कोरोनाः भारतात लशीमुळं पहिला मृत्यू; सरकारने म्हटलं मृत्यूचा धोका 'नगण्य'

कोरोना लस

फोटो स्रोत, Getty Images

कोरोनाच्या लसीकरणानंतर होणाऱ्या दुष्परिणामांवर अभ्यास करणाऱ्या एका सरकारी पॅनलनं लसीकरणानंतर पहिला मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे.

आरोग्य मंत्रालयानं लसीकरणामुळं होणाऱ्या मृत्यूच्या बातम्या या अपूर्ण माहितीवर आधारित असल्याचं म्हटलं असून लसीमुळं असलेला धोका कोरोनाच्या धोक्याच्या तुलनेत नगण्य असल्याचं म्हटलं आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार सरकारी समितीनं कोरोनोची लस घेणाऱ्या एका वृद्धाचा मृत्यू अॅनाफिलेक्सिस नावाच्या रिअॅक्शनमुळं झाल्याचं मान्य केलं आहे.

या समितीनं 31 जणांची तपासणी करून कोव्हिड-19 ची लस घेतल्यानंतरच्या गंभीर दुष्परिणामांचा (अॅडव्हर्स इव्हेंट्स ऑफ इम्युनायझेशन-एईएफआय) चा अभ्यास केला आहे.

समितीच्या रिपोर्टनुसार 8 मार्च, 2021 रोजी लशीचा डोस घेतल्यानंतर 68 वर्षाच्या एका व्यक्तीचा अॅनाफिलेक्सिसनं मृत्यू झाला.

अॅनाफिलेक्सिस ही एक गंभीर अॅलर्जिक रिअॅक्शन आहे. लस घेतल्यानंतर या रिअॅक्शनची काही प्रकरणं समोर आली आहेत.

एईएफआय समितीचे अध्यक्ष असलेले डॉक्टर एनके अरोरा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, "कोव्हिड-19 लसीकरणाशी संबंधित अॅनाफिलेक्सिसमुळं झालेला हा पहिला मृत्यू आहे. या घटनेनंतर लशीचा डोस घेतल्यानंतर लसीकरण केंद्रावर 30 मिनिटे थांबणं आवश्यक असल्याचं अधोरेखित झालं आहे.

कोरोना लस

फोटो स्रोत, JOHN CAIRNS/UNIVERSITY OF OXFORD

अॅनाफिलेक्सिसच्या बहुतांश रिअॅक्शन या दरम्यानच्या काळातच होण्याची शक्यता असतात. तसं झाल्यास त्वरित उपचारानं मृत्यू रोखता येऊ शकतो."

31 प्रकरणांचा तपास

समितीनं 5 फेब्रुवारीला आलेली अशी पाच प्रकरणं, 9 मार्चची आठ प्रकरणं आणि 31 मार्चची 18 प्रकरणं यांचा अभ्यास केला आहे.

अहवालातील माहितीनुसार एप्रिलमधील आकडेवारीचा विचार करता, लशीचा डोस घेणाऱ्या 10 लाख लोकांमागे 2.7 लोकांचा मृत्यू होत आहे, तर रोज दहा लाख लोकांपैकी 4.8 रुग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागलं.

याच रिपोर्टमध्ये समितीनं असंही म्हटलं आहे की, लस घेतल्यानंतर रुग्णालयात दाखल व्हावं लागणं किंवा मृत्यू होणं म्हणजे, हे सर्व लसीमुळंच झालं, असा त्याचा अर्थ होत नाही.

कोरोना लस

फोटो स्रोत, Getty Images

पूर्णपणे तपासणी आणि अभ्यास केल्यानंतरच लस आणि तिच्या गंभीर दुष्परिणामांचा संबंध जोडणं शक्य होणार आहे.

अॅनाफिलेक्सिसच्या 31 प्रकरणांपैकी 18 आकस्मिक वर्गामध्ये विभागली आहेत. म्हणजे त्यांचा लसीकरणाशी काहीही संबंध नाही. सात प्रकरणं अनिश्चित वर्गामध्ये, तीन प्रकरणं लस उत्पादनासंबंधी दुष्परिणामांच्या वर्गात, तर एक प्रकरण एन्झायटी आणि दोन प्रकरणं कोणत्याही वर्गांमध्ये विभागलेली नाहीत.

वर्गीकरणाचा अर्थ काय?

