हवामान बदलः महाराष्ट्रात दरडी, अतिवृष्टी, चक्रिवादळं यांची संख्या का वाढत आहे?

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

पश्चिम महाराष्ट्रात 22 आणि 23 जुलैला पाऊस झाला, त्यानंतर चिपळूण आणि महाडमध्ये पूर आला.

ही शहरं अक्षरश: पाण्याखाली गेली. घरं चिखलांची झाली. घाटमाथ्यावर प्रपात बनून आलेलं पाणी सावित्री-वशिष्ठीच्या काठांना घेऊन घरात शिरलं.

पण यंदा सह्याद्रीनंही तेवढंच झेललं आहे. किंबहुना याअगोदर जे क्वचितच पाहिलं, त्यापेक्षा अधिक या दोन-तीन दिवसांमध्ये त्याला पहायला मिळालं. दरडींनी लचके तोडल्यासारख्या जखमा झाल्या आहेत.

तळिये आणि आंबेघर मध्ये दरड काळलोटासारखी आली आणि अनेकांचे जीव गेले. पश्चिम घाटाला आणि सह्याद्रीला दरडी कोसळण्याच्या घटना नव्या नाहीत.

वर्षानुवर्षं अशा घटना इथं होत राहिल्या आहेत. काही भाग दरडप्रवणही आहे. पण यंदा जे झाले ते वेगळं होतं, खूप होतं.

अतिवृष्टीचा प्रकोप झाल्यावर पंधरवड्यानंतर आम्ही सह्याद्रीच्या काही भागात गेलो. सातारा-महाबळेश्वर-कोयनेचा हा पट्टा आहे.

हा भाग केवळ निवडक आहे. रायगड, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर या घाटावरच्या आणि घाटाखालच्या जिल्ह्यांना जोडणाऱ्या सगळ्याच या पश्चिम घाटाच्या पट्ट्यात या वर्षी हाहा:कार उडाला आहे.

असंख्य दरडी कोसळल्या आहेत, रस्ते तुटले आहेत, शेतं माती-दगडांखाली दाबली गेली आहेत. इथं जीवितहानी झाली नाही, तर काही भाग अति दुर्गम आहे म्हणून म्हणून इथल्या गोष्टी कानावर आल्या नाहीत. पण खोऱ्यात आक्रोश आहे.

'देवाला निवद दाखवायला पन शेत -हायलं नाही'

आम्ही कोयनेच्या आणि कांदाटीच्या खोऱ्यात अगोदर गेलो. आतल्या गावांमध्ये रस्त्यानंही जाता येतं, पण दरडींमध्ये अनेक ठिकाणी रस्ता तुटला आहे म्हणून शिवसागराच्या पाण्यातून लॉंचमधून जावं लागलं.

बामणोलीपासून रस्ता पाण्याचा आणि आजूबाजूला डोंगरांतून जाणारी नागमोडी वाट. इथपासूनच यंदाच्या पावसात सह्याद्रीला झालेल्या जखमा दिसायला लागतात. क्वचितच एखादा डोंगररांग असेल ज्यावर लाल माती घेऊन आलेल्या दरडी लांबून दिसत नसतील.

पण डोंगरांच्या पोटामध्ये वसलेल्या गावांमध्ये आम्ही जात होतो तेव्हा खरी परिस्थिती समजू लागली.

अकल्पे नावाचं गाव पहिल्यांदा लागलं. गावापासून काही अंतर अलिकडे दरड कोसळली होती. कुशाभाऊ सावंत आणि त्यांचे भाऊ नामदेव दोघं आम्हाला त्यांच्या शेतापाशी घेऊन गेले.

शेत कसलं... नुसता दगड-गोटे-मातीचा गाळ राहिलाय होता. कुशाभाऊंच्या डोळ्यांना सतत पाण्याच्या धारा लागल्या होत्या. त्यांची उताराला त्यांची आणि त्यांच्या भावाची भाताचं खाचरं होती.

