असदुद्दीन ओवेसी : 'मुस्लिमांची अवस्था लग्नाच्या 'बँड बाजा पार्टी'सारखी' #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, ANI
आज वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या पाच बातम्यांचा थोडक्यात आढावा पाहूया,
1. 'मुस्लिमांची अवस्था लग्नातल्या 'बँड बाजा पार्टी'सारखी' - असदुद्दीन ओवेसी
मुस्लिमांची अवस्था लग्नाच्या वरातीतल्या 'बँड बाजा पार्टी'सारखी झाली असल्याचं एमआयएमचे अध्यक्ष, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलंय. प्रत्येक जातीकडे त्यांचा नेता आहे मात्र मुस्लिमांकडे नाही असंही ते म्हणाले.
आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी ओवेसी यांनी अयोध्येतून प्रचार मोहिमेला सुरुवात केली आहे. 403 जागांपैकी 100 जागांवर आपले उमेदवार असतील अशी घोषणा ओवेसींनी केलीय. लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.
ते कानपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, "मुस्लिमांची अवस्था लग्नाच्या वरातीमधील बँड बाजा पार्टीसारखी झाली आहे, जिथे त्यांना आधी संगीत वाजवायला सांगितलं जातं आणि लग्नाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर बाहेर उभं केलं जातं."
पण आता मुस्लीम वाद्यं वाजवणार नाहीत, असंही ते पुढे म्हणाले. उत्तर प्रदेशात 19 टक्के मुस्लीम लोकसंख्या असूनही एकही नेता नाही याकडे त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
CAA आणि NRC विरोधात आंदोलन करताना मृत्यू झालेल्यांना त्यांनी 'शहीद' म्हटलं असून ज्यांनी त्यांना मारलं ते नष्ट होवोत असंही ओवेसी म्हणाले.
2. 'उद्धव ठाकरे यांनी बंगले घेण्यासाठी रश्मी वहिनींचा वापर केला' - किरीट सोमय्या
'पुढचं टार्गेट रश्मी ठाकरे असतील,' असा इशारा भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी दिला आहे. टिव्ही 9 मराठीने हे वृत्त दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंगले घेण्यासाठी रश्मी वहिनींचा वापर केला, असा आरोप सोमय्या यांनी केलाय. मला अडवलं तर आणखी घोटाळे बाहेर काढणार असंही त्यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत, अनिल परब, आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केलाय. महाराष्ट्रात भ्रष्टाचारमुक्त यात्रा करणार असल्याची घोषणा सुद्धा किरीट सोमय्या यांनी केली.
3. अखेर भाजप-मनसे युतीचा नारळ फुटला, 'या' जिल्ह्यात युती
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातलं राजकारण तापलं आहे. मनसे आणि भाजप पालघर जिल्ह्यात युती करणार असल्याचं समोर आलं आहे.
पालघरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायतसमितीच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि मनसे एकत्र येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. सकाळने हे वृत्त दिलं आहे.

फोटो स्रोत, Huw Evans picture agency
भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली.
पुढील वर्षी होणाऱ्या मुंबई, ठाणे, औरंगाबाद आणि इतर महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत महत्त्वाची राजकीय घडामोड आहे.
काही आठवड्यांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. तेव्हापासून दोन्ही पक्षांच्या युतीबाबत चर्चा होऊ लागली.
4. मोदी सरकारने अजित पवारांवर 'ही' जबाबदारी सोपवली
मोदी सरकारकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. GST मधील त्रुटी दूर करुन सुधारणा सूचविण्यासाठी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Ajit Pawar/facebook
यात विविध राज्यातील उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांचा सहभाग असणार आहे. लोकमतने हे वृत्त दिलं आहे.
GST भरण्याची प्रक्रिया सुलभ करणे, करदात्यांनी दिलेल्या माहितीची पडताळणी करणे, राज्यातील करयंत्रणेत समन्वयासाठी यंत्रणा उभी करणे अशा अनेक कामांची जबाबदारी समितीकडे सोपवण्यात आली आहे.
जीएसटी परिषदेच्या 45 व्या बैठकीनंतर हा मंत्रिगट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्रालयाने यासंदर्भातील आदेश नुकतेच जारी केले.
5. आता 'या' तारखेला होणार आरोग्य विभागाची परीक्षा
आरोग्य विभागाच्या रद्द झालेल्या परीक्षा ऑक्टोबर अखेर होणार आहेत. वर्ग 'क' पदासाठी 24 ऑक्टोबरला आणि वर्ग 'ड' पदासाठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.
परीक्षेला प्रविष्ठ होणाऱ्या उमेदवारांना परीक्षेच्या 9 दिवस आधी प्रवेशपत्र मिळणार आहे.
ऐनवेळी आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्याने राज्यभरात गोंधळ उडाला. परीक्षा केंद्रावर पोहचलेल्या उमेदवारांना मनस्ताप तर झालाच शिवाय आर्थिक फटका बसला.
यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत बैठक घेतली. यावेळी परीक्षेबाबत चर्चा करण्यात आली.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








