कोरोना - 'प्लाझ्मा थेरपी' मुळे व्हायरसचे म्युटंट तयार होण्याची भीती आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
कोरोना रुग्णांना आजाराशी लढायला मदत म्हणून देण्यात येणाऱ्या प्लाझ्मा थेरपीमुळे व्हायरसमध्ये म्युटेशन्स होत असल्याचं मत काही तज्ज्ञांनी मांडलंय.
भारतात संसर्ग क्षमता तीव्र असलेला 'डबल म्युटंट' आढळून आलाय. या म्युटेशनला रोगप्रतिकारशक्ती ओळखत नाही. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढलीये.
इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (ICMR) संचालक डॉ. बलराम भार्गव म्हणतात, "रोगप्रतिकारशक्तीचा व्हायरसवर प्रचंड दबाव असल्याने व्हायरस म्टुटेट होतात. वातावरण आणि उपचारपद्धत ही म्युटेशनची दोन प्रमुख कारणं आहेत."
कोरोना रुग्णांवर उपचारात 'प्लाझ्मा थेरपी' कायम चर्चेत राहिलीये. यामुळे जीव वाचत नाही, असं केंद्राने स्पष्ट केलंय. तर, 'प्लाझ्मा' म्युटेशनसाठी कारणीभूत आहे, असं काही तज्ज्ञांचं मत आहे.
'प्लाझ्मा' मुळे व्हायरसमध्ये म्युटेशन होतं?
भारतात रुग्णसंख्या वाढण्यासोबतच जीव वाचवण्यासाठी 'प्लाझ्मा' ला प्रचंड मागणी आहे. 'प्लाझ्मा' शोधण्यासाठी नातेवाईकांची धावपळ सुरू झालीये.
महाराष्ट्र सरकारच्या कोव्हिड टास्कफोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी सांगतात, "आपल्याला माहित आहे, प्लाझ्मा म्युटंट तयार होण्यासाठी कारणीभूत आहे. पण, आपण अजूनही प्लाझ्मा वापरतोय."

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्रात कोव्हिड टास्कफोर्सने, एप्रिल महिन्यात 'प्लाझ्मा थेरपी' उपचारपद्धतीमधून वगळण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.
"मध्यम आणि तीव्र स्वरूपाच्या संसर्गात प्लाझ्माचा फायदा नाही. आजार सौम्य असेल तरच, संशोधनासाठी आणि सहानुभूतीच्या तत्वावर प्लाझ्माचा वापर करू शकतो, " असं डॉ. जोशी पुढे सांगतात.
तज्ज्ञ म्हणतात, अनेक रुग्णालयात प्लाझ्मावर अनावश्यक भर दिला जातोय. काहीवेळा, नातेवाईकांच्या आग्रहाखारतही प्लाझ्मा द्यावा लागतो असं कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. जोशी पुढे म्हणतात, "काही उपचारपद्धतीवर निर्बंध घालावे लागतील. नाहीतर जास्त म्युटंट तयार होतील आणि येणाऱ्या काळात नुकसान सोसावं लागेल."
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ काय म्हणतात?
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, प्रत्येक व्हायरस आपलं रूप बदलत असतो. यालाच सोप्या शब्दात आपण म्युटेशन असं म्हणतो.
पुण्याच्या सरकारी रुग्णालयातील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात, "प्लाझ्मा थेरपीमुळे व्हायरसमध्ये म्युटेशन होणं शक्य आहे."
"प्लाझ्मामधील अँटीबॉडीज (रोगप्रतिकारशक्ती) रुग्णाच्या शरीरातील व्हायरसवर हल्ला करून त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात. व्हायरसही स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करतो. अँटीबॉडीजने व्हायरसला मारलं नाही तर तो आपलं रूप बदलतो आणि सटकतो. याला एस्केप म्युटेशन म्हणतात," असं ते पुढे सांगतात.
भारतात आढळून आलेलं E484Q आणि L452R ही दोन्ही एस्केप म्युटेशन म्हणून ओळखली जातात. या म्युटेशनला रोगप्रतिकारशक्ती ओळखत नसल्याने, संसर्ग पसरतो असं तज्ज्ञ सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
तर, डॉ. रवी वानखेडकर सांगतात, "प्लाझ्मा दान केलेल्या व्यक्तीच्या शरीरातील प्लाझ्मा कमकुवत असेल किंवा यात चांगल्या अँटीबॉडी नसतील तर, रुग्णाच्या शरीरातील व्हायरस पूर्ण मरणार नाही. अशावेळी व्हायरसमध्ये म्युटेशन होण्याची दाट शक्यता असते."
तज्ज्ञ सांगतात, काहीवेळा रुग्णाचे नातेवाईक शेवटचा प्रयत्न म्हणून प्लाझ्मा थेरपीचा आग्रह धरतात.
इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक-इंटीग्रेटेड बायोलॉजीचे संचालक डॉ. अनुराग अग्रवाल सांगतात, "प्लाझ्या थेरपीमुळे व्हायरसमध्ये म्युटेशन होणं शक्य आहे. पण, यामुळे व्हायरसमध्ये नक्की म्युटेशन होतंय याचा काही ठोस पुरावा अजूनही पुढे आलेला नाही."
प्लाझ्मा थेरपी बाबत केंद्राची भूमिका काय?
भारतात आणि जगभरात कोव्हिड-19 ग्रस्त रुग्णांवर उपचारात प्लाझ्मा फायदेशीर आहे का, हे शोधण्यासाठी चाचण्या करण्यात आल्या. ज्यात, कोरोनाग्रस्तांचा मृत्यू रोखण्यासाठी प्लाझ्मा फायदेशीर नाही, असं स्पष्ट झालं.

