कोरोना लॉकडाऊन : पुणे, नागपूर, नाशिक, परभणी, औरंगाबादमध्ये असे आहेत नियम

फोटो स्रोत, ANI
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या दोन दिवसात प्रशासनासोबत बैठक घेऊन लॉकडॉऊन बाबत निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे.
तरीही महाराष्ट्राच्या अनेक भागात काही ना काही प्रकारचे निर्बंध लागू केले आहेत. कोणत्या जिल्ह्यात काय प्रकारचे निर्बंध आहेत वाचा इथे -
1. नागपूरमध्ये निर्बंध
नागपूर शहरात 15 ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी ही माहिती दिलीय. यावेळी अत्यावश्यक सेवा सुरू राहतील असंही त्यांनी सांगितलं. 10 मार्चला नागपूरमध्ये 1700 हून अधिक नवीन रुग्णांची नोंद झालीय. यानंतर लॉकडॉऊनचा निर्णय घेण्यात आला. यावेळी उद्योग सुरू राहणार असून खासगी कार्यलय मात्र बंदच राहणार आहेत. सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 25% कमर्चारी उपस्थित राहू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
- नागपूर शहरातील शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था ( कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था) आणि इतर तत्सम संस्था सुरु ठेवण्यास प्रतिबंध. पण ऑनलाईन क्लासेस सुरु ठेवता येतील.
- राष्ट्रीय/राज्य/विद्यापीठ/शासन स्तरावरील पूर्वनियोजित परीक्षा कोव्हिड विषयक सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून घेता येतील.
- नागपूर शहर सीमेत कोणत्याही धार्मिक सभा, राजकीय सभा, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम यावर प्रतिबंध.
- नागपूर शहरातील संबंधित सभागृह/मंगल कार्यालयं/लॉन याठिकाणी होणारे लग्न समारंभाचे आयोजनास प्रतिबंध.
- धार्मिक/पूजाअर्चनेची स्थळं नागरिकांना दर्शनासाठी बंद राहतील. सदर स्थळाची नियमित पूजा, अर्चना/ साफसफाई विषयक दैनंदिन कामं जास्तीत जास्त 5 व्यक्तीच्या उपस्थितीच्या मर्यादेत करण्यास मुभा राहील.
- नागपूर शहरातील सर्व आठवडी बाजार बंद राहतील.
- रेस्टॉरंट/ हॉटेल/खाद्यगृह मधील प्रत्यक्ष डायनिंग सुविधा बंद राहील, मात्र होम डिलीव्हरी ठेवण्याची मुभा राहील आणि त्यासाठी किचन रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहू शकतील.
- तरणतलाव (Swimming Pools) बंद राहतील.
- सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन बंद राहतील.
- सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालय (अत्यावश्यक सेवेशी संबंधित कार्यालय वगळून) त्यांच्या एकूण क्षमतेच्या केवळ 25 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीने सुरू ठेवता येतील.
- सर्व खाजगी आस्थापने/कार्यालय पूर्णपणे बंद राहतील. (आर्थिक लेखाविषयक सेवेशी संबंधित वगळून)
- मॉल्स, चित्रपटगृहे/नाट्यगृहे बंद राहतील.
- दुकाने, मार्केट बंद राहतील.
- नागपूर शहरातील उद्याने नागरिकांसाठी बंद राहतील.
- व्यायामशाळा / जिम बंद राहतील.
2. पुण्यातील नियम
कोरोना व्हायरस प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात कोणतेही नवे निर्बंध घालण्यात आले नाहीत पण लोकांनी आधीच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, असं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
जिल्ह्यातील शाळा 31 मार्चपर्यंत बंद राहणार असून रात्रीची संचारबंदी कायम असेल, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन सौरभ राव यांनी कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनसंदर्भात अधिक माहिती दिली.
काय आहेत निर्बंध?
• शाळा, महाविद्यालयं 31 मार्चपर्यंत बंद, 10-12 वीच्या विद्यार्थ्यांना यातून शिथिलता
• हॉटेल रात्री 10 वाजता बंद, दिवसभर 50 टक्के क्षमतेनेच सुरू ठेवू शकणार
• हॉटेलमध्ये रात्री 10 नंतर एक तास पार्सल सुरू राहणार
• रात्री 11 पासून सकाळी 6 पर्यंत संचारबंदी
• गार्डन संध्याकाळी बंद राहणार, सकाळी व्यायामासाठी सुरू राहणार
• लग्न, धार्मिक कार्यक्रम, अंत्यविधी 50 पेक्षा जास्त लोक सहभागी होऊ शकणार नाही. अन्यथा गुन्हा दाखल होणार
• मॉल रात्री 10 वाजता बंद होणार
• रस्त्यावरील स्टॉलवर एकावेळी 5 लोक उभे राहू शकणार
• सोसायटीमधील क्लब हाऊस बंद राहणार
• MPSC क्लासेस, लायब्ररी 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार
3. ठाण्यात हॉटस्पॉट
ठाणे शहरातील हॉटस्पॉट असणाऱ्या भागात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. ठाणे शहरातील 16 विभाग हॅाटस्पॅाट घोषित करण्यात आले असून, 31 मार्च रात्री 12 वाजेपर्यंत या भागात लॅाकडाऊन असेल. ठाणे महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी हे आदेश जारी केले आहेत.
ठाण्यातील कुठल्या भागात हॉटस्पॉट?
• आईनगर कळवा
• सूर्यनगर विटावा
• खारेगाव हेल्थ सेंटर
• चेंदणी कोळीवाडा
• हिरानंदानी इस्टेट
• लोढा
• रुनवाल गार्डनसिटी बाळकुम
• लोढा आमरा
• शिवाईनगर
• दोस्ती विहार
• हिरानंदानी मेडीज
• पाटीलवाडी
• रुनवाल प्लाझा
• रूनवालनगर, कोलवाड
• रुस्तमजी, वृन्दावन स्टॅाप
हॉटस्पपॉट नसलेल्या भागात आधीप्रमाणे मिशन बिगीन अगेन सुरू राहील, असेही महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
4. जळगावात 3 दिवसांचा कर्फ्यू
जळगावात करोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन तीन दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे.

