उद्धव ठाकरेंनी युतीच्या शक्यतेवर म्हटलं, 'मी दोघांमध्ये बसलोय, बाहेर कसा येऊ?' #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवरील महत्त्वाच्या बातम्यांचा घेतलेला आढावा.
1. मी दोघांमध्ये बसलोय, बाहेर कसा येऊ?- उद्धव ठाकरेंची युतीच्या शक्यतेवर प्रतिक्रिया
शिवसेना भाजपसोबत पुन्हा युती करणार असल्याची शक्यता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेटाळली आहे. "मी या दोघांमध्ये बसलो आहे. बाहेर कसा येऊ?" असं उद्धव ठाकरे मिश्किलपणे म्हणाले. झी 24 तासने हे वृत्त दिलं आहे.
पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेना आणि भाजप एकत्र येणार असल्याची चर्चा आहे याबाबत प्रश्न विचारला.
यावर उद्धव ठाकरे म्हणाले, "मी या दोघांमध्ये बसलो आहे. बाहेर कसा येऊ? 30 वर्षे एकत्र होतो तेव्हा काही झालं नाही आता काय होणार?"
यावेळी त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर दबाव आणला जात असल्याचाही आरोप केला. केंद्र सरकारकडून अधिकारांचा गैरवापर होत असल्याचंही ते म्हणाले.
2. नवी मुंबई विमानतळाला शरद पवार यांचे नाव देण्याची मागणी
नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून वाद सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार यांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाने या मागणीसाठी मुंबईत आंदोलन केलं. पुढारीने हे वृत्त दिलं आहे.

फोटो स्रोत, Sharad Pawar/Facebook
शरद पवार यांचे राजकीय आणि सामाजिक योगदान मोठं असून ते सलग 54 वर्ष राजकारणात कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे, अशी मागणी प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद हाजी मोमीन यांनी केली आहे.
नवी मुंबई विमानतळाला शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचं, तर भाजप आणि नवी मुंबईतील नागरिकांकडून दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी होतेय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची भूमिका घेतली आहे.
3. कृपाशंकर सिंह भाजपमध्ये प्रवेश करणार
माजी गृहराज्यमंत्री आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह आज (7 जुलै ) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे. महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
कृपाशंकर सिंह गेल्या काही काळापासून काँग्रेसमध्ये नाराज होते. तसंच 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. विरोधी पक्षनेते देवंद्र फडणवीस आणि प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे.
मुंबईत उत्तर भारतीयांचा एक प्रमुख चेहरा भाजपमध्ये जाणार असल्याने यामुळे काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे. कृपाशंकर सिंह हे मुंबईत एकेकाळी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते. कलिना मतदारसंघातून ते तीन वेळा काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले आहेत.
4. सर्वसामान्यांसाठीचे धान्य खाजगी उद्योगांना?
केंद्र सरकारच्या नवीन योजनेनुसार भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामांमध्ये ठेवलेल्या तांदळाचा काही हिस्सा खाजगी हातांमध्ये सोपवला जाणार आहे. 78,000 टन तांदूळ खासगी उद्योगांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
देशातील इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यासाठी हे पाऊल उचललं जात आहे. लोकमतने हे वृत्त दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
एफसीआयच्या गोदामांमध्ये असलेला तांदूळ खाजगी डिस्टलरीजकडे देण्यात येणार असून त्या यातून इथेनॉलचे उत्पादन करणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे डिस्टलरीजना तांदूर 2 हजार रुपये प्रति क्विंटल या माफक दराने दिला जाणार आहे. एखादे राज्य जेव्हा ही खरेदी करतं तेव्हा त्यांच्याकडून प्रति क्विटलमागे किमान 2200 रुपये घेतले जातात.
पेट्रोलियम पदार्थांची आयात कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असून त्यासाठी इंधनात इथेनॉल मिसळण्यास केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे. यासाठी खासगी डिस्टलरीजना सरकार स्वस्त दरात कर्ज सुद्धा उपलब्ध करून देत आहे. या निर्णयाचे भविष्यात अनेक दुष्परिणाम होऊ शकतात, असं जाणकार सांगतात.
5. रेव्ह पार्टी प्रकरणात हिना पांचाळसह 20 जणांची पोलीस कोठडी कायम
इगतपूरी रेव्ह पार्टी प्रकरणात अभिनेत्री हिना पांचाळसह 20 जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मंगळवारी (6 जुलै) विशेष न्यायालयात याप्रकरणी सुनावणी पार पडली. न्यायालयाने संशयितांचा ताबा ग्रामीण गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.
आज (7 जुलै) सर्व आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. नाशिकमधील इगतपुरीत दोन बंगल्यांमध्ये मालिका आणि सिनेमात काम करणाऱ्या कलाकारांना रेव्ह पार्टी करत असताना रंगेहाथ पकडण्यात आलं होतं.
पोलिसांचा छापा पडल्यानंतर संशयितांनी बंगल्याच्या आवारातील स्विमिंग पूलमध्ये चरस, कोकेनसारखे ड्रग्ज फेकून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. विशेष न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीदरम्यान संशयितांनी सलग दोन दिवस अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे समोर आलं होतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








