सावरकरांच्या नावाने दिल्ली विद्यापीठात उभारलं जाणार महाविद्यालय #5मोठ्या बातम्या

विनायक दामोदर सावरकर, दिल्ली, शिक्षण

फोटो स्रोत, TSAVARKARSMARAK.COM

फोटो कॅप्शन, विनायक दामोदर सावरकर

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1.दिल्ली विद्यापीठात सावरकरांच्या नावाने उभारलं जाणार महाविद्यालय

दिल्ली विद्यापीठात लवकरच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाने महाविद्यालय सुरू होणार आहे. दिल्ली विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेची बैठक बुधवारी झाली. या बैठकीत नव्या संस्थांच्या नावाला मान्यता देण्यात आली.

सावरकर यांच्यासह माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज, अरुण जेटली यांच्या नावाने शैक्षणिक संस्था सुरू होणार आहेत. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.

सावरकरांच्या नावे महाविद्यालय सुरू करण्याला अनेकांनी विरोध दर्शवला होता. विद्यापीठाच्या एक्झ्क्युटिव्ह कौन्सिलचे माजी सदस्य राजेश झा यांनी सांगितलं की, "आम्हाला अंधारात ठेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही याला विरोध करू".

देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावानेही महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान ज्या नावांना मंजुरी मिळाली आहे ती नावे समाजातील त्या व्यक्तींच्या योगदानाच्या आधारे प्रस्तावित करण्यात आली होती.

विहित प्रक्रियेचं पालन करूनच परिषदेने या नावांना मंजुरी दिल्याचं दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक पी.सी. जोशी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

2.ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत; सर्वपक्षीयांचं बैठकीत एकमत

राज्यातील इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण पुन्हा लागू होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नयेत, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत करण्यात आली आणि त्यावर सर्वांचे एकमतही झाले. 'लोकसत्ता'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

कायदेविषयक सल्ला घेऊन या मुद्यावर तोडगा कसा काढता येईल यासाठी पुढील शुक्रवारी पुन्हा बैठक होणार आहे. त्यात सर्वसंमतीने निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.

आरक्षण, राज्य सरकार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिला आहे. लवकरच महानगरपालिका, नगरपलिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांच्या निवडणुका होणार आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने प्रभागांची रचना करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाचा प्रश्न तीव्रतेने पुढे येणार आहे. त्यामुळे त्यावर काय तोडगा काढायचा, याबद्दल सर्वपक्षीय नेत्यांची मते जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती.

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी भूमिका सर्वच नेत्यांनी बैठकीत मांडली. या मुद्यावर सर्वांचे एकमत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

3. सोमय्या यांनी आरोप करताना थोडी तरी माणुसकी दाखवायला हवी होती-सरनाईक

किरीट सोमय्या यांनी आरोप करताना थोडी तरी माणुसकी दाखवायला हवी होती असं आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

केंद्र आणि राज्याच्या संघर्षात माझा बळी गेला, अशी भावना शिवसेना प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना व्यक्त केली. "अजूनही माझी न्यायालयीन लढाई संपली नाही. मात्र, मी आता गप्प बसणार नाही. ईडीच्या प्रकरणामुळे प्रचंड त्रास झाला. पण माझ्यामुळे माझ्या पत्नी आणि मुलांना जास्त त्रास झाल्याने मी व्यथित झालो", असं त्यांनी सांगितलं.

प्रताप सरनाईक, शिवसेना, किरीट सोमय्या

फोटो स्रोत, FACEBOOK/PRATAP SARNAIK

फोटो कॅप्शन, प्रताप सरनाईक कुटुंबीयांसमवेत

"किरीट सोमय्या यांच्याबद्दल माझे खूप चांगले मत होते, आदर होता, पण माझ्यावर किरीट यांनी आरोप केले, त्यानंतर माझ्या 2 अँन्जोप्लास्टी झाल्या. अनेक प्रॉब्लेम आले. माझ्या घरच्यांवर अनेक संकटं आली. अशावेळी त्यांनी आरोप करणे थांबवले पाहिजे होते, पण ते मी प्रॉब्लेममध्ये बघून अजून आरोप करत राहिले, त्यांनी थोडी तरी माणुसकी दाखवायला हवी होती", असं सरनाईक म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "सुप्रीम कोर्टाने संरक्षण दिलं म्हणून मी आता बोलतोय. मात्र, काहीही न करता आरोप होत असून माझी छबी वाईट होत आहे. मी आधीपासून व्यावसायात आहे. बँक आता कर्ज देत नाही, माझे भागीदार घाबरतात, ग्राहक फ्लॅट विकत घ्यायला येत नाही, असे अनेक परिणाम यामुळे होत आहेत. राजकीय, व्यावसायिक आणि पर्सनल देखील, अशावेळी जवळचे मित्र लांब पळतात, लांबचे कधीतरी जवळ येतात, असे दिवस बघायला मिळतात".

