कोरोना : 'डेल्टा प्लस' व्हेरियंटचे रुग्ण आढळलेलं गाव कोरोनामुक्त कसं झालं?

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

"मला कोरोना व्हायरसचा नवा प्रकार 'डेल्टा प्लस' व्हेरियंटची लागण झाली होती. कोरोना टेस्ट केली तेव्हाही लक्षणं दिसून आली नाहीत. आताही तब्येत एकदम ठणठणीत आहे."

जळगावच्या विचखेडा गावचे विनोद पाटील (नाव बदललेलं आहे) सांगतात. त्यांच्याच गावात कोरोना व्हायरसच्या 'डेल्टा प्लस' व्हेरियंटचे 7 रुग्ण आढळून आले होते. पण आता विचखेडा गाव पूर्णत: कोरोनामुक्त झालं आहे.

जळगाव जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील म्हणतात, "डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आढळलेलं हे गाव कोरोनामुक्त झालंय. गावात गेल्या 20 दिवसांपासून एकही रुग्ण नाही."

कोरोना व्हायरसच्या 'डेल्टा प्लस' व्हेरियंटला केंद्र सरकारनं 'Variant of Concern' म्हणजेच 'विषाणूचा चिंताजनक प्रकार' म्हणून घोषित केलंय. भारतातील 3 राज्यात 'डेल्टा प्लस' व्हेरियंटचे 40 रुग्ण आढळून आले आहेत.

'मला झाला डेल्टा प्लस व्हेरियंटचा संसर्ग'

महाराष्ट्रात 'डेल्टा प्लस' व्हेरियंटचे 21 रुग्ण आढळून आलेत. यातील 7 रुग्ण जळगाव जिल्ह्यातील विचखेडा गावात नोंदवले गेले.

विचखेडा गावातील कम्युनिटी हेल्थ ऑफिसर डॉ. देवयानी शिंदे सांगतात, "डेल्टा प्लस व्हेरियंटची लागण झालेले हे रुग्ण पूर्णत: बरे झालेत. त्यांच्या संपर्कात आलेल्यांमध्येही कोरोना संसर्ग दिसून आला नाही."

विचखेडा, जळगाव

फोटो स्रोत, Devendra Sonawane

याच 7 रुग्णांपैकी एक असलेल्या विनोद पाटील (नाव बदललेलं) यांच्याशी आम्ही बातचीत केली, तेव्हा ते शेतावरचं काम आटपून, संध्याकाळी घरी परतले होते.

ते सांगतात, "मी रोज कामाला जातो. दिवसभर शेतीची कामं करतो. गावातही हिंडतो-फिरतो. माझी तब्येत एकदम व्यवस्थित आहे."

पण मे महिन्यात आरोग्य विभागानं केलेल्या एका रँडम अशा टेस्ट मोहिमेत विनोद यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. "त्यावेळेही मला काहीच लक्षणं नव्हती. अजिबात त्रास होत नव्हता," विनोद तो अनुभव सांगतात.

विनोद यांचा मुलगाही त्यांच्यासोबतच शेतात काम करतो. बीबीसीशी बोलताना ते सांगतात, "वडिलांना कोणताही त्रास किंवा लक्षणं नव्हती. आताही तब्येत उत्तम आहे."

महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरियंट आढळून आल्याने लोकांच्या मनात भीती निर्माण झालीय आहे.

तुम्हाला तुमचा रिपोर्ट कळला तेव्हा भीती वाटली का? असा प्रश्न विचारल्यावर पुढे सांगतात, "मला काहीच त्रास झाला नाही. या व्हेरियंटची लागण झाली होती अशी माहिती प्रशासनाकडून मिळाली."

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

गावात येता-जाता कुतूहलापोटी लोकं त्यांना डेल्टा प्लस व्हेरियंटबद्दल विचारतात.

ते सांगतात, "काही लोकांनी मला विचारलं. मी त्यांना सांगितलं, मला काहीच त्रास नव्हता. घाबरण्याचं कारण नाही."

गावातील मिनाक्षी गाडगे (नाव बदललेलं) यांनाही डेल्टा प्लस व्हेरियंटचा संसर्ग झाला होता. "मलाही काहीच त्रास झाला नाही. मीच विचारात पडले, माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह कसा आला?" असं त्या म्हणाल्या.

गाव कोरोनामुक्त कसं झालं?

