प्रदीप शर्मा यांना जामीन : 'एन्काऊंटर स्पेशालिस्ट', राजकारणी ते वादग्रस्त पोलीस अधिकारी

प्रदीप शर्मा

फोटो स्रोत, Getty Images

वाचन वेळ: 3 मिनिटे

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलिया बाहेर बॉम्ब ठेवणे आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला आहे.

याआधी व्हेकेशन बेंचचे न्यायाधीश अनिरुद्ध बोस यांनी 26 जून रोजी पुढची सुनावणी होईल असं जाहीर केलं होतं. त्यावेळी पत्नीच्या वैद्यकीय स्थितीसंदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेशही न्यायाधीशांनी दिले होते.

जून 2021 मध्ये प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत होते.

शर्मा यांची जामिनासाठीची विनंती एनआयए कोर्टाने नाकारली होती.

25 फेब्रुवारी 2021 रोजी स्फोटकांनी भरलेली एसयुव्ही अँटिलया परिसरात सापडली होती. या गाडीचे मालक आणि उद्योगपती मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्च रोजी ठाण्याजवळच्या खाडीत आढळला होता.

प्रदीप शर्मा यांच्यासह दया नायक, विजय साळस्कर आणि रवींद्रनाथ आंग्रे या मुंबई पोलिसांमधल्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट टीमचा भाग आहेत. या टीमने 300हून अधिक गुन्हेगारांचा खात्मा केला आहे. मनसुख हिरेन यांना मारण्यासाठी सहकारी सचिन वाझेला मदत केल्याचा शर्मा यांच्यावर आरोप आहे.

अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात माजी पोलीस अधिकारी आणि शिवसेना नेते प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली होती.

शर्मा यांच्या मुंबईतील घरावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) छापे टाकले. त्यांच्या अंधेरी येथील घरावर सकाळी साधारण सहा वाजता एनआयएने छापा टाकला. त्यांना अटक केल्याची माहिती दिली होती.

कोण आहेत प्रदीप शर्मा?

निवृत्ती घेतल्यानंतर प्रदीप शर्मा यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. पालघरमध्ये नालासोपाऱ्यात शिवसेनेकडून प्रदीप शर्मा यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती.

शर्मा कुटुंबीय मूळचे उत्तर प्रदेशातील आग्र्याचे. मात्र, प्रदीप शर्माचे वडील महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात स्थलांतरित झाले. तिथेच ते स्थायिकही झाले. ते पेशानं शिक्षक होते.

प्रदीप शर्मा

फोटो स्रोत, Facebook/Pradeep Sharma

प्रदीप शर्मा यांचा जन्म जरी उत्तर प्रदेशातील असला, तरी ते लहानपणापासूनच महाराष्ट्रात राहिले आहेत. लहानपणीच वडिलांसोबत ते धुळ्यात राहिले आणि प्राथमिक शिक्षणापासून ते एमएस्सीपर्यंत ते धुळ्यातच वाढले. शिक्षण घेतल्यानंतर एमपीएससी करून ते पोलीस सेवेत दाखल झाले.

पोलीस सेवेच्या आकर्षणाबद्दल सांगताना ते म्हणतात, "धुळ्यात असताना आमच्या शेजारी पगार नावाचे इन्स्पेक्टर राहायचे. लहान असताना त्यांना पाहायचो. ते युनिफॉर्मवर बाईकवर जात असत. पोलीस सेवेच्या आकर्षणासाठी ते एक कारणीभूत ठरलं म्हणता येईल."

महाराष्ट्रातली 1983 ची पोलिसांची बॅच सर्वांत प्रसिद्ध ठरली. या बॅचमध्ये प्रफुल्ल भोसले, विजय साळसकर, रविंद्र आंग्रे, अस्लम मोमीन असे 'एनकाउंटर स्पेशालिस्ट' म्हणून सर्वत्र परिचित असलेले पोलीस अधिकारी होते. याच बॅचमध्येच प्रदीप शर्मा हे सुद्धा आहेत.

नाशिक पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर ही बॅच 1984 साली पोलीस सेवेत कार्यरत झाली. प्रदीप शर्मा यांची पहिली नियुक्ती मुंबईतल्या माहिम पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षकपदावर झाली. त्यानंतर ते स्पेशल ब्रँचमध्ये गेले. नंतर मुंबई उपनगरातील पोलीस ठाण्यांचे प्रमुख, क्राईम इंटेलिजियन्समध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले.

'विजय साळकरांशी खबऱ्यांवरून वाद?'

26/11 च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या विजय साळसकरांशी प्रदीप शर्मा यांचा वाद होता, अशी बरीच चर्चा माध्यमांमधून झाली.

प्रदीप शर्मा

फोटो स्रोत, Getty Images

प्रदीप शर्मा यांनी टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबत आपली बाजू मांडली होती.

शर्मा यांनी म्हटलं, "शहीद विजय साळसकर हे माझे जिवलग मित्र होते. 1983 मध्ये पोलीस प्रशिक्षणासाठी आम्ही एकाच स्कॉडला होतो. प्रशिक्षणात आडनावाच्या पहिल्या अक्षरापासून स्कॉड तयार केले जातात. त्यांचं साळसकर आणि माझं शर्मा आडनाव, त्यामुळं आम्ही एकाच स्कॉडला होतो. वर्षभर आम्ही एकत्र राहिलो. मुंबईत आल्यानंतरही बरीच वर्षे एकत्र होत. क्राईम ब्रांचलाही आम्ही एकत्र काम केलंय. काही मोठमोठे ऑपरेशनही आम्ही एकत्र केलेत."

"विजय साळसकरांसोबत केलेली कामं आजही आठवतात. सगळ्यांत जास्त इन्फर्मेशन नेटवर्क असणारा अधिकारी म्हणून आजही विजय साळसकरांना मी मानतो. माझ्यापेक्षा शंभर पटीनं जास्त नेटवर्क त्यांचं होतं," असं शर्मा सांगतात.

प्रदीप शर्मा

फोटो स्रोत, Getty Images

"साळसकर आणि माझ्यात जमत नाही, हे माध्यमांनी जे पसरवलं होतं, तसं खरंतर काहीच नव्हतं. आमची भांडणं फक्त खबऱ्यांवरून व्हायची. त्याचा खबरी असेल, तर मी त्याला ट्रॅप करायचो, माझ्या बाजूला वळवायचा प्रयत्न करायचो. माझे खबरी तो वळवायचा. अबोला असं काही नव्हतं," असंही प्रदीप शर्मा म्हणाले.

2009 साली रामनारायण गुप्ता उर्फ लखन भैय्या यांच्या हत्येप्रकरणी प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यासह एकूण 13 पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, चार वर्षे ठाणे मध्यवर्ती कारागृहात काढल्यानंतर 2013 साली प्रदीप शर्मांची सुटका झाली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)