महाराष्ट्र महापालिका : 'एक वॉर्ड एक नगरसेवक' पद्धतीमुळे महापालिकांमध्ये काय बदल होणार?

मुंबई महानगरपालिका

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, राहुल गायकवाड
    • Role, बीबीसी मराठीसाठी

पुढच्या वर्षी महाराष्ट्रात होणाऱ्या महापालिकांच्या निवडणुका आता एकल वॉर्ड रचनेनुसार होणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

वॉर्डरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेशही महापालिकांना देण्यात आले आहेत. ही वॉर्ड रचना 2011 च्या लोकसंख्येच्या आधारे करण्यात येणार आहे.

यापूर्वी भाजपाची सत्ता असताना प्रभाग पद्धती अवलंबण्यात आली होती. एका प्रभागामध्ये तीन ते चार वॉर्ड तयार करण्यात आले होते. त्या प्रभागामध्ये चार नगरसेवक नागरिकांना निवडून देता येत होते. या पद्धतीचा फायदा भाजपला झालेला दिसून आला.

2014 नंतर भाजपची सत्ता आल्यानंतर हा बदल केल्याने राज्यातील अनेक महापालिकांमध्ये भाजपाने आपली सत्ता मिळवली.

यापूर्वी आघाडी सरकारमध्ये 2007 च्या निवडणुकांमध्ये एका सदस्याचा वॉर्ड करण्यात आला होता. त्यानंतर 2012च्या निवडणुकांमध्ये दोन सदस्यांना वॉर्ड करण्यात आला होता. एक सदस्य एक वॉर्ड पद्धतीचा फायदा आघाडी सरकारला झाला होता.

एक वॉर्ड एक नगरसेवक म्हणजे नेमकं काय?

यापूर्वी एका प्रभागाचे चार वॉर्ड तयार करण्यात आले होते. यात एका प्रभागात चार नगरसेवक निवडून देता येत होते. याला पॅनल पद्धत देखील म्हंटलं जातं.

हे चारही नगरसेवक एकत्र येऊन त्यांच्या प्रभागाच्या विकासाचा विचार करु शकत होते. त्यांचे कार्यक्षेत यामुळे विस्तारले होते. पक्षांना संपूर्ण पॅनल निवडून आणण्याची संधी देखील यात होती.

आता या प्रभागांची पुनर्रचना करुन प्रभागांमध्ये पुन्हा वॉर्ड तयार करण्यात येतील.

उल्हासनगर महानगरपालिका

फोटो स्रोत, RESHMA DUDHANE

एक वॉर्ड एक नगरसेवक प्रभाग रचना केल्यास नगरसेवकाचे कार्यक्षेत्र त्याच्या वॉर्डापुरते मर्यादित होईल. त्याच्या वॉर्डातील विकासकामे करण्याची संधी त्या नगरसेवकाला मिळेल.

इथे पॅनल पद्धत असणार नाही. तसंच एका प्रभागात चार नगरसेवक असल्याने कुठल्या नगरसेवकाने कुठल्या वॉर्डातलं काम करायचं याबाबत होणारे मतभेद कमी होण्यास मदत होणार आहे.

येत्या काळात कुठल्या निवडणुका आहेत?

कोरोनामुळे अनेक महापालिकांच्या निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात राहिली तर येत्या काळात या निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी देखील सुरु केली आहे.

येत्या काळात मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी- निजामपूर, पनवेल, मीरा भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड, लातूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर या ठिकाणी निवडणुका होऊ घातल्या आहेत.

प्रभाग पद्धतीमुळे पक्षांचे वर्चस्व वाढण्यास सुरुवात

या प्रभाग रचनांबाबत बोलताना माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार म्हणाले, "पूर्वी वॉर्ड पद्धती अस्तित्वात होती. 10 -20 हजार लोकसंख्येचा एक वॉर्ड केला जात असे. प्रभाग पद्धतीमध्ये तीन ते चार वॉर्डांचा मिळून एक प्रभाग असतो."

लक्ष्मी रोड पुणे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लक्ष्मी रोड पुणे

ते पुढे सांगतात, "प्रभाग पद्धतीमुळे व्यक्तीपेक्षा राजकीय पक्षांचे वर्चस्व वाढण्यास सुरुवात झाली. चार जणांचे पॅनेल तयार करण्यास सुरवात झाली. वॉर्ड पद्धतीमध्ये एकट्या नगरसेवकाला काम करण्याची संधी होती. चार जनांच्या प्रभागामुळे नगरसेवकांमध्ये आपआपसात वाद होण्यास सुरुवात झाली.

"त्याचा विकासकामांवर परिणाम होण्यास सुरुवात झाली. त्याचबरोबर प्रभाग पद्धतीमुळे नागरिकांना कुठल्या नगरसेवकाकडे जायचे याबाबत देखील प्रश्न पडत होते. वॉर्ड पद्धतीमुळे त्या भागातील नगरसेवकाकडे नागरिक त्यांच्या समस्या घेऊन जाऊ शकतात."

प्रभागपद्धतीत बदल हा राजकीय अजेंडा?

प्रभाग पद्धतीमध्ये बदल करुन एक वॉर्ड एक नगरसेवक करणे हा बदल मतदारांसाठी नाही तर केवळ राजकीय अजेंड्यातून घेतला असल्याचं सकाळचे पुण्याचे संपादक सम्राट फडणीस बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले.

फडणीस म्हणाले, ''एका प्रभागात चार नगरसेवक या पॉलिसीचा फायदा भाजपला झाला. राज्यातील विविध महापालिकांमध्ये असंच चित्र होतं. प्रभागाचा विकास एक युनीट म्हणून सर्वानुमते व्हावा अशी त्याची संकल्पना होती. एखाद्याला एक पक्ष आवडत असेल तर ती व्यक्ती त्या पक्षाचे चार नगरसेवक निवडूण देऊ शकते जेणेकरुन त्या प्रभागाचा विकास होईल. हीच पद्धत सहकार क्षेत्रात वापरली जाते. तिथे पॅनलला मतदान केले जाते. त्याच पद्धतीत सुधारणा करुन महापालिकांमध्ये प्रभाग पद्धत आणण्यात आली.''

''या पद्धतीचा फायदा भाजपला झाला तर तोटा कॉंग्रेस - राष्ट्रवादीला झाला. मतदारांना त्याचा फायदा झाला नाही. एका प्रभागात चार नगरसेवक ही पद्धत ज्या उद्देशाने आणण्यात आली तो उद्देश यात साध्य झाला नाही. नगरसेवक प्रभागाचा विचार न करता केवळ त्यांच्या वॉर्डापुरता विचार करताना दिसून आले."

"हा प्रयोग अजूनही पुढे चालू ठेवता आला असता परंतु राजकीय फायदा पाहून एक वॉर्ड एक नगरसेवक पद्धत आणण्यात आली. दोन्ही पद्धतीमध्ये मतदारांचा विचार कुठेच करण्यात आला नाही," असेही फडणीस म्हणाले.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)