पश्चिम बंगाल निवडणूक निकाल: ममता बॅनर्जी म्हणतात, 'हा लोकशाहीचा विजय आहे'

फोटो स्रोत, Getty Images
पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनं 206 जागांवर आघाडी मिळवली आहे. तर भाजप 76 जागांवर आताच्या घडीला आघाडीवर दिसत आहे.
या विजयी घोडदौडीनंतर ममता बॅनर्जी यांनी म्हटलं, "हा बंगालच्या लोकांचा, भारतातल्या लोकांचा आणि लोकशाहीचा विजय आहे."
भाजपचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यांनी घाणेरडं राजकारण केलं, असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
कोरोनाची स्थिती बघता शपथविधीचा कार्यक्रम छोटेखानी केला जाईल, असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं.
ममता बॅनर्जी यांच्या या विजयामुळे देशातील इतर राज्यांमधील नेत्यांनी अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे. तर भाजप निवडणूक निकालांबाबत आत्मपरिक्षण करेल, असं वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी केलं आहे.
एकूण 294 जागा असणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभेवर वर्चस्व मिळवण्यासाठी 148 जागांचा आकडा पार करणं गरजेचं आहे.
ममता दीदींनी सगळ्यांची धूळदाण उडवली - उद्धव ठाकरे
ममता जिंकल्या आहेत आणि आता कोरोनाकडे लक्ष देऊया, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
ते म्हणाले, ममता बॅनर्जी या 'बंगाली' जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्यांच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावे लागेल.
"पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारे ममता दीदींच्या पराभवासाठी बंगालच्या भूमीवर एकवटली. त्या सर्व शक्तींची धूळदाण उडवत ममता दीदींनी विजय मिळवला. मी त्यांचे व हिंमतबाज बंगाली जनतेचे मनापासून अभिनंदन करतो. आता राजकारण संपले असेल तर सगळ्यांनी मिळून कोरोनाविरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया."

फोटो स्रोत, Twitter
शरद पवार, अखिलेश यादव, संजय राऊत यांच्याकडून अभिनंदन
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे. पश्चिम बंगालमधील विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन करणारं ट्वीट पवारांनी केलं आहे.

फोटो स्रोत, Twitter
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं, "पश्चिम बंगालच्या निकालांवरून हे स्पष्ट होतं की देशातली लोकशाही अमर आहे. एक जखमी वाघीण ज्या पद्धतीनं मैदानात उतरली, या वाघिणीच्या पक्षातल्या नेत्यांना फोडण्यात आलं, तिच्यावर केंद्रीय संस्थांचा दबाव टाकण्यात आला, तरीही या वाघिणीनं ऐतिहासिक विजय मिळवला आहे. दिल्लीतून येऊन तुम्ही कोणत्याही राज्यात दादागिरी करू शकत नाही, हे या निकालातून स्पष्ट झालं."
'भाजप निवडणूक निकालांबाबत आत्मपरिक्षण करेल'
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच विजयाच्या दिशेने घोडदौड करत आहे. याचं श्रेय पक्षाध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं असल्याचं सांगत भाजप या निवडणूक निकालांचं आत्मपरिक्षण करेल, असं वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी केलं आहे. सुरुवातीचे कल हाती येत असताना विजयवर्गीय यांनी सकाळीही याबाबत प्रतिक्रिया दिली होती. अंतिम निकाल येईपर्यंत नेमकी परिस्थिती कळू शकणार नाही, असं म्हणत त्यांनी भाजपच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केला होता.

फोटो स्रोत, TWITTER@KailashOnline
बंगाल निवडणूक निकालाबाबत केंद्रीय गृहमंत्री यांच्याशी पक्षाच्या वाईट कामगिरीबाबत आपली फोनवर चर्चा झाल्याचं विजयवर्गीय यांनी सांगितलं. तसंच भाजप खासदार बाबुल सुप्रियो आणि लॉकेट चॅटर्जी पिछाडीवर असल्याचं आश्चर्य वाटत असल्याचं ते म्हणाले. तृणमूल काँग्रेस पक्ष फक्त ममता बॅनर्जी यांच्यामुळे विजयी झाला आहे. लोकांनी दीदींना निवडलं. आमच्याकडून कोणत्या चुका झाल्या, त्याबाबत आम्ही आत्मपरिक्षण करू, असं विजयवर्गीय म्हणाले.
तर बंगालमध्ये सगळे विरोधक एकत्र आले म्हणून भाजपचा पराभव झाला, हे पण सांगा, असं महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.
भाजप 3 जागांवरून 90च्या वर जागा जिंकत आहे, त्यामुळे बंगालमध्ये भाजपचा प्रभाव वाढल्याचं दिसून येतं, असंही ते म्हणाले.
जल्लोष साजरा करण्यासाठी गर्दी करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये जल्लोष साजरा करणारे व्हीडिओ समोर आल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं पाचही राज्यांच्यी सचिवांना संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.

