किरीट सोमय्या उद्धव ठाकरे सरकारविरुद्ध एवढे आक्रमक का होत आहेत?

किरीट सोमय्या

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी

किरीट सोमय्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री हसन मुश्रिफ यांच्याविरुद्धचा एक अंक मुंबई ते कराड असा पार पडला.

हा चालू असलेला अंक म्हणावा लागेल, कारण कराडमधून मागे परततांना सोमय्या यांनी मुश्रिफ यांच्या विरुद्ध अजून काही आरोप केले आणि हे प्रकरण पुढे लावून धरण्याचंही जाहीर केलं. त्यामुळे ना हा अंक संपला, ना पडदा पडला असंच म्हणावं लागेल.

पण हा केवळ अंक आहे आणि मुख्य प्रयोगाचा केवळ भाग आहे. मुख्य प्रयोग हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातल्या 'महाविकास आघाडी' सरकारविरोधातला आहे आणि किरीट सोमय्या हे त्यातले महत्वाचे पात्र आहेत. शिवसेना ही मुंबईच्या स्थानिक राजकारणात आक्रमक असणा-या सोमय्यांची पहिल्यापासून लक्ष्य होतीच, पण सेनेच्या नेतृत्वातलं महाविकास आघाडी सरकार आल्यावर हे सरकार त्यांचं लक्ष्य बनलं.

अनिल परब, अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, मिलिंद नार्वेकर आणि आता हसम मुश्रिफ, असे एकामागोमाग एक आघाडीचे नेते सोमय्या यांच्या रडारवर येत आहेत.

एका बाजूला विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस सभागृहात आणि बाहेरही या सरकारविरुद्ध आक्रमक आहेत. चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, चित्रा वाघ याही भाजपच्या नेत्यांच्या सरकारविरोधातला आवाज चढा आहे.

पण किरीट सोमय्या यांची कागदपत्रांच्या शोधाची, आकड्यांवर आधारलेली, तपास संस्थांपर्यंत जाऊन तक्रारी करण्याची शैली आणि सोबत त्यांना माध्यमांमध्ये मिळणारं महत्व, यामुळे 'सोमय्या विरुद्ध महाविकास आघाडी' हा संघर्ष राज्यभरात ठसून दिसणारा बनला आहे.

भाजपा या विरोधी पक्षातर्फे असं दिसण्यापेक्षा सोमय्या यांची 'वन मॅन आर्मी' विरुद्ध महाविकास आघाडी असं चित्रं बनलं आहे. त्यामुळे हा प्रश्न विचारला जाणं स्वाभाविक आहे की किरीट सोमय्या उद्धव ठाकरे सरकार विरुद्ध असे आक्रमक का होतात?

किरीट सोमय्या विरुद्ध शिवसेना

आता जरी सोमय्यांनी महाविकास आघाडी सरकारविरुद्ध दंड थोपटले असले, तरीही या संघर्षाची मुळं ही त्यांच्या शिवसेनेविरोधातल्या राजकीय शत्रुत्वात आहेत.

हे शत्रुत्व सुरु होऊन एवढं नियंत्रणाबाहेर गेलं की ते व्यक्तिगतसुद्धा झालं. किरीट सोमय्यांना त्याचे स्वत:च्या राजकीय करियरमध्ये परिणामही सहन करावे लागले.

किरीट सोमय्या

फोटो स्रोत, Getty Images

मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता युतीच्या काळात निर्विवाद राहिली. भाजपानं पक्ष म्हणून त्यांची वाढ, विशेषत: अमराठीबहुल उपनगरांमध्ये, कायम होत ठेवली, पण त्यांनी शिवसेनेच्या मुंबईतल्या वर्चस्वाला कधी शह दिला नाही.

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय स्तरावर ठरलेली गणितं कायम टिकवली गेली. पण 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीअगोदर भाजप शिवसेना युती तुटली आणि मुंबईत ख-या अर्थानं सेना-भाजपा युद्ध सुरु झालं.

विधानसभा युतीनंतर काहीच महिन्यांमध्ये सेना सत्तेत सहभागी झाली, पण पूर्वीसारखी गणितं आणि मनं जुळली नाहीत. राज्याच्या सत्तेत एकत्र राहिले तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दोघांनी एकमेकांविरुद्ध निवडणुका लढवल्या.

