सिराजुद्दौलाने खरंच 146 इंग्रजांना अंधारकोठडीत डांबून मारलं होतं का?

भिश्ती

फोटो स्रोत, AlEPH PUBLICATION

    • Author, रेहान फझल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

इंग्लंडमधील कोणत्याही शाळेतील मुलाला भारताबाबत तीन गोष्टी नक्की माहिती असतात, असं म्हणतात. त्या तीन गोष्टी म्हणजे अंधारी कोठडी (ब्लॅक होल), प्लासीची लढाई आणि 1857 चे बंड.

औरंगजेबच्या मृत्यूनंतर म्हणजे 1707 पासूनच अत्यंत वेगानं मुघल साम्राज्याच्या पतनाला सुरुवात झाली होती. बंगाल तर एकप्रकारे तांत्रिकदृष्ट्या मुघल साम्राज्याचा भाग असूनही स्वतंत्र प्रांत बनला होता.

इंग्रज आणि फ्रान्सच्या लोकांनी त्यांच्या तिथल्या कारखान्यांची तटबंदी सुरू केली. त्यामुळं ते मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर करत आहेत, असं नवाब सिराजुद्दौलांना वाटलं. त्यांनी याबाबत विचारणा केली.

मात्र इंग्रजांकडून मिळालेल्या उत्तरानं ते समाधानी नव्हते. त्यामुळं 16 जून 1756 ला त्यांनी कलकत्त्यावर (आताचे कोलकाता) हल्ला केला.

या युद्धात इंग्रजांचा पराभव जवळपास निश्चित झाला होता. त्यामुळं गव्हर्नर जॉन ड्रेक त्यांच्या कमांडर, परिषदेतील सदस्य आणि महिला तसंच मुलांसह हुगळी नदीतून एका जहाजाद्वारे स्वतःचा जीव वाचवून निघून गेले.

इंग्रजांची शरणागती

कलकत्ताच्या तुकडीची (गॅरिसन) जबाबदारी जोनाथन हॉलवेल नावाच्या परिषदेच्या एका नव्या सदस्यावर सोडली.

सिराजुद्दौला

फोटो स्रोत, BLOOMSBURY PUBLICATION

फोटो कॅप्शन, सिराजुद्दौला आपल्या सैनिकांसमवेत एका पेंटिंगमध्ये

20 जून, 1756 ला सिराजुद्दौलाच्या सैनिकांनी फोर्ट विल्यमच्या भिंती तोडून आत प्रवेश केला आणि इंग्रजांच्या संपूर्ण गॅरिसननं त्यांच्यासमोर शरणागती पत्करली.

''सिराजुद्दौलानं फोर्ट विल्यमच्या मध्यभागी दरबार थाटला. त्याठिकाणी त्यांनी कलकत्त्याचं नाव बदलून अलीनगर करण्याची घोषणा केली,'' असं एस. सी. हिल यांनी बंगाल इन 1857-58 पुस्तकात म्हटलं आहे.

त्यानंतर त्यांनी माणिकचंद राजाला किल्ल्याचे रक्षक म्हणून जाहीर केलं. इंग्रजांनी तयार केलेलं गव्हर्नमेंट हाऊस पाडण्याचा आदेशही दिला.

ही इमारत राजकुमारांच्या राहण्याच्याही लायकीची नाही आणि व्यापाऱ्यांच्या लायकीचीही नाही, असं म्हटलं. त्यानंतर या यशासाठी ईश्वराचे आभार मानत, त्यांनी नमाज पठण केलं.

इंग्रज सैनिकाचा गोळीबार

"माझे हात बांधून मला नवाब सिराजुद्दौलांसमोर हजर करण्यात आलं. नवाब यांनी माझे हात उघडण्याचे आदेश दिले. माझ्याबरोबर गैरवर्तन केलं जाणार नाही, असं वचन दिलं. तसंच इंग्रजांनी केलेला विरोध आणि गव्हर्नर ड्रेकच्या वर्तनावर त्यांनी नाराजीही व्यक्त केली," असं वर्णन झेड हॉलवेल यांनी या घटनेची माहिती देताना 'इंट्रेस्टिंग हिस्टॉरिकल इव्हेंट्स रिलेटेड टू प्रोव्हिन्स ऑफ बंगाल' या पुस्तकात केलं आहे.

