Online school: ऑनलाईन शाळांसंदर्भातील 'या' पाच प्रश्नांवर कसा तोडगा काढाल?

विद्यार्थी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी

शालेय विद्यार्थ्यांना यंदाही लॉग इन करूनच शाळेत आपली हजेरी नोंदवावी लागणार आहे. कारण कोरोना आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षीही शाळा ऑनलाईन माध्यमातूनच सुरू झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत जाऊन शिक्षण घेता येणार नाही.

साधारण दीड वर्षांपासून विद्यार्थी स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा आयपॅडसमोर बसूनच शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. परंतु डिजिटल शिक्षण घेत असतानाही विद्यार्थी आणि पालकांनी काही मुलभूत गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचावासाठी घरच्याघरी सुरू असलेले ऑनलाईन शिक्षण सध्या फायदेशीर ठरत असले तरी ऑनलाईन शिक्षणाचा मोठा प्रभाव विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर झाल्याचे गेल्या काही काळात दिसून आले.

विद्यार्थ्यांचा स्क्रिनटाईम वाढला, मुलांना मोबाईल आणि लॅपटॉपची सवय लागली, अभ्यासापासून विद्यार्थी दुरावले, संवादाचा अभाव, डोळ्यांवरील वाढता ताण, मुलं आणि शिक्षकांमध्ये विसंवाद, तसंच ऑनलाईन शिक्षणातली तांत्रिक आव्हानं अशा अनेक तक्रारींबाबत शिक्षणतज्ज्ञ, मानसोपचार आणि वैद्यकीयतज्ज्ञ काळजी व्यक्त करत आहेत.

ऑनलाईन शिक्षणाचा दीड वर्षांचा अनुभव पाहता पालक यासंदर्भात कोणत्या उपाययोजना करू शकतात? विद्यार्थ्यांनी काय खबरदारी घ्यावी? ऑनलाईन शिकत असताना नियोजन कसे करावे? विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य कसे सांभाळायचे? ऑनलाईन माध्यमातूनही विद्यार्थी प्रभावीपणे शिकतील यासाठी शिक्षक, पालक काय करू शकतात? अशाच काही प्रश्नांचा आढावा आपण घेणार आहोत.

1. ऑनलाईन शाळा सुरू असताना घरातलं नियोजन कसं करावं?

लॉकडॉऊन सुरू असल्याने कुटुंबातले बहुतांश सदस्य गेल्या वर्षभरापासून अधिकाधिक काळ घरी आहेत. अशा परिस्थितीत वर्क फ्रॉम होम आणि विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शाळांचे गणित जुळवणे म्हणजे पालकांची तारेवरची कसरत होत आहे.

यावर तोडगा म्हणून घरातल्या सगळ्यांच्या कामाचे वेळापत्रक आणि पूर्वनियोजन केल्यास यात समतोल साधला जाऊ शकतो असंही काही पालक सांगतात.

प्रातिनिधीक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

एका खासगी संस्थेत काम करणाऱ्या समीर चिटणीस यांची मुलगी मिहिका पहिलीच्या वर्गात शिकते. ते सांगतात, "वर्क फ्रॉम होम सुरू असताना मुलांच्या ऑनलाईन शाळेकडेही लक्ष देणं आव्हानात्मक आहे. लॅपटॉप, वायफाय कनेक्शन, ऑनलाईन सेशनची लिंक, म्यूट-अनम्यूट, स्क्रिनसमोर बसणे, इत्यादी अशा अनेक तांत्रिक बाबी असल्याने सुरुवातीला आम्हालाही यासाठी बराच वेळ द्यावा लागला.

सुरुवातीला ही मुलं ऑनलाईन शाळेसाठी एकाच जागेवर किती वेळ बसणार? इथून प्रश्नांना सुरुवात झाली होती. पण कालांतराने आम्ही यातून काही मार्ग काढले ज्यामुळे आपलं कार्यलयीन काम आणि मुलांची शाळा दोन्ही गोष्टी सुरळीत होऊ लागल्या."

ते सांगतात, "आताच्या मुलांना मोबाईल, लॅपटॉप हाताळण्याची सवय आहे. त्यामुळे मुलांना शाळेच्या ऑनलाईन सेशनची लिंक कुठे आहे, तिथे कनेक्ट कसे व्हायचे, डिसकनेक्ट झाल्यानंतर काय करायचे अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी शिकवा. यामुळे पालकांना सतत मुलांसोबत बसावं लागणार नाही.

