अजित पवार: सतेज पाटील यांचं वय 50, तरी काँग्रेस त्यांना राज्यमंत्रीच ठेवते #5मोठ्याबातम्या

अजित पवार सतेज पाटील

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, अजित पवार, सतेज पाटील

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..

1. सतेज पाटील यांचं वय 50, तरी काँग्रेस त्यांना राज्यमंत्रीच ठेवते - अजित पवार

महाविकास आघाडीत मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसच्याच कार्यप्रणालीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली आहे. राजकारणात नवीन पिढीला पुढे आणण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केली.

पिंपरी-चिंचवडच्या आकुर्डीमध्ये डी. वाय. पाटील ज्ञानशांती शाळेचं उद्घाटन पवारांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, "सतेज पाटील यांना मी आता वय विचारलं, ते म्हणाले आता पन्नाशीला पोहोचलो. त्यांचं वय 50 तरी काँग्रेस त्यांना राज्यमंत्रीच ठेवते, मला तर काही कळत नाही. नव्या पिढीला पुढे आणण्यासाठी शरद पवार यांनी आम्ही 40 पूर्ण नसतानाही आम्हाला मंत्रिपद दिलं. त्या माध्यमातून आम्ही हिरीरीने काम करण्याचा प्रयत्न केला.

राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांचे अधिकार यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक असतो. राज्यमंत्र्यांनी मनात आणलं तरी कॅबिनेट मंत्र्याने सहकार्य केल्याशिवाय ते काम राबवण्यात अडचणी येत असतात, असं अजित पवार म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.

2. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 2 कोटी लसीकरणाचा विक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्र सरकारने अतिशय वेगवान लसीकरण मोहिम राबवली.

शुक्रवारी (17 सप्टेंबर) एका दिवसात देशात 2 कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना व्हायरसची लस देण्यात आली. हा एक जागतिक विक्रमच आहे, असा दावा आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी केला आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

भारतात सध्या लसीकरणाचं काम अत्यंत वेगाने सुरू असून आतापर्यंत 4 वेळा एका दिवसात 1 कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली.

तर 17 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंतच दीड कोटी नागरिकांना लस देण्यात आली. अखेर संध्याकाळपर्यंत दोन कोटी लोकांचं लसीकरण करण्यात यश आलं, अशी माहिती मांडवीय यांनी दिली आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली.

3. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत सर्वसामान्यांना दिलासा नाहीच

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होण्याचे संकेत केंद्र सरकारकडून गेल्या काही दिवसांपासून दिले जात होते. पण अखेर याबाबत विशेष काहीच घडलं नाही.

निर्मला सीतारमण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, निर्मला सीतारमण

GST परिषदेच्या बैठकीनंतर पेट्रोल-डिझेल GST कक्षेत येणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याविषयी माहिती दिली.

पेट्रोल-डिजेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची ही योग्य वेळ नाही, असं सीतारमण यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली.

4. आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी राणेंना हायकोर्टाचा दिलासा कायम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायम राणे यांनी गेल्या महिन्यात कथित आक्षेपार्ह विधान केलं होतं. याप्रकरणी पुढील सुनावणीपर्यंत 30 सप्टेंबरपर्यंत कोणतीच कारवाई करणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारने हायकोर्टात दिली आहे.

नारायण राणे उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नारायण राणे, उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांबाबत विधानानंतर राज्यात महाड, नाशिक, पुणे, ठाणे, जळगाव आणि अहमदनगर येथे राणे यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आले होते. ते रद्द करण्यासाठी राणे यांनी स्वतंत्र याचिका दाखल कराव्यात अशी सूचना हायकोर्टाने केली आहे.

न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे जमादार यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी (17 सप्टेंबर) सुनावणी पार पडली.

सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेतली तर सुलभ होईल, तोपर्यंत राणे यांच्यावर कारवाई करण्यात येऊ नये, अशी सूचना कोर्टाने केली आहे. ही बातमी ई-सकाळने दिली.

5. अमरावती जिल्हा बँकेच्या दोन माजी अध्यक्षांना EDच्या नोटीस

अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख आणि उत्तरा जगताप यांना ईडीकडून नुकतीच नोटीस पाठवण्यात आली आहे.

याप्रकरणी भाजप आमदार प्रताप अडसड यांनी जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याची तक्रार केली होती.

बँकेत आर्थिक अनियमितता झाल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर याप्रकरणी आता EDने बँकेचे माजी अध्यक्ष तथा काँग्रेसचे अमरावती जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख आणि काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या पत्नी, माजी अध्यक्ष उत्तरा जगताप यांना ईडीने नोटीस बजावत ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

दरम्यान, बँकेची निवडणूक 4 ऑक्टोबर रोजी होणार आहे, पण EDच्या नोटीसमुळे आता काँग्रेस पक्षाची कोंडी झाल्याचं दिसून येतं. ही बातमी एबीपी माझाने दिली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)