फोटो स्रोत, ANI
जळगाव जिल्ह्यासह शहरात करोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता करोनाची साखळी तोडण्यासठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशांनुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शुक्रवार, शनिवार व रविवार असा तीन दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे.
या तीन दिवसांत शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांश बाजारपेठा बंद राहणार आहेत. सर्वांनी जनता कर्फ्यूचे पालन काटेकोरपणे करावे असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह प्रशासनाने केले आहे.
जळगाव शहराच्या हद्दीत 11 मार्च रोजी रात्री आठ वाजेपासून जनता कर्फ्यू सुरू होणार असून तो १५ मार्च २०२१ रोजी सकाळी आठ वाजता संपणार आहे. या दरम्यान, आपत्कालीन सेवा वगळता अन्य सेवा बंद राहणार आहेत.
काय राहाणार बंद?
• सर्व शाळा, कॉलेज आदी शैक्षणिक संस्था
• बाजार, भाजीपाला दुकाने, सलून, सर्व खासगी कार्यालये
• धार्मिक स्थळे, सार्वजनिक कार्यक्रम, किराणा दुकाने आणि दारू दुकाने
• बगीचा, पानटपरी, हातगाड्या, सिनेमागृहे, व्यायामशाळा/जीम, तरणतलाव
काय राहाणार सुरू ?
• वैद्यकीय आपत्कालीन सेवा, जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक
• बस, रेल्वे आणि विमानसेवा
• नियोजित परीक्षा असणारी शाळा व कॉलेजेस
• बँका आणि वित्तीय संस्था, कृषी केंद्र,
• गॅरेज, वर्कशॉप्स, कुरीअर, सर्व प्रकारची माल वाहतूक,
• कोव्हिड लसीकरण
5. औरंगाबादमध्ये अंशतः लॉकडाऊन
कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येत्या ११ मार्चपासून औरंगाबादमध्ये अंशत: लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा रविवारी करण्यात आली. ११ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे.
शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, राजकीय सभा, धार्मिक सभा, क्रीडा स्पर्धा याकाळात बंद ठेवण्यात येणार आहेत.
तसंच या कालावधीमध्ये आठवडी बाजारही बंद ठेवण्यात येणार आहेत.
दरम्यान, शनिवार रविवार पूर्ण लॉकडाऊन असलं तरी या कालावधीत वैद्यकीय सेवा, माध्यमांची कार्यालये, दुध विक्री, भाजीपाला आणि फळविक्री सुरू ठेवण्यात येणार आहे.
"गर्दी टाळता येईल आणि अनावश्यक गर्दी होऊ नये, कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या वेगानं वाढतोय त्याला आळा घालता येईल अशा प्रकारचा निर्णय स्थानिक प्रशासनानं घेतला आहे. संपूर्ण शहरात मास्कचा वापर केला गेला पाहिजे, सुरक्षित अंतरही ठेवलं पाहिजे या सर्व बाबींकडे लक्ष देण्यात आलं आहे. सर्वांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला पाहिजे," असं मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
6. नाशिकमध्ये कडक निर्बंध
नाशिक जिल्ह्यातही कडक निर्बंध लादण्यात आलेत. नाशिक आणि मालेगावमध्ये सर्व शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस पूर्णपणे बंद राहणार आहेत, अशी माहिती नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

फोटो स्रोत, ANI
10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना पालकांची परवानगी घेऊन प्रवेश देण्यात येणार आहे. तसंच नाशिक, निफाड, मालेगाव, नांदगावमधील सर्व शाळा बंद राहणार आहेत.
शहरातील आणि जिल्ह्यातील दुकानं सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. विशेष म्हणजे 15 तारखेनंतर शहरात कोणतीही लग्न समारंभ होणार नाहीत.
बार, खाद्यपदार्थांची दुकानं अशी ठिकाणं 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते रात्री 9 सुरू ठेवण्यास परवानगी आहे.
7. परभणीमध्ये 2 दिवसांचा लॉकडाऊन
परभणीमध्ये पालक मंत्री नवाब मलिक यांनी जिल्ह्यात आज (शुक्रनवार) रात्री बारा वाजल्यापासून सोमवारी म्हणजेच 15 मार्चपर्यंत दोन दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.
परभणीकरांनी कोरोनावर मात करण्यासाठी नियमाचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन पालकमंत्र्यांनी केलंय. जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर नाईलाजाने कडक लॉकडाऊन करण्याची वेळ येणार येईल, असंही पालकमंत्र्यांनी म्हटलंय.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)