मुंबई महापालिका निवडणुकीतही तेच झालं आणि भाजपानं त्याच्या फायदा महापालिकेच्या सत्तेत जवळपास पोहोचण्यापर्यंत उचलला. पण अगोदर युती तुटल्यानंतरच सेन भाजपा वाग्युद्धं सुरु झाली होती आणि प्रथमपासून आघाडीवर होते किरीट सोमय्या. सोमय्यांनी तेव्हापासून जी सेनेविरुद्ध आघाडी उघडली, ती आजपर्यंत धगधगते आहे.

सोमय्यांनी त्यांच्या शैलीत विविध कागदपत्रांसह मुंबई महापालिकेतल्या तथाकथित भ्रष्टाचार प्रकरणांचे आरोप सुरु केले, शिवसेनेला अडचणीत आणलं. पक्षाच्या आदेशाशिवाय सोमय्यांनी भाजपाविरोधी आघाडी उघडली असण्याची शक्यता नाही, पण त्यांचे आरोप अधिकाधिक तिखट होत गेले.

त्यांनी ते केवळ सेनेवर केले असते तर सेनेनंही राजकीय स्वरुप पाहून तसं उत्तर दिलं असतं, पण सोमय्यांनी जेव्हा आपली दिशा 'मातोश्री' ठरवली, तेव्हा मात्र बिनसलं. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात कोणाचं उखळ पाढरं झालं, असा प्रश्न एका मुलाखतीत विचारत त्यांनी सेना नेतृत्वावर टीका सुरु केली.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत उद्धव ठाकरे यांनीही सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्याला उत्तर देताना सोमय्या यांनी 'मी माझी संपत्ती माझ्या संकेतस्थळावर जाहीर करतो. माझ्या बँक खात्यांची सगळी माहिती लोकांसमोर ठेवतो. आता उद्धव ठाकरे यांनीही आपली खातेवही लोकांसमोर उघडी करावी,' असं आव्हान उद्धव यांना दिलं होतं.

सोमय्या यांनी सात कंपन्यांची नावं जाहीर करून या सात कंपन्यांमध्ये शिवसेनेच्या कोणत्या नेत्याचा पैसा गुंतला आहे, ते जाहीर करावं, असं म्हणत शड्डू ठोकले होते.

'सोमय्या विरुद्ध सेना' असा संघर्ष जणू प्रत्येक दिवशी मुंबईत पहायला मिळाला. पण ठाकरेंवरच्या टीकेमुळे सोमय्या कायमस्वरूपी शिवसैनिकांचे शत्रू बनले. शिवसैनिकांनी भाजपा आणि सोमय्या हे जणू वेगळे बनले.

भांडण व्यक्तिगत बनलं. त्यामुळेच जेव्हा 2019 च्या लोकसभा निवडणुकीअगोदर मोदी-शाहांनी पुढाकार घेऊन पुन्हा एकदा युती करण्याचं ठरवलं, तेव्हा जागावाटपाच्या वेळेला मुंबई उत्तर-पूर्व या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेनं खासदार असलेल्या किरीट सोमय्यांना स्पष्ट विरोध केला. सेनेनं आम्ही प्रचार करणार नाही सांगितलं.

शेवटी वर्मी लागलेल्या घावांची शिवसेनेनं परतफेड केली. सोमय्यांनी जुळवून घेण्यासाठी प्रयत्न केले, पण सेना बधली नाही. शेवटी आपल्या विद्यामान खासदाराला भाजपा तिकीट देऊ शकली नाही आणि सोमय्यांची हातातली खासदारकी गेली.

