हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण: पीडित कुटुंब वर्षभरानंतरही भीतीच्या सावटाखाली

हाथरसमधील दलित कुटुंब
    • Author, दिलनवाज पाशा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, हाथरसहून

"या लोकांच्या (जातीवाचक शब्द) घराबाहेर पोलीस बसवले तरी त्यामुळं हे ठाकूर थोडेच बनणार आहेत. ते जे आहेत, तेच राहतील."

गावातील एका महिलेच्या या वाक्यावरून तथाकथित उच्चवर्णीय असल्याचा अभिमान, दलितांबाबत तिरस्कार आणि देशाच्या संविधान आणि कायद्याबाबतची अनास्था स्पष्टपणे झळकत होती.

त्या जातीवाचक शब्दांचा वापर एवढ्या सहज आणि सराईतपणे करत होत्या की, त्या जे बोलत आहेत ते कायदेशीर दृष्ट्या गुन्ह्याच्या श्रेणीत येतं याची त्यांना कदाचित जाणीवच नसावी, असं वाटतं.

तुम्ही गावातील दलितांबरोबर बसू किंवा जेवण करू शकता का? असा प्रश्न आम्ही त्यांना केला. त्यावर त्यांनी "हा प्रश्न करत आहात, म्हणजे तुम्ही हरिजन आहात वाटतं," असं हसतच आम्हाला म्हटलं.

उत्तर प्रदेशातील हाथरसमधील हे गाव गेल्यावर्षी एका दलित मुलीच्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलं होतं. या गुन्ह्याच्या आरोपात गावातीलच तथाकथित चार उच्चवर्णीय आरोपी तुरुंगात आहेत.

पीडित कुटुंबासोबत बीबीसीचे प्रतिनिधी
फोटो कॅप्शन, पीडित कुटुंबासोबत बीबीसीचे प्रतिनिधी

देश-विदेशातील माध्यमांनी या घटनेचं वृत्तांकन केलं होतं. त्यानंतर भारतातील दलितांच्या स्थितीबाबत गंभीर चर्चा सुरू झाली होती. मात्र एका वर्षानंतर या गावात जातीयवादाची मुळं आणखी खोल पसरली असल्याचं पाहायला मिळत आहे.

पीडित कुटुंबाबरोबर अजूनही भेदभाव सुरुच

अजूनही जातीयवादाचा सामना करावा लागत असल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबानं केला आहे. गावात आता त्यांच्या कुटुंबाबद्दल असलेला तिरस्कार पूर्वीच्या तुलनेत वाढला असल्याचं मृत मुलीच्या भावानं बीबीसीबरोबर बोलताना म्हटलं.

"गावातील उच्चवर्णीय लोक आम्हाला हीन नजरेनं पाहतात. काही दिवसांपूर्वीच माझी पुतणी दूध घ्यायला गेली तेव्हा ती त्याठिकाणच्या खाटेवर बसली, तर तिला तिरस्कारानं तिथून उठवून लावलं," असं त्यांनी सांगितलं.

"माझी मोठी मुलगी पाच वर्षांची आहे. तिला आता थोडं फार समजायला लागलं आहे. चांगलं वाईट तिला समजतं. काही दिवसांपूर्वी सीआरपीएफच्या एका सरांबरोबर ती डेअरीवर दूध घेण्यासाठी गेली होती. त्याठिकाणी सरांनी तिला खाटेवर बसवलं, पण उच्चवर्णीय लोकांनी तिला खाटेवरून खाली उतरवलं. हा प्रसंग तिच्या मनात घर करून बसला आहे. आता ती दूध घ्यायलाही जात नाही," असं या मुलीची आई आणि मृत तरुणीच्या वहिणींनी सांगितलं.

पीडित कुटुंबाला सीआरएफची सुरक्षा
फोटो कॅप्शन, पीडित कुटुंबाला सीआरएफची सुरक्षा

"जोपर्यंत लोकांचे विचार बदलणार नाही तोपर्यंत जातीवाद संपणार नाही. याठिकाणी अनेक शतकांपासून हे घडत आलेलं आहे. पूर्वी जसा जातीवाद होता, तसाच आजही आहे," असं त्या म्हणतात.

गावात तथाकथित उच्चवर्णीयांपैकी आम्ही ज्यांच्याशी बोललो, त्यांनी कसलाही संकोच न बाळगता, ते दलितांना त्यांच्या बरोबरीचं समजतंच नाहीत असं स्पष्टपणे सांगितलं. आरोपींच्या कुटुंबीयांचाही त्यात समावेश होता.