फोटो स्रोत, Getty Images
इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने देशभरातील 39 रुग्णालयात प्लाझ्माची ट्रायल केली होती. ICMR च्या संशोधनातील निरीक्षण,
- तीव्र स्वरूपाचा आजार होण्यापासून रोखण्यासाठी प्लाझ्माचा फायदा होत नाही
- प्लाझ्मा दिल्याने मृत्यू रोखले जाऊ शकत नाहीत
- जगभरातील चाचण्यात प्लाझ्माचा कोरोना रुग्णांना फायदा होत नाही हे स्पष्ट झालंय
ICMR चे संचालक डॉ. बलराम भार्गव म्हणतात, "मध्यम आणि तीव्र स्वरूपाचा संसर्ग असलेल्या कोरोना रुग्णांचे मृत्यू रोखण्यात प्लाझ्माचा फायदा होत नाही."
प्लाझ्माच्या सरसकट वापरामुळे धोका?
केंद्र सरकारने स्पष्ट करूनही देशात प्लाझ्माचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत आहे. ICMR च्या माहितीप्रमाणे, प्लाझ्माचा सरसकट वापर करणं योग्य ठरणार नाही.

फोटो स्रोत, Getty Images /SUJIT JAISWAL
डॉ. भार्गव पुढे सांगतात, "व्हायरसमध्ये होणाऱ्या म्युटेशनमागे उपचार पद्धत एक कारण आहे. त्यामुळे उपचार पद्धतीचा योग्य वापर करण्यात आला पाहिजे. जेणेकरून याचा फायदा होईल."
ते पुढे सांगतात, "ज्या उपचार पद्धतीचा फायदा सिद्ध झाला नाही. त्यांचा वापर करण्यात येऊ नये. व्हायरसवर रोगप्रतिकारशक्तीचा प्रचंड दबाव निर्माण झाल्यास व्हायरस अधिक म्टुटेट होईल."
कोणाला द्यावा प्लाझ्मा? ICMR ची गाईडलाईन?
ICMR च्या माहितीनुसार,
- कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात प्लाझ्मा दिला जावा.
- लक्षणं दिसून आल्यानंतर पहिल्या 3 ते 7 दिवसात प्लाझ्मा द्यावा, 10 दिवसानंतर देण्यात येऊ नये.
आंतरराष्ट्रीय संशोधन काय सांगतं?
इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार, अमेरिका, यूके आणि इटलीमधील ट्रायलदरम्यान सरसकट प्लाझ्माचा वापर केल्यामुळे, व्हायरसमध्ये बदल होऊन, एस्केप म्युटेशन तयार होत असल्याचं स्पष्ट झालं.
'द नेचर' जर्नलमध्ये छापण्यात आलेल्या संशोधनानुसार, ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यांच्यावर प्लाझ्मा थेरपीने दिल्यास म्युटंट तयार होतात. केंब्रिज विद्यापिठाचे संशोधक डॉ. रविंद्र गुप्ता यांच्या संशोधनानुसार, प्लाझ्या थेरपी दिलेल्या रुग्णामध्ये तीव्र म्युटंट आढळून आला.
बीबीसी फ्युचरशी बोलताना ते म्हणाले, "आम्हाला व्हायरसमध्ये म्युटेशन आढळून आले. प्लाझ्मा थेरपीत दिलेल्या अन्टीबॉडीज हा नवीन व्हायरस चुकवण्याचा प्रयत्न करत होता, असं दिसून आलं. पहिल्यांदा असं होताना आम्ही पाहिलं."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








