नाशिक ऑक्सिजन गळती: ज्या टँकमध्ये बिघाड झाला, तो टॅंक कसा आहे?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात बुधवारी सकाळी (21 एप्रिल) मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गळती झाली.
याचा थेट परिणाम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गंभीर रुग्णांवर झाला. ऑक्सिजन पुरवठा काही काळ पूर्णत: ठप्प झाला. ज्यामुळे, व्हेन्टिलेटर आणि ऑक्सिजनवर असलेल्या 22 रुग्णांचा मृत्यू झालाय.
द्रव स्वरूपात ऑक्सिजन साठवण्यात येणाऱ्या टाकीत बिघाड झाल्याने, गळती झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने दिलीये.
पत्रकारांशी बोलताना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले, "रुग्णालयात 13 KL (13 किलोलीटर) चा ऑक्सिजन टॅंक लावण्यात आलाय. ज्यातून रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा केला जातो. या टॅंकमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाला."
"अग्निशमन अधिकारी, गॅस एजन्सीचे कर्मचारी यांनी टॅंकचा व्हॉल्व बंद केला. व्हॉल्व बंद केला नसता तर ऑक्सिजन बाहेर पडला असता आणि दुरूस्ती करता आली नसती," असं विभागीय आयुक्त पुढे म्हणाले.
13 किलोलीटरचा ऑक्सिजन टॅंक कसा असतो? त्याची देखभाल आणि दुरूस्ती कशी केली जाते? हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
13 किलोलीटरचा ऑक्सिजन टॅंक म्हणजे काय?
सोप्या शब्दात सांगायचं झालं तर,
- 1 किलोलिटर म्हणजे 1,000 लीटर
- 13 किलोलिटर म्हणजे 13,000 लीटर
ऑक्सिजनची गळती झालेल्या टॅंकची साठवणूक क्षमता 13 किलोलीटर (13,000 लीटर) होती. या टॅंकमध्ये द्रव स्वरूपात मेडिकल ऑक्सिजन साठवून ठेवण्यात आला होता.
ऑक्सिजन साठवण्यासाठी वापरण्यात येणारे टॅंक 11, 13, 14 किलोलीटर अशा विविध क्षमतेचे असतात. मोठ्या सरकारी आणि खासगी रुग्णालयात हे टॅंक लावण्यात येतात. टॅंकमध्ये साठवलेल्या ऑक्सिजनचा पाईपच्या माध्यमातून रुग्णालयात पुरवठा केला जातो.
टॅंकच्या कोणत्या भागांची तपासणी अनिवार्य?
महाराष्ट्रात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोव्हिड रुग्णांसाठी ऑक्सिजन जगण्याची लाइफलाइन ठरतोय. त्यामुळे या ऑक्सिजन टॅंककडे खास लक्ष देण्यात येतं.
या टॅंकची तपासणी कशी केली जाते? हे जाणून घेण्यासाठी आम्ही राज्यातील एका कोव्हिड सेंटरच्या टीमशी चर्चा केली.
नाव न घेण्याच्या अटीवर ते सांगतात, "ऑक्सिजन टॅंकवर लक्ष देण्यासाठी तीन शिफ्टमध्ये टीम काम करतात. यात सहा प्रकारच्या तपासण्या केल्या जातात."
- प्रेशर मीटरची तपासणी
- कपॅसिटी मीटरवर लक्ष ठेवणं
- ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या पाईपची तपासणी
- इनलेट आणि आऊटलेटची तपासणी केली जाते
त्याचसोबत वेपोरायझरच्या क्षमतेची तपासणी करणं अत्यंत गरजेचं आहे.
"रुग्णालयात किंवा कोव्हिड सेंटरमध्ये असलेल्या या टॅंकचे व्हॉल्व, पाईप यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवावं लागतं. दिवसातून चार वेळा तरी तपासणी करावी लागते," असं ते पुढे म्हणतात.

