कोरोना लॉकडाऊन : नागपूर शहरात 15 मार्चपासून 6 दिवसांचा कडक लॉकडाऊन

फोटो स्रोत, ANI
- Author, प्रवीण मुधोळकर
- Role, बीबीसी मराठीसाठी
नागपूर शहरातली कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने शहरात 15 ते 21 मार्च कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय.
नागपूर शहराच्या पोलीस आयुक्तालयाच्या सीमेत कडक निर्बंधांसह हा लॉकडाऊन असेल.
नागपूर शहरातली कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10 मार्च रोजी 1700 पर्यंत पोहोचली. गेल्या तीन आठवड्यांपासून नागपूर शहरात शनिवार आणि रविवारी ऐच्छिक लॉकडाऊनही पाळण्यात येत आहे.
पण या वीकेंड लॉकडाऊनला लोकांनी गांभीर्याने घेत नसल्याने कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचं पालकमंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं.
काय काय बंद राहणार?
- नागपूर शहरातील शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था ( कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था) आणि इतर तत्सम संस्था सुरु ठेवण्यास प्रतिबंध. पण नलाईन क्लासेस सुरु ठेवता येतील.
- राष्ट्रीय/राज्य/विद्यापीठ/शासन स्तरावरील पूर्वनियोजित परीक्षा कोव्हिड विषयक सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून घेता येतील.
- नागपूर शहरातील शासन स्तरावरील पूर्वनियोजित परिक्षा कोव्हिड विषयक सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करून घेता येतील.
- नागपूर शहर सीमेत कोणत्याही धार्मिक सभा, राजकीय सभा, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम यावर प्रतिबंध.
- नागपूर शहरातील संबंधित सभागृह/मंगल कार्यालयं/लॉन याठिकाणी होणारे लग्न समारंभाचे आयोजनास प्रतिबंध.
- धार्मिक/पूजाअर्चनेची स्थळं नागरिकांना दर्शनासाठी बंद राहतील. सदर स्थळाची नियमित पूजा, अर्चना/ साफसफाई विषयक दैनंदिन कामं जास्तीत जास्त 5 व्यक्तीच्या उपस्थितीच्या मर्यादेत करण्यास मुभा राहील.
- नागपूर शहरातील सर्व आठवडी बाजार बंद राहतील.
- रेस्टॉरंट/ हॉटेल/खाद्यगृह मधील प्रत्यक्ष डायनिंग सुविधा बंद राहील, मात्र होम डिलीव्हरी ठेवण्याची मुभा राहील आणि त्यासाठी किचन रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहू शकतील.
- तरणतलाव (Swimming Pools) बंद राहतील.
- सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन बंद राहतील.
- सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालय (अत्यावश्यक सेवेशी संबंधित कार्यालय वगळून) त्यांच्या एकूण क्षमतेच्या केवळ 25 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीने सुरू ठेवता येतील.
- सर्व खाजगी आस्थापने/कार्यालय पूर्णपणे बंद राहतील. (आर्थिक लेखाविषयक सेवेशी संबंधित वगळून)
- मॉल्स, चित्रपटगृहे/नाट्यगृहे बंद राहतील.
- दुकाने, मार्केट बंद राहतील.
- नागपूर शहरातील उद्याने नागरिकांसाठी बंद राहतील.
- व्यायामशाळा / जिम बंद राहतील.
काय काय सुरु राहणार?
- वैद्यकीय सेवा, मेडिकल स्टोअर्स
- वृत्तपत्र, मीडीया संदर्भातील सेवा (ओळखपत्राच्या आधारे)
- दूध विक्री आणि पुरवठा.
- भाजीपाला विक्री आणि पुरवठा.
- फळे विक्री आणि पुरवठा.
- पेट्रोल पंप, गॅस एजन्सी
- सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवा ( 50 टक्के क्षमतेने)
- माल वाहतूक सेवा
- बांधकामं
- उद्योग आणि कारखाने
- किराणा दुकाने (फक्त Stand Alone स्वरुपातील)
- चिकन, मटन, अंडी आणि मास दुकाने
- पशू खाद्य दुकाने
- बँक आणि पोस्ट सेवा
- कोरोना विषयक लसीकरण सेवा आणि चाचणी केंद्र
- ऑप्टीकल्स दुकानं
- खते आणि बी-बियाणं दुकाने (फक्त Stand Alone स्वरुपातील)
- निवासाकरिता असलेले हॉटेल/लॉजेस (50 टक्के क्षमतेने)
एका ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येऊ नये. (अत्यावश्यक सेवेशी संबंधित ठिकाणे/सेवा वगळून) अशी माहिती महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिला आहे.