पीडित कुटुंबाला सीआरपीएफचं संरक्षण

सीआरपीएफची 135 जवानांची एक तुकडी पीडित कुटुंबाच्या संरक्षणासाठी तैनात आहे. कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाणाऱ्यांना तपासणीनंतर मेटल डिटेक्टरमधून जावं लागतं. याठिकाणी जवान नेहमी सज्ज दिसतात.

संरक्षणासाठीच्या प्रोटोकॉलमुळं कुटुंबातील कोणत्याही सदस्याला सुरक्षेशिवाय घराबाहेर निघण्याची परवानगी नाही.

पीडित कुटुंबाचे घर

सीआरपीएफनं पीडितेच्या काकाच्या घराच्या अंगणातच तळ ठोकला आहे.

अजूनही भीती असून संरक्षणाची आवश्यता आहे. मात्र या प्रोटोकॉलमुळं कुटुंब जणू स्वतःच्याच घरात कैदेत असल्यासारखं झालं आहे, असं पीडितेच्या कुटुंबाचं म्हणणं आहे.

14 सप्टेंबर 2020 ला नेमकं काय घडलं होतं?

वीस वर्षांची तरुणी आईसह घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर गवत कापण्यासाठी गेली होती. त्याचठिकाणी गावातील चार आरोपींनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. मुलीजवळ पोहोचले तेव्हा ती जखमी होती आणि तिचे कपडे फाटलेले होते, असं पीडितेच्या आईचं म्हणणं आहे.

मृत तरुणीची आई आणि मोठा भाऊ लगेचच तिला दुचाकीवर जवळपास दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या चंदपा ठाण्यात घेऊन गेले होते. त्याठिकाणाहून तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर तिला तिथून अलिगड मेडिकल कॉलेजला रेफर करण्यात आलं होतं.

तरुणीनं शुद्धीत आल्यानंतर अलिगड मेडिकल कॉलेजमध्ये जबाब दिला होता. त्याआधारे सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पीडित कुटुंबाचे घर

अलिगडहून 28 सप्टेंबरला तिला दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्याठिकाणी दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी कुटुंबाला मुलीचा चेहराही न दाखवता रात्री अंधारातच तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले होते. त्यावरून बराच गदारोळ झाला होता.

या प्रकरणाचा तपास आधी युपी पोलिस, नंतर यूपी पोलिसांच्या विशेष तपास पथकानं आणि नंतर सीबीआयनं केला होता.

सध्याची स्थिती?

सीबीआयनं या प्रकरणी 11 ऑक्टोबर 2020 ला एफआयआर दाखल केली होती. त्यानंतर 18 डिसेंबर 2020 ला आरोपपत्र दाखल केलं होतं.

सीबीआयनं चारही आरोपींवर हत्या आणि सामुहिक बलात्काराचे आरोप निश्चित केले आहेत. आरोपपत्रात युपी पोलिसांवरही निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला होता.

पीडित कुटुंबाचे घर

आतापर्यंत या प्रकरणी 20 पेक्षा अधिक सुनावणी झाल्या आहेत. हाथरसच्या एससी-एसटी कोर्टात या प्रकरणी सुनावणी होत आहे. यापूर्वी 9 सप्टेंबरला सुनावणी होती, तर पुढची सुनावणी 23 सप्टेंबरला आहे.

"मी कोर्टात तारखांना जातो. सध्या साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे," असं मृत तरुणीच्या मोठ्या भावानं सांगितलं.

आरोपीच्या नातेवाईक आणि काही गटांनी हे प्रकरण सामूहिक बलात्काराचं नसून, ऑनर किलिंगचं असल्याचा आरोप केला होता. मृत तरुणीच्या मोठ्या भावावरच हत्येचे आरोप करण्यात आले होते.

"मला सीबीआयनं सगळ्या प्रकारे प्रश्न विचारले आणि मी त्याची उत्तरंही दिली. सीबीआयनं पुरावे गोळा केले होते आणि आरोपपत्रही सादर केलं होतं. आरोपपत्रात काय आहे, हे सर्वांना माहिती आहे. या बिनबुडाच्या आरोपांना आम्ही घाबरत नाही. आम्हाला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे," असं मृत तरुणीच्या भावानं म्हटलं.

आरोपींकडून अनेकदा जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे. पण प्रत्येकवेळी त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. सध्या चारही आरोपी तुरुंगात आहेत.