सिराजुद्दौला

फोटो स्रोत, Aleph

थोड्या वेळानं सिराजुद्दौला तिथून उठले आणि एका घरात आराम करण्यासाठी निघून गेले. वॅडरबर्न नावाच्या इंग्रजाचं ते घर होतं.

"सिराजुद्दौलांच्या सैनिकांनी लूटमार सुरू केली होती. पण त्यांनी फार क्रूरपणा केला नाही. त्यांनी काही इंग्रजांना लुटलं पण त्यांच्याबरोबर कुठल्याही प्रकारची बळजबरी केली नाही," असं एस. सी. हिल यांनी लिहिलं आहे.

काही पोर्तुगाली आणि आर्मिनियम यांना तर त्यांनी काहाही केलं नाही. त्यानंतर ते फोर्ट विल्यममधून बाहेर निघून आले. पण काही तासांनीच म्हणजे सायंकाळ होताच हॉलवेल आणि इतर कैद्यांबरोबरचं नवाब यांच्या सैनिकांचं वर्तन बदललं. त्याचं कारण म्हणजे, दारुच्या नशेत एका इंग्रजानं पिस्तुल काढलं आणि नवाबच्या एका सैनिकाला गोळीनं उडवलं.

इंग्रजांना अंधाऱ्या कोठडीत डांबलं

याबाबतची तक्रार सिराजुद्दौलांकडं पोहोचली. त्यांनी गैरवर्तन करणाऱ्या इंग्रज सैनिकांना कुठं ठेवलं जातं असं विचारलं. त्यावर त्यांना अंधाऱ्या कोठडीत ठेवलं जातं, असं उत्तर मिळालं. त्यामुळं या कैद्यांना रात्रभर मोकळं सोडणं धोकादायक ठरेल, अशा विचारानं त्यांना अंधाऱ्या कोठडीत टाकणं योग्य राहील, असा सल्ला अधिकाऱ्यांनी त्यांना दिला.

काळी कोठडी

फोटो स्रोत, Getty Images

सिराजुद्दौलांनीही त्यांना यावर अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला.

आदेश मिळताच 146 इंग्रजांना 18 फूट बाय 14 फुटांच्या एका कोठडीत डांबण्यात आलं. इंग्रजांच्या पदाचा किंवा ते पुरुष आहेत की, महिला याचाही विचार न करता त्यांना या कोठडीत डांबण्यात आलं. मोजक्या तीन ते चार कैद्यांसाठी तयार करण्यात आलेल्या या कोठडीला केवळ 2 लहान -लहान खिडक्या होत्या.

''ती रात्र कदाचित वर्षातील सर्वाधिक उकाडा असलेली रात्र असावी. सर्व कैदी त्या कोठडीत अन्न, पाणी आणि हवेविना कोंडलेले होते,'' असं हॉलवेल यांनी लिहिलं आहे.

सायंकाळी सात वाजता सुरू झालेला हा त्रास इंग्रजांना दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत कायम राहिला.

''या कैद्यांवर नजर ठेवण्यासाठी सैनिक त्याठिकाणी होते. पण सिराजुद्दौलांना उठवून या कैद्यांच्या अस्थेबद्दल सांगण्याची त्यांची हिम्मतच झाली नाही.

"सिराजुद्दौला जेव्हा स्वतः झोपेतून उठले त्यावेळी त्यांना या कैद्यांची अवस्था समजली. त्यानंतर त्यांनी कोठडीची दारं उघडण्याचे आदेश दिले. जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा 146 पैकी केवळ 23 कैदी जिवंत बाहेर आले. तेही मरणासन्न अवस्थेत होते," असं वर्णन एस. सी. हिल यांनी केलं आहे.