4. जनता कुंभकर्णासारखी झोपली, जाचक कायदे होणारच-अण्णा हजारे

"आपण आंदोलनं करून लोकहिताचे अनेक कायदे मंजूर करून घेतले. मात्र आता सरकारला वाटेल ते कायदे बहुमताच्या जोरावर पास करण्यात येत आहे. मागणी नसताना अनेक कायदे करण्यात येत आहे. जनताच कुंभकर्णासारखी झोपली. त्यामुळे हे शक्य आहे.

आता जनतेने आवाज उठवून सरकार बदलण्याची ताकद उभी केली पाहिजे, तेव्हाच सरकार झुकेल आणि जाचक कायदे रद्द करेल", असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्ती केलं. ते देशबचाव जनआंदोलन समितीशी बोलत होते. 'सकाळ'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

अण्णा हजारे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अण्णा हजारे

जनआंदोलन समितीने पत्रकार परिषद घेऊन तीन कृषी कायदे, बेरोजगारी, इंधन दरवाढ आणि देशात सुरू असलेलं सरकारी कंपन्या विकण्याचं धोरण यावर केंद्र सरकारविरुद्ध आवाज उठविण्याचं आवाहन अण्णा हजारेंना केलं होतं. अन्यथा केंद्र सरकार आणि अण्णा हजारेंविरुद्ध राळेगणसिद्धीत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

"माझं वय 84 वर्षे आहे. मी कधीपर्यंत लढू, देश बचाव जनआंदोलन समिती युवकांनी स्थापन केली. यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. तुम्ही लढा उभा करा, मी तुमच्यासोबत आवश्य येईल. मात्र त्याचवेळी देशात सरकारकडून मागणी नसताना लादण्यात येत असलेल्या कायद्यांवर, सरकारी कंपन्या विकण्याच्या धोरणांवर अण्णांनी खंत व्यक्त केली. देशातील जनता कुंभकर्णासारखी झोपली आहे. ही जनता जोपर्यंत जागी होत नाही आणि सरकार बदलण्याची ताकद उभी करत नाही, तोपर्यंत सरकार झुकणार नाही. असेच कायदे आणि निर्णय लादण्यात येतील", असंही अण्णांनी म्हटलं.

5. रोनाल्डो आता मँचेस्टर युनायटेड कडून खेळणार

जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आता मँचेस्टर युनायटेड क्लबकडून खेळणार आहे. रोनाल्डोने युव्हेंटस क्लबमधून स्थलांतरण प्रक्रिया पूर्ण केल्याच्या वृत्ताला संबंधित क्लबकडून दुजोरा देण्यात आला आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने ही बातमी दिली आहे.

याबाबत कराराचा आकडा स्पष्ट होऊ शकलेल नसला, तरी ब्रिटन आणि इटलीच्या प्रसारमाध्यमांनी रोनाल्डोने दोन वर्षांसाठी दोन कोटी, 50 लाख युरोचा करार केल्याचे म्हटले आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डो, फुटबॉल

फोटो स्रोत, UEFA

फोटो कॅप्शन, ख्रिस्तियानो रोनाल्डो

पोर्तुगालचा आक्रमक रोनाल्डाने 2003 ते 2009 या कालावधीत मँचेस्टरला आठ महत्त्वाची जेतेपदे जिंकून दिली होती.

2018 मध्ये रोनाल्डोने रेयाल माद्रिदमधून युव्हेंटस क्लबमध्ये स्थलांतराचा करार केला होता. माद्रिदचे नऊ वर्षे प्रतिनिधित्व करताना रोनाल्डोने 438 सामन्यांत 450 गोल केले होते. याशिवाय चॅम्पियन्स लीग जेतेपदासह चार महत्त्वाची जेतेपदे पटकावली होती.

रोनाल्डो युव्हेंटस क्लब सोडण्याच्या तयारीत असल्याचे युव्हेंटसचे प्रशिक्षक मॅसिमिलिआनो अलेग्री यांनी गुरुवारी स्पष्ट केले होते. रोनाल्डोचा समन्वयक जॉर्ज मेंडीसनेही या वृत्ताला दुजोरा दिला होता.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)