अयोध्या: राम मंदिर देणगी अभियानातून 2100 कोटी रुपये जमा #5 मोठ्या बातम्या

फोटो स्रोत, AFP
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.
1. राम मंदिरासाठी देणगी अभियानातून 2100 कोटी जमा
अयोध्येतील राम मंदिरासाठी देश विदेशातून देणगी गोळा करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संबंधित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी फिरून मंदिरासाठी देणगी घेतली. या अभियानातून 2100 कोटी रुपये जमा झाले आहेत.
1100 कोटी जमा होण्याची अपेक्षा होती. पण रामभक्तांची मंदिरासाठी भरभरून मदत केल्याचं दिसतं आहे. 'झी न्यूज'ने ही बातमी दिली आहे.
- 'सरकारने काम केलं असतं तर किमान 30 हजार लोकांचे जीव वाचवता आले असते' - देवेंद्र फडणवीस
- कोरोना लशीमुळे 80 वर्षांवरील व्यक्तींमध्ये तीव्र आजाराची शक्यता 80 टक्क्यांनी कमी होते
- ‘तिच्याशी लग्न करशील का?’ बलात्काराच्या आरोपीला सुप्रीम कोर्टाने विचारलं
- राहुल गांधींच्या पुशअप्समुळे मोदींच्या चाहत्यांसमोर नवा पेच
उर्वरित पैशांमधून संपूर्ण अयोध्या शहराचा विकास करावा, असा सल्ला काही संतांनी दिला आहे. तर तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी सीतामाईच्या नावानं अयोध्येत संस्कृत विद्यापीठ सुरू करावं, असं सुचवलं आहे.
शहरात प्रत्येकाला मोफत दूध देता यावं, यासाठी गोशाळा स्थापन करावी, असंही परमहंस दास यांनी म्हटलं आहे. निर्मोही आखाड्याचे महंत धनेंद्र दास यांनी अयोध्येतल्या अन्य मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी अतिरिक्त निधी वापरला जावा, अशी सूचना केली आहे.
2. दहशतवादाला पोसणं बंद करा, त्यानंतरच परिषदेला या- भारताने पाकला सुनावलं
दहशतवादाला पोसणं बंद करा, त्यानंतरच परिषदेला या असं भारताने संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेत पाकिस्तानला सांगितलं.
आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानचा संयुक्त राष्ट्राच्या फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सने पुन्हा एकदा ग्रे यादीत समावेश केला आहे. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.

मानवी हक्क परिषदेच्या राईट टू रिप्लाय अंतर्गत भारतानं पाकिस्तानला सुनावलं. शेजारी देशांनी दहशतवादाला पोसणं आणि आपल्या देशातील अल्पसंख्याकांना छळणं बंद करावं, त्यानंतरच परिषदेला यावं अशी टीका भारताने केली आहे.
पाकिस्तानकडून संयुक्त राष्ट्र संघाच्या व्यासपीठाचा वापर अप्रपाचारासाठी केला जातो असं भारताच्या स्थायी मिशनचे सचिव पवनकुमार बढे म्हणाले.
3. समुद्री क्षेत्रात 6 लाख कोटी गुंतवणार-मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी बंदर क्षेत्रात 82 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आणण्यासाठी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याची योजना बनवली आहे.
ते म्हणाले की, "2035 पर्यंत भारतातील सागरी क्षेत्रात 82 अब्ज डॉलर किंवा सहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे. सागरी नौकानयन क्षेत्रात स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढविण्यात येणार आहे. जलवाहिन्यांचा विकास करण्यात येणार असून, समुद्रकिनाऱ्यावर सेवा सुरू केल्या जातील आणि किनाऱ्यावरील पर्यटनस्थळ म्हणून लाईटहाऊस विकसित करण्यात येतील," असेही ते म्हणाले. 'टीव्ही9मराठी'ने ही बातमी दिली आहे.
बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने 400 गुंतवणुकीच्या प्रकल्पांची यादी तयार केली असून, त्यामध्ये 31 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 2.25 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करता येईल.
भारताच्या किनारी सीमेवर 189 लाइटहाऊस आहेत, त्यापैकी 78 लाइटहाऊस मोठी पर्यटन स्थळे म्हणून विकसित करण्याचे नियोजन आहे.
4. वीजयंत्रणेतील बिघाड मानवी चुकीमुळे
गेल्या वर्षी मुंबईत वीजपुरवठा सायबर हल्ल्यांमुळे खंडित झाला नव्हता, तर मानवी चुकीमुळे हा प्रकार घडला, असे स्पष्टीकरण केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी मंगळवारी केले. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
गतवर्षी सायबर हल्ले झाले हे खरे, पण चीनच्या या हल्ल्यांमुळे मुंबईतील वीजपुरवठा खंडित झाल्याचे कुठलेही पुरावे नाहीत, असे त्यांनी सांगितले.

फोटो स्रोत, Getty Images
वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, पाकिस्तान किंवा चीन यांनी सायबर हल्ले केल्याचे पुरावे नाहीत. काही लोक या वीज खंडित होण्याच्या घटनेमागे काही विशिष्ट गट असल्याचे सांगत असले तरी तसे कुठलेही पुरावे नाहीत. चीननेही या आरोपाचा इन्कार केला आहे.
भारतात उत्तर व दक्षिण भागातील वीज वितरण केंद्रांवर सायबर हल्ल्याचे काही प्रयत्न झाले पण ते यशस्वी झाले नव्हते. कारण कुठलेही 'मालवेअर' संचालन प्रणालीपर्यंत पोहोचू शकत नाही, असे सिंह म्हणाले.
दरम्यान राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंगळवारी सांगितले की, मुंबईतील वीजपुरवठा गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये खंडित झाल्याबाबतचा अहवाल बुधवारी विधानसभेत मांडणार आहोत.
5. गोध्रात एमआयएमने 8 पैकी 7 जागा जिंकल्या
गुजरातमध्ये नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितांच्या झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपने वर्चस्व राखलं असलं तरी गोध्रा इथं एमआयएमने 8 पैकी 7 जागांवर विजय मिळवला आहे. 'आजतक'ने ही बातमी दिली आहे.
गोध्रा येथे 2000च्या दशकात झालेल्या दंगलीने देशाचं राजकारण ढवळून निघालं होतं. याच गोध्रामध्ये असादुद्दीन औवेसी यांच्या एमआयएम पक्षाने बहुतांश जागांवर यश मिळवलं आहे.
भाजपने नगरपालिका निवडणुकांमध्ये 1,967 तर जिल्हा पंचायत निवडणुकांमध्ये 735 ठिकाणी विजय मिळवला.

हे वाचलंत का?
- अर्णब गोस्वामी यांना हक्कभंग समिती समोर हजर राहण्यासाठी समन्स, काय आहे प्रकरण?
- सचिन-लता मंगेशकरांना भाजपने ट्वीट करायला सांगितले? फडणवीस म्हणतात...
- 'सरकारने काम केलं असतं तर किमान 30 हजार लोकांचे जीव वाचवता आले असते' - देवेंद्र फडणवीस
- अयोध्येच्या कचाट्यात अशी सापडली काँग्रेस
- राम मंदिरासाठी 27 वर्षांपूर्वी बाबरी मशिदीबरोबरच काय-काय तुटलं होतं?
- राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना सर्व श्रेय देण्यामागची कारणं...
- राम मंदिर : 'अयोध्येतील मुस्लीम साशंक आहेत, भयभीत आहेत'
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )








