सावित्रीबाई फुले यांना 'साध्वी' म्हणण्यावरून वाद का निर्माण झाला?

साध्वी सावित्रीबाई फुले नाव असलेला फलक

फोटो स्रोत, Facebook / Asim Sarode

    • Author, राहुल गायकवाड
    • Role, बीबीसी मराठीसाठी

पुण्यातल्या एका बागेला नाव देताना सावित्रीबाई फुलेंच्या नावापुढे 'साध्वी' लिहिण्यात आल्याने त्यावरून वाद निर्माण झालाय. 'साध्वी सावित्रीबाई फुले उद्यान' असं लिहीलेला फोटो व्हायरल झाला होता. नेमकं काय आहे हे प्रकरण?

पुण्याच्या क्षेत्रीय कार्यालय परिसरातील, ढोले पाटील रोडवरील उद्यानाच्या नावावरून या वादाला सुरुवात झाली.

या बागेचं नाव - 'साध्वी सावित्रीबाई फुले उद्यान'. या नावाचा फोटो व्हायरल झाला.

फोटो व्हायरल झाल्यानंतर कायदेतज्ञ अॅड असीम सरोदे यांनी त्याबाबत फेसबुकवर पोस्ट लिहीत सावित्रीबाई फुले यांच्या नावासमोर 'साध्वी' या शब्दाच्या वापरावर आक्षेप घेतला.

पण हे नामकरण 4 जानेवारी 1991 ला कॉंग्रेसच्या काळात करण्यात आल्याचं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सरोदे यांच्या लक्षात आणून दिले. कोणाचीही सत्ता असताना हे नाव दिले असले तरी आता हे नाव बदलण्यात यावे अशी मागणी सरोदे यांनी केली आहे.

सरोदे यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. समता सैनिक दलाच्या काही कार्यकर्त्यांनी गुरुवारी रात्रीच त्या फलकावरील साध्वी हा शब्द पुसून टाकला. 'ज्ञानज्योती' सावित्रीबाई फुले उद्यान असा नवीन फलक त्यांनी लावला.

साध्वी सावित्रीबाई फुले नाव असलेला फलक

'सावित्रीबाई फुले यांचे काम व्यापक, रचनात्मक व शैक्षणिक क्रांती घडवून संपूर्ण भारताच्या अर्ध्या वंचित स्त्री लोकसंख्येला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणारे होते. साध्वी हा शब्द धार्मिक किंवा ज्या पौराणिक सांस्कृतिक अर्थाने वापरला जातो त्याला सावित्रीबाईंच्या कार्याला मर्यादित करणे चुकीचे आहे. त्यामुळे साध्वी हा शब्द काढून टाकावा,' असं असीम सरोदे त्यांच्या दुसऱ्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात.

'साध्वी' या शब्दाबाबत सरोदे यांनी नेमका आक्षेप का घेतला हे बीबीसी मराठीने सरोदे यांच्याकडून जाणून घेतले. सरोदे म्हणाले, ''साध्वी हा शब्द 1995 च्या नंतर बदनाम झाला आहे. साध्वी या शब्दाचं पावित्र्य काही लोकांनी नष्ट केलं आहे. साध्वी ऋतंबरांपासून आपण पाहिलं आहे. वेगवेगळ्या साध्वी आल्या, त्यांनी अनेक विचित्र वक्तव्यं केली आहे. त्यांनी धार्मिक भावनांचा गैरफायदा घेतला आहे. त्यामुळे साधेपणामुळे किंवा बाळबोधपणे 1991 ला सावित्रीबाईंच्या नावापुढे 'साध्वी' लिहीलं असेल तर त्यामागे फार विचार नाही आणि तो साधेपणातून केलेला मूर्खपणा आहे.''

''साध्वी या शब्दाला हिंदुत्त्वाचा गंध लागला आहे, तो अनेकांना स्वीकारण्यासारखा नाही. एखाद्याचे विचार व्यवहारात आणायचे नसतात, तेव्हा त्या व्यक्तीला देव करण्याची परंपरा सर्वच धर्मात आहे. सावित्रीबाई फुलेंनी माणूस म्हणून काम केलं. स्त्रियांना त्यांनी मुख्य प्रवाहात आणलं. त्यांच्यामुळे आपण सामाजिक विकसितता अनुभवतो आहे. आताच्या काळात ज्यांनी 'साध्वी' हा शब्द धारण केला आहे, त्यांनी हिंसा, कटकारस्थान, विध्वंस केला आहे. त्यामुळे 'साध्वी' शब्दाला पावित्र्य राहिलं नाही, तो शब्द कलुषित झाला आहे. त्यामुळे या काळात सावित्रीबाईंना 'साध्वी' म्हणणे योग्य होणार नाही.'' असही सरोदे म्हणतात.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे अभ्यासक प्राध्यापक हरि नरके यांच्याशी बीबीसी मराठीने चर्चा केली. सावित्रीबाई फुले यांच्या नावासमोर 'साध्वी' लावण्याबाबत त्यांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

