उद्धव ठाकरे : दसरा मेळाव्याच्या भाषणातले 9 महत्त्वाचे मुद्दे

@ShivsenaComms

फोटो स्रोत, @ShivsenaComms

शिवसेनेचा परंपरागत 'दसरा मेळावा' मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात झाला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली.

1. देवेंद्र फडणवीसांवर टीका

दसरा मेळव्याच्या भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीसांवर नाव न घेता टीका केली आहे. 'मी मुख्यमंत्री आहे असे मला कधीही वाटू नये,' असं त्यांनी म्हटलंय.

"मी पुन्हा येईन म्हणाले आता, मी गेलोच नाही... मी गेलोच नाही... असं म्हणत आहेत. पदं येतील जातील तुमच्या डोक्यात त्याचा अहंकार किंवा हवा जाता कामा नये, असे संस्कार आणि आशिर्वाद आम्हाला मिळाले आहेत.

मी आज काय बोलणार, कोणाचा समाचार घेणार, कोणाचे वाभाडे काढणार अशा चर्चा होत्या. माझ्या भाषणानंतर अनेक जणं चिरकण्यासाठी तयारच आहेत. पण मी त्यांच्यासाठी नव्हे तर जनतेसाठी बोलत आहे," असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला आहे.

"सध्या एक विकृती आली आहे. ठाकरे कुटुंबीयांवर हल्ले केले जात आहेत, बदनामी केली जात आहे. पण हे त्यांचं रोजगार हमीचं काम झालेलं आहे. त्या चिरकण्यानुसार त्यांना पैसे मिळतात. पण त्यानं फायदा होणार नाही.

2. 'हर्षवर्धन पाटलांना भाजपचे ब्रँड अॅम्बेसेडर करा'

भाजपात का गेलो हे हर्षवर्धन पाटलांनी अनाहूतपणे बोलून दाखवलं. अशा सर्वांना भाजपचे ब्रँड अॅम्बेसेडर करायला पाहिजे," अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

"आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही. पण जर कोणी अंगावर आलं तर त्यांना सोडत नाही. आव्हान द्यायच तर निधड्या छातीने द्या... ईडी, सीबीआय, आयटीच्या माध्यामातून देऊ नका. मी पण आव्हान पक्षप्रमुख म्हणून देतोय. मुख्यमंत्री म्हणून नाही. मुख्यमंत्री म्हणून आव्हान द्यायचं आणि पोलीसांच्या मागे लपायचं... ही वृत्ती नाही," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

3. '...तर मी या जीवनातून बाजुलाही झालो असतो'

विचार एकच असल्यामुळं आम्ही युती केली होती. शिवसेनेला दिलेला शब्द पाळला असता तर तुम्ही परत मुख्यमंत्री झाले असता. मी केवळ शिवसेना प्रमुखांना दिलेला शब्द पाळण्यासाठी पद स्वीकारलं. शिवसेनाप्रमुखांना दिलेलं वचन अजून पूर्ण झालेलं नाही. कारण शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचं वचन दिलं होतं आणि ते मी पूर्ण करणारच, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

त्याचवेळी "पण त्यांनी दिलेलं वचन पाळलं असतं आणि शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं असतं, तर कदाचित मी या जीवनातून बाजुलाही झालो असतो," असा ठाकरे म्हणालेत.

हे माझं क्षेत्र नाही अशी माझ्यावर टीका होते. हो हे माझं क्षेत्र नाही, तरीही पुत्र कर्तव्य निभावण्यासाठी मी या क्षेत्रात आलो आणि पाय रोवून ठामपणे उभा आहे. खांद्यावर असलेली जबाबदारी पार पाडल्याशिवाय मी राहणार नाही या निश्चयाने मी उभा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

"मै फकीर हू, झोली उठाके... असे कर्मदरिद्री विचार आमचे नाहीत," असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

4. हिंदुत्वाला नवहिंदूंपासून धोका - ठाकरे

"मोहनजींनी हिंदुत्व म्हणजे काय हे सांगितलं. पण आमचं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे. शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला देश म्हणजे आमचा धर्म अशी शिकवण दिली आहे," असं त्यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना उद्देशून म्हटलंय.

मोहन भागवत यांनी या देशात सर्वांचे पूर्वज एक होते, असं म्हटलं. ते खरं आहे. मग विरोधी पक्षांचे पूर्वज परग्रहावरून आले होते का. आता आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे पूर्वज परग्रहावरून आले होते का? लखीमपूर खिरीमध्य जे झालं त्या शेतकऱ्यांचे पूर्वच परग्रहावरून आले होते का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

मोहन भागवत सत्ता मिळवण्याच्या लालसेनं आम्ही काही करत नसल्याचं म्हणाले. मात्र मग सत्ता मिळवण्यासाठी आज जे काही केलं जात आहे, ते तुमच्या शिकवणीतून बाहेर पडणाऱ्यांना का सांगत नाही, असंही ठाकरे म्हणाले.

"सध्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू होता. त्यावेळी स्वातंत्र्य लढ्यात पंजाब, बंगाल आणि महाराष्ट्र अग्रेसर होता. बंगालनं दाखवून दिलं आहे, तीच जिद्द आपल्याला ठेवावी लागेल. हर हर महादेव म्हणजे काय हे पुन्हा एकदा आपल्याला दाखवून द्यावं लागेल.