शाळेसाठीची एक निश्चित जागा ठरवा. त्याठिकाणी अभ्यासाचे सर्व साहित्य, ऑनलाईन शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी असतील याची काळजी घ्या. यामुळे मुलांना शाळेप्रमाणेच बराच काळ एकाच ठिकाणी बसण्याची सवय होईल. बेड किंवा सोफ्यावर बसून मुलं ऑनलाईन शाळा शिकणार नाहीत याची काळजी घ्या. यामुळे मुलांना झोप किंवा आळस येणार नाही."

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, RAJSHREE AUTI

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

ऑनलाईन वर्ग सुरू असताना विद्यार्थ्याच्या मागे कोणतीही हालचाल नसेल याची खबरदारी घेतल्यास विद्यार्थी विचलित होणार नाहीत. शाळा सुरू असताना घरात शांतता आणि सकारात्मक वातावरण असल्यास मुलांची एकाग्रता कायम राहण्यास मदत होईल असंही तज्ज्ञ सांगतात.

2. ऑनलाईन शिकत असताना शिक्षक-विद्यार्थी संवाद वाढवण्यासाठी काय करता येईल?

प्रत्यक्षात विद्यार्थी जेव्हा शाळेत असतात तेव्हा शिक्षकांशी थेट संवाद साधणे किंवा त्यांना एखादा प्रश्न, शंका विचारणे विद्यार्थ्यांना सोयीचे जाते, तसंच शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांचं एक नातं असतं. यामुळे आपल्या आवडीनुसार विद्यार्थी वेगवेगळ्या शिक्षकांशी विविध विषयांवर चर्चा करत असतात. एवढंच नाही तर शिक्षक सांगतात, की अनेकवेळेला घरातल्या अडचणींबद्दलही विद्यार्थी आमच्याजवळ सांगतात.

शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना संवादाचे हे व्यासपीठ उपलब्ध होत नाही. ऑनलाईन माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांसमोर शिक्षकांशी बोलणं प्रत्येक विद्यार्थ्याला शक्य होत नाही. शिक्षकांनाही विद्यार्थ्यांशी पुरेसा संवाद साधता येत नसल्याचे दिसून येत आहे. याचे गंभीर परिणाम होत आहेत असं शिक्षक, मुख्याध्यापक सांगत आहेत.

मुंबईतील अभिनव एज्यूकेशन संस्थेच्या संस्थाचालक आणि माजी उपमुख्याध्यापक लीना कुलकर्णी याविषयी बोलताना सांगतात, "शिक्षण म्हणजे केवळ अभ्यासक्रम पूर्ण केला, पुस्तकातले सर्व शिकवले असे नाही. या प्रक्रियेत विद्यार्थी आणि शिक्षकांमधला संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. मी शिक्षक म्हणून निवृत्त झाले. विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर होणारे सकारात्मक बदल आणि त्याचा शैक्षणिक फायदा आम्ही शिक्षक म्हणून एवढे वर्ष अनुभवला आहे. आता ऑनलाईन शिक्षण सुरू असताना संवाद होत नसल्याचे आमच्या लक्षात आले आणि आम्ही त्यावर उपाय म्हणून एक उपक्रम सुरू केला."

शाळा

फोटो स्रोत, Getty Images

अभिनव शाळेने विद्यार्थ्यांना शिक्षकांशी वैयक्तिक संवाद साधता यावा यासाठी वेगळे नियोजन केले आहे. शिक्षकांशी खासगीत बोलायचे असल्यास किंवा शैक्षणिक शंका असल्यास शिक्षक विद्यार्थ्यांसाठी कोणत्या वेळेत उपलब्ध असतील याचे वेळापत्रक विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे.

लीना कुलकर्णी सांगतात, "मुलांच्या मानसिक समस्या पाहता विद्यार्थी लेखी स्वरुपात आपल्या अडचणी आम्हाला सांगू शकतील असा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. या उपक्रमाला विद्यार्थी आणि पालकांचा चांगला प्रतिसाद आहे. विद्यार्थी भरभरून आपल्या मनातलं बोलत आहेत.

काहीजण सांगतात आम्हाला घरात एकटे वाटते, खेळण्यासाठी जाता येत नाही, आमचं म्हणणं कोणालाच कळत नाही, शिकवलेले आधी कळत होते पण आता कळत नाही, लक्षात राहत नाही, अभ्यासात मन रमत नाही अशा अनेक गोष्टी विद्यार्थी मनमोकळेपणाने शिक्षकांना वैयक्तिकरित्या सांगत आहेत."

यामुळे तोडगा काढण्यास आणि नवीन उपाययोजना करण्यासाठी मदत झाली असंही त्या सांगतात. शिवाय, अशा संवादामुळे विद्यार्थ्यांचा शाळेवर, शिक्षकांवर विश्वास वाढत जातो असंही त्या म्हणाल्या.

