Coca-Cola : जेव्हा इंदिरा गांधींना पराभूत केल्याच्या आनंदात मोरारजी देसाईंनी सरकारी कोला बाजारात आणला होता

कोका कोला

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी

1980 चं दशक ओळखलं जातं ते स्मलगर्ससाठी. त्याकाळात भारतात अनेक गोष्टींचं स्मगलिंग व्हायचं. त्या काळातले स्मगलर्स, डॉन यांचे किस्से अजूनही चर्चिले जातात. अमिताभ बच्चन यांची त्याकाळातले गाजलेले सिनेमे आठवा, त्याची थीमही स्मगलिंगच होती. हाजी मस्तानसारखे डॉन मोठे झाले याच स्मगलिंगच्या जीवावर.

सोनं, चांदी, परदेशी घड्याळं, इलेक्ट्रॉनिक्ससारख्या गोष्टींचं स्मगलिंग तर व्हायचंच, पण त्याही बरोबर एक गोष्ट असायची. कोका-कोलाच्या बाटल्या.

शेजारच्या पाकिस्तानातून या बाटल्या भारतात यायच्या आणि चढ्या भावाने विकल्या जायच्या.

त्याला कारणही तसंच होतं. तेव्हा भारतात कोका-कोला विकण्यावर बंदी होती. भारत सरकारने कोका-कोलाला 1977 सालीच हाकललं होतं. पण तोपर्यंत उच्चभ्रू भारतीयांना कोका-कोलाची चटक लागली होती आणि आपल्या घरात, पार्टीमध्ये कोका-कोला असणं श्रीमंतीचं लक्षण समजलं जायचं.

एकीकडे कोका-कोलाला भारतातून काढता पाय घेऊनही असं भाग्य लाभलं होतं तर पेप्सीला मात्र 1962-63 च्या सुमारास थंड प्रतिसादामुळे भारतातून गाशा गुंडाळावा लागला होता.

हे दोन्ही कोल्ड्रिंक भारतात मिळत नव्हते, तरी भारतातलं कोलाचं मार्केट मात्र जोरात चालू होतं. कोण होते इथले दावेदार? ते पाहूच. तेव्हाच याही प्रश्नांचं उत्तर मिळेल जगभरात स्वस्तात विकला जाणारा की कोका-कोला भारतात श्रीमंतीचं लक्षण का बनला.

कोका कोला

फोटो स्रोत, Getty Images

कोका-कोला इंडियाच्या साईटवर असलेल्या कोकाकोला जर्नी या लेखात 1993 साली या पेयाची भारतात पुन्हा प्रवेश कसा झाला हे सांगितलंय.

याच लेखात त्यावेळेस कोका-कोला इंडियाचे मार्केटिंग हेड असणारे नितीन दळवी म्हणतात, "आम्ही कंपनीच्या इतिहासात कधीही न घडलेली गोष्ट करू पाहात होतो. तब्बल सोळा वर्षांनंतर भारतात कोका-कोलाची एंट्री होत होती. एक अख्खी पिढी कोका-कोला न पिता मोठी झाली होती. देशातल्या काही मोजक्या लोकांनी, जे एकतर परदेशी भेटी देऊन आले होते किंवा ज्यांनी स्मगलिंगव्दारे देशात आलेल्या कोका-कोलाची चव चाखली होती. पण लाखो लोकांना या शीतपेयची चव माहिती नव्हती. एक मोठा जुगार आम्ही खेळत होतो."

कोका-कोला आणि पेप्सीची भारतात एंट्री

भारतातला पहिला सोडा एका इंग्रजाने 1837 साली बनवला. हेन्री रॉजर्स असं त्या माणसाचं नाव होतं आणि त्याने बनवलेला सोडा होता रॉजर्स.

आता मुळात पाण्यात सोडा मिसळून त्याचं पेय कोणी बनवलं जगात तर फारच मागे जावं लागेल, पार 1767 च्या इंग्लंडमध्ये. जोसेफ प्रिस्टली याने पहिल्यांदा ते उसळतं, बुडबुड्याचं पेय बनवलं. पण याचा व्यावसायिक स्तरावर उपयोग सुरू केला जेकब श्वेप्स या स्वित्झर्लंडच्या माणसाने 1786 साली.