सेना-सोमय्या शत्रुत्व तेव्हापासून अधिक वाढीस लागलं. पुढे विधानसभेनंतर जेव्हा शिवसेनेनं भाजपा सोडून राष्ट्रवादी-कॉंग्रेससोबत घरोबा केला, तेव्हा तर सोमय्यांना त्यांच्यावरच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पक्षांतर्गत आणि बाहेर वाचा फोडण्यासाठी निमित्त आणि संधी मिळाली.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Twitter

त्यामुळे किरीट सोमय्या विरुद्ध महाविकास आघाडी हा सेनिविरुद्धच्या संघर्षाचाच नवा अंक सुरु झाला आहे. शिवसेनेच्या मंत्र्यासोबतच आघाडीतल्या मंत्र्यांविरुद्ध नवनवी प्रकरणं सोमय्या कागदपत्रं-पुराव्यांसह बाहेर काढल्याचा दावा करताहेत, अंमलबजावणी संचालनालय, आयकर विभाग, सीबीआय अशा तपास यंत्रणांकडे तक्रार करताहेत.

त्यांच्या तक्रारींची दखल घेऊन चौकशा होत आहेत. पण उद्धव ठाकरे सरकारविरुद्ध किरीट सोमय्या एवढे आक्रमक का याचं उत्तर 2014 मध्ये युती पहिल्यांदा तुटल्यानंतर सुरु झालेल्या आणि व्यक्तिगत रुप धारण केलेल्या संघर्षात आहेत.

केंद्रीय नेतृत्वाच्या नजरेत येण्यासाठी?

किरीट सोमय्या उद्धव ठाकरे सरकारविरोधात सध्या एवढे आक्रमक का झाले आहेत यासाठी त्यांच्या भाजपाअंतर्गत स्थानाकडे आणि संघर्षाकडेही पाहिलं जातं.

सोमय्या हे जरी भाजपाचे एकनिष्ठ आणि अगदी प्राथमिक टप्प्यापासून एकेक पायरी चढत वर आलेले नेते असले तरी ते विविध काळांमध्ये असलेल्या विविध गटांतल्या एका गटातले म्हणून कधी ओळखले गेले नाहीत. त्यांच्या राजकीय चळवळीकडे 'वन मॅन आर्मी' म्हणूनच पहिल्यापासून पाहिलं गेलं.

एक चार्टर्ड अकाऊंट असल्यानं व्यवहारांच्या आकडेवारीवर बारीक नजर असलेला, कायद्याच्या सगळ्या गल्ल्या माहित असलेला, तपास यंत्रणांचं काम चोख माहित असलेला हा नेता, पण विरोधी नेत्यांच्या भ्रष्टाचाराची त्यांनी काढलेली प्रकरणं ही पक्षापेक्षा त्यांची वैयक्तिक चळवळ म्हणून कायम पाहिली गेली. त्यामुळेच सत्तेत आल्यावर एक प्रस्थापित नेता असतांनाही सोमय्यांचा पदांसाठी विचार झालेला दिसत नाही.

त्यांचा भाजपात, राज्यात आणि दिल्लीत दोन्हीकडे, जवळचा नेता कोण याचं उत्तरही स्पष्ट मिळत नाही. ना ते महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे नेते म्हणून ओळखले जातात, ना दिल्लीत अमित शाहा किंवा नरेंद्र मोदींशी जवळीक असलेले नेते म्हणून. त्यामुळेच शिवसेनेने अडथळा आणताच त्यांची खासदारकी वाचण्यासाठी मदत झाली नाही.

हसन मुश्रीफ, किरीट सोमय्या

त्यामुळेच आता त्यांच्या राजकीय करियरमध्ये एका महत्वाच्या टप्प्यावर केंद्रीय नेतृत्वाच्या नजरेत येण्यासाठी सोमय्या महाविकास आघाडी सरकारविरुद्धचा संघर्ष अधिक चढवत नेत आहेत का असा कयासही लावला जातो आहे.

हे सरकार भाजपाशी काडीमोड घेऊन बनले आहे, त्यासाठी शिवसेनेनं अमित शाहांवर दिलेला शब्द मोडल्याचा आरोप केला आहे, भाजपाकडे सर्वाधिक आमदार असतांना त्यांना विरोधात बसावे लागले आहे आणि या सगळ्या कारणांमुळे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला हे अपयश सतत सलणारे आहे.

अशा सरकारला सातत्यानं एकहाती अडचणीत आणून, त्यांना मंत्र्यांची प्रकरणं समोर आणून किरीट सोमय्या भाजपातलं आपलं स्थान अधिक बळकट आणि नजरेत आणू पाहताहेत का? त्यासाठीच उद्धव ठाकरे सरकारविरुद्ध किरीट सोमय्या दिवसागणिक आक्रमक होत आहेत का?