फोटो स्रोत, Twitter
राजकीय रणनीतीचे काम सोडणार - प्रशांत किशोर
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सांगितलं आहे की ते राजकीय रणनीतीचे काम सोडणार आहेत. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपला मनोदय बोलून दाखवला.
त्यांच्या या निर्णयाचे कारण विचारल्यावर ते म्हणाले की, मी हे काम गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. हेच काम मी आयुष्यभर करू शकत नाही. मला दुसरं काही करण्याची इच्छा आहे.

फोटो स्रोत, SANJAY DAS/BBC
पुढे ते म्हणाले, "माझी कंपनी आयपॅकमध्ये अनेक योग्य लोक आहेत जे या संस्थेची जबाबदारी पेलू शकतात. ते काम मीच करावे असं काही नाही. सध्या देखील ते हे काम योग्यरीत्या करतात पण श्रेय मला मिळतं. मला वाटतं त्यांनी आता पुढे यावं आणि या संस्थेची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी. त्यांना जे काही करावं वाटतं ते आयपॅक या ब्रॅंडच्या माध्यमातून करावं."
तुम्ही सक्रिय राजकारणात जाणार का? असा प्रश्न विचारल्यावर प्रशांत किशोर म्हणाले, "मी इतकंच म्हणू शकेल की मी ते करू इच्छित नाही जे मी आतापर्यंत करत आलोय. मी माझ्या वाट्याची जबाबदारी पार पाडली आहे. आयपॅकमधील माझ्या सहकाऱ्यांनी आता जबाबदारी घ्यावी असं मला वाटतं."
आम्ही बहुमताचा आकडा पार करू - भाजप नेते
भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी ANI शी बोलताना विश्वास व्यक्त केलाय की, "पश्चिम बंगालमध्ये आम्ही बहुमताच आकडा पार करू."
"अजून बऱ्याच फेऱ्या बाकी असल्यानं आता काहीही बोलणं घाईचं ठरेल. संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल. आम्ही 3 जागांपासून सुरुवात केलीय आणि 100 ही मिळणार नाही, असं आव्हान देण्यात आलं होतं. मात्र, आम्ही हा आकडा पार केलाय. आम्ही बहुमताचा आकडा पार करू," असं कैलास विजयवर्गीय म्हणाले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
पश्चिम बंगाल निवडणूक
पश्चिम बंगाल निवडणुकीवर सर्वांचे लक्ष आहे. ममता बॅनर्जी आणि भाजपमध्ये थेट लढत इथं पाहायला मिळतेय. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपनं पश्चिम बंगालमध्ये आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. मात्र, प्रचारात व्हिलचेअरवर बसून राज्य पिंजून काढणाऱ्या ममता बॅनर्जींनी नरेंद्र मोदी-अमित शाह यांना जोरदार टक्कर दिल्यामुळे पश्चिम बंगालमधील निवडणूक चर्चेचा विषय ठरली.
भारतात कोरोनाची दुसरी लाट पसरलेली असताना कोरोना साथीच्या नियमांचं अनेक ठिकाणी उल्लंघन झाल्याचं पाहायला मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमध्ये भरपूर सभा घेतल्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली.
देशभरात कोरोनाची लाट तीव्र झालेली असताना भाजप प्रचार सभा का घेत आहेत असा सवाल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विचारला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी त्यांच्या दोन सभा रद्द केल्या होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 23 एप्रिलला पश्चिम बंगालमध्ये नियोजित असलेली त्यांची सभा रद्द केली होती. त्याच दिवशी त्यांनी कोरोनासंदर्भात एक उच्चस्तरीय बैठक घेतली होती.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
ममता बॅनर्जी या पुन्हा बाजी मारतील असा अंदाज अनेक वृत्तवाहिन्यांनी आपल्या एक्झिट पोलमध्ये सांगितला आहे.
पश्चिम बंगाल एक्झिट पोल
एकूण 294 जागा असणाऱ्या पश्चिम बंगाल विधासभेवर वर्चस्व मिळवण्यासाठी 148 जागांचा आकडा पार करणं गरजेचं आहे. इथे ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष बाजी मारेल असा अंदाज रिपब्लिक टीव्ही वगळता इतर बहुतेक माध्यमांच्या एक्झिट पोल्सनी व्यक्त केला आहे.
एबीपी - सी व्होटर
तृणमूल काँग्रेस : 152-164
भाजप : 109-121
काँग्रेस - डावी आघाडी : 14-25
CNN न्यूज 18
तृणमूल काँग्रेस : 162
भाजप : 115
काँग्रेस - डावी आघाडी : 15
रिपब्लिक टीव्ही - CNX
तृणमूल काँग्रेस : 128-138
भाजप : 138-148
काँग्रेस - डावी आघाडी : 11-21
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