म्हणजे गेली 257 वर्षं सोडा, ज्याला स्पार्कलिंग वॉटर असंही म्हणतात, माणसाच्या पोटात उड्या मारतोय.

कोका कोला

फोटो स्रोत, H D DARUKHANAWALA, PARSIS AND SPORTS

रॉजर्सचा सोडा लोकप्रिय झाला तसं इतर भारतीय कंपन्यांनीही सोडा काढले. पालनजी, आर्देशर, दिनशॉ अशा अनेक प्रकारचे सोडा मिळू लागले. सर्वसामान्य भारतीयांसाठी गोटी किंवा बंटा सोडा रस्त्यावर मिळायला लागला.

भारतात हे सगळं होतं असताना अमेरिकेत कोका-कोला आणि पेप्सीने आपला प्रवास सुरू केला होता.

पुढे जाण्याआधी एक छोटीशी गंमत - हे सगळे सोडा, कोला वगैरै प्रकार शोधून काढले ते केमिस्टांनी. किचकट वाटणाऱ्या केमिस्ट्रीचा हा फायदा.

अमेरिकेतल्या अटलांटामध्ये जॉन पेंमर्टन या केमिस्टने कोका-कोलाची रेसिपी तयार केली. कोका-कोला सुरुवातीला औषधाच्या दुकानात मिळायचं आणि त्याची जाहिरात केली जायची ती 'मानसिक आणि शारीरिक आजारांवरचा काढा' अशी.

1891 मध्ये कोका-कोलाचीही रेसिपी असा चँडलर नामक व्यक्तीने विकत घेतली आणि तिथून कोका-कोलाचा खऱ्या अर्थाने जगातलं टॉप सॉफ्ट ड्रिंक बनण्याचा प्रवास सुरू झाला.

कोका-कोलाच्या रेसिपीला 'मर्कंडाईज X' असं म्हटलं जातं. ही रेसिपी अजूनही एक रहस्य आहे.

कोका कोला

फोटो स्रोत, Getty Images

पेप्सीचा शोध केलब ब्रॅडहॅम नावाच्या केमिस्टने (अर्थातच) 1893 साली लावला. त्यांनी कोका-कोलाच्या धर्तीवरच आपलं उत्पादन सुरू केलं.

पण 1938 साली कोका-कोलाने पेप्सीवर दावा ठोकला की यांनी आमची नक्कल केलीये आणि आमच्या ट्रेडमार्कचा भंग केलाय. एक वेळ अशी आली होती की पेप्सी बंद पडतं की काय वाटायला लागलं होतं. पण 1941 साली पेप्सीने हा दावा जिंकला आणि शीतपेयांच्या दुनियेतला त्यांचा रस्ता मोकळा झाला.

त्यानंतर पेप्सी आणि कोक-कोलाचं वैर वाढतच गेलं. या दोन्ही कंपन्यांच्या दुष्मनीला कोलावार्स असं म्हणतात. ही कोलावार्स तब्बल 70-80 वर्षं चालली, पण 2000 पासून याची तीव्रता कमी कमी होत जातेय. कारण सोपं आहे - गेलं पाऊण शतकं जगाच्या शीतपेय इंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवणाऱ्या या दोन्ही कंपन्यांसमोर एक सामायिक शत्रू उभा ठाकला आहे - हेल्थ ड्रिंक्स.

जगभरातच आरोग्याप्रती सजग असणारे लोक कार्बोनेटेड ड्रिंक पिणं बंद करत आहेत. त्यामुळे 2000 सालापर्यंत प्रतिवर्षी वाढत जाणारा पेप्सी-कोकचा खप आता प्रतिवर्षी कमी कमी होत जातोय. पण याविषयी सविस्तर नंतर कधीतरी.

कोका कोला

फोटो स्रोत, H D DARUKHANAWALA, PARSIS AND SPORTS

आता जाऊ भारतीय स्वातंत्र्याच्या आसपासच्या काळात. पेप्सी आणि कोका-कोला दोन्ही कंपन्यांसाठी एक नवीन बाजारपेठ खुली झाली होती.

भारतातला पहिला स्वदेशी कोला पार्लेने बनवला, 1949 साली...नाव होतं पार्ले कोला. पण कोका-कोलाने तोवर भारतात एन्ट्री घेतली होती आणि आपलं नाव रजिस्टर केलं होतं. त्यांच्याशी 2 वर्षं कोर्टाने लढल्यानंतर कोर्टात लढल्यानंतर पार्लेने आपलं कोला प्रोडक्ट बंद केलं.

तोवर कोका-कोला आणि पेप्सी दोघांनी भारतात आपलं उत्पादन सुरू केलं होतं. लोकांना दोन्ही शीतपेयं मिळू लागली.

पार्लेने कोलाच्या शर्यतीतून माघार घेतली असली तरी शीतपेयांच्या बाजारात आपलं स्थान बळकट करण्याचे प्रयत्न सोडले नव्हते. 1952 साली पार्लेने गोल्डस्पॉट आणलं. कोल्ड्रिंक म्हणजे गोल्डस्पॉट हे समीकरण पुढच्या काही वर्षांत रूढ होणार होतं.

कोका-कोलाला हाकलणारे जॉर्ज फर्नांडिस

कोका-कोलाची भारतीय शीतपेय बाजारात चांगलीच वाढ होत होती. पण पेप्सी मात्र मागे पडत होतं. जगभरात कोक-कोला आणि पेप्सीची स्पर्धा होत असताना इथे मात्र पार्ले आणि कोका-कोलाची टक्कर पहायला मिळत होती. शेवटी 1962 मध्ये पेप्सीने भारतातून काढता पाय घेतला.

असं म्हणतात की आपल्या आसपास घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीशी राजकारणाचा संबंध असतो. मग कोल्ड्रिंक्स कसे त्यापासून मागे राहातील?

जॉर्ज फर्नांडीस

फोटो स्रोत, WWW.GEORGEFERNANDES.ORG

फोटो कॅप्शन, जॉर्ज फर्नांडीस

सत्तरच्या दशकात भारतापुढे नवी आव्हानं उभी राहात होती. 1971 च्या युद्ध, त्यानंतर आलेले दुष्काळ यामुळे भारताची अर्थव्यवस्था ढासळत होती. अशात 1973 ला इंदिरा गांधींनी फॉरेन एक्सेंज रेग्युलेशन अॅक्ट पास केला आणि त्यामुळे कोणत्याही परदेशी कंपनीच्या भारतातल्या गुंतवणुकीला आळा घातला गेला. आता कोणतीही परदेशी कंपनी भारतात फक्त 40 टक्के भांडवल गुंतवू शकत होती. म्हणजेच 60 टक्के भांडवल, पर्यायाने अधिकार भारतीय कंपनीकडे असणार होते.

परदेशी कंपन्या, ज्यात कोका-कोलाही होती, सरकारशी बोलणी करायला लागल्या. पण काही निष्कर्ष निघायच्या आत 1975 साली भारतात आणीबाणी जाहीर झाली. परिस्थिती जैसै थे राहिली.

1977 साली आणीबाणी मागे घेण्यात आली. त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये इंदिरा गांधी पराभूत झाल्या आणि जनता दलाचं सरकार आलं. मोरारजी देसाईंच्या मंत्रिमंडळात उद्योग मंत्री होते जॉर्ज फर्नांडिस.

कोका कोला

फोटो स्रोत, Getty Images

जॉर्ज फर्नांडिस यांचा सुरुवातीपासूनच कोका-कोलाला विरोध होता. त्यांनी या कंपनाविरोधात पावलं उचलायला सुरुवात केली.

कोका-कोलाने त्यांचं भारतीय कंपनीतलं भांडवलं घटवावं आणि त्यांची सिक्रेट रेसिपी भारतात जाहीर करावी असे आदेश त्यांनी काढले. फर्नांडिस याचं म्हणणं होतं की भारताच्या पेटंट कायद्यानुसार कोणत्याही गोष्टीचं मिश्रण हा नवा शोध असू शकत नाही. कोका-कोलाला भारतातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी या अटी घातल्या असंही म्हटलं जातं. कोका-कोला या मागण्या मान्य करणं शक्यच नव्हतं.

1978 साली टाईम्स ऑफ इंडियामध्ये एक जाहिरात आली होती. एका काचेच्या कंपनीने ती दिली होती. त्यात म्हटलं होतं की, "आमच्या एका ग्राहकाला कोका-कोलाच्या 10 लाख रिकाम्या बाटल्या नष्ट करायच्या आहेत."

कोको-कोलाची भारतातली सद्दी संपली होती.

सरकारी कोला

एखाद्या देशाचं सरकार कोला बनवून बाजारात विकतं हे सांगितलं तर हसाल तुम्ही. पण हेच भारतात घडलं. कोका-कोलाला देशातून बाहेर काढलं खरं पण त्यामुळे इथल्या 300 प्लांट्समध्ये काम करणारे हजारो लोक बेकार झाले.

कामगारांनी आंदोलनं केली तसं ग्राहकांची नाराजी सरकारला पत्कारावी लागली. यावर उत्तर म्हणून सरकारने काढला स्वतःचा कोला. खुद्द पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी याची घोषणा केली आणि असंही म्हटलं याची चव अगदीच कोका-कोलासारखी आहे.

इंदिरा गांधी

फोटो स्रोत, PHOTO DIVISION

या कोलाचं नाव होतं 'डबल सेव्हन' (77). 1977 साली झालेला आणीबाणीचा अंत, इंदिरा गांधीचा पराभव, जनता दलाचं सरकार आणि भरीस भर म्हणून कोका-कोलाला केलेला टाटा बाय-बाय या सगळ्या गोष्टींची आठवण म्हणून हे नाव ठेवलं होतं.

पण हा डबल सेव्हन कोला काही ग्राहकांच्या पसंतीला उतरला नाही. भरीस भर म्हणून 1979 जनता दलाचं सरकार कोसळलं आणि इंदिरा गांधी पुन्हा निवडून आल्या. आपल्या पराजयाचं प्रतिक म्हणून काढलेल्या कोलाचं उत्पादन त्या चालू ठेवतील हे शक्यच नव्हतं आणि अशा प्रकारे सरकारी कोलाचा पहिला आणि एकमेव प्रोजेक्ट 1980 च्या सुमारास बारगळला.

पार्लेची पेयं

कोका-कोलाची भारतातून एक्झिट झाल्यानंतर शीतपेयांच्या बाजारात पोकळी तयार झाली होती. ती पार्लेने भरून काढली. पार्लेने गोल्डस्पॉट तर आणलं होतंच. त्यानंतर 1971 साली लिम्का आणलं. मग माझा आणलं. पण कोका-कोला भारतात होतं तोवर त्यांनी कोला मार्केटमध्ये प्रवेश केला नव्हता. ते कोका-कोलाशी सरळ स्पर्धा टाळत होते. पण कोका-कोलाला भारताबाहेर काढल्यानंतर त्यांना मोकळं रान मिळालं.

पण पार्लेला टक्कर देणाऱ्या बाजारात उतरल्या. त्यातली मोठी कंपनी होती प्युअर ड्रिंक्स. ही कंपनी आधी कोका-कोलासाठी भारतात उत्पादन करायची. या कंपनीने स्वतःचा कोला आणला कॅम्पा कोला. हा कोलाही भारतीय लोकांना आवडला. जग पेप्सी विरुद्ध कोका-कोलाच्या स्पर्धेची चर्चा करत होतं पण भारतात पार्ले आणि कॅम्पा कोला लढत होते.

