मिताली राजने रचला इतिहास, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण

फोटो स्रोत, TWITTER @BCCI WOMEN
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने आज इतिहास रचला आहे.
मितालीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या.
अशी कामगिरी करणारी ती जगातील दुसरी तर भारताची पहिलीच क्रिकेटपटू ठरली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांमध्ये एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना लखनऊमध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यात मिताली राजने आपल्या डावादरम्यान या विक्रमाला गवसणी घातली.
पहिली महिला टी-20 कर्णधार
मिताली राज हिच्या नावे याआधीही अनेक विक्रमांची नोंद आहे.
भारताचा महिला क्रिकेट संघ 2006 मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळण्यासाठी उतरला होता. त्यावेळी भारताची कर्णधार मिताली राज हीच होती.
म्हणजेच भारतासाठी पहिली महिला टी-20 कर्णधार होण्याचा रेकॉर्ड मितालीच्या नावावरच कायम असेल.
टी-20 मध्ये दोन हजार धावा बनवणारी एकमेव भारतीय खेळाडू
मिताली राजच्या नावावर भारताकडून महिला टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनवण्याचा रेकॉर्डही आहे.
तिने टी-20 सा दोन हजारपेक्षाही जास्त धावा बनवलेल्या आहेत.
भरतनाट्यम सोडून क्रिकेटची बॅट हाती घेणारी मिताली
क्रिकेट मॅचदरम्यान बॅटिंगची वाट बघताना कुणी पुस्तक वाचत बसलेलं मी बघितलेलं नाही. पण, मिताली पुस्तक वाचत होती.
मितालीच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर तिने कायमच वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं. 10 वर्षांची असताना भरतनाट्यम किंवा क्रिकेट यापैकी एकाची निवड करायची वेळ आली त्यावेळी तिने क्रिकेटची निवड केली.
वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी मितालीने 26 जून 1999 साली आयरलँडविरोधातल्या सामन्यात वन-डेमध्ये डेब्यू केलं होतं. त्या सामन्यातल्या आपल्या पहिल्याच डावात तिने नाबाद 144 धावा केल्या होत्या. अवघ्या दोनच वर्षात 2002 साली तिची कसोटी संघातही निवड झाली.
19 व्या वर्षी इंग्लंडविरोधातल्या सीरिजमध्ये मितालीने दमदार 214 धावा केल्या. कसोटी सामन्यातला हा तिचा वैयक्तिक सर्वोत्तम स्कोर आहे.
ऑस्ट्रेलियाविरोधाच्या सामन्यापूर्वी मितालीने 182 वन-डे सामन्यांमध्ये 51.37 च्या रेटने बॅटिंग केली होती. ती अधून-मधून बॉलिंगही करते. तिने आतापर्यंत 8 विकेट्स घेतल्या आहेत.
मितालीने आजवर 5 वर्ल्ड कप खेळलेत. 2005 च्या वर्ल्ड कपमध्ये तिने पहिल्यांदा भारतीय संघाचं नेतृत्त्व केलं होतं. त्यावेळी भारत उपविजेता ठरला होता.
गेल्या अनेक मुलाखतींमध्ये हा वर्ल्ड कप आपला शेवटचा असेल, असं स्वतः मितालीने म्हटलं आहे.
3 डिसेंबर 1982 रोजी जन्मलेली मिताली राज आज इथवर पोहोचली. मात्र, हा मार्ग खाच-खळग्यांनी भरलेला होता.
"कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मी आणि माझी मैत्रीण आमची किट घेऊन मैदानावर जायचो त्यावेळी लोकांना वाटायचं या हॉकी खेळत असतील. कारण त्यावेळी मुलींची क्रिकेट टीम असेल, असा विचारच त्यांनी कधी केला नव्हता," असं मितालीने एका मुलाखतीत सांगितलं होतं. दुसरीकडे घरी नातेवाईक हिचं लग्न कधी करणार म्हणून सारखी विचारपूस करायचे.
महिला क्रिकेटविषयी मितालीला काय वाटतं याचा अंदाज तिने एका पत्रकाराच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरातून बांधता येतो.
काही दिवसांपूर्वी एका पत्रकाराने मितालीला तुमचा सर्वात आवडता पुरूष क्रिकेटर कोणता, असा प्रश्न विचारला होता. त्यावर मितालीने ताबडतोब उत्तर दिलं, "तुम्ही कधी एखाद्या पुरूष क्रिकेटरला तुमची आवडती महिला क्रिकेटर कोण, असा प्रश्न विचारला आहे का?"
आणखी एक, प्रेक्षकांनी मितालीला टिव्हीवर पहिल्यांदाच बॅटिंगच्या आधी पुस्तक वाचताना बघितलं असलं तरी तिला ओळखणारे सांगतात की प्रत्येक मॅचममध्ये बॅटिगआधी पुस्तक वाचते. फरक फक्त एवढाच की ती किंडलवर पुस्तक वाचायची. मात्र, वर्ल्ड कपमध्ये किंडल घेऊन जायला परवानगी नसल्याने तिने फिल्डिंग कोचकडून पुस्तक उधार घेतलं होतं.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









