परमबीर सिंह नेमके कुठे आहेत?

- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची सध्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्यात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी त्यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा या चर्चेला फोडणी मिळाल्याचं दिसून येतं आहे.
बुधवारी (20 ऑक्टोबर) अमृता फडणवीस एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
अमृता फडणवीस म्हणाल्या, "एक पोलीस कमिश्नर असो किंवा माजी गृहमंत्री असो, त्यांचे कुठे हनिमून चाललेत आपल्याला माहीत नाही. पण हे व्हायला नको ही खरी गोष्ट आहे. तुम्हाला पण कुठे दिसले तर रिपोर्ट करा. त्या लोकांना लवकरात लवकर पकडता येईल."
अमृता फडणवीस यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर बऱ्याच प्रतिक्रिया मिळत आहेत.
राज्य सरकारलाही माहित नाही परमबीर सिंह कुठे आहे?
महाराष्ट्र सरकारने बुधवारी (20 ऑक्टोबर) बॉम्बे हायकोर्टात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह कुठे आहेत याची माहिती नसल्याचं सांगितलं. परमबीर सिंह यांना पोलीस शोधू शकले नाहीत अशी माहिती सरकारने कोर्टाला दिली आहे.
दरम्यान, परमबीर सिंह यांचे वकील महेश जेठमलानी यांनी राज्य सरकारने परमबीर सिंह यांना फरार घोषीत केलेलं नाही. त्यामुळे सरकारने परमबीर सिंह यांच्याबाबत कोर्टात दिलेली ग्वाही पुढे सुरू ठेवावी अशी मागणी केलीये.
राज्य सरकारने मे महिन्यात परमबीर सिंह यांच्याविरोधात कठोर कारवाई करणार नाही अशी ग्वाही कोर्टात दिली होती. बुधवारच्या सुनावणीत सरकारने आम्ही ही ग्वाही आता पुढे देऊ इच्छित नाही अशी भूमिका घेतली आहे.
ठाणे पोलिसात परमबीर सिंह यांच्याविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला होता.
शरद पवारांनीही उपस्थित केले होते प्रश्नचिन्ह
"केंद्र सरकार तपास यंत्रणांचा सतत राजकीय वापर करतंय असं दिसतय. अनिल देशमुखांवर एका पोलीस कमिशनरने आरोप केले. त्यामुळे अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. या आरोपांवरून विविध आरोपांची मालिका सुरू झाली. हे आरोप करणारे गृहस्थ गायब आहेत," असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परमबीर सिंह यांच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
शरद पवार यांनी आज (13 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी ईडीची अजित पवार तसंच अनिल देशमुख आणि इतर नेत्यांवरील कारवाई, एनसीबीची कारवाई या विषयांवर भाष्य केलं.
यावेळी अनिल देशमुखांवरील कारवाईबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं की, अनिल देशमुखांवर पाचव्यांदा छापा टाकला. या यंत्रणांचं कौतुक केलं पाहीजे. एकाच घरावर 5 वेळा छापा घातला. अनिल देशमुखांवर आरोप करणारे अधिकारी कुठे आहेत?
गेल्या काही दिवसांपासून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे बेपत्ता आहेत. ते परदेशात गेले आहेत अशा देखील बातम्या येत आहेत याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं होतं की, 'ते परदेशात गेलेत की नाहीत हे गृहखात्याला माहीत नाही.'
'परमबीर सिंहांनी गैरहजेरीबाबत गृहखात्याला कळवलेलं नाही'
परमबीर सिंह यांच्याबाबत गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की "राज्यातील कोणत्याही अधिकाऱ्याला परदेशात जाण्याआधी मुख्यमंत्री आणि सरकारच्या परवानगीची आवश्यकता असते त्यांनी अशी परवानगी घेतलेली नाही. आम्ही आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. याबाबत केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून पुढील पावले आम्ही उचलणार आहोत."
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह गायब झालेत का? हा प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारण म्हणजे, महाराष्ट्र पोलिसांना परमबीर सिंह कुठे आहेत हे अजूनही शोधता आलेलं नाही.
चांदीवाल कमिशनने जारी केलेल्या जामीनपात्र वॉरंटनंतर पोलिसांनी सिंह यांना शोधण्याचा प्रयत्न केला. पण, परमबीर सिंह यांना शोधण्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत.
वैद्यकीय कारणांमुळे सुट्टीवर असल्याचं परमबीर सिंह यांनी मे महिन्यात सरकारला कळवलं. मात्र, पाच महिन्यांनंतरही सरकारला त्यांचा ठाव ठिकाणा शोधण्यात यश आलेलं नाही.
परमबीर सिंह कुठे आहेत?
बीबीसी मराठीने परमबीर सिंह यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा फोन गेल्याकाही दिवसांपासून बंद येतोय. आम्ही त्यांना व्हॉट्सअपवरही संपर्क केला. पण, संपर्क होऊ शकला नाही.
परमबीर सिंह यांच्या निकटवर्तीयांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला आहे.

अॅन्टिलिया स्फोटकं प्रकरणानंतर परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली.
होमगार्डच्या पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर काही दिवसांनी परमबीर सिंह सुट्टीवर गेले.
गृहमंत्री कार्यालयाच्या माहितीनुसार, वैद्यकीय कारणांमुळे सुट्टी घेत असल्याचं सिंह यांनी सरकारला कळवलं होतं.
परमबीर सिंह 4 मे 2021 पासून वैद्यकीय रजेवर आहेत.
नाव न घेण्याच्या अटीवर गृहमंत्रालयातील अधिकारी सांगतात, "परमबीर सिंह यांची वैद्यकीय रजा दोन वेळा वाढवण्यात आलीये. पण, त्यानंतर सिंह यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही."
पोलिसांना सापडत नाहीत परमबीर सिंह?
मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी झाल्यानंतर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर 100 कोटी रूपयांची खंडणी वसूल करण्याचा खळबळजनक आरोप केला.
अनिल देशमुखांना मंत्रीपद गमवावं लागलं. सीबीआयने आणि ईडीच्या चौकशीचा फेरा सुरू झाला.
दरम्यान, अनिल देशमुख खंडणी प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने निवृत्त न्यायमूर्ती कैलाश चांदीवाल यांची समिती गठीत केली. चांदीवाल कमिशनने सिंह यांना चौकशीला हजर रहाण्यासाठी समन्स बजावले. पण, सिंह चौकशीला उपस्थित राहीले नाहीत.
चांदीवाल कमिशनेने सिंह यांच्याविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं. सीआयडीने सिंह यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांच्या हाती काहीच लागलं नाही.

फोटो स्रोत, FACEBOOK/ANIL DESHMUKH
चांदीवाल कमिशनचे वकील शिरिष हिरे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, "सीआयडीचे अधिकारी परमबीर सिंह यांच्या चंदीगड आणि मुंबईतील तीन माहित असलेल्या ठिकाणी गेले. पण, सिंह उपलब्ध असल्याने त्यांना वॉरंट बजावता आलं नाही."
ते पुढे म्हणाले, "परमबीर सिंह कमिशनसमोर उपस्थित राहीले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात दुसरं वॉरंट बजावण्यात आलंय." चांदीवाल कमिशनने परमबीर सिंह यांना चौकशीसाठी 6 ऑक्टोबरला उपस्थित रहाण्याचे आदेश दिलेत.
परमबीर सिंह कुठे आहेत? ते कमिशनसमोर का येत नाहीत? हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्या वकीलांशी संपर्क केला. त्यांचे वकीलही परमबीर सिंह कुठे आहेत यावर प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत.
नाव न घेण्याच्या ते सांगतात, "परमबीर सिंह यांनी चांदीवाल कमिशनच्या नियुक्तीविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केलीये. लवकरच त्यावर सुनावणी होणार आहे."
राज्य सरकारची भूमिका काय?
परमबीर सिंह यांच्याविरोधात जुलै महिन्यात एसीबीने खुली चौकशी सुरू केली होती. एसीबीने त्यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती.
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना प्रसारमाध्यमांनी परमबीर सिंह यांच्याविरोधातील चौकशीबाबत विचारलं. ते म्हणाले होते, "परमबीर सिंह यांना चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आलीये. त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि खंडणीचे आरोप आहेत."
"परमबीर यांच्यावरील आरोपांची चौकशी होईल. त्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल," असं ते म्हणाले होते.
परमबीर सिंह न होणाऱ्या संपर्काबद्दल गृहविभागाचे अधिकारी उघडपणे बोलण्यास तयार नाहीत.