"आता हे गाव पूर्णत: कोरोनामुक्त झालंय," गावातील आरोग्यसेवक देवेंद्र सोनावणे सांगतात. विचखेडा गावाची लोकसंख्या 1200 च्या आसपास आहे. गावातील बहुतांश लोक शेतीचा व्यवसाय करतात.

जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "डेल्टा प्लस व्हेरियंटचे सर्व रुग्ण एसिम्टोमॅटीक होते. त्यांना कोणतीही लक्षणं नव्हती किंवा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्याची गरजही पडली नाही."

'डेल्टा प्लस व्हेरियंट' धोकादायक समजला जात असल्याने प्रशासनाने तात्काळ तपासणी सुरू केली.

"संक्रमित रुग्णांच्या संपर्कातील हायरिस्क आणि लो-रिस्क कॉन्टॅक्टची तपासणी केली. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळालं नाही, "असं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत पुढे म्हणाले.

विचखेडा, जळगाव

फोटो स्रोत, Devendra Sonawane

जळगाव जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील सांगतात, "डेल्टा प्लस व्हेरियंटचा संसर्ग झालेल्यांच्या संपर्कात आलेल्या 155 लोकांची तपासणी करण्यात आली. संपर्कात आलेल्यांमध्ये कोरोना संसर्ग दिसून आला नाही. "

जळगावातील 1525 गावांपैकी सद्य स्थितीत फक्त 75 गावांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद आहे. रुग्णांची संख्या अत्यंत कमी आहे, डॉ. पाटील यांनी पुढे सांगितंल.

त्यातही 'डेल्टा प्लस' व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांना कोणतीच लक्षणं नव्हती. होम क्वारंटाईनमध्येच रुग्ण बरे झाले, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

मे महिन्यात रुग्ण आढळले

मे महिन्यात विचखेडा गावातील लोकांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. हे नमुने जिनोम सिक्वेंन्सिंगसाठी पुण्याच्या नॅशनल इंस्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजिकडे (NIV) पाठवण्यात आले.

कम्युनिटी हेल्थ ऑफिसर डॉ. देवयानी शिंदे सांगतात, "ज्यांना 'डेल्टा प्लस' व्हेरियंटची लागण झाल्याचं स्पष्ट झालं, त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह होता. पण, कोणालाच कोरोनाची लक्षणं नव्हती."

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पाटील म्हणाले, "सातपैकी सहा रुग्ण गावातील होते. एक रुग्ण बाहेरच्या राज्यातून आला होता. पण, तो ही असिप्टोमॅटीक होता."

प्रशासनाकडून काय काळजी घेतली जात आहे?

आरोग्य सेवक देवेंद्र सोनावणे याविषयी माहिती सांगतात, "डेल्टा प्लस व्हेरियंटची लागण झालेल्या व्यक्तींची दररोज तपासणी होते. आशासेविका घरोघरी जाऊन ऑक्सिजनची पातळी आणि आरोग्य तपासणी करतात."

पण, गावातील लोकांमध्ये डेल्टा प्ल्स व्हेरियंटबदद्ल भीती आहे का? यावर देवेंद्र सोनावणे पुढे सांगतात, "गावकऱ्यांना हळूहळू डेल्टा प्लस व्हेरियंटबाबत माहिती मिळाली आहे. आम्ही त्यांना काळजी करू नका, घाबरू नका, योग्य काळजी घ्या, अशी माहिती देत आहोत."

'डेल्टा प्लस' व्हेरियंट' धोक्याचा आहे?

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, 'डेल्टा प्लस' व्हेरियंट' चिंतेचा मानला जातोय. हा व्हायरस रोगप्रतिकार शक्तीला चकवणारा असू शकतो.

'डेल्टा प्लस' व्हेरियंटला केंद्र सरकारने 'विषाणूचा चिंताजनक प्रकार' घोषित केलंय. त्यामुळे, राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यातून 100 नमुने 'डेल्टा प्लस' व्हेरियंटच्या तपासणीसाठी गोळा करण्याचा निर्णय घेतलाय.

महाराष्ट्रात 'डेल्टा प्लस' व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 21 पर्यंत पोहोचली आहे. 'डेल्टा प्लस' व्हेरियंटच्या तपासासाठी राज्यभरातून 7500 नमुने पाठवण्यात आले होते.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)