Independence Day : 'जीवापेक्षाही आमच्यासाठी झेंडा महत्त्वाचा'

मंत्रालयावरील झेंडा

फोटो स्रोत, Shahid shaikh

फोटो कॅप्शन, मंत्रालयावरील झेंडा
    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी

"बॉर्डरवर सैनिक लढतात तसं आम्हाला इथे वाटतं. आम्ही खरोखर मंत्रालयात काम करतो, राष्ट्रध्वज फडकवतो तर आम्हाला अभिमान वाटतो. निदान आम्ही बॉर्डरवर जाऊ शकत नाही तर इथे चांगलं काम करतो," ही भावना आहे मंत्रालयात दररोज न चुकता राष्ट्रध्वज फडकवणाऱ्या सुरेंद्र जाधव यांची.

मंत्रालयावर दिवसभर दिमाखात फडकणारा राष्ट्रध्वज तुम्ही प्रत्यक्ष किंवा दृश्यांमध्ये तरी नक्की पाहिला असेल.

हा झेंडा नित्यनियमाने दररोज सूर्योदयाला वर चढवला जातो आणि सूर्यास्ताला झेंडा सन्मानाने काढला जातो. एकही दिवस या कामात खंड पडत नाही.

हे काम सुनिश्चित करतात सुरेंद्र जाधव आणि त्यांचे चार सहकारी.

सूर्योदय होण्यापूर्वीच सुरेंद्र जाधव मंत्रालयात पोहचतात. सुरक्षा रक्षक वगळता ते पहिलेच कर्मचारी असतात जे भल्या पहाटे मंत्रालयात प्रवेश करतात.

मंत्रालय इमारतीचा सर्वांत वरचा मजला म्हणजेच सातव्या मजल्यावर झेंडा फडकवला जातो. त्याच ठिकाणी सुरेंद्र जाधव यांच्या कामासाठी एक छोटी खोली आहे.

टाळं खोलायचं. साफ-सफाई करायची. सूर्योदयाची वेळ झाली की झेंडा काढायचा, जाड दोरी काढायची आणि सहकाऱ्यांसमवेत वरती झेंडा चढवायचा.

36 फूट उंचावर झेंडा नेला जातो. कुठल्याही प्रकारे तो खाली सरकू नये म्हणून खालच्या बाजूला दोरी हुकांमध्ये घट्ट बांधली जाते.

सुरेंद्र जाधव सांगतात, "ताकदीपेक्षा युक्तीने काम करावं लागतं. याठिकाणी हवा जोरात येते. 36 फूट उंच झेंडा फडकवावा लागतो. पाऊस किंवा हवा जास्त असेल तर चार ऐवजी पाच माणसांनाही बोलवावं लागतं. झेंडा पावसात भिजतो तेव्हा त्याचं वजन जवळपास 50 किलो एवढं होतं."

झेंडा वर चढवला की तो सूर्यास्ताला धिम्या गतीने खाली उतरवला जातो आणि घडी करुन ठेवला जातो.

मंत्रालयावरील झेंडा

फोटो स्रोत, Shahid shaikh

पण सुरेंद्र जाधव यांचं काम इथेच थांबत नाही. तर सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत राष्ट्रध्वजाची सुरक्षा करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. त्यामुळे सतत झेंड्याजवळ पहारा द्यावा लागतो असं ते सांगतात.

"झेंडा हवेमुळे किंवा पावसामुळे फाटला किंवा रंग खराब झाला का हे तपासावं लागतं. तसं असेल तर तातडीने झेंडा बदलावा लागतो. कधी कधी दोरीचाही प्रॉब्लेम होतो, हवा आली तर कधी दोरी कमकुवत होते. तसंच कावळा किंवा घार अशा पक्ष्यांनी घाण केली तर त्याकडे लक्ष ठेवावं लागतं. तसं काही झाल्यास झेंडा लगेच उतरवावा लागतो."

इतर कामांपेक्षा हे काम विशेष तर आहेच पण प्रचंड आव्हानात्मक सुद्धा आहे. कुठलाही प्रसंग ओढावला तरी हे काम थांबवता येत नाही.

26 जुलैसारखा पाऊस असो, चक्रीवादळ असो, रेल्वे ठप्प असो, दहशतवादी हल्ला असो वा कोरोना आरोग्य संकट असो सुरेंद्र जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांना राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी पोहचावेच लागते.

कोरोनाची लाट पसरली तेव्हा लोक अगदी उंबरठ्याबाहेरही येऊ शकत नव्हते. पण या काळातही एकही दिवस न चुकता सुरेंद्र जाधव आपलं काम जबाबदारीने पार पाडत होते.