22 तारखेला दुपारहून जनावरं घेऊन ते गावात घरी गेले कारण जोराचा पाऊस शेतात उभं राहू देईना. दुसऱ्या दिवशीपर्यंत पाऊस न थांबता कोसळत राहिला. जरा उघडीप मिळाल्यावर कुशाभाऊ शेतावर आले तर सगळं संपलेलं होतं.

वरुन तुटलेला डोंगराचा तुकडा सगळा गाळ त्याच्यासोबत घेऊन आला आणि त्याखाली कुशाभाऊ आणि त्यांचे भाऊ नामदेव यांची शेतं गायब झाली होती.

"काय पन उरलं नाही. देवाला निवद दाखवायला पन शेत -हायलं नाही," कुशाभाऊ कापऱ्या स्वरात सांगत होते. शेती सोडून दुसरं काय करायचं माहित नाही. त्यामुळे त्यांच्या जिवाला घोर लागलाय.

सरकारी लोक येऊन पंचनामे करुन गेलेत. पण मदत काय, कधी ते माहित नाही. आपल्याकडे दरड पडल्यावर अपघात झाला, जीवितहानी झाली तर सरकार मदत जाहीर करतं. या वेळेस ती तशी केलीही.

पण इथं शेतांमागून शेतं जी मातीखाली गेली आहेत, त्यासाठी काही धोरण नाही. रस्ते होतील, पण या जमिनीवर पुढे काही कधी पिकू शकेल का हे अद्याप कोणाला माहित नाही.

या पट्ट्यांतल्या गावांची शोकांतिका अधिक गडद आहे कारण ही विस्थापितांची गावं आहेत.

1962 मध्ये कोयना धरणाच्या वेळेस गावं पाण्याखाली गेली. कोकणात, नवी मुंबई, ठाण्याकडे त्यांना पुनर्वसनाची जमिन मिळाली. काही कुटुंबं गेली, काही परत आली, काही वरच्या डोंगराच्या अंगाला येऊन इथंच वसली.

आता दरडींच्या भीतीनं त्यांना इथूनही उठून जावं लागणार असं दिसतंय. पुढच्या निवळी या गावात आम्ही जेव्हा पोहोचलो, तेव्हा त्यांनी सरकारनं आमचं दुसरीकडे पुनर्वसन करावं असे अर्जच लिहिले केले होते. पण त्या गावाच्या भीतीचं कारणही तसंच आहे.

निवळी गाव आता या पावसानंतर दोन दरडींच्या बेचक्यात वसलं आहे. जणू मधला भाग कधी पडतो याची सतत चिंता करत. शब्दश: त्यांच्या डोक्यावर 'टांगती दरड' आहे.

आम्ही गावात शिरलो तसं सगळं गाव जमा झालं. बायका-पुरुष सगळे. डोळ्यात भीती आहे. "माझ्या 72 वर्षांत एवढा पाऊस मी कधीच पाहिला नाही. पाऊस इथे कायम जोरात असतो, पण या भागात अशा दरडीही कधी कोसळल्या नाहीत," राजाराम निवळे सांगतात.

निवळीच्या उजव्या आणि डाव्या, दोन्ही बाजूंनी मोठ्या दरडी खाली आल्या. तळिये गावात आली तेवढ्याच आकाराची ही दरड आहे. फरक इतकाच की दरड गावावर आली नाही. गाव वाचलं. शेतं गेली.

"रात्रभर आम्हाला झोप लागत नाही. खायचं आणि भितीनं घरात बसून रहायचं विचार करत की कुठून डोंगर खाली येईल, मग आम्ही कोणत्या माळावर पळायचं असा. आमच्यापैकी कोणालाही इथं रहायचं नाही. सरकारनं आमचं पुनर्वसन करावं," सीताबाई आवतेकर म्हणतात.

समोर एका दरडीच्या प्रवाहानं उखडून टाकलेला पूल दिसत होता. या भागात पाऊस कायम प्रचंड असला तरीही गेल्या काही वर्षांत तो वाढायला लागला आहे.