समितीच्या मते, लसीमुळं होणारे दुष्परिणाम हे अशा प्रकारचे अपेक्षित दुष्परिणाम असतात ज्यासाठी सध्या उपलब्ध वैद्यकीय निष्कर्षांच्या आधारे लसीकरणाला जबाबदार ठरवलं जाऊ शकतं.

अशा रिअॅक्शचं उदाहरण म्हणजे, अॅलर्जिक रिअॅक्शन आणि अॅनाफिलेक्सिस इत्यादी. अनिश्चित रिअॅक्शन म्हणजे, जे दुष्परिणाम लसीकरणानंतर लगेचच दिसून येतात, पण सध्या उपलब्ध असलेले पुरावे आणि क्लिनिकल डेटानुसार हे दुष्परिणाम कोव्हिड लसीमुळंच झाले असल्याची निश्चित माहिती उपलब्ध नाही. त्यामुळं त्यासाठी आणखी अधिक अभ्यास आणि संशोधन करण्याची गरज या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

लस

फोटो स्रोत, ANI

अॅनाफिलेक्सिसच्या इतर आणखी दोन प्रकरणांमध्ये 16 आणि 19 जानेवारीला लस देण्यात आली होती. या दोघांनाही रुग्णालयात दाखल करावं लागलं आणि उपचारांनंतर ते पूर्णपणे बरेही झाले.

वर्गीकरण करण्यात न आलेल्या प्रकरणांपैकी काहींमध्ये तपासणीसाठी किंवा अभ्यासासाठी आवश्यत असलेली महत्त्वाची माहिती उपलब्ध नसते, ती उपलब्ध झाल्यानंतर त्याचा अभ्यास केला जाईल.

आकस्मिक प्रकरणांचा विचार करता, यात लसीकरणानंतर लगेच गंभीर दुष्परिणाम पाहायला मिळतात. पण तपासणीनंतर यामागं लसीकरणाऐवजी दुसरं वेगळंच कारण असल्याचं समोर येतं.

मात्र, लसीकरणाचे फायदे हे त्यापासून निर्माण होणाऱ्या धोक्यांच्या तुलनेत कित्येक पट अधिक असल्याचं समितीचं मत आहे. त्याचबरोबर सावधगिरी म्हणून समोर येणाऱ्या दुष्परिणामांवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात असून त्यांचा अभ्यासही केला जात आहे.

लशीमुळं मृत्यू झाल्याच्या बातम्यांवर आरोग्य मंत्रालयाचं स्पष्टीकरण

काही बातम्यांमध्ये (मीडिया रिपोर्ट्स) 16 जानेवारी ते 7 जून दरम्यान लसीकरणानंतर झालेल्या 488 मृत्यूचा संबंध हा कोरोनानंतरच्या त्रासाशी जोडण्यात आला होता. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयांनं मंगळवारी हा दावा फेटाळला असून, या बातम्या 'अपूर्ण' आणि 'मर्यादित माहिती' वर आधारित असल्याचं स्पष्ट केलं आहे.

आरोग्य मंत्रालयानं आवर्जून याबाबत माहिती दिली की, तोपर्यंत (7 जून) 23.5 कोटी नागरिकांचं लसीकरण झालेलं होतं.

लशीचा डोस घेतलेल्या 23.5 नागरिकांमध्ये मृत्यूचा आकडा हा 0.0002 टक्के एवढा आहे. एका ठराविक लोकसंख्येमध्ये होणार्या अपेक्षित मृत्यूपेक्षा हा आकडा कमी असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.

लोकसंख्येच्या प्रमाणानुसार मृत्यूचा दर हा ठरलेला असतो. एसआरएसच्या माहितीनुसार 2017 मध्ये मृत्यूदर हा 1000 लोकांमागे 6.3 एवढा होता, असंही आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

यात आणखी एक महत्त्वाची आणि सध्याच्या घडीला अनुसरून असलेली बाब म्हणजे, कोरोना विषाणूमुळं होणाऱ्या मृत्यूचा दर हा एक टक्क्यापेक्षा अधिक असून लसीकरणामुळं हा आकडा कमी करता येऊ शकतो.

''त्यामुळं कोव्हिड-19 मुळं होणाऱ्या मृत्यूच्या आकड्याचा विचार करता, लसीकरणामुळं होणाऱ्या मृत्यूचा धोका हा हा नगण्य आहे,'' असं आरोग्य मंत्रालयांनं स्पष्टपणे म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)