कोरोना: अकार्यक्षम आणि भ्रष्ट सरकारचे परिणाम महाराष्ट्र भोगतोय - पीयूष गोयल #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, facebook
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. अकार्यक्षम आणि भ्रष्ट सरकारचे परिणाम महाराष्ट्र भोगतोय - पीयूष गोयल
राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोरोना स्थिती हाताळण्यास अपयशी ठरल्याची टीका केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे.
राज्यातील अकार्यक्षम आणि भ्रष्ट सरकारचे परिणाम महाराष्ट्र भोगतोय, असं पीयूष गोयल यांनी ट्वीट करून म्हटलं आहे.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे, "केंद्राकडून महाराष्ट्राला आवश्यक ती सगळी मदत केली जात आहे. पण राज्यातील अकार्यक्षम आणि भ्रष्ट सरकारचे परिणाम महाराष्ट्र भोगतोय. राज्यातील नागरिक 'माझं कुटुंब, माझी जबाबदारी' याचं काटेकोरपणे पालन करत आहेत. पण आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही त्याचं पालन करण्याची वेळ आली आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
"ऑक्सिजनबाबत उद्धव ठाकरे हे रडीचा डाव खेळत असल्याचं पाहून दुःख होतं. देशात पुरेसं ऑक्सिजन उत्पादन केलं जावं, यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. सध्या आपण 110 टक्के क्षमतेने ऑक्सिजन निर्मिती करत आहोत. औद्योगिक वापरासाठी बनवण्यात येणारं ऑक्सिजन वैद्यकीय क्षेत्राकडे वळवण्याचे शक्त तितके प्रयत्न केंद्राकडून केले जात आहेत," असं गोयल यांनी म्हटलं.
ही बातमी टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे.
2. आपण एका वादळात अडकलो आहोत, कुठं जायचं कल्पना नाही - राहुल गांधी
"समुद्राच्या मध्यभागी एका वादळात आपण अडकलो आहोत, कुठं जायचं कल्पना नाही, संकटाचा इशारा देणारी सगळी यंत्रणा सरकारने बंद करून टाकली आहेत," अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत राहुल गांधी बोलत होते. या बैठकीत काँग्रेसने मोदी सरकारविरुद्ध 14 मुद्द्यांचं एक 'आरोपपत्र' प्रसिद्ध केलं. यामध्ये मोदी सरकारने देशाला एका अभूतपूर्व आपत्तीत लोटल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

फोटो स्रोत, Twitter
"सातत्याने आपला विजय झाल्याचं जाहीर करण्याची सरकारची भूमिका आहे. या भूमिकेतून सरकारचा उर्मटपणा दिसून येतो. सध्याच्या स्थितीत सरकारने संकटाचा इशारा देणारी सगळी यंत्रणा बंद करून टाकली. समुद्राच्या मध्यभागी एका वादळात आपण अडकलो आहोत, आता इथून पुढे कुठं जायचं कल्पना नाही," असं राहुल गांधी म्हणाले.
ही बातमी द हिंदूने दिली आहे.
3. कुंभमेळ्यातून आलेले भाविक आता 'प्रसाद' म्हणून कोरोना वाटतील - किशोरी पेडणेकर
कुंभमेळ्यातून आलेले भाविक आता 'प्रसाद' म्हणून कोरोना वाटतील, त्यामुळे मुंबईत परतणाऱ्या भाविकांना देखील क्वारंटाईन करण्याचा विचार आम्ही करत आहोत, असं वक्तव्य मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. ANI वृत्तसंस्थेशी बोलताना पेडणेकर यांनी वरील वक्तव्य केलं.

फोटो स्रोत, Twitter
त्या म्हणाल्या, "दिल्लीत मुस्लीम बांधवांचा कार्यक्रम झाला. दिल्लीतून परतल्यानंतर लोकांमध्ये कोरोना संसर्ग झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर कोरोना रूग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला. तशीच परिस्थिती आजही आहे. कुंभमेळ्यातून आलेले भाविक आता 'प्रसाद' म्हणून कोरोना वाटतील
आता कोरोना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भविकांनी राज्यात स्वखर्चाने क्वारंटाईन व्हावे. मुंबईत परतणाऱ्या भाविकांना देखील क्वारंटाईन करण्याचा विचार आम्ही करत आहोत," असं देखील किशोरी पेडणेकर म्हणाल्या. ही बातमी झी 24 तासने दिली आहे.
4. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किंमतीत घट
कोरोना संसर्गानंतर दिल्या जाणाऱ्या रेमडेसिवीर औषधाची सध्या प्रचंड टंचाई पाहायला मिळते. हे औषध मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड तारांबळ उडत असल्याचं सध्या चित्र आहे.

फोटो स्रोत, Getty Images
या पार्श्वभूमीवर रेमडेसिवीरचं उत्पादन दुप्पट करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. तसंच सरकारच्या हस्तक्षेपानंतर रेमडेसिवीर निर्मिती करण्याऱ्या कंपन्यांनी इंजेक्शनच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
डिसेंबर 2020 मध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर रेमडेसिवीर तयार करण्याऱ्या कंपन्यांनी उत्पादनात घट केली होती.
पण आता दुसरी लाट आल्याने रेमडेसिवीरची मागणी पुन्हा वाढली. टंचाईमुळे रेमडेसिवीरची काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचं निदर्शनास आलं आहे. या इंजेक्शनची साठेबाजी आणि काळ्याबाजाराला आळा घालण्याचे निर्देशही राज्यांना देण्यात आले आहेत. ही बातमी लोकसत्ताने दिली.
5. ऑक्सिजन पुरवठा रेल्वेनी करण्याची तयारी सुरू
महाराष्ट्रात ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाल्याने संकटात वाढ झाली आहे. या स्थितीत महाराष्ट्राला इतर राज्यांतून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे.
पण रस्तेमार्गाने हा पुरवठा होण्यास विलंब लागू शकतो, त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रेल्वेने ऑक्सिजन पुरवठा करण्याची मागणी केली होती. या मागणीला आता रेल्वेकडून परवानगी देण्यात आली आहे. या संदर्भात रेल्वेच्या सर्व विभागांना पत्र पाठवण्यात आले आहे.
रेल्वेने यासाठी परवानगी दिली असून त्यासाठी आवश्यक असणारी माहिती मागवण्यात आली आहे. आता मालगाडीत थेट ट्रक, टँकर ठेवून ते राज्यात पाठवले जाऊ शकतात. मुलुंड, नाशिक, पिंपरी-चिंचवड, कळंबोली या ठिकाणी असे टँकर, ट्रक उतरवण्यासाठी रॅम्पची सुविधा आहे. इथून त्यांचा पुरवठा राज्यात केला जाऊ शकतो. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