निवळीच्या पुढे लमाज नावाचं गाव आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते प्रकाशात आलं आहे. कारण विक्रमी पावसाची तिथं नोंद होते आहे. यंदा 22 जुलैला तिथं आणि बाजूच्या पट्ट्यात 24 तासात 927 मिलीमीटर पावसाची, म्हणजे सर्वाधिक, नोंद झाली असं सांगण्यात येतं आहे.

'शेतीभाती साफ गेली, माणसं आणि गुरं तेवढी वाचली'

कांदाटीच्या या खो-यातून आम्ही महाबळेश्वर उतरुन जावळीच्या खो-यात आलो. पण खाली उतरता आलं नाही. कारण मेटतळे गावापाशी घाटातला रस्ता तुटला होता.

वरुन दरड आली आणि कोकणात उतरणाऱ्या महत्वाच्या रस्त्यांपैकी एक असणारा हा आंबेनळी घाटाचा रस्ता आता बंद झाला आहे. काही महिने काम चालेल असं सांगितलं जातं आहे.

मोठ्या रस्त्याच्या प्रश्न आहेच, पण या घाटालगतच्या डोंगररांगांमध्ये परिस्थिती अधिक भयानक आहे. या खोऱ्यातल्या शंभरहून गावा-वस्त्यांचा संपर्क रस्ते तुटल्यामुळं गेला आहे असं इथले स्थानिक सांगत होते.

पण तेवढ्यात एक मोठा ग्रामस्थांचा गट पाठीवर पोती घेऊन पायवाटेनं घाटाखाली उतरायला लागला. आम्ही त्यांना थांबवलं. ते सगळे खाली प्रतापगडाजवळ असलेल्या कोंडुशी गावचे लोक होते.

असं का चाललाय? विचारल्यावर समजलं की त्यांच्या गावाला जाणारे रस्ते तुटले आहेत, त्यामुळे डोंगर चढून वर येण्याशिवाय पर्याय नाही/ संपर्क नाही म्हटल्यावर गावात मदतही येत नाही, सामान येत नाही. त्यामुळे डोंगर चढून वर येऊन काही सामान गावात नेल्याशिवाय दुसरा मार्ग नाही. वर मदतीसाठी आलेले सामान ते न्यायला आले होते.

खाली काय परिस्थिती आहे? "काही उरलं नाही. पायवाटा उरल्या आहेत. शेतीभाती साफ गेली, माणसं आणि गुरं तेवढी वाचली. दर दोन दिवसांनी असं वर येऊन सामान न्यावं लागतं आहे," एक ग्रामस्थ सांगत होते. थोडा वेळ बोलून सगळे परत डोंगर उतरुन भर पावसात पायवाटेनं चालू लागले.

त्यांच्याशी बोलतानाच आंबेनळीच्या दरड पडल्या ठिकाणी दोन मुलांनी एक डोली आणून ठेवली. दोन बांबू आहेत आणि मधोमध माणूस बसेल एवढी टोपली घट्ट बांधलेली होती.

काय आहे ते समजत नाही. त्या डोलीशेजारी उभ्या असलेल्या गृहस्थांना विचारलं. त्यांचं नाव रामचंद्र ढेबे. त्यांच्या आईसाठी ही डोली आणली आहे. पण का?

"आम्ही खालच्या पार गावंचे. पाऊस पडायला लागला होता तेव्हा आईला असंच डोलीत बसवून वर आणलं होतं. आता परत नेत आहोत. इथून 15 किलोमीटरवर गाव आहे. तिथंपर्यंत खांद्यावर घेऊन जाणार. इथं रस्ता नाही आणि खालचाही रस्ता तुटला आहे," ढेबे सांगत होते.

