मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला चोपदार माहिती आहेत का?

फोटो स्रोत, BBC/SHARDUL KADAM
- Author, रोहन नामजोशी
- Role, बीबीसी मराठी
मुंबईच्या उच्च न्यायायलयाच्या पहिल्या महिला चोपदार अनिता मोरे 31 मार्च रोजी निवृत्त झाल्या.
मी त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी पत्रकार का, असा प्रश्न विचारला आणि त्या व्यवस्थित सावरून बसल्याचं मला फोनवरून ऐकू आलं आणि दिसलंसुद्धा. निवृत्त झाल्यामुळे त्या अतिशय आनंदात होत्या. आपली कहाणी सांगण्यास उत्सुक होत्या. सुरुवातीची औपचारिक ओळख झाली आणि त्यांची जीवनगाथा सांगायला सुरुवात केली.
अनिता आत्माराम मोरे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या शिवथर गावातल्या मूळ रहिवासी लग्नानंतर मुंबईत आल्या. 1981 साली त्यांच्या पतीचं निधन झालं आणि त्यांच्या जागी अनिता यांना मुंबई उच्च न्यायालयात शिपाई म्हणून नोकरी मिळाली.पुढे त्या मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला चोपदार झाल्या. त्याआधी त्यांनी कधीच कोर्टाचं तोंड पाहिलं नव्हतं. त्यांनी नोकरी करण्याला सासरच्यांचा प्रचंड विरोध होता.
मात्र गावाकडे जाऊन काय करणार आणि 1981 मध्ये पेन्शन तरी किती मिळणार हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यामुळे दोन्ही मुलांना आई वडिलांकडे गावाला सोडलं अनिता त्यांच्या दीराकडे काही दिवस रहायला गेल्या. इथून त्यांचा एक नवीन प्रवास सुरू झाला.
कोर्टातला पहिला दिवस
"मला काहीच त्रास झाला नाही. तिथल्या लोकांनी मला खूप पाठिंबा दिला, कोर्टाची वाट त्यांनी दाखवली. त्यांनी शक्य तितकी सगळी मदत केली. तेव्हा कोर्टात बायका कामाला नव्हत्या. पण मला कधीही त्रास झाला नाही," अनिता मोरे सांगत होत्या.
पतीचं निधन, मुलं दूर, नवीन नोकरी या सगळ्यात मानसिक संतुलन राखणं अनिता यांना फार जड गेल्याची प्रांजळ कबुली त्या देतात. माझ्या आजूबाजूच्या लोकांनी मला समजावलं, माझी भाऊ, भावजय यांनी मला खूप साथ दिली, असं त्या सांगतात.

फोटो स्रोत, BBC/SHARDUL KADAM
पंधरा वर्षं चांगली सेवा केल्यावर त्यांना चोपदार पदी बढती मिळाली. न्यायमूर्ती के.के.बाम यांनी मोरे बाईच चोपदारपदी हव्या अशी मागणी केली आणि त्यांच्या आयुष्यातलं नवीन पर्व सुरू झालं. अनेक महिला न्यायाधीशांबरोबर काम केल्याच्या आठवणी त्यांनी बीबीसी मराठीला सांगितल्या.
अनेक मोठमोठ्या न्यायाधीशांबरोबर पडेल ते काम केलं. त्यांना लिहिता वाचता यायचं नाही. त्याही ते थोडं शिकल्या. कागदपत्रं इकडून तिकडे पोहोचवणं, ग्रंथालयातून अनेक संदर्भग्रंथ आणून देणं अशी अनेक कामं त्यांनी केली.
या सगळ्या प्रवासात त्यांनी न्या.बाम यांचा विशेष उल्लेख केला. त्यांचा अनिता यांच्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव असल्याचं वेळोवेळी जाणवलं. त्यांनी अनिता यांच्या मुलाला वकील होण्यासाठी प्रोत्साहन दिलं, त्याच्या कॉलेजचा, पुस्तकाचा खर्च केला. गेल्या दोन दिवसांपूर्वी बाम यांचं निधन झालं. त्याची चुटपूट मात्र यांना अनिता यांना लागून राहिली. लॉकडाऊनच्या काळात व्हीडिओ कॉलवरून त्यांची भेट व्हायची मात्र त्यांना शेवटचं पाहता आलं नाही याची खंत त्या व्यक्त करतात.
खंबीर साथ आणि आनंदाची वाट
अनिता मोरे आता अतिशय समाधानााने निवृत्त झाल्या आहेत. त्या नोकरीला लागल्या तेव्हा सासरच्यांनी विरोध केला होता. पण जेव्हा मोरे यांनी स्वबळावर पुन्हा आयुष्य उभं केलं तेव्हा सासरच्यांचा दृष्टिकोन बदलला. त्यांनी अनिता यांना साथ दिली. त्यांचा विरोध मावळत गेला.

फोटो स्रोत, BBC/SHARDUL KADAM
नोकरीच्या काळात सुट्ट्या अजिबात मिळायच्या नाहीत अशी खंत त्या व्यक्त करतात. पण आता त्या पूर्णपणे आराम करणार आहेत. त्यांची दोन्ही मुलं त्यांना सुखात ठेवतात हे सांगायला त्या विसरल्या नाही.
अनिता मोरे यांना अजूनही पूर्ण लिहिता वाचता येत नाही मात्र स्वत:च्याच प्रवासातून त्या बरंच शिकल्या आहेत. त्यांच्या मनात कोणाबद्दलही कटुता नाही. या प्रवासात साथ दिलेल्या लोकांबद्दल त्या ऋणी आहेत. आयुष्यात आलेल्या संकटाशी दोन हात करून मुंबईसारख्या महानगरात चोपदारसारखं वेगळं काम त्यांनी केलं. रुढार्थाने प्रेरणादायी नसली तरी आश्वासक भाव देणारी ही कहाणी आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