जीवनच बदलून गेलं

मृत तरुणीचा लहान भाऊ आधी गाझियाबादमध्ये एका खासगी लॅबमध्ये नोकरी करत होता. त्याची नोकरी सुटली आहे. मोठा भाऊदेखील खासगी नोकरी करत होता, घटनेनंतर तोही घरीच आहे.

हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरण

"आमचा दिनक्रम पूर्णपणे बदलला आहे. आमचं काम ठप्पं झालं आहे. आम्ही कुठंही जात किंवा येत नाही. मी खासगी नोकरी करत होतो, ती सुटली आहे. आम्ही आमच्याच घरात नजरकैदेत आहोत. आमचं संपूर्ण वर्ष दुःखात गेलं आहे. ही घटना आम्ही कधीही विसरू शकणार नाही. आम्हाला आमच्या भवितव्याबाबतही साशंकता आहे. आमचं जीवन यापुढं कसं असेल आम्हाला माहिती नाही," असं तरुणीच्या मोठ्या भावाचं म्हणणं आहे.

छोट्या भावानंही त्याच्या वेदना मांडल्या. "आम्ही तर अजूनही दुःखातच जीवन जगत आहोत. संपूर्ण दिवस असाच घरात निघून जातो. मित्रांनाही भेटता येत नाही. या गावात तर माझा कुणी मित्रही नाही. इथं गावात राहून काहीही होऊ शकणार नाही. करिअरसाठी घराबाहेर निघावं लागेल. पण सुरक्षेच्या कारणामुळं आम्हाला घराबाहेरही निघता येत नाही," असं त्यानं म्हटलं.

घटनेच्या काही दिवसांपूर्वीच मृत तरुणीच्या वहिणीनं तिसऱ्या मुलीला जन्म दिला होता. ती आता एका वर्षाची झाली असून, चालायला लागली आहे. "ती असती तर हिच्या जन्मानं किती आनंदी झाली असती. तिनं हिला मांडीवर खेळवलं असतं. आमची एक लेक निघून गेली आणि आता आम्हाला इतर मुलींची चिंता आहे," असं त्या म्हणाल्या.

"आमची लेक निघून गेली. आम्ही तिचा चेहराही पाहू शकलो नव्हतो. तेव्हा जेवढं वाईट वाटलं होतं, तेवढंच आजही वाटत आहे. आम्ही आमच्या मुलीला विसरू शकलो नाही, आणि कधीही विसरू शकणार नाही."

सरकारवर नाराजी, न्यायालयावर विश्वास

पीडित कुटुंब सरकारवरही नाराज आहे. घटनेनंतर सरकारनं पीडितेच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याबरोबरच भावाला सरकारी नोकरी आणि सरकारी घर देण्याचंही आश्वासन दिलं होतं. पण ते अद्याप पूर्ण झालेलं नाही.

"सरकारनं त्यावेळी 25 लाखांची आर्थिक मदत केली होती. त्यावरच आमचा खर्च भागत आहे. पण नोकरी आणि घर देण्याचं वचन अद्याप पूर्ण झालेलं नाही. या दिशेनं काही कामही झालेलं नाही," असं मृत तरुणीच्या भावानं म्हटलं.

"सरकारनं हे प्रकरण दाबण्याचा पूर्ण प्रयत्न केला असला तरी, आम्हाला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे, आमच्या लेकीला न्याय मिळेल, याचा आम्हाला विश्वास आहे," असं पीडितेच्या वहिनी म्हणाल्या.

"प्रशासनानं आम्हाला एवढं हीन समजलं की, आम्हाला चेहराही न दाखवता आमच्या मुलीवर अंत्यसंस्कार केले, त्याचं आम्हाला सर्वाधिक वाईट वाटलं. आता हा केवळ आमच्या मुलीला न्याय मिळण्याचा मुद्दा नाही, तर देशाच्या लेकींबरोबर न्याय आणि त्यांच्या संरक्षणाचा मुद्दा आहे. आम्ही कोणत्याही दबावानं दबणार नाही," असंही त्या म्हणाल्या.

सरकारच्या वर्तनावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. "आता निवडणुका येणार आहे. महिला सुरक्षेच्या घोषणा दिल्या जातील. पण आपल्या मुलींसाठी काहीही बदलणार नाही. माझ्या स्वतःच्या तीन मुली आहेत. मुलींना सन्मानानं जगता यावं म्हणून सरकार काहीही करत नसल्याचं दिसतंय. जीवंतपणीच काय, पण मेल्यानंतरही त्यांना सन्मान मिळत नसल्याची परिस्थित आहे," असं त्यांनी म्हटलं.

कुटुंबाची गाव सोडण्याची इच्छा

हाथरसमधील या गावात वाल्मिकी समुदायाची चार घरं आहेत. तर उर्वरित लोकसंख्या ही तथाकथित उच्चवर्णियांची आहे. त्यात बहुतांश ठाकूर आणि काही ब्राह्मण आहेत.

या गावात कधीही सुरक्षितपणे राहू शकणार नाही आणि भविष्य घडवू शकणार नाही, असं पीडित कुटुंबाचं म्हणणं आहे. कुटुंबातील सर्वांचीच गावं सोडून इतर ठिकाणी स्थायिक होण्याची इच्छा आहे.

"इथं पुन्हा कधी आमचं जीवन सुरळीत होऊ शकेल असं वाटत नाही. आम्हाला या गावातून निघायचं आहे. पण आता कुठं जावं आणि आम्हाला कुठं आसरा मिळेल, हे आम्हाला माहिती नाही. या गावात आम्हाला रोजगार नाही. एके ना एके दिवशी आम्हाला, हे गाव सोडून जावं लागणार आहे," असं पीडितेच्या मोठ्या भावानं म्हटलं.

आरोपींच्या कुटुंबीयांची स्थिती

या प्रकरणातील आरोपींच्या कुटुंबीयांनी घटना घडली तेव्हापासूनच त्यांचा याच्याशी संबंध नसल्याचं म्हटलं आहे. आरोपींपैकी दोन विवाहित असून त्यांना मुलंही आहे.

आरोपींचे कुटुंबीय या प्रकरणी माध्यमं, प्रशासन आणि समाजाबाबत नाराजी व्यक्त करतात. त्यांच्या मुलांना खोट्या आरोपांत फसवण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे.

या कुटुंबांची आर्थिक स्थितीही फारशी चांगली नाही. नातेवाईकांना अद्याप आरोपींना भेटताही आलेलं नाही. कोर्टाची तारीख असते तेव्हा ते त्यांना पाहण्यासाठी न्यायालयात जातात.

ते निर्दोष असून एक दिवस न्यायालयातून नक्कीच सुटतील, असं आरोपींचे नातेवाईक माध्यमांशी बोलताना म्हणतात.

"मी पतीशिवायच मुलांचा सांभाळ करत आहे. माझ्याकडे काहीही नाही. दोन म्हशी होत्या त्याही विकाव्या लागल्या आहेत. पतीशी जेव्हाही फोनवर चर्चा होते, तेव्हा ते मी निर्दोष असून एकदिवस नक्कीच सुटेल," असं म्हणत असल्याचं एका आरोपीच्या पत्नीनं सांगितलं.

एका आरोपीची आईदेखील भावूक झाली. "आमच्या मुलांना यात गोवण्यात आलं आहे. पण आम्हाला विचारायला कधीही कोणी आलं नाही. सगळे त्यांच्याच घरी जातात. त्यांना भरपूर पैसाही मिळाला. त्यामुळं ते ताकदीनं खटला लढवू शकतात. पण आमच्याकडे तर काहीही नाही," असं त्या म्हणाल्या.

गावात स्मशान शांतता

हाथरसमधील या गावात स्मशान शांतता पसरलेली पाहायला मिळते. काही मोजके लोक शेतात काम करताना आढळतात. पीडितेच्या घराजवळून जाताना लोक गाड्यांचा वेग वाढवतात. लोक आता इथं मोकळेपणानं बोलतही नाही. माध्यमांच्या प्रतिनिधींना पाहून आधीत सतर्क होतात.

दलित कुटुंब वगळता, इतर सर्वांचं मत आरोपी निर्दोष असल्याचंच आहे. "चार निर्दोष मुलांना विनाकारण फसवलं," असं लोक दबक्या आवाजात म्हणतात.

गावापासून काही अंतरावर मुलीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाला, त्याठिकाणी आता गवत उगवलं आहे. त्याठिकाणी एखादा मृतदेह जाळला होता, याची खूणही आढळत नाही.

आम्ही त्या जागेकडे जात होतो त्यावेळी गावातील एका व्यक्तीनं आम्हाला आवाज दिला. "तिथं असं काय आहे जे पाहायला जात आहात. जो कोणी बाहेरून येतो तिथं का जातो. आता तर तिथं काहीही नाही," असं त्या व्यक्तीनं आम्हाला म्हटलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)