पार्लेची गोल्डस्पॉट, लिम्का ही नावं घराघरात पोचली. पण आता भारतात मिळाणारे सगळे कोला स्वदेशी होते. त्यांना फॉरेनचं वलय नव्हतं. ही शीतपेयं सर्वसामान्यांच्या आवाक्यातही होती आणि म्हणूनच बंदी असली तरी उच्चभ्रू वर्गाला कोका-कोला हवं होतं. ते सर्वसामान्यांच्या आवाक्यातलं नव्हतं म्हणूनच श्रीमंतीचं लक्षण ठरलं.

कोका कोला

फोटो स्रोत, Getty Images

त्यामुळेच इतर चैनीच्या गोष्टींसारखंच कोका-कोलाचंही स्मगलिंग व्हायला लागलं होतं.

दरम्यान बाजारात इतरही काही कोला आले. पण पार्लेने ठरवलं काहीतरी नवं, फ्रेश आणि भारतीय चवीचं आणायचं. त्यांनी स्वतःचा कोला आणला 'थम्स-अप'.

1987 पर्यंत पार्ले भारतीय शीतपेय बाजारातलं अनभिषिक्त सम्राट बनलं होतं.

थम्स-अप इतकं लोकप्रिय झालं की 1993 मध्ये कोका-कोलाची भारतात पुन्हा एन्ट्री झाल्यानंतर त्यांनी पार्लेची शीतपेय टेकओव्हर केली, पण थम्स-अप हा ब्रँड तसाच ठेवला. थम्स-अपची 'टेस्ट द थंडर' ही भारतीय इतिहासात सर्वाधित काळ चाललेली अॅड कँपेन आहे.

एखाद्या मोठ्या ब्रँडने स्थानिक ब्रँड विकत घेऊन तो तसाच ठेवणं ही दुर्मीळ गोष्ट होती पण थम्स-अपची लोकप्रियताच इतकी जास्त होती की त्याला धक्का लावणं कोका-कोलाला परवडणारं नव्हतं.

थम्स-अप अनेक वर्षं भारतातलं सर्वाधिक विकलं जाणारं सॉफ्ट ड्रिंक होतं.

1990 साली पेप्सीला भारतीय बाजारात भारतीय नावासह येण्याची परवानगी मिळाली होती. त्यांनी लहर या कंपनीसोबत टायअप करून लहर पेप्सी भारतात आणलं.

1993 ला कोका-कोलाने एन्ट्री घेतली आणि कोला-वॉर्सची सुरुवात झाली.

भारतीय ड्रिंक्स मार्केट

सन 2000 नंतर पेप्सी, कोकाकोला सारख्या कार्बोनेटेड डिंक्सचं मार्केट घसरतंय. लोक आपल्या आरोग्याबद्दल सजग झालेत. या पेयांमध्ये अतिसाखर असते, त्यांच्यामुळे लठ्ठपणा वाढतो आणि त्यामुळे येणारे विकार वाढतात हे लोकांना कळलंय म्हणून लोक आता हेल्थ ड्रिंक्सवर जास्त भर देतात.

कोका कोला

फोटो स्रोत, PALLONJIS FACEBOOK PAGE

म्हणूनच की काय कदाचित पण आजघडीला देशातल्या पहिल्या पाच सॉफ्ट ड्रिंक्स कंपन्यांमध्ये कोका-कोला किंवा पेप्सी नाहीये.

एक काळ होता, 1993 नंतर, जेव्हा पेप्सी आणि कोका-कोला दोन्ही कंपन्याचा भारतीय शीतपेय बाजारातला हिस्सा 80 टक्क्यांहून जास्त होता. पण आता हेल्थ ड्रिंक्सची क्रेझ जास्त वाढतेय.

रिअल या नावाने फळांचे ज्यूस बाजारात आणणारी डाबर कंपनी सध्या टॉपवर आहे.

2019 सालच्या निल्सनच्या सर्व्हेनुसार भारतात स्थानिक सॉफ्टड्रिंक कंपन्या कोका-कोला किंवा पेप्सीपेक्षा दुप्पट वेगाने वाढतायत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)