या सहा दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान शहरातील अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय सेवा पूर्णपणे सुरु राहतील.
या लॉकडाऊन काळात पोलिस आयुक्तालयाच्या सीमेतील खासगी कार्यालये बंद राहतील, तर उद्योग सुरू राहतील. सरकारी कार्यालयांमध्ये 25 टक्के उपस्थितीतच कामकाज चालवलं जाईल.
मार्च महिना असल्याने ज्या सरकारी कार्यालयामध्ये ऑडिट किंवा अकाऊंट्सच्या कामांसाठी आवश्यकता असणारी कार्यालयं सुरू ठेवली जातील.

फोटो स्रोत, ANI
नागपूरमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोनो नियंत्रणासंदर्भात जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, महानगर पालिका आणि पोलीस विभागाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.
यात पालकमंत्री नितीन राऊत यांनी शहरातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीनंतर बीबीसी मराठीशी बोलताना पालकमंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊन बद्दल अधिक माहिती दिली.
ते म्हणाले, "शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर फिरतांना आढळून आले आहेत. तसंच गृह विलगीकरणात असणाऱ्या नागरिकांकडून सुद्धा नियमांचा भंग होतो. नागपुरात कोव्हिड-19चा पहिला रुग्ण आढळून बरोबर एक वर्ष झाले आहे. पण नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन केलं नसल्याने वर्षभरानंतर शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1700च्या वर गेली आहे.
त्यामुळे आता कडक लॉकडाऊन लावल्याशिवाय कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडली जाणार नाही. त्यामुळे 15 मार्च ते 21 मार्च दरम्यान नागपूर शहरातील पोलीस आयुक्तालयाच्या सीमेतील भागात कडक लॉकडाऊन असेल. शिवाय या दरम्यान कडक संचारबंदीही ठेवली जाईल."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
पण लॉकडाऊन करण्याचा निर्णय अत्यंत वेडेपणाचा असल्याचं भाजपनं म्हटलंय.
भाजप नेते आणि माजी महापौर संदीप जोशी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "केसेस वाढताहेत. त्यामुळे कडक नियम लावणं आवश्यक आहे. पण त्याला कडक लॉकडाऊन हा पर्याय नाही.
जे लोक कोरोनाच्या या संकट काळात नियम पाळत नाहीत त्यांना दंड दुप्पट करा, पाचशेचा हजार करा. पण कडक लॉकडाऊन लावल्याने कोरोनाच्या रुग्णसंख्येत कुठलीही कमतरता येत नाही."
फक्त पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी हेकेखोरपणामुळे हा निर्णय घेतल्याची टीका संदीप जोशी यांनी केली आहे. सर्वसामान्य माणसं, गोरगरिबांसाठी हा लॉकडाऊन अत्यंत दुर्देवी आहे. असा निर्णय लोकांवर लादणे हा शुद्ध मूर्खपणा आहे, असंही संदीप जोशी सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
पण अत्यावश्यक सेवा आणि आरोग्य सेवेला या लॉकडाऊनमुळे बाधा पोहोचेल असं आम्ही कुठल्याही परिस्थितीत काही करणार नाही, असं नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलंय.
"कोव्हिड लसीकरणसुद्धा शहरात मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यामुळे त्यालाही कुठे अडथळा या लॉकडाऊनमुळे येणार नाही. ज्येष्ठ नागरिक जे कोव्हिड लसीकरणासाठी जातील त्यांना आणि त्यांच्यासोबत एकाला अशी परवानगी आहे.
पण विनाकारण शहरात फिरणाऱ्यांना मात्र आम्ही थांबवू आणि त्यांच्यावर कारवाई करू. सध्या आम्हाला नागपूर शहराच्या पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात हा सहा दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश मिळाले आहेत. 15 मार्च पासून ते 21 मार्च पर्यंत या कडक लॉकडाऊनच्या काळात शहरातील सर्व सीमांवर नाकाबंदी लावण्यात येईल. शहरातसुद्धा पूर्णपणे नाकाबंदी करण्यात येईल. आमचं लोकांना आवाहन आहे की लोकांनी विनाकारण बाहेर पडू नये," नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले.
या काळात विविध आस्थापनं, दुकानं आणि ऑफिसेस सुरु राहणार नाहीत याची काळजी नागपूर पोलीस घेणार आहेत. हा कडक लॉकडाऊन पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी आतापासूनच तयारी सुरु केली असल्याचंही पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)









