कोरोना : महाराष्ट्र, मध्य प्रदेशसह अनेक राज्यात छत्तीसगडमधून पुरवला जातोय ऑक्सिजन

फोटो स्रोत, ALOK PUTUL
- Author, आलोक प्रकाश पुतुल,
- Role, बीबीसी हिंदीसाठी
कोरोना व्हायरसच्या संकटात देशभरात ऑक्सिजनची कमतरता जाणवत असताना छत्तीसगड अनेक राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करणारं केंद्र बनलं आहे.
छत्तीसगड दिवसभरात केवळ राज्यातल्याच हॉस्पिटल्सना नव्हे तर देशभरातल्या इतर राज्यांनाही ऑक्सिजन पुरवत आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी बीबीसीला सांगितलं, "छत्तीसगड ऑक्सिजन उत्पादक राज्य आहे. इथून मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा तसंच इतर राज्यांमध्ये ऑक्सिजन पाठवला जात आहे. छत्तीसगडमध्ये सध्या दररोज 386.92 मेट्रिक टन ऑक्सिजनचं उत्पादन होत आहे. यापैकी राज्यात केवळ 160 मेट्रिक टन इतका वापर होत आहे. उर्वरित ऑक्सिजन इतर राज्यांना पाठवला आहे."
छत्तीसगडमध्ये ऑक्सिजनची निर्मिती करणारे 29 यंत्र आहेत. यापैकी 27 स्प्रिंग असोर्प्शन संयंत्र आहेत. यात 176.92 मेट्रिक टन ऑक्सिजनचं उत्पादन केलं जातं. याचा वापर उद्योग आणि दवाखान्यांमध्ये केला जातो.
पण ऑक्सिजनचं सर्वाधिक उत्पादन राजधानी रायपूरपासून 30 किलोमीटर अंतरावरच्या भिलाई स्टील प्लांटमध्ये केलं होतं.
स्टील प्लांटमधून पुरवठा
भिलाई स्टील प्लांटमध्ये 1959पासून उत्पादन सुरू झालं आहे आणि आज देशातील 260 मीटर लांबीच्या रेल्वेच्या सगळ्यात लांब पटरीसाठी इथून पुरवठा केला जातोय. या कारखान्याची वार्षिक उत्पादन क्षमता 31 लाख 53 हजार टन आहे. याशिवाय या कारखान्यात ऑक्सिजनचही उत्पादन होतं.
गेल्या वर्षी कोरोना आल्यानंतर दवाखान्यांना ऑक्सिजनची गरज पडू लागली तेव्हा इथलं ऑक्सिजन उत्पादन वाढवण्यात आलं.

फोटो स्रोत, Bsp
गेल्या वर्षी ऑगस्ट ते मार्च 2021पर्यंत भिलाईच्या कारखान्यातून 13,002 मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे. याचा देशातल्या वेगवेगळ्या राज्यांतील लोकांना उपयोग झाला आहे.
या काळात सर्वाधिक 5921 मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची पूर्तता तेलंगणाला करण्यात आली.
मध्यप्रदेश 2640, छत्तीसगड 1955, महाराष्ट्र 999, आंध्रप्रदेश 665, उत्तरप्रदेश 389, ओडिशा 190, गुजरात आणि कर्नाटकला 89 मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला.

फोटो स्रोत, Bsp
गरजेनुसार वाढता पुरवठा
1 एप्रिलला भिलाई कारखान्यातून 279.35 मेट्रिक टन इतकं उत्पादन करण्यात आलं होतं. तर पुरवठा फक्त 75.60 मेट्रिक टन इतका होता. एका आठवड्यानंतर मात्र पुरवठ्याचा आकडा 142.35 मेट्रिक टन इथपर्यंत पोहोचला.
देशभरात ऑक्सिजनची मागणी जसजशी वाढत गेली, तसतसं पुरवठ्याचा आकडाही वाढत गेला. 10 एप्रिलला भिलाईहून 293.12 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला.
21 एप्रिलला भिलाईहून 364.82 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला.
असं असलं तरी राज्यातील हॉस्पिटलमधल्या ऑक्सिजन साठ्याविषयी विरोधी पक्षानं सवाल उपस्थित केले आहेत.
आरोग्य विभागाची आकडेवारी सांगते की, राज्यात 1 मार्च रोजी कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 2880 इतकी होती. यातही बहुतेक रुग्ण होम आयसोलेशनमध्ये होते.

फोटो स्रोत, SAGAR FARIKAR
पंधरवड्यानंतर रुग्णांची संख्या वाढली, पण राज्यात केवळ 197 रुग्ण होते ज्यांना ऑक्सिजनची गरज होती. यातही इतर आजारांशी लढत असलेले रुग्ण सामील होते. या सगळ्या 197 रुग्णांसाठी फक्त 3.68 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागत होती.
पण एका महिन्यानंतर म्हणजेच 15 एप्रिलनंतर राज्यात 5,898 रुग्णांना ऑक्सिजनी गरज लागली आणि हॉस्पिटलमधी ऑक्सिजनच्या विक्रीचा आकडा 110.30 मेट्रिक टन पर्यंत पोहोचला.
विरोधकांचे आरोप
आज राज्यातील कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी वाढत असताना राज्यातील दवाखान्यांना 160 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे.
राज्यातल्या वेगवेगळ्या दवाखान्यांत ऑक्सिजन बेड्ससाठीची मागणी वाढत आहे आणि मोठ्या संख्येनं लोकांना ते शोधावे लागत आहेत.
राज्याचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह म्हणतात, "भिलाई स्टील प्लांट हा देशातील सगळ्यात मोठा स्टील प्लांट आहे. असं असतानाही राज्यातील रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्यानं त्यांचा मृत्यू होत आहे. ही व्यवस्थेची चूक आहे. कारण मुख्यमंत्री एका आणि आरोग्यमंत्री दुसऱ्या दिशेला चालत आहेत. दोघेही मीटिंगमध्ये एकत्र बसू शकत नाही. सर्वपक्षीय बैठक बोलावली जाते आणि तिला आरोग्य मंत्री अनुपस्थित राहतात, अशी स्थिती असेल तर आरोग्यविषयक योजना कशा राबवल्या जाणार?"
पण राज्याचे आरोग्य मंत्री टीएस सिंहदेव हे आरोप फेटाळून लावतात.

फोटो स्रोत, SAGAR FARIKAR
त्यांचा दावा आहे की, रमण सिंह यांच्या 15 वर्षांच्या काळात ऑक्सिजन बेड्सची संख्या फक्त 1242 होती. डिसेंबर 2018 नंतर यात मोठी वाढ झाली आहे आणि आता 7042 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध आहेत.
आरोग्य मंत्र्याच्या मते, "राज्यात दोनच दवाखाने होते, जिथे ऑक्सिजन प्लांट होते. कोरोनाची स्थिती पाहिल्यानंतर ऑगस्ट 2020 मध्ये 20 दवाखान्यात ऑक्सिजन प्लांट लावण्याचा निर्णय घेण्यात आला. यातले 15 प्लांट तयार झाले आहेत, तर पुढच्या आठवड्यात 4 प्लांट तयार होण्याची शक्यता आहे. याचप्रकारे भारत सरकारनं राज्यातल्या दवाखान्यांत 4 ऑक्सिजन प्लांट बसवण्याच्या योजनेवर काम सुरू केलं होतं, यांतील 1 ऑक्सिजन प्लांट सुरू झालेला आहे."
टीएस सिंहदेव सांगतात, "राज्यातल्या कोरोना रुग्णांना कोणत्याच प्रकारे अडचण येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. कुठेच ऑक्सिजनची कमतरता नाहीये. काही ठिकाणी सिलेंडरची कमतरता समोर आल्यानंतर आम्ही ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही केंद्र सरकारकडे 20 हजार ऑक्सिजन सिलेंडरची मागणी केली आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