सिराजुद्दौला

फोटो स्रोत, Alamy

या सर्व मृतदेहांना जवळच एक खड्डा खोदून कोणतेही विधी न करता पुरण्यात आलं.

सुरक्षारक्षकांना लाच देण्याचा प्रयत्न

केवळ एका वृद्ध सुरक्षारक्षकानं त्यांच्याप्रती जरा दया दाखवली होती, असं हॉलवेल यांनी लिहिलं आहे.

"मी त्यांना नम्रपणे म्हटलं की, आमचा त्रास कमी व्हावा म्हणून अर्ध्या लोकांना दुसऱ्या खोलीत बंद करा. एवढी दया दाखवल्यास सकाळी तुम्हाला एक हजार रुपये देईन. त्यानं प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं. पण थोड्याच वेळात तो परत आला आणि असं करणं शक्य नसल्याचं सांगितलं.

"मी त्याला दुप्पट पैसे देण्याचा प्रस्ताव दिला. तो गेला पण परत येऊन त्यानं नवाबांच्या आदेशाशिवाय हे शक्य नसल्याचं सांगितलं. तसंच ते झोपले असून त्यांना उठवण्याची हिम्मत कुणामध्येही नसल्याचंही त्यांनी सांगितलं,'' असं हॉलवेल यांनी लिहिलं आहे.

श्वास कोंडून झाला मृत्यू

रात्री नऊ वाजेच्या सुमारास लोकांना तहान लागायला सुरुवात झाली होती. त्यानंतर लोकांची अवस्था खराब होऊ लागली.

एका म्हाताऱ्या सैनिकाला त्यांच्यावर दया आली. त्यानं थोडं पाणी आणलं. खिडकीच्या गजांमधून त्यानं पाणी आत दिलं.

काळी कोठडी

फोटो स्रोत, Getty Images

या स्थितीचं वर्णन असं करण्यात आलं आहे.

''आमची काय अवस्था होती, हे आम्ही सांगूही शकत नाही. दुसऱ्या खिडकीच्या गजाला धरून काही लोक उभे होते. ज्या खिडकीतून पाणी आत देण्यात आलं होतं, त्याकडं दुसऱ्या खिडकीत उभे असलेले सगळेच अत्यंत वेगानं धावले.

रस्त्यात त्यांनी अनेक जणांना पायाखाली चिरडलं. त्यामुळं थोड्या पाण्यानं त्यांना दिलासा तर मिळालाच नाही, पण त्यांची तहान आणखी वाढल्याचं मला जाणवलं. सगळीकडून 'हवा हवा' असा एकच आवाज येत होता.

त्यानंतर कोठडीत बंद असलेल्या लोकांनी सैनिकांना वाईट-साईट बोलायला सुरुवात केली. राग येऊन सैनिक गोळ्या झाडतील आणि या कष्टातून कायमची मुक्ती मिळेल, असं त्यांना वाटलं होतं. पण तसं झालं नाही.

रात्रीच्या साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान तेही बंद झालं. त्यांच्या अंगात प्राणच शिल्लक राहिला नव्हता. उकाड्यामुळं त्यांचा श्वास कोंडत होता. जीव जाऊन ते एकमेकांवर पडत होते," असं हॉलवेल यांनी म्हटलं आहे.

स्मारकाद्वारे स्मृतींचं जतन

हॉलवेल यांनी या मृतांच्या स्मरणार्थ याठिकाणी एक स्मारक तयार केलं.

काही वर्षांनी वीज पडल्यामुळं या स्मारकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. विटांपासून तयार करण्यात आलेलं हे स्मारक 1821 मध्ये फोर्ट विल्यमचे तत्कालीन गव्हर्नर जनरल फ्रान्सिस हॅस्टिंग्स यांनी पाडलं होतं.

स्मारक

फोटो स्रोत, Getty Images

त्यानंतर 1902 मध्ये व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी अंधाऱ्या कोठडीपासून काही अंतरावर असलेल्या डलहौसी स्क्वेअर (आजचं बिनोय, बादल, दिनेश बाग) मध्ये या लोकांच्या स्मरणार्थ संगमरवराचं आणखी एक स्मारक तयार केलं.