3. अभ्यासाची गोडी लावण्यासाठी काय करता येऊ शकते?

शाळा बंद असल्याने प्रत्यक्षात शिक्षकांसमोर जावं लागणार नाहीय आणि गृहपाठ केला नाही तर शिक्षा होणार नाही किंवा आपण पास होणारच आहोत, असा एक समज विद्यार्थ्यांमध्ये असल्याने विद्यार्थी निर्धास्त झाल्याचं दिसून येतं असल्याचं शिक्षक सांगतात.

काही शिक्षकांनी असंही सांगितलं की, घरी शिक्षणाचे अपेक्षित वातावरण नसल्याने विद्यार्थ्यांचा शाळेत जेवढा अभ्यास होतो तेवढा घरी होत नाही.

विद्यार्थी

फोटो स्रोत, Getty Images

विद्यार्थ्यांच्या मनात अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी यासाठी काय करावं?

याविषयी बोलताना ब्रेन बेस लर्निंग एक्सपर्ट आणि प्रयोगशील शिक्षणतज्ज्ञ श्रुती पानसे असं सांगतात, "यासाठी शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल होणं गरजेचं आहे. हे एकट्या पालकांच्या हातात नाही. यावर शिक्षकांनी अधिक काम केलं पाहिजे. विद्यार्थ्यांना गृहपाठ देताना त्यात स्वारस्य असलं पाहिजे. केवळ प्रश्न-उत्तरं या स्वरुपात देण्याऐवजी विद्यार्थ्यांना आव्हानात्मक वाटेल असा गृहपाठ दिला पाहिजे. यामुळे विद्यार्थ्यांच्या मेंदूचा विकास चांगला होतो."

यासाठी अनेक शाळा विद्यार्थ्यांना गोष्ट सांगणे, कलाकृती, विविध उपक्रम, चित्रकला अशा अनेक पर्यायांच्या माध्यमातून गृहपाठ देण्याचा प्रयत्न करतात. पण या पद्धतीतही त्रुटी असल्याचं समोर आलं आहे. कारण यापैकी बहुतांश काम विद्यार्थ्यांऐवजी पालक करू लागले, अनेक ठिकाणी तयार प्रोजेक्ट्स मिळू लागल्याचं शिक्षक सांगतात.

याविषयी बोलताना श्रुती पानसे सांगतात, "उपक्रम देणे हा अत्यंत चांगला पर्याय आहे. विद्यार्थी हा गृहपाठ आवडीने करतात. पण उपक्रम देत असताना, त्याचे विषय निवडत असताना विद्यार्थ्याच्या वयानुसार आणि अभ्यासक्रमानुसार तो देणं गरजेचं आहे. त्याचे व्यवसायिकरण होऊ नये याची काळजी शाळा आणि शिक्षकांनी घेतली पाहिजे."

"जेव्हा पालक म्हणतात शाळा आणि शिक्षा नाही किंवा परीक्षेत पास होणार आहेत म्हणून मुलं अभ्यास करत नाहीत याचा अर्थ मुलांना आपण केवळ भीतीपोटी शिका असं म्हणत आहोत. हीच मूळ समस्या आहे. परीक्षा देण्यासाठी किंवा पास होण्यासाठीच अभ्यास करायचा आहे अशी आपली शिक्षण पद्धती आहे. यात बदल होणं गरजेचं आहे. हसत-खेळत मुलांना शिकवणे, विविध उपक्रम देऊन त्याआधारे विद्यार्थ्यांना गुण देणे, त्यांची आकलन क्षमता पाहणे याकडे लक्ष देण्याची गरज आहे," असं श्रुती पानसे सांगतात.

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधीक फोटो

यासाठी पालक काय करू शकतात याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, "पालकांनी शक्य तितके विद्यार्थ्यांसोबत बसून त्यांचा गृहपाठ करून घ्यावा. ही सर्वमान्य पद्धत आहे."

4. स्क्रीनटाईम मर्यादित कसा ठेवायचा?

विविध आस्थापनांकडून मुलांचा स्क्रीनटाईम वाढल्याने काळजी व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय, स्क्रीनटाईम किती असावा यासाठी मर्यादित वेळेचे नियोजन देण्यात आले आहे.

पण प्रत्यक्षात शाळा, ट्यूशन, गृहपाठ आणि मनोरंजन अशा सर्वच गोष्टी ऑनलाईन सुरू असल्याने स्क्रीनटाईमवर मर्यादा कशा आणायच्या असा प्रश्न पालकांच्या मनात आहे.