साध्वी सावित्रीबाई फुले नाव असलेला फलक

फोटो स्रोत, Facebook / Asim Sarode

नरके म्हणतात, ''शब्दाचे अर्थ काळाच्या ओघात बदलत जातात. नवीन संदर्भ येत जातात. त्यामुळे तो शब्द वाईट बनून जातो. अलिकडच्या काळात साध्वींवर बॉम्ब स्फोटाचे आरोप झाले, त्यांच्या वक्तव्यांमुळे समाजात त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण झाला आहे. 1991 च्या आधीची मांडणी पाहिली तर 'साध्वी' या शब्दाचा अर्थ त्याग करणारी स्त्री , समाजासाठी वाहून घेणारी स्त्री असा अर्थ त्याला प्राप्त झाला होता. ज्यांनी त्यावेळी सावित्रीबाईंच्या नावापुढे 'साध्वी' हे विशेषण वापरलं ती माणलं सावित्रीबाईंबाबत आदर असलेली माणसं आहेत.''

''31 वर्षानंतर या फलकावर आक्षेप घेतला जातोय, त्यामुळे आक्षेप घेणारे किती जागरुक आहेत हे दिसतंय. सनसनाटी करण्याऐवजी पालिकेला पत्र लिहून हा विषय मांडता आला असता. मात्र हा विषय पालिकेकडे न पोहचवता त्यातून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनेक तरुणांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. त्यांना आता वापरल्या जाणाऱ्या साध्वी या शब्दाला अर्थ माहित आहे. आधी तो कसा वापरला जात होता हे माहीत नाही.''

''सावित्रीबाई फुले यांच्या सुरुवातीच्या चरित्रांमध्ये त्यांचा उल्लेख 'साध्वी' सावित्रीबाई फुले असाच करण्यात आला आहे. 1930 साली शांताबाई बनकर यांनी सावित्रीबाईंच पहिलं चरित्र लिहीलं. त्यात त्यांनी सावित्रीबाईंना 'साध्वी' म्हटलं होतं. त्यावेळी 'साध्वी' या शब्दाचा अर्थ त्याग करणारी स्त्री असा होता. त्यामुळे उग्र प्रतिक्रिया देण्याऐवजी ज्यांनी हे नाव दिलं त्यांचा हेतू काय होता हे तपासलं पाहिजे. सावित्रीबाईंच्या पुढे क्रांतिज्योती किंवा इतर विशेषणे लावण्यास कोणाचा आक्षेप नाही. परंतु प्रतिक्रीया देणाऱ्या किती लोकांनी सावित्रीबाईंचे स्मारक होण्यासाठी प्रयत्न केले असा प्रश्न आहे.''

साध्वी सावित्रीबाई फुले नाव असेलेला फलक

फोटो स्रोत, Facebook / Asim Sarode

''असिम सरोदे यांनी फेसबुक पोस्ट लिहीण्याऐवजी पालिकेला प्रथम पत्र लिहून हा विषय मांडायला हवा होता. त्यावर कारवाई झाली नसती तर फेसबुकवर पोस्ट लिहीण्यास हरकत नव्हती. सनसनाटीपणा टाळून परिवर्तनाचा आग्रह धरायला हवा होता. शब्दांचे अर्थ बदलतात परंतु परिवरतनाचे काम करायचे असेल तर हेतु पाहणे सुद्धा गरजेचे आहे.'' असंही नरके पुढे सांगतात.

'साध्वी' या शब्दाचा नेमका अर्थ आहे तरी काय?

'साध्वी' हा शब्द कुठे त्याग करणारी स्त्री म्हणून वापरला जातो तर दुसरीकडे त्याला धार्मिक रंग असल्याचे देखील म्हंटलं जातं. त्यामुळे 'साध्वी' या शब्दाचा नेमका अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी भाषेचे अभ्यासक मनोहर जाधव यांच्याकडून केला.

जाधव सांगतात, ''साध्वी हा शब्द पवित्र या अर्थाने वापरला जातो. त्याचबरोबर त्याग करणारी महिला अशी देखील एक बाजू आहे या शब्दाची. हा शब्द विशेषतः आध्यात्मिक, धार्मिक क्षेत्रात वापरला जातो. समाजसुधारकांसाठी हा शब्द वापरला जात नाही. सावित्रीबाईंच्या संदर्भात हा शब्द वापरला तर त्यांच्या कार्याच उद्दात्तीकरण होतं. त्याला माणूसपणाचा गंध राहत नाही. तो अर्थ देवात्वाकडे जातो. त्यामुळे समाजसुधारकांच्या नावापुढे हा शब्द वापरणे संयुक्तिक होत नाही.''

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)