कोरोना महाराष्ट्र : लॉकडाऊनचा निर्णय 14 एप्रिलनंतर? टास्क फोर्सच्या बैठकीनंतर राजेश टोपेंनी काय म्हटलं?

राजेश टोपे

फोटो स्रोत, Getty Images

राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे, असं टास्क फोर्सच्या सदस्यांचं मत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कोव्हिड टास्क फोर्स समिती यांच्यात आज (11 एप्रिल) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थितीसंदर्भात चर्चा झाली.

या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राजेश टोपे म्हणाले, "राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती आता निर्माण होतीये, तर लॉकडाऊनच्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं, लोकांचे जे काही प्रश्न असतील ते कसे सोडवायचे, लॉकडाऊन लावायचा झाल्यास किती दिवसांचा लावायचा या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली."राजेश टोपे यांनी पुढे सांगितलं की, "या सगळ्यावर अर्थात केवळ चर्चाच झाली आहे. पण राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे, असं टास्क फोर्सच्या सदस्यांचं मत होतं. त्यामुळे आता मुख्यमंत्री अर्थ आणि अन्य विभागांशी चर्चा करतील. त्यानंतर कॅबिनेट बोलावली जाईल आणि कदाचित 14 एप्रिलनंतर यासंदर्भातला उचित निर्णय घेतला जाईल."

या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. अविनाश सुपे, डॉ तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव विजय अपस्थित होते.

बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

ऑक्सिजन उपलब्धता, रेमडेसिवीरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढविणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे आदी मुद्य्यांवर विस्तृत चर्चा झाली.

मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत म्हटलं की, गेल्या वर्षभरापासून आपण कोविड्शी लढा देताना सुविधा वाढविल्या, चाचण्या वाढवल्या, मोठ्या प्रमाणावर आरोग्याचे नियम पाळावेत यादृष्टीने जनजागृती केली, लोकांमध्ये सुद्धा याविषयी जागरूकता आली आहे. कार्यालयीन वेळांमध्ये बदल करावेत, वर्क फ्रॉम होमवर भर द्यावा, मुंबईत उपनगरीय रेल्वेसाठी पिक अवर्स ठरवणे अशा अनेक मुद्द्यांवर आपण बोललो आणि कार्यवाही केली आहे.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Uddhav Thackeray/facebook

रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. लक्षणे नसलेल्या व्यक्ती लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरवित आहेत. जे लोक आरोग्याचे नियम पाळत आहेत त्यांना निष्काळजी लोकांमुळे करण नसतांना धोका निर्माण झाला असून लॉकडाऊन लावून ही वाढ थोपवावी असं त्यांचं म्हणणं असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्वसमावेशक कार्य पद्धती ( एसओपी ) तयार करण्यात येईल, असं म्हटलं.

आजच्या बैठकीत गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश तसेच ज्या ठिकाणी ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो तेथून ऑक्सिजन तातडीने मागविण्याबाबतही चर्चा झाली. रेमडेसिवीरचा अति व अवाजवी वापर थांबविणे देखील गरजेचे आहे, असं मत टास्क फोर्सने व्यक्त केले.

टास्क फोर्सच्या सदस्यांनी कोणत्या सूचना केल्या?

  • 95 टक्के रुग्ण हे घरीच योग्य रीतीने उपचार घेऊन बरे होऊ शकतात, केवळ गंभीर स्वरूपाच्या रुग्णांनाच तातडीने रुग्णालयाची गरज भासते त्यादृष्टीने जनजागृती करावी
  • सोसायट्यांमध्ये विलगीकरण कक्ष करून तिथे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स लावून तात्पुरती गरज भागवावी
  • तरुण रुग्णांना देखील व्हेंटिलेटर्सची आवश्यकता पडू लागली आहे त्याचे नियोजन करावे
  • ऑक्सिजन देताना तो सुयोग्य आणि आवश्यकतेपेक्षा जास्त न दिला पाहिजे यासाठी डॉक्टर्सना सूचना देणे
  • मास्क न लावल्यास किंवा इतर नियम तोडल्यास मोठा दंड आकारणे

कोव्हिड टास्क फोर्स ही तज्ज्ञ डॉक्टरांची एक समिती आहे. कोरोना आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी ही समिती स्थापन करण्यात आली होती.

दरम्यान, शनिवारी (10 एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा केली. या बैठकीत एक आठवडा ते पंधरा दिवस लॉकडॉऊन लागू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

"कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. आपल्याला प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे," अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारच्या बैठकीनंतर मांडली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)