नाशिकमध्ये टॅंकच्या व्हॉल्वमध्ये बिघाड होऊन गळती झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येतेय. त्यामुळे व्हॉल्वमध्ये गळती होऊ शकते? यावर ते म्हणतात, "व्हॉल्वमध्ये गळती शक्य आहे. बहुदा याकडे लक्ष दिलं नसल्याने ही घटना घडली असण्याची शक्यता आहे."
तर, ऑक्सिजनचे डिस्ट्रीब्यूटर नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात, "प्रत्येक प्लांटवर एक ऑपरेटर असतो. प्लांटची जबाबदारी त्याच्यावर असते. ऑक्सिजन टाकीला 11 आणि 13 नंबरचे व्हॉल्व असतात. यामध्ये बिघाड झाल्याने ही घटना घडली असण्याची शक्यता आहे."
नाशिकची घटना कशामुळे घडली?
कौस्तुभ बुटाला पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या ऑक्सिजन समितीचे सदस्य आहेत.
ते म्हणतात, "ही घटना घडण्यासाठी दोन प्रमुख कारणं असू शकतात. एक निष्काळजीपणा आणि दुसरी टॅंकमधील पार्ट खराब असल्यामुळे."

फोटो स्रोत, Getty Images
ऑक्सिजन टॅंकमध्ये व्हॉल्व, वेपोराईजर आणि ज्वाइंट फार महत्त्वाचे आहेत, असं बुटाला सांगतात.
"हा प्लांट नवीन होता. मग एका वर्षात पार्टमध्ये बिघाड कसा झाला? हा प्रश्न आहे. पार्ट चांगल्या कंपन्यांकडून विकत घेतले गेले पाहिजेत. हे पार्ट ब्रासचे असले पाहिजेत," असं कौस्तुभ पुढे सांगतात.
ऑक्सिजन टॅंक उभारण्यासाठी परवानगी कोण देतं?
औरंगाबादच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातही 11 किलोलीटरचा टॅंक उभारण्यात आला आहे. या टॅंकची जबाबदारी रुग्णालयातील डॉक्टरांच्या पाच सदस्यीय टीमकडे देण्यात आली आहे. डॉ. अमोल जोशी या टीमचे एक सदस्य आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
ते सांगतात, "ऑक्सिजन टॅंक कोणीही, कुठेही उभारू शकत नाही. याची परवानगी केंद्राच्या पेट्रोलियम अन्ड सेफ्टी ऑर्गनायझेशनकडून (PESO) दिली जाते. टॅंकच्या सुरक्षेची तपासणी झाल्यानंतर लायसन्स दिलं जातं. लायसन्स मिळाल्यानंतर टॅंकचं रिफिलिंग केलं जातं."
ऑक्सिजन टॅंकबाबत पाच गोष्टींवर दररोज लक्ष दिलं पाहिजे, असं डॉ. जोशी सांगतात.
- टॅंकचं प्रेशर रोज तपासणं गरजेचं
- टॅंकमध्ये द्रव स्वरूपात ऑक्सिजनची पातळी किती हे पहाणं
- टॅंकमध्ये आवश्यक ठिकाणी बर्ष होतोय का याची तपासणी. बर्ष झाला नाही तर द्रव ऑक्सिजनचा पुरवठा थांबलाय असं समजावं
- प्रमाणाबाहेर बर्फ तयार झाला तर वेपोरायझरची क्षमता कमी होते
- यामुळे लिक्विडमधून गॅस कमी प्रमाणात बनतो आणि रुग्णांना पुरवठा कमी होण्याची शक्यता असते
द्रव ऑक्सिजनचा धोका असतो?
ऑक्सिजन प्लांटचे संचालक नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात, "द्रव स्वरूपातील ऑक्सिजनचं तापमान उणे 195 ते 210 डीग्री असतं. ऑक्सिजन हातावर पडला तर, तो भाग गोठून जातो."
डॉ. जोशी सांगतात, "ऑक्सिजनसाठी फायर सेफ्टी अत्यंत महत्त्वाची आहे. ऑक्सिजन गळती झाली तर, आजूबाजूच्या पदार्थाला ज्वलनशीलमध्ये रूपांतर करतो. व्हॉल्व घाईत उघडण्यात आले तर धोका निर्माण होऊ शकतो."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








