सुएझ कालवा : महाकाय एव्हर गिव्हन जहाज बाहेर कसं काढलं?

सुएझ कालवा, एव्हरगिव्हन, जलवाहतूक, व्यापार, पैसा

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, सिद्धनाथ गानू
    • Role, बीबीसी मराठी

एखादा मोठा माणूस लहान मुलांच्या खुर्चीत बसला, तर त्याला बाहेर काढताना किती मेहनत करावी लागेल? तो सगळाच प्रसंग हसू आणणारा असेल. पण 200 मीटर रुंद कालव्यात 400 मीटर लांब जहाज जेव्हा तिरपं अडकतं, तेव्हा ते बाहेर काढताना माणसं रडकुंडीला येऊ शकतात.

संपूर्ण भारतीय कर्मचारी वर्ग असलेल्या MV एव्हर गिव्हन जहाजाला सुएझ कालव्यातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी काय काय करावं लागलं? हे आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत..

एव्हर गिव्हन हे एक महाकाय मालवाहू जहाज आहे. 400 मीटर लांब आणि सामानासह जवळपास 2 लाख टन वजनाचं हे जहाज सुएझच्या कालव्यात 23 मार्चला अडकलं.

जागतिक व्यापारावर त्याचे मोठे परिणाम झाले, कच्च्या तेलाच्या किंमती कडाडल्या. हे जहाज सोडवण्यासाठी नेमकं काय काय केलं गेलं?

एव्हर गिव्हन जहाजाची सुटका कशी झाली?

मोठ्या जहाजाला छोट्या होड्या साथ देतात वगैरे गोष्टी आपण बहुधा साहित्यात वाचलेल्या असातात. पण यावेळी त्या प्रत्यक्षात पाहायला मिळाल्या.

सुएझ कालवा, एव्हरगिव्हन, जलवाहतूक, व्यापार, पैसा

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, जहाज सुवेझ कालव्यात फसल्याने कोट्यवधींचं नुकसान झालं.

या बोटीला सरळ करण्यासाठी आणि गाळातून सोडवण्यासाठी लहान लहान टग बोटींची मदत घेतली गेली. डझनभर टगबोटी या जहाजाला बाहेर काढण्याचं काम करत होत्या. दोन टगबोटी पुढून ओढत होत्या. सहा बोटी तिला कालव्याच्या दक्षिणेकडे ढकलत होत्या आणि चार टगबोटी दक्षिणेकडे ओढत होत्या.

हे सगळं का? कारण जहाज किनाऱ्याजवळ तिरपं रुतलं होतं, त्याला आधी सरळ करणं गरजेचं होतं. ते करताना त्याच्या नाकाजवळ आणि शेपटाजवळची वाळू/गाळ मोकळा करणंही तितकंच आव्हानाचं काम होतं.

सोमवारी (29 मार्च) सकाळी हे जहाज मोकळं झाल्याचा एक व्हीडिओ समोर आला पण नंतर असं लक्षात आलं की त्या व्हीडिओत ते फक्त वळलं होतं. पूर्णपणे मोकळं होऊन तरंगायला लागलं नव्हतं.

त्यामुळे तो गाळ काढण्यासाठी अनेक ड्रेजर्स म्हणजे गाळ काढणारी यंत्रं काम करत होते. तुम्ही नदीपात्रात हे ड्रेजर्स पाहिले असतील. या जहाजाचं काम पाहणाऱ्या बर्नहार्ड शुल्ट शिप मॅनेजमेंट कंपनीने सांगितलं की एक विशिष्ट प्रकारचा सक्शन ड्रेजरही इथे आणला होता, जो ताशी 2 हजार घनमीटर गाळ काढून किनाऱ्यावर टाकू शकतो.

जहाजाच्या पुढच्या भागाजवळ जवळपास 18 मीटर खोलपर्यंत ते ड्रेजर खणत होते आणि त्यांनी 27 हजार घनमीटर वाळू उपसली असं सुवेझ कॅनॉल ऑथॉरिटीने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं. इजिप्त आणि इतरही देशांनी या कामात भाग घेतला.

पण फक्त गाळ काढून आणि जहाजाला धक्के देऊन ते बाहेर निघणं शक्य नव्हतं. या जहाजावरचं वजनही कमी करण्याची गरज होती. या जहाजावर 20 फूट लांबीचे साधारण 20 हजार कंटेनर होते असा अंदाज होता.

रविवारी (28 मार्च) कंटेनर जहाजावरून उतरवण्याची तयारीही सुरू झाली होती जेणेकरून जहाज हलकं होऊन हलायला मदत झाली असती. असं करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या क्रेनची गरज पडेल असं तज्ज्ञांनी बीबीसीला सांगितलं होतं.

क्रेनला 200 फूट वर जाऊन कंटेनर उचलून ते हळूहळू उतरवावे लागले असते. हे करण्यात सगळ्यात मोठा धोका असतो तो म्हणजे जहाजाचा तोल जाण्याचा. जर वजनाचा समतोल ढासळला तर जहाज दुभंगूही शकतं.

भारतीय 'क्रू'चं काय झालं?

या जहाजावर काम करणारे 25 कर्मचारी भारतीय आहेत. यातले तीन कर्मचारी मुंबईचे, काही तामिळनाडू, काही आंध्र प्रदेश तर इतर काही उत्तर भारतातील आहेत.

सुएझ

फोटो स्रोत, BBC Sport

ऑल इंडिया सीफेअरर अँड जनरल वर्कर्स युनियनचे कार्याध्यक्ष अभिजीत सांगळे यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं की त्यांच्या युनियनला कोणत्याही कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांनी मदतीसाठी संपर्क केला नव्हता. कारण या कर्मचाऱ्यांची जहाजावरच देखभाल केली जात होती.

नौवहन महासंचालक अमिताभ कुमार यांनीही भारतीय कर्मचारी सुखरूप असल्याचं आणि नौवहन महासंचालनालयाची मदत मागितली गेली नसल्याचं सांगितलंय.

व्यापारावर काय परिणाम?

193 किलोमीटर लांब सुएझ कालव्यातून जगाच्या एकूण व्यापारापैकी 12 टक्के व्यापार चालतो. आशिया आणि युरोपाला जोडणारा हा सर्वांत जवळचा मार्ग आहे. दररोज य कालव्यातून साडेनऊ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किंमतीच्या वस्तूंची वाहतूक होत असते.

सुएझ कालवा, एव्हरगिव्हन, जलवाहतूक, व्यापार, पैसा

फोटो स्रोत, EPA

एव्हर गिव्हन जहाज अडकल्यानंतर तेलाच्या किंमती वाढायला लागल्या होत्या. सोमवारी (29 मार्च) सकाळी हे जहाज मोकळं होत असल्याच्या बातम्या येताच तेलाच्या किंमती कमी होऊन आशियाई बाजारही वधारलेले पाहायला मिळाले.

एव्हर गिव्हनमुळे साडे तीनशेपेक्षा जास्त इतर मालवाहू बोटी आणि जहाजं सुएझ कालव्यात अडकली होती. पर्यायी मार्ग खुला असला तरी वाहतुकीच्या वेगावर परिणाम झाला होता, हे जर आणखी काही दिवस सुरू राहिलं असतं तर अनेक देशांतल्या कंपन्यांना हवाई मार्गे माल मागवावा लागला असता, ज्यासाठी जलवाहतुकीच्या तिप्पट खर्च झाला असता. हे जहाज सोडवण्यात यश आल्याने जागतिक व्यापारावरचं एक मोठं संकट आत्ता टळलेलं दिसतंय.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)