राम मंदिर अयोध्या: राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना सर्व श्रेय देण्यामागची कारणं...

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राज ठाकरे
    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी

अयोध्या राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यापासून शिवसेनेला पूर्णपणे दूर ठेवण्यात भारतीय जनता पक्षाला यश आल्याचं दिसून येतंय. इतकंच नाही तर राम मंदिराच्या स्थापनेचे श्रेयही भाजपने एकहाती घेतल्याचं दिसतंय.

शिवसेनेचं मुखपत्र सामानातून याच मुद्यावर भाजपवर काडाडून टीका करण्यात आलीय. मंदिरांच्या श्रेयावरून शिवसेनेनं हा सोहळा व्यक्ती केंद्रीत केल्याचा आरोप केलाय.

'पंतप्रधान मोदी आज राम मंदिरासाठी पहिली कुदळ मारतील. त्या मातीत कारसेवकांच्या त्यागाचा गंध आहे हे विसरणारे रामद्रोहीच ठरतील. बाबरीच्या पतनाने संघर्ष संपला. राममंदिराच्या भूमिपूजनाने या प्रश्नाचे राजकारणही कायमचे संपावं. श्रीरामाचीही तीच इच्छा असेल!' असं सामनात लिहिण्यात आलंय.

शिवसेनेकडून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली असली तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मात्र नरेंद्र मोदींचं कौतुक करण्यात आलं आहे.

ते म्हणतात, 'स्वतंत्र भारतातील जे काही मोजके मंगलमय क्षण आहे, त्यापैकी हा एक आहे. यासाठी न्यायालयीन लढाई असो वा सर्वसहमतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी नरेंद्र मोदी ह्यांच्या सरकारने जे प्रयत्न केलेत ते वाखाणण्यासारखे आहेत. त्यासाठी त्यांचे अभिनंदन.'

राज ठाकरे यांच्या या भूमिकेविषयी बोलताना 'ठाकरे विरुद्ध ठाकरे' या पुस्तकाचे लेखक आणि पत्रकार धवल कुलकर्णी सांगतात, "जेव्हा मनसेचा जन्म झाला तेव्हा त्याचा वापर हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेना आणि भाजपचे पाय खेचण्यासाठी करण्यात आला होता. आता भाजप मनसेचा वापर शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी करत आहे."

महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती सध्या अस्थिर आहे. परस्पर विरोधी विचारधार असूनही तीन पक्ष एकत्र सत्तेत आहेत. तर दुसऱ्या बाजूला सर्वाधिक मताधिक्य असलेला भाजप सत्तेबाहेर आहे. याच परिस्थितीत मनसे आपले अस्तित्व चाचपडून पाहते आहे का, असाही प्रश्न आहे.

राम मंदिर

फोटो स्रोत, twitter

उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री पदावर येणं हे सर्वांसाठी अनपेक्षित होते. " पण आता उद्धव यांच्यासाठी राज ठाकरे, नारायण राणे हे विषय संपलेत. पण राज ठाकरेंसाठी उद्धव ठाकरे हा विषय संपलेला नसावा," असंच राज यांच्या या भूमिकेतून दिसून येत असल्याचं विश्लेषण धवल करतात.

याबाबत ज्येष्ठ पत्रकार वैभव पुरंदरे सांगतात, "राम मंदिरावरबन देशाचा कल राज ठाकरे यांनी ओळखला आहे. त्यामुळे शिवसेनेपासून नाराज झालेली आणि भाजपला मत न देणारी वोट बँक त्यांच्याकडे वळेल का, हे ते पाहत असावेत."

यामागे राजकीय समीकरणं तर आहेतच. पण यामागे दोन भावांमधलं प्रत्यक्षातलं नातंसुद्धा कारणीभूत असावं असं धवल यांना वाटतं.

ते सांगतात, "राज ठाकरे मध्यंतरी एका मुलाखतीत म्हणाले होते की उद्दधव ठाकरे मुख्यमंत्री बनण्यासाठी पात्र नाहीत. असं उघडपणे ते स्पष्ट बोलल्यानंतर आजही शंका उपस्थित होते की राज ठाकरेंना शिवसेनेतून बाहेर पडावं लागल्याची खदखद आजही त्यांच्या मनात असावी."

