समीर वानखेडे हिंदू आहेत की मुस्लीम हा वाद का निर्माण होत आहे?

फोटो स्रोत, ANI
क्रूज ड्रग्ज प्रकरणामुळं सुरू झालेल्या चर्चांमधून आर्यन खानं हे नाव आता मागं पडलं असून, त्याला अटक करणारे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचीच सध्या सगळीकडं चर्चा आहे. विशेष म्हणजे त्यांच्या धर्माच्या मुद्दयावरून संभ्रम आणि आरोप- प्रत्यारोप होत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र सरकारमधले मंत्री असलेले नवाब मलिक यांनी एका पाठोपाठ समीर वानखेडे यांच्या विरोधात आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.
समीर वानखेडे यांनी धर्मांतराच्या माध्यमातून दुहेरी लाभ मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. त्यासंबंधी नवाब मलिकांनी बुधवारी (27 ऑक्टोबर) सकाळी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामादेखील ट्विटरवर पोस्ट केला.
या संपूर्ण प्रकरणात समीर वानखेडे यांच्या तर्फेही स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. मात्र आता या संपूर्ण प्रकरणानं धर्माच्या मुद्द्यावर वळण घेतलेलं पाहायला मिळत आहे.
समीर वानखेडे यांचा नेमका धर्म कोणता? याबाबत चर्चांना सुरुवात झाली आहे. दोन्हा बाजुंनी या मुद्द्यांवरून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.
मलिकांनी सादर केला 'निकाहनामा'
नवाब मलिक यांनी बुधवारी सकाळीच या प्रकरणाशी संबधित कथित माहिती ट्विटरच्या माध्यमातून सर्वांसमोर आणली. त्यात समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा आणि फोटो यांचा समावेश आहे.
नवाब मलिकांनी पोस्ट केलेल्या या निकाह नाम्यामध्ये समीर वानखेडे यांचं पूर्ण नाव 'समीर दाऊद वानखेडे' असं लिहिण्यात आलेलं आहे.

फोटो स्रोत, Twitter
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या निकाहचा फोटोदेखील पोस्ट केला आहे. 7 डिसेंबर 2006 रोजी अंधेरीमध्ये समीर दाऊद वानखेडे आणि सबाना कुरेशी यांचा निकाह झाला होता, असं ट्विटर पोस्टमध्ये मलिक यांनी म्हटलं आहे.
समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा हा निकाहनामा असून, त्यात मेहेरची रक्कम 33 हजार रुपये होती, असा उल्लेखही नवाब मलिक यांनी केला आहे.
तर समीर वानखेडे हिंदूच असल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
नवाब मलिकांचे आरोप
नवाब मलिक यांनी सोमवारी 25 ऑक्टोबर रोजी ट्विटवर एक पोस्ट केली होती. त्या पोस्टमध्ये असलेलं दस्तऐवज म्हणजे समीर वानखेडे यांचा जन्माचा दाखला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
'Sameer Dawood Wankhede का यहां से शुरू हुआ फर्जीवाडा' असा उल्लेख असलेलं ट्वीट त्यांनी केलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
या मुद्द्यावरून दोन्ही बाजुंनी अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत. नवाब मलिक यांनी सादर केलेलं जन्मप्रमाणपत्र खोटं असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आई मुस्लीम, पिता हिंदू
नवाब मलिक यांच्या आरोपांच्या नंतर समीर वानखेडे यांनी देखील प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून यावर स्पष्टीकरण दिलं. तसंच अशा आरोपांच्या माध्यमातून मानसिक दबाव निर्माण केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
"माझे वडील ज्ञानदेव कचरूजी वानखेडे 30 जून 2007 रोजी अबकारी विभागातून निवृत्त झाले. माझे वडील हिंदू असून माझी आई मुस्लीम होती," असं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.
खऱ्या भारतीय परंपरेचं पालन करणाऱ्या एका बहुधार्मिक आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील मी सदस्य असून, मला त्याचा अभिमान आहे, असंही वानखेडे यांनी सांगितलं.
वानखेडे यांनी या पत्रातून त्यांच्या पहिल्या विवाह आणि घटस्फोटाबाबतही माहिती दिली. तसंच घटस्फोटानंतर अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्याशी दुसरा विवाह केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
मात्र, अशा प्रकारे खासगी दस्तऐवज पोस्ट करणं अपमानजनक आहे. माझ्या कुटुंबाच्या खासगी जीवनावर विनाकारण हल्ला करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप वानखेडे यांनी मलिकांवर केला.
या संपूर्ण प्रकरणामुळं मी आणि माझ्या कुटुंबाला प्रचंड मानसिक दबावात ढकललं आहे. अशा प्रकारे होणाऱ्या वैयक्तिक आणि अपमानास्पद आरोप आणि हल्ल्यामुळं दुःखी असल्याचंही वानखेडे यांनी या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय.
कुटुंबीय वानखेडेंच्या पाठिशी
समीर वानखेडे यांनी प्रसद्धी पत्रकाच्या माध्यमातून नवाब मलिकांच्या विविध आरोपांवर स्पष्टीकरण दिलं. तर त्यांच्या कुटुंबीयांनीही समोर येत त्यांची पाठराखण केली.
समीर वानखेडे यांची बहीण यास्मीन आणि पत्नी क्रांती रेडकर यांनी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळे आरोप फेटाळत मलिकांवरच आरोप केले आहेत.

