पंकजा मुंडे चुकीचा निर्णय घेणार नाहीत, भाजपने मुंडे कुटुंबाला भरपूर दिलं - विनायक मेटे #5मोठ्याबातम्या

पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे

फोटो स्रोत, @PankajaGopinathMunde

फोटो कॅप्शन, पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे

आज विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

1. भाजपने मुंडे कुटुंबाला भरपूर दिलं, पंकजा चुकीचा निर्णय घेणार नाहीत - विनायक मेटे

भाजपने मुंडे कुटुंबाला भरपूर दिलं असून दोन्ही बहिणींना याची जाणीव असल्याचं शिवसंग्राम संघटनेचे आमदार विनायक मेटेंनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे कोणताही चुकीचा निर्णय घेणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

लोकमतने याविषयीची बातमी दिली आहे.

झी 24 तास ने दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय सचिवांच्या बैठकीमध्ये पंकजा मुंडेंना कानपिचक्या दिल्या आहेत.

"सध्या अनेकांना मंत्री बनण्याची घाई झाली आहे. परंतु आता लोकसेवा करण्याची वेळ आहे, मंत्रिपद मागण्याची नाही," असं पंतप्रधान म्हणाल्याचं या बातमीत म्हटलंय.

"पंकजा तुम्ही खूप बोलता," असंही या बैठकीमध्ये बोलताना पंतप्रधान म्हणाल्याचं वृत्त काही माध्यमांनी छापलं आहे.

2. लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याची मोदी सरकारची तयारी, 6 ऑगस्टला राज्यसभेत चर्चा

संसदेच्या 19 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या पावसाळी अधिवेशनादरम्यान लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याची तयारी करण्यात येत आहे.

संसद

फोटो स्रोत, Getty Images

लोकसंख्या नियंत्रणासंदर्भातील प्रायव्हेट मेंबर बिलवर 6 ऑगस्टला राज्यसभेत चर्चा होण्याची शक्यता असल्याचं लोकमतने म्हटलंय.

भाजप खासदार राकेश सिन्हा यांचं हे लोकसंख्या नियंत्रणाविषयीचं बिल आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कालावधीदरम्यान 19 दिवस कामकाजाचे असतील.

3. जून महिन्यात किरकोळ महागाईच्या दरात अल्प घसरण

मे महिन्याच्या तुलनेमध्ये जून महिन्यात महागाईचा दर काहीसा कमी नोंदवला गेलाय. मे महिन्यात किरकोळ महागाईचा (Retail Inflation) दर 6.30 टक्के होता.

जून महिन्यासाठी महागाईचा दर 6.26 टक्के आला असल्याचं टीव्ही9 मराठीने म्हटलंय.

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने महागाईविषयीची ही माहिती जाहीर केली.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महागाईचा दर 4 टक्क्यांवर आणण्याचं उद्दिष्टं ठेवलं आहे, तर चालू आर्थिक वर्षासाठी महागाईच्या दराचं उद्दिष्टं 5.1 टक्क्यांवर ठेवलं आहे.

4. लवकरच स्पुटनिक लस देशभरात उपलब्ध होणार

स्पुटनिक - व्ही लशीचं व्यावसायिक वितरण लवकरच वाढवण्यात येणार असल्याचं ही लस भारतात उपलब्ध करून देणाऱ्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीने म्हटलंय.

स्पुटनिक लस

फोटो स्रोत, Reuters

येत्या काही आठवड्यांत लशीचं वितरण वाढवण्यात येईल.

रशियाकडून स्पुटनिक व्ही लस आयात केल्यानंतर या लशीचा डॉ. रेड्डीज कंपनीद्वारे सॉफ्ट लाँच करण्यात आला होता. हैदराबादनंतर हळूहळू ही लस देशातल्या 50 शहरांमध्ये देण्यात येत आहे. याचा विस्तार आता करण्यात येणार असल्याचं हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या बातमीत म्हटलंय.

5. गेल्या 6 महिन्यांत देशात 86 वाघांचा मृत्यू

गेल्या 6 महिन्यांमध्ये देशामध्ये 86 वाघांचा मृत्यू झाला असून याबाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.

वाघ

फोटो स्रोत, Getty Images

गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये वाघांच्या मृत्यूचं प्रमाण 153 टक्क्यांनी वाढल्याचं लोकसत्ताने म्हटलंय.

दुसऱ्या लाटेमध्ये ग्रामीण भागामध्ये संसर्ग वाढलेला असताना त्याची झळ वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना बसली आणि त्याचा परिणाम व्याघ्र संरक्षणावर झाल्याचं कन्झव्हेशन लेसन्स अँड वाईल्डलाईफ या संस्थेने म्हटलंय.

वाघांच्या मृत्यूमध्ये मध्य प्रदेश पहिल्या स्थानावर, महाराष्ट्र दुसऱ्या तर कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात सहा महिन्यांत 22 वाघांचा मृत्यू झालाय. तर मध्य प्रदेशात 26 वाघांचा मृत्यू झाला.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)