तेवढ्यात साताऱ्याच्या हॉस्पिटलमधून कारने इथपर्यंत त्यांच्या वयस्कर आईंना आणलं जातं. त्यांना डोलीत उचलून ठेवलं जातं. त्यानंतर सगळं कुटुंब त्या डोलीमागे दरड ओलांडून डोंगर उतरायला लागतात. या भागात दरडींनी लोकांचं रोजचं आयुष्यं असं करुन ठेवलं आहे.

जागतिक हवामान बदलाचा संबंध

साताऱ्यातल्या सह्याद्रीच्या डोंगरांगांतल्या या दरडींचा हा प्रताप पाहून आल्यावर पुण्यात 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा'च्या भूशास्त्र विभागाचे प्रमुख राहिलेले डॉ. सतीश ठिगळेंना आम्ही भेटलो.

डॉ. ठिगळे 1983 पासून महाराष्ट्रातल्या दरडींचा अभ्यास करताहेत. "ज्या भागात या दरडी झाल्या आहेत तो अतिवृष्टीच्या प्रदेश आहे. तो भूकंपप्रवणही आहे. इथे यापूर्वीही अशा घटना झाल्या आहेत. पण यंदा ज्या प्रमाणात त्या झाल्या आहेत आणि जिथं पूर्वी कधी दरडी पडल्या नव्हत्या त्या भागातही त्या पडल्या आहेत. माझ्या दृष्टीनं ही चिंतेची बाब आहे. याचा हवामान बदलाच्या दृष्टीनंही अभ्यास व्हायला हवा," डॉ ठिगळे म्हणतात.

कोसळणारा पाऊस पश्चिम घाटाला नवीन नाही. इथला भूगोल, इथली जमिन आणि तिचं भूशास्त्र ही कारणं आहेतच, पण त्यापेक्षाही काही अधिक आहेत का? हा प्रश्न आम्हाला डॉ. रॉक्सी कोल यांच्याकडे घेऊन गेला.

रॉक्सी हवामानशास्रज्ञ आहेत आणि गेली 12 वर्षं पुण्याच्या Indian Institute of Tropical Meteorology म्हणजे IITM च्या 'सेंटर फॉर क्लायमटे चेंज' मध्ये जागतिक हवामान बदलाचा आणि त्याच्या भारतावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करत आहेत. अशा दरडी कोसळणं यामागे भूशास्त्रीय कारणं आहेच, या भागात मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गाला बसलेले धक्के आहेतच, पण अतिवृष्टीही कारणीभूत आहे. कमी काळात ढगफुटीसारखा होणारा प्रचंड पाऊस, जो इथल्या स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी अगोदर अनुभवला नाही आहे, त्यानं दरडींसारख्या घटनांची संख्याही वाढते आहे. आणि या अतिवृष्टीला जागतिक हवामान बदल कारणीभूत आहे.

"आमचा अभ्यास हे स्पष्टपणे दाखवतो की हे सगळं जागतिक हवामान बदलामुळं होतं आहे. त्यातही नेमकं कारण म्हणजे आपल्या हिंद महासागराचं तापमान वाढतं आहे. तापमान वाढल्यामुळे वाफ किंवा आर्द्रताही वाढते, जी अशा प्रकारच्या अतिवृष्टीला पोषक ठरते आहे," डॉ. रॉक्सी म्हणतात.

"ग्लोबल वॉर्मिंगचं एक महत्वाचं लक्षण म्हणजे, जेव्हा हवा तापते, ती अधिक आर्द्रता धरुन ठेवते. पण ती आर्द्रता अधिक काळ धरुन ठेवू शकत नसल्यामुळे पाऊस हा अधिक काळ पडत नाही. त्यामुळे जेव्हा पाऊस पडतो, तो थोड्या काळासाठी पडतो, पण जोरात पडतो आणि अतिवृष्टी होते.

त्यामुळे या अशा घटना आता वारंवार पाहायला मिळताहेत की खूप काळ पाऊस पडत नाही, कोरडा काळ जातो आणि त्यामध्ये 3-4 दिवस एकदम अतिवृष्टी होते. या घटना देशभर पाहायला मिळताहेत, विशेषत: पश्चिम घाट आणि महाराष्ट्राच्या काही भागात."

नेमकं हेच आम्हाला सर्वाधिक पावसाच्या महाबळेश्वरमध्येही ऐकायला आणि पहायला मिळतं. भारतातलं हवामानशास्त्र विभागाचं सर्वात जुनं वेदर स्टेशन महाबळेश्वरमध्ये आहे. 1929 पासून पावसाच्या नोंदी इथे होताहेत.

आम्ही तिथं गेलो. पाऊस इथे कायम अती, पण यंदा 22 आणि 23 जुलैला इथे गेल्या किमान 30 वर्षांतला सर्वाधिक पाऊस पडला. विशाल रामचंद्र इथं गेली 15 वर्षं नोंदी करताहेत, सहाय्यक वैज्ञानिक आहेत. त्यांच्या मते यंदा गेल्या 30 वर्षांतला सर्वाधिक पाऊस त्यांनी नोंदवला.

"गेल्या 30 वर्षांमध्ये आम्ही कधीही एवढ्या पावसाची नोंद पाहिलेली नाही. 594 मिमी हा विक्रम आहे. याअगोदरचं 2005 मध्ये होतं, पण तेही यापेक्षा कमी होतं.

तीन दिवसात खूप पाऊस पडलेला होता. जवळपास 1000 मिमी पाऊस 72 तासांमध्ये. सलग तीन दिवसांमध्ये महाबळेश्वरमध्ये एवढा पाऊस कधीही झालेला नाही. पूर्वी कसं व्हायचं की पाऊस पडायचा आणि थोडा ब्रेक मिळायचा. सलग 24 तासही एवढा पडायचा नाही. पण आता न थांबता सलग तीन दिवस पाऊस पडला आहे," विशाल सांगतात.

एक महत्वाचं नोंदवण्यासारखं, ते म्हणजे, अतिवृष्टीचं हे प्रमाण टप्प्याटप्प्यानं वाढतं आहे. निष्कर्षापर्यंत पोहोचायला वैज्ञानिकांना अनेक वर्षांच्या डेटा लागतो, पण महाबळेश्वरच्या गेल्या 15 वर्षांच्या मोठ्या नोंदीकडे नजर टाकली तरी कल्पना येते.

महाबळेश्वरमध्ये 26 जुलै 2005 ला, म्हणजे जेव्हा मुंबईत जलप्रलय झाला होता, तेव्हा 432 मिमी पाऊस 24 तासात पडला होता. त्यानंतरची नोंद आहे 11 ऑगस्ट 2008 ची जेव्हा 490.7 मिमी पाऊस झाला होता. आणि आता, यंदा 23 जुलै 2021 ला तो 594.4 मिमी एवढा विक्रमी नोंदवला गेला.

IPCC नं दिलेले इशारे महाराष्ट्र अनुभवतो आहे

प्रश्न केवळ अतिवृष्टी आणि त्यानंतर दरडींसारख्या होणा-या जिवघेण्या घटनांचा नाही वा केवळ अति पावसानं येणाऱ्या सांगली-कोल्हापूरसारख्या पूरांचाच नाही, तर इतरही अनेक आव्हानांचा आपल्यासमोर आहे.

6 ओगस्ट रोजी Intergovernmntal Panal on Climate change म्हणजेच 'IPCC' नं त्यांचा अहवाल घोषित करतांना अनेक गंभीर इशारे दिले आहेत. भारतासह दक्षिण आशियाला दिलेल्या इशा-यांपैकी काही तर आपण महाराष्ट्रात आणि पश्चिम घाटात अनुभवतोही आहोत.

हे शतक संपता संपता दक्षिण आशियात पाऊस खूप वाढेल. उन्हाळ्यातही पाऊस पडेल. एकूणच पावसाचं चक्र बदलून जाईल.

  • पृथ्वीचं तापमान वाढल्यामुळे जमिनीतली आर्द्रता कमी होऊन दुष्काळ वाढतील.
  • उन्हाळ्यात तापमान आणखी वाढेल आणि पूर्वीसारखी कडक थंडी पडणार नाही.
  • समुद्राच्या वाढत्या तापमानामुळे चक्रीवादळ, समुद्री वादळ यांसारख्या घटना वाढतील.

गेल्या काही काळात पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्रात येणाऱ्या चक्रीवादळांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्रानं गेल्या सलग दोन वर्षांमध्ये निसर्ग आणि तौक्ते ही दोन वादळं झेलली आहेत.

डॉ. रोक्सी कोल म्हणतात, "IPCC चा रिपोर्ट असं स्पष्ट म्हणतो की हिंद महासागर हा सर्वाधिक वेगानं तापत जाणारा महासागर आहे. त्यातही अरबी समुद्रासहित पश्चिमेकडचा भाग अधिक वेगानं तापतो आहे.

अरबी समुद्रात काही भागांत 1.2 ते 1.5 डिग्री सेल्सियसने तापमान वाढलं आहे. अगोदर बंगालच्या उपसागरात चक्रिवादळं यायची आणि अरबी समुद्र तुलनेनं थंड होता. पण आता तापमानवाढीमुळं तो चक्रिवादळांसाठी पोषक बनला आहे."

केवळ पश्चिम घाट नव्हे, तर मराठवाडाही

हवामान बदलाचे परिणाम केवळ पश्चिम किनारपट्टीवर आणि घाटात दिसत नाही आहे, तर ते मराठवाड्यातही दिसताहेत. एकिकडे दुष्काळ, तर दुसरीकडे त्याच प्रांतात अतिवृष्टी, हेही हवामान बदलाचं लक्षण आहे.

अतुल देऊळगांवकर हे लातूरस्थित ज्येष्ठ पर्यावरण पत्रकार आहेत. हवामान बदलावर त्यांच्या विशेष अभ्यास आहे.

ते सांगतात, "जेव्हा ढगफुटी होते ठिकठिकाणी. मराठवाड्यामध्ये तर 2012 पासून ढगफुटीची संख्या वाढत चालली आहे. एका पावसात पूर्ण दाणादाण उडते. शेतावरची माती पूर्णपणे निघून गेली आहे आणि गोटे येऊन पडलेले आहेत, असं चित्र शिरुर तासबनला, औरादला अनेक वेळेला दिसलं आहे. हे आपण लक्षात घेऊन त्याला सामोरं कसं जायचं याचा विचार करा.

आपण सतत खरीप आणि रब्बी पिकं खराब होणं हे मराठवाड्यामध्ये पाहतो आहोत. उष्णता 48 अंश सेल्सियस एवढी पोहोचली आहे. ढगफुटीचं प्रमाण वाढलेलं आहे.

या काळामध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र काय काय पद्धतीनं सहन करतो आहे. अतिवृष्टी पण सहन करत आहे, उष्णतेच्या लाटापण सहन करत आहे आणि पूर पण सहन करत आहे. याला सामोरं जाण्याचं आपलं एक डिझाईन तयार करणं आवश्यक आहे कारण या घटना खूप वरचेवर वाढत चाललेल्या आहेत.

त्यामुळे हे स्पष्ट आहे की, जगतिक हवामान बदलाची अरिष्टं आपल्या दारात येऊन पोहोचली आहेत. ती वाढत जातील असं शास्त्रज्ञ सांगताहेत. पण दोष केवळ निसर्गाला देऊन चालणार नाही, तो माणसालाही द्यावा लागेल.

पश्चिम घाटात, जंगलामध्ये, शहरांमध्ये नदीकिनारी जी अतिक्रमणं आहेत, खाणी आहे, मोठी विकासकामं आहेत जी या अरिष्टांच्या भयावहतेला मदत करताहेत, त्याची जबाबदारी टाळता येणार नाही. महाराष्ट्राला आता धोरणहीन राहता येणार नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)