फोटो स्रोत, INSTAGRAM/KRANTI REDKAR
"मलिकांकडं पुरावे असतील तर ते मीडियासमोर का वेळ वाया घालवत आहेत. त्यांनी कोर्टात जावं," असं त्यांच्या बहिणीनं पत्रकार परिषदेत म्हटलं.
नवाब मलिक वानखेडे यांचा जन्माचा दाखला ऑनलाईन मिळत नसल्याचं म्हणत आहेत. पण त्यांना हा दाखला कशासाठी हवा आहे. त्यांना अशा अधिकाऱ्याचा दाखला मिळवण्याचा काय अधिकार आहे, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
समीर वानखेडे यांच्या वडिलांनीही, "माझं नाव ज्ञानदेव कचरू वानखेडे असंच आहे. दाऊद हे नाव माझं कधीही नव्हतं. त्यामुळं कोणीतरी हा खोडसाळपणा केला आहे," असं म्हणत या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिलंय.
वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनीही नवाब मलिकांवर खोटी कागदपत्रं सादर करत असल्याचा आरोप केला आहे. नवाब मलिक रोज एक नवीन खोटा पुरावा सादर करतात आणि आम्ही खरा पुरावा देतो, असं त्या म्हणाल्या.
मलिक हे सर्रास खोटे आरोप करत आहेत. त्या माध्यमातून ते आमची बदनामी करण्याचा करत असल्याचंही क्रांती रेडकर यांनी म्हटलं.
तर मंत्रिपद सोडेन...
दरम्यान, क्रांती रेडकर यांच्या आरोपांवर नवाब मलिक यांनी त्यांना थेट आव्हान दिलं आहे.
"मी सादर केलेला जन्माचा दाखला किंवा निकाहनामा अशी कागदपत्रं खोटी असतील, तर मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. मात्र जर ते खरं असेल तर वानखेडे काय करणार ते त्यांनी सांगावं," असं मलिक यांनी 'इंडिया टुडे' या वाहिनीशी बोलताना म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images
मी सादर केलेली कागदपत्रं खोटी आहेत हे सिद्ध करण्यासाठी ते आजोबांची, वडिलांची कागदपत्रं सादर करत आहेत. मात्र, समीर वानखेडे यांचं जन्म किंवा जात प्रमाणपत्र ते सादर करत नाहीत, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
क्रांती रेडकर यांनी माझ्यावर बदनामी करत असल्याचा आरोप केला आहे. तसं असेल तर माझ्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करा. पण तसं करायला ते तयार नाहीत. ते त्यापासून दूर पळत आहेत, असंही मलिक म्हणाले.
'धर्माचा मुद्दा नाही'
नवाब मलिक यांनी हे आरोप करतानाच धर्म हा मुद्दा नसल्याचं म्हटलंय.
मलिक यांनी एका ट्विटमध्ये याबाबतची त्यांची भूमिका मांडली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
समीर वानखेडे यांनी बेकायदेशीरपणे खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवून मागासवर्गीय गटातील एका उमेदवाराची नोकरीची संधी हिसकावली. त्यामुळं हे करत असल्याचं नवाब मलिक यांचं म्हणणं आहे. पण काही जण याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्यांचा आरोप आहे.
मलिक यांनी हा धर्माचा मुद्दा नसल्याचं म्हटलं असलं, तरी या संपूर्ण प्रकरणानंतर आता प्रामुख्यानं समीर वानखेडे यांचा धर्म कोणता अशीच चर्चा सुरू झाली आहे.
'समीर हिंदूच'
समीर वानखेडे यांच्या एका निकटवर्तीयांने नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं,
"समीर हिंदू आहे आणि वडीलही हिंदू धर्माचे आहेत. आई मुसलमान होती. त्या दोघांनी धर्म बदलला नव्हता. समीर यांनी त्यांच्या आईच्या इच्छेप्रमाणे मुस्लीम पद्धतीने पहिलं लग्न केलं होतं. त्यांना मुसलमान सिद्ध करण्याचे प्रयत्न का केले जात आहेत? ते धर्मनिरपेक्ष आहेत. त्यांचं लग्न Special marriage act नुसार रजिस्टर करण्यात आलं आणि घटस्फोटही रजिस्टर झालाय."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