मानसोपचारतज्ज्ञ डॉ.राजेंद्र बर्वे असं सांगतात,

1. स्क्रीनटाईम मर्यादित ठेवायचा.

2. खेळणी केवळ आणून देऊ नका. पालकांनी मुलांसोबत खेळावं.

3. एकमेकांशी संवाद साधता येतील असे खेळ खेळा. एकापेक्षा अधिक लोकांचा सहभाग असेल अशा खेळांची मुलांना गोडी लावा.

4. मुलांमध्ये कुतुहल जागरुक करणाऱ्या अनेक विषयांच्या माहितीच्या साईट्स आणि व्हिडिओ आहेत. मुलांना याची सवय लावा.

तुमचं मूल 24 तासांमध्ये किती काळ मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप आणि टॅबलेटसारख्या गॅजेट्सचा वापर करतात याला स्क्रीनटाईम म्हणतात.

मोबाईल

फोटो स्रोत, Getty Images

लॉकडॉऊनमध्ये मुलांचा स्क्रीनटाईम अर्थात वाढला आणि आता मुलांना त्याची सवय झाली आहे. ही सवय बदलण्यासाठीही पालकांना प्रचंड मेहन घ्यावी लागतेय.

चीडचीड, मानसिक समस्या आणि डोळ्यांचा ताण या आरोग्याच्या समस्या लक्षात घेता केंद्रीय शिक्षण विभागाने डिजिटल शिक्षणासाठी स्क्रीनटाईम निश्चित करणाऱ्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

पूर्वप्राथमिक ( प्लेग्रुप ते सी.केजी) विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्गाची मर्यादा 30 मिनिटांपेक्षा जास्त नसावी.

इयत्ता पहिली ते आठवीसाठी दोन ऑनलाईन सत्रे होणार आहेत. सत्रामध्ये 45 मिनिटांचा वर्ग असेल.

5. मुलं घरी सतत चिडचिड करत असतील तर काय करावे?

लॉकडॉऊनमध्ये पालकांना आपल्या मुलांसोबत अधिक वेळ घालवता आला ही एक सकारात्मक गोष्ट असून याचा चांगला परिणाम मुलांवर झाल्याचं पालक आणि मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितलं.

पण लॉकडॉऊनमुळे मुलांचे मैदानी खेळ बंद आहेत, बाहेरच्या भेटीगाठी, शाळा बंद असल्याने संपूर्ण दिवसभराचा वेळ कुठे आणि कसा घालवावा असा प्रश्न मुलांसमोरही आहे. त्यामुळे मुलं हट्टी झाली आहेत, ऐकत नाहीत, अभ्यास करत नाहीत, सतत मोबाईलवर असतात अशा तक्रारी पालक मानसोपचारतज्ज्ञ आणि शिक्षकांकडे करत आहेत.

मोबाईल

फोटो स्रोत, Getty Images

याविषयी बोलताना ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शुभांगी पारकर असं सांगतात, "मुलांची गरज ही मोकळं खेलण्याची आहे. सध्या आपण तसं करू शकत नाही. तेव्हा पालकांनी घरच्याघरी काय उपाय करता येईल याचा विचार करावा. सोशल मीडियाचा वापर, गॅजेटचा वापर पालकांनीही आवश्यकतेनुसारच करावा. कारण मुलं पालकांचे पाहूनही शिकत असतात. सोशल मीडिया, मोबाईल, टिव्ही किती वेळ पहायचा याचे नियम पालकांनी ठरवले पाहिजेत."

"पालकांचे कार्यालयीन कामही घरून सुरू असले तरी मुलांना पुरेसा वेळ देणं गरजेचं आहे. मुलांसोबत एकत्र खेळा, जेवायला एकत्र बसा, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करा, त्यांना प्रश्न विचारू द्या, त्यांच्यासोबत त्यांच्या आवडीचे खेळ खेळा यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल, ते आनंदी राहतील. मुलांनी केलेल्या चांगल्या गोष्टींची प्रशंसा करा. यातून त्यांना अधिक चांगल्या गोष्टी करण्याची प्रेरणा मिळते," असं पारकर म्हणतात.

अशा काही उपाययोजना केल्याने मुलांची चिडचिड निश्चितच कमी होईल, असंही डॉ.पारकर सांगतात. पण तरीही मुलांमध्ये काही विचित्र आढळले, एकटी राहत असल्याचं जाणवलं, व्यसनाच्या आधीन मुलं होत आहेत असं वाटलं तर पालकांनी संबंधित वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच उपचार करावेत, असंही त्या सांगतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)