राजकारणासाठी सोमय्या नावाचं भ्रष्टाचारविरोधी मिसाईल वापरलं जातं आहे का?

अनेक वर्षं भाजपाचं राजकारण जवळून पाहणा-या राजकीय पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांना मात्र किरीट सोमय्या यांची स्वत:ची राजकीय बांधणी असेल असं वाटत नाही.

"कायम स्वत:च्या मर्जीनुसार, आपला राजकीय लाभ वा हानी न पाहता भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढणं असं ते करत आले आहेत. भ्रष्टाचारविरोधी क्रुसेडर आपल्याला मानलं जावं अशी त्यांची इच्छा असते. सेनेला ते आवडत नाहीत आणि सेनेनं केलेला अपमान त्यांच्या जिव्हारी लागला हे तर स्पष्टच आहे. आता नियतीनं जणू या अपमानचा बदला घेण्याची संधी त्यांना दिली आहे. मात्र त्यामुळे त्यांच्या काही राजकीय इच्छा असाव्यात असं मला वाटत नाही," असं नानिवडेकर म्हणतात.

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

पण सोमय्यांच्या या आक्रमकतेचा कोणी फायदा घेतंय का असा प्रश्नही पडतो आहे असं नानिवडेकर म्हणतात.

"सेना आणि भाजपा यांच्यामध्ये जो वर्चस्वाचा संघर्ष सतत सुरु असतो, त्याकडे पाहता सोमय्यांना मुद्दाम मोठं केलं जातं आहे असा प्रश्न पडतो. त्यांनी कोल्हापूरला जाऊन पत्रकार परिषद घेतली असती तर काय झालं असतं? पण त्यांना पोलिसांनी असं अडवल्यामुळे मीडिया अटेन्शन त्यांना मिळालं.

दुस-या बाजूनं प्रश्न असाही पडतो की आघाडीतल्या अंतर्गत संघर्षाची याला धार आहे का? जे सरकारचा भाग नाहीत, पण मंत्र्यांचे जावई किंवा पत्नी असे आहे, त्यांनाही सोमय्यांच्या आरोपांमधून राजकीय निशाण्यावर आणलं जातं आहे का? राजकारणासाठी सोमय्या नावाचं भ्रष्टाचारविरोधी मिसाईल वापरलं जातं आहे का, असा तो प्रश्न आहे," नानिवडेकर म्हणतात.

राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांच्या मते किरीट सोमय्यांचं आक्रमक होणं भाजपाच्या ठरलेल्या रणनितीनुसार होत असण्याची शक्यता आधिक आहे. "सोमय्यांचा सेनेवर वैयक्तिक राग आहेच, पण मला त्यांच्या आक्रमकतेचा टोन 2017 सालच्या महानगरपालिका निवडणुकीसारखा वाटतो आहे. येणा-या निवडणुकांवर लक्ष ठेवून हे आरोप होत आहेत. अतुल भातखळकर, आशिष शेलार, सोमय्या यांच्या आक्रमकतेत एक धागा आपल्याला दिसतो," असं देशपांडे म्हणतात.

"मला असंही वाटतं की राष्ट्रवादी आणि सेनेला टारगेट करुन या सरकारमध्ये आपण राहिलो तर आपल्याला त्रास होईल हा दबाव त्यांच्यावर ठेवणं हा हेतू आहे. प्रताप सरनाईकांची भावना तीच होती. त्याबरोबरच जे कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोडून भाजपात आले आहेत त्यांनाही हा संदेश आहे की जरी आपण सत्तेत नसलो तरीही आपल्याला त्रास काही नाही. जर बाहेर पडलो तर असा त्रास होईल," देशपांडे पुढे म्हणतात.

किरीट सोमय्यांनी कराडहून परततांना आता अधिक प्रकरणं बाहेर काढणार असल्याचं म्हटलं आहे. ते प्रकरणं कधी आणि कशी बाहेर येतात त्यावरुन आता कयास केलेले राजकीय परिणाम प्रत्यक्षात येतात का ते समजेल.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)