@ShivsenaComms

फोटो स्रोत, @ShivsenaComms

"92-93 साली शिवसेना उतरली नसती तर सध्या सत्तेसाठी टपून बसलेले कुठं राहिले असतं कळलंही नसतं. हिंदुत्वाला सध्या सर्वाधिक धोका हा उपटसुंब नवहिंदूंपासून आहे. हिंदुत्वाला सर्वाधिक धोका होता, त्यावेळी केवळ बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाच्या शत्रूंसमोर उभे राहिले होते.

"आम्ही पालखीचे भोई आहोत, पण आम्ही तुमची पालखी वाहणारे नाही. तुमच्या पक्षाची पालखी वाहण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही, अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे.

5. 'उत्तर प्रदेशात लोकशाहीचा मळा फुलला आहे की काय?'

"राज्यपालांनी महिलांच्या एका अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यपालांनी विधानसभेचं दोन दिवसांचं अधिवेशन घेण्यासंदर्भात पत्र लिहिलं. त्यावर मी त्यांना नम्रपणे विनंती केली. महिलांवर देशभरात अत्याचार होत आहे, त्यामुळं पंतप्रधान मोदींना सांगून संसदेचं अधिवेशन घ्यायला सांगा, असं मी त्यांना म्हटलो.

महाराष्ट्रात काही घडलं, की लगेचच लोकशाहीचा खून झाला असा गळा काढतात. पण मग उत्तर प्रदेशात लोकशाहीचा मळा फुलला आहे की काय?

आमच्याकडे सगळे सण असतात, मात्र काहींच्या घरी वर्षभर शिमगाच असतो. आंदोलनकांना अडवणारे आमचे पोलिस माफिया असतील, तर उत्तर प्रदेशचे पोलिस जे करत आहेत ते काय भारतरत्न आहेत का?

भारत माता की जय हे जोरानं ओरडलं की, मी मोठा देशभक्त होतो हे आजचं दुर्दैव आहे. पण देशासाठी नेमकं काय केलं याचा विचार कोण करणार.

केंद्राचे अधिकार किती, राज्याचे अधिकार किती यावर चर्चा व्हायला हवी. केंद्राएवढेच सगळे राज्य सार्वभौम आहेत, असं बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तयार केल्यानंतर ठामपणे सांगितलं होतं."

6 'सत्तेचं व्यसन मूळापासून उपटा'

सत्तेचं व्यसन हा देखील एक अंमली प्रकारच आहे. सर्व काही माझ्या अंमलाखाली असावं हेदेखील अंमली पदार्थाचे व्यसन आहे, अशी टाका त्यांनी भाजपवर केली आहे.

@ShivsenaComms

फोटो स्रोत, @ShivsenaComms

"सत्तेचं व्यसन लागणं सर्वांत वाईट आहे. ते लागलं की लोकांची घरंदारं उध्वस्त करायलाही मागंपुढं पाहिलं जात नाही. त्यामुळं हे व्यसन सर्वांत आधी मुळापासून उपटून टाकणं गरजेचं आहे.

तरुणांना रोजगार मिळणं गरजेचं आहे. युवा शक्ती घडवली नाही तर देशाची घडी विस्कटून जाईल.

आपण महाराष्ट्राला पुढं नेण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र त्यामुळं पोटात दुखत असल्यानं विरोधक महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत."

7. 'मराठी भाषा भवन उभारणार'

मराठी भाषेसाठी दिमाखदार मराठी भाषाभवन आपण उभं करत आहोत. तसंच मराठी नाटकांचा इतिहास सांगणारं मराठी नाटक भवन करत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.

धारावीत लोकांचं पुनर्वसन करण्याबरोबरच जागतिक दर्जाचं आर्थिक केंद्रदेखील निर्माण करणार आहोत. त्याचप्रमाणे मुंबईत लष्कराचं एक संग्रहालयदेखील तयार करत आहोत, असं ठाकरे म्हणाले.

8 'बंगालसारखी तयारी ठेवा'

"बंगालनं जी कामगिरी केली आहे, ती तयारी महाराष्ट्रामध्ये असायला हवी. कोणी कितीही हल्ले केले, तरी ती परतवण्याची तयारी ठेवावी लागेल," असं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केलं आहे.

"हिंदुत्वाची शिडी करून जे वर चढले आहेत, ते आता इंग्रजांची नीती साधू शकतात. तोडा फोडा आणि राज्य करा असं करून समाजात भेदभावाच्या भिंती उभ्या करून ते सत्तेची गाजरं खात बसतील.

9 हिंदू तितुका मेळवावा

त्यामुळं मराठी समाजातील भेदाभेद गाडून मराठी माणसाशी भक्कम एकजूट बांधायला हवी. त्याचबरोबर मराठी अमराठी भेदभाव गाडून हिंदुंचीही एकजूट बांधायला हवी,"असं ते शेवटी म्हणाले

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, SHIV SENA

मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा याप्रमाणेच हिंदू तितुका मेळवावा, हिंदुस्तान धर्म वाढवावा असं करायला हवं, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणाचा शेवट केला.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)