झेंडा

फोटो स्रोत, Shahid shaikh

2012 मध्ये मंत्रालयात मोठी आग लागली. तिथे असलेला प्रत्येक जण जीव वाचवण्यासाठी शक्य तितक्या लवकर गेटबाहेर धावत होता. परंतु मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर परिस्थिती याउलट होती.

बाहेर पडण्याऐवजी राजेंद्र कानडे, सुरेंद्र जाधव आणि त्यांचे सहकारी झेंड्याजवळ गेले. झेंडा सुरक्षित आहे का ते तपासले.

"2012 मध्ये आग लागली तेव्हा आम्ही इथेच होतो. सगळा धूर वर येऊ लागला. कर्मचारी बाहेर पडत होते. पण आम्ही राष्ट्रध्वजाकडे लक्ष देत होतो. अधिकाऱ्यांना विचारुन झेंडा सन्मानाने वेळेआधीच खाली घेतला. तोपर्यंत आग आणखी पसरली होती. आम्ही सातव्या मजल्याच्याही वर अडकलो. फायर ब्रिगेडची शिडी सहाव्या मजल्यापर्यंतच पोहचली. आम्ही सातव्या मजल्यावरुन खाली उड्या मारल्या."

अशा कठीण प्रसंगी जिवाची भीती वाटत नाही का? यावर सुरेंद्र जाधव म्हणाले, "

झेंडा अभिवादन

फोटो स्रोत, Shahid shaikh

सुरेंद्र जाधव पत्नी आणि मुलासोबत वांद्रे येथे राहतात. आपल्याला या कामात कुटुंबाचीही मोलाची साथ मिळत असल्याचं ते सांगतात.

"माझी पत्नी पहाटे चार वाजता सुद्धा मला डबा देते. मी काय काम करतो हे इतरांना कौतुकाने सांगते. कोरोनामध्ये भीती होती पण कुटुंबाला माहिती होतं की जावं तर लागणार आहे."

भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्याचे नियम

भारतीय झेंडा संहिता 2002 नुसार देशभरात झेंडा कुठे आणि कसा फडकवावा याबाबतचे स्पष्ट नियम देण्यात आले आहेत.

सरकारी इमारत, सरकारी निवासस्थान, सरकारी कार्यालय या ठिकाणी झेंडा फडकवता कोणती काळजी घ्यावी याचेही निर्देश यात आहेत. यापैकी काही नियम जाणून घेऊया,

• झेंडा फडकवताना त्याला सन्मानाचे स्थान दिले पाहिजे.

• झेंडा स्पष्ट दिसेल अशा ठिकाणीच तो फडकवला पाहिजे.

• सरकारी आस्थापनांवरती रविवारसह सर्व सुट्ट्यांच्या दिवशीही झेंडा फडकला पाहिजे.

• झेंडा सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत फडकवला जाईल. हवामान कसेही असले तरीही.

• झेंडा वेगाने वरती चढवला पाहिजे आणि खाली उतरवताना धिम्या गतीने, सन्मानाने काढला पाहिजे.

• फाटलेला किंवा मळलेला झेंडा फडकवता येणार नाही.

• कोणत्याही व्यक्तीसाठी किंवा वस्तूसाठी अभिवादन करताना झेंडा खाली आणता येणार नाही.

• कोणताही इतर झेंडा राष्ट्रध्वजापेक्षा वरती फडकवता येणार नाही.

• कोणतीही वस्तू ध्वज-दंडाच्या वरती ठेवता येणार नाही.

• झेंड्याचा उपयोग इतर कुठल्याही प्रकारच्या कामासाठी करता येणार नाही.

घटनातज्ज्ञ उल्हास बापट सांगतात, "देशातील वरिष्ठ पदांवरील व्यक्तींचे निधन झाल्यास राष्ट्रध्वज मध्यावर आणला जातो. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, भारतरत्न अशा काही सर्वोच्च पदावरील व्यक्तींचे निधन झाल्यास दुखवटा जाहीर केला जातो."

"राज्यघटनेच्या 4 अ भागात 51 अ मध्ये भारतीय नागरिकाची 11 कर्तव्य दिली आहेत. यातील पहिलेच कर्तव्य आहे, नागरिकांनी राज्यघटनेचे मान राखावा, राष्ट्रध्वजाचा सन्मान करावा आणि राष्ट्रगीताचा सन्मान राखावा. हे प्रत्येक नागरिकाचे पहिले कर्तव्य आहे."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)