लोकांच्या मागणीवरून 1940 मध्ये ते सेंट जॉर्ज चर्चच्या प्रांगणात स्थलांतरित करण्यात आलं. त्याठिकाणी आजही हे स्मारक आहे. काही इतिहास अभ्यासकांनी मात्र हॉलवेल यांच्या वर्णनावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

"हॉलवेल यांनी सांगितलेल्या 123 मृतांपैकी आम्हाला फक्त 56 जणांच्या नोंदी आढळल्या," असं एस. सी. हिल यांनी म्हटलं आहे.

मृतांचा आकडा फुगवून सांगितल्याचा आरोप

भारतातील प्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार यांनीही हॉलवेल यांनी या घटनेतील मृतांचा आकडा फुगवून सांगितला असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

'द एनार्की' पुस्तक

फोटो स्रोत, Bloomsbury

''अनेक इंग्रज हे लढाईमध्येच मारले गेले होते. त्यामुळं सिराजुद्दौलाच्या हाती एवढे इंग्रज लागण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. पुढं एक सावकार भोलानाथ चंद्रा यांनी 18 बाय 15 फूट आकाराचं एक रिंगण आखलं आणि त्यात लोकांना एकत्र केलं.

"त्या लोकांची संख्या 146 होऊ शकली नव्हती. जे लोक आधीच लढाईमध्ये मारले गेले होते किंवा ते जिवंत राहण्याची किंवा वाचण्याची शक्यता नव्हती, त्यांचं वर्णन हॉलवेल यांनी केलं आहे," असं सरकार यांनी त्यांच्या 'द हिस्ट्री ऑफ बंगाल' पुस्तकात केलं आहे.

"नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार अंधाऱ्या कोठडीत 64 जणांना ठेवण्यात आलं होतं. त्यातील 21 जणांचा जीव वाचला होता.

"या घटनेच्या 150 वर्षांनंतरही ब्रिटिश शाळांमध्ये भारतीय लोकांच्या क्रौर्याचं दर्शन म्हणून हे शिकवलं जातं. पण गुलाम हुसैन खान यांच्यासह तत्कालीन इतिहासकारांच्या लिखाणातही याचं वर्णन आढळत नाही," असं प्रसिद्ध इतिहासकार विल्यम डेलरिंपिल यांनी त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'द अनार्की' पुस्तकात म्हटलं आहे.

इंग्रजांमध्ये नाराजी

इतिहासाच्या पानांमध्ये या घटनेला आहे त्यापेक्षा फुगवून सांगितलं आहे. पण त्याचा फायदा ब्रिटिशांनी राष्ट्रवाद वाढवण्यात करुन घेतला.

इंग्रजांमध्ये नाराजी

फोटो स्रोत, Getty Images

रॉबर्ट क्लाइव्ह यांनी 7 ऑक्टोबर 1756 ला खासदार विल्यम मॉबट यांना एक पत्र लिहिलं होतं.

"या घटनेबाबात समजल्यानंतर प्रत्येकाच्या मनात भीती, दहशत आणि दुःख निर्माण झालं आहे. ही नाराजी प्रामुख्यानं सिराजुद्दौला यांच्याबद्दल आहे.

"त्यांनी कलकत्ता आमच्याकडून हिसकावला असून तो आपल्या देशवासियांचा मारेकरी आहे. ज्या पद्धतीनं कलकत्त्यावर ताबा मिळवण्यात आला, त्यामुळंही आपला अपमान झाला आहे," असं या पत्रात म्हटलं होतं.

ब्रिटिशांमध्ये सगळीकडं हीच भावना निर्माण झाली होती. त्यामुळं या घटनेचा बदला घेतला जायला हवा.

"ब्लॅक होल म्हणजे अंधारी कोठडी हा चर्चेचा विषय ठरली. ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाऱ्यांवर केलेला अत्याचार अशा पद्धतीनं त्याचं सादरीकरण करण्यात आलं.

घटनेच्या एका वर्षानंतर लंडनला याची बातमी पोहोचली. त्याचवेळी हॉलवेल हेही जहाजाद्वारे लंडनला पोहोचले.

"नंतर 1757 मध्ये नवाब सिराजुद्दौलावर हल्ला करण्यासाठी या घटनेचं कारण पुढं करण्यात आलं," असं निकोलस डर्क्स यांनी त्यांच्या 'कास्ट्स ऑफ माइंड कोलोनियलिझ्म अँड मेकिंग ऑफ मॉडर्न इंडिया' मध्ये लिहिलं आहे.

हॉलवेल यांच्या वर्णनावर प्रश्नचिन्हं

"हॉलवेल, कूक आणि इतर ज्यांनी या घटनेची वर्णनं लिहिली आहेत, ती सर्व कल्पनांच्या आधारावर होती. यापैकी बहुतांश लोक हे फोर्ट विल्यमवर झालेल्या हल्ल्यात मारले गेले होते,'' असं एच. एच. डॉडवेल यांनी त्यांच्या 'क्लाइव्ह इन बंगाल 1756-60' या पुस्तकात लिहिलं आहे.

"ब्लॅक होल घटनेच्या एकूण 14 वर्णनांमध्ये एकाला वगळता इतर सर्व वर्णनांच्या माहितीचा स्रोत हॉलवेल यांचा लेख हाच आहे. तर 14 वं वर्णन हे घटनेच्या 16 वर्षांनंतर लिहिण्यात आलं होतं,'' असं डर्क्स यांनी म्हटलं आहे.

रॉबर्ट क्लाइव्ह

फोटो स्रोत, BLOOMSBURY PUBLICATION

काही इतिहासकारांना अंधाऱ्या कोठडीच्या या घटनेवर शंका आहे. मारले गेलेले लोक अंधाऱ्या कोठडीत श्वास गुदमरून नव्हे तर लढाईत मारले गेले होते.

''घटना घडली होती हे खरं आहे. पण काही वर्णनांमध्ये तफावत आहे. या क्रौर्यासाठी नवाब सिराजुद्दौला प्रत्यक्षरीत्या स्वतः जबाबदार नव्हता. कैद्यांबरोबर कसं वर्तन करायचं याचा निर्णय त्यानं शिपायांवर सोडला होता. या कैद्यांना त्या लहानशा कोठडीत ठेवायचा आदेश त्यांनी स्वतः दिला नव्हता.

"मात्र त्यांनी या कृत्यासाठी शिपायांना कधी शिक्षाही दिली नाही किंवा, यार कधी दुःखही व्यक्त केलं नाही,'' असं दुसरे एक इतिहासकार विन्सेंट ए स्मिथ यांनी त्यांच्या 'ऑक्सफर्ड हिस्ट्री ऑफ इंडिया फ्रॉम अर्लियर टाइम्स टू द एंड ऑफ 1911' मध्ये लिहिलं.

ब्रिटिश साम्राज्यवादाला योग्य ठरवण्याचा प्रयत्न

अंधाऱ्या कोठडीची ही घटना म्हणजे भारतातील ब्रिटिश साम्राज्यवादाच्या विस्ताराचं कारण असल्याचं म्हटलं गेलं. पण त्याचबरोबर भारतात ब्रिटिशांच्या राज्याला त्याआधारे योग्य ठरवण्याचा प्रयत्नही करण्यात आला.

मात्र, ब्रिटिशांच्या राज्याचा सूर्य अस्त होत गेला, तशी ही घटना इतिहासांच्या पानांमध्ये मागे पडत गेली. या घटनेच्या एका वर्षाच्या आत रॉबर्ट क्लाइव्हनं पुन्हा कलकत्त्यावर ताबा घेतला तसंच प्लासीच्या लढाईत सिराजुद्दौलाला पराभूत करून इंग्रजांच्या राज्याची पायाभरणीही केली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)