फोटो स्रोत, HINDUSTAN TIMES
पण, रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत दिलीप वळसे-पाटील म्हणाले होते, "रजेवर गेले असताना त्यांना त्यांचा पत्ता सरकारला देणं बंधनकारक आहे. पण, त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. यावर गृहविभाग विचार करून निर्णय घेईल."
पण, सरकारी अधिकारी इतके दिवस अनुपस्थित राहू शकतो? यावर माजी IPS अधिकारी सुरेश खोपडे सांगतात, "वैद्यकीय कारणांसाठी रजा घेतली असेल तर अधिकाऱ्याला त्याचा पत्ता सरकारला देणं बंधनकारक नाही. पण वैद्यकीय सर्टिफिकिट द्यावं लागतं."
ते पुढे म्हणतात, "एखादा अधिकारी दीर्घकाळ रजेवर असेल आणि सरकारला हा अधिकारी खोटं बोलत असल्याचा संशय आला. तर सरकार प्राथमिक चौकशी सुरू करू शकतं. अशा परिस्थितित अधिकाऱ्याच्या कुटुंबियांचा जबाब नोंदवण्यात येतो.
परमबीर सिंह यांना निलंबित करा- पोलीस महासंचालक
महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक (DGP) संजय पांडे यांनी गृह विभागाला मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवलाय.
परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीचे गुन्हे दाखल झालेत. त्यामुळे, त्यांचं निलंबन करण्यात यावं असा प्रस्ताव पोलीस महासंचालकांनी दिलाय.

फोटो स्रोत, ANI
परमबीर सिंह यांच्या निलंबंनाच्या प्रस्तावावर पोलीस महासंचालकांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
याबाबात गृह विभागातील अधिकारी नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात, "परमबीर सिंहांच्या निलंबन प्रस्तावाबाबत अधिक स्पष्टतेची गरज आहे. त्यामुळे हा प्रस्ताव पुन्हा पोलीस महासंचालकांकडे पाठवण्यात आलाय."
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 25 अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव गृह विभागाला पाठवण्यात आलाय.
परमबीर सिंह यांच्यावर दाखल गुन्हे
वरिष्ठ IPS अधिकारी परमबीर सिंह सद्य स्थितीत होमगार्डचे प्रमुख आहेत.
मुंबई, ठाणे आणि अकोल्यात त्यांच्याविरोधात खंडणीचे पाच गुन्हे दाखल करण्यात आलेत.
- मुंबईच्या मरीनड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये खंडीणी मागितल्याचा गुन्हा
- ठाण्याच्या कोपरी पोलिसांत किडनॅपिंग, खंडणी आणि फसवणूकीचा गुन्हा
- ठाण्यातील नगर पोलीस स्टेशनमध्ये खंडणी मागितल्याप्रकरणी FIR
- अकोल्यात SC-ST कायद्यांतर्गत गुन्हा
- मुंबईच्या गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा
वरिष्ठ अधिकारी सांगतात, "परमबीर सिंह यांच्यासोबत FIR मध्ये नाव असलेले 4 पोलीस उपायुक्त (DCP) आणि सहाय्यक पोलीस आयुक्तांचं (ACP) निलंबित करण्याचा प्रस्ताव आहे."
एवढंच नाही परमबीर सिंह यांच्याविरोधात राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी खुली चौकशी सुरू केली आहे.
महाराष्ट्र सरकारने परमबीर सिंह देश सोडू नयेत यासाठी त्यांच्याविरोधात सर्व एअरपोर्टवर लूक आऊट नोटीस बजावली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