पण वैभव यांना मात्र असं वाटत नाही. "मनसेच्या या हालचाली पूर्णपणे राजकीय असून त्यामध्ये वैयक्तिक द्वेष असेल असे मला वाटत नाही," असं ते सांगतात.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

मनसे शिवसेनेचं 'स्थान' घेणार?

महाराष्ट्र एकमेव असं राज्य आहे जिथं दोन हिंदुत्ववादी पक्षांना जनाधार आहे. पण कट्टर हिंदुत्ववादी असलेली शिवसेना काँग्रेससोबत गेल्यानंतर मनसेने आता हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारली आहे.

जानेवारी 2020मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्षाच्या अधिवेशनात हिंदुत्वाचा नारा दिला. पक्ष स्थापन झाल्यानंतर 13 वर्षांनंतर राज ठाकरे यांनी पक्षाचं अधिवेशन घेण्याचं निश्चित केलं आणि मनसेचा बहुरंगी झेंडाही बदलला.

मनसेच्या अधिवेशनात सर्वांत महत्त्वाचा बदल दिसून आला तो म्हणजे सावरकरांच्या प्रतिमेला व्यासपीठावर मिळालेलं स्थान. शिवसेनेने आजवर सावरकरांच्या बाजूने भूमिका मांडली असली तरी आता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकार स्थापन झाल्यानंतर स्पष्ट भूमिका घेण्यात शिवसेनेची थोडी अडचण झाल्याचं दिसतं.

1980 च्या दशकात शिवसेनेनेही हा यू टर्न घेतला होता. मराठीचा मुद्दा बाजूला सारत हिंदुत्ववादीची भूमिका स्विकारली होती.

राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे

"मनसेसाठी हिंदुत्ववादी विचारसरणी स्वीकारणं सोपं नसेल. त्यासाठी त्यांना मराठी माणसाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करून हिंदी भाषिकांना आपलेसे करावं लागेल," असं धवल सांगतात.

शेतकऱ्यांचे प्रश्न, शिक्षण, रोजगार, पाणी टंचाई, नागरी समस्या या जनतेच्या मुळ समस्यावर मेहनत न घेता केवळ संधी आहे म्हणून मनसे हिंदुत्वाकडे गेली असेल तर त्याचा फारसा उपयोग होईल का, असाही प्रश्न आहे.

पण कळीचा मुद्दा हा आहे की हे हिंदुत्व स्वीकारून मनसे भाजप बरोबर जाईल का?

वैभव पुरंदरे यांच्यामते "मनसेचा हा प्रयत्न तात्पुरता आहे. मनसेकडे हारण्यासाठी काहीही नाही. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात का होईना ते भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न करू शकतात."

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मात्र बीबीसी मराठीशी बोलताना हे सर्व मुद्दे खोडून काढले आहेत. "हिंदुत्ववादी असणं म्हणजे शिवसेना किंवा भाजपसोबत जाणं असं होत नाही. आमचा पक्षा वेगळा आहे आणि त्यासाठी आम्ही आमची भूमिकाही जाहीर केलीय," असं ते म्हणतात.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे

मनसे भाजपसोबत जाणार?

'राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो', अशा आशयाची विधानं बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई या मनसेच्या नेत्यांनी जानेवारी महिन्यात केली होती. तेव्हाच मनसे भाजपसोबत जाणार का, या चर्चेला उधाण आलं होतं.

महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली नव्हती तोपर्यंत देवेंद्र फडणवीस आणि राज ठेकरेंच्या भेटीगाठी सुरू झाल्या होत्या. त्याचवेळी नाशिक महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत मनसेनं भाजपच्या उमेदवाराला मतदान केलं होतं.

लोकसभा निवडणुकी वेळेस मोदी-शाहांविरोधात प्रचार करून राज ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष मदतच केली होती. या काळात शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यात वाढलेली जवळीक हाही चर्चेचा मुद्दा ठरला होता.

"पण आता अयोध्येप्रकरणी सर्व श्रेय नरेंद्र मोदींना दिल्याने राज ठाकरे यांनी केंद्रातल्या भाजपला जवळ करण्यासाठी प्रयत्न केल्याची शक्यता नाकारता येत नाही," असं धवल सांगतात.

याविषयी बोलताना मनसे नेते संदीप देशपांडे सांगतात, "भाजपसोबत जाण्याबाबत सध्यातरी काही प्रस्ताव नाही. जेव्हा अशी वेळ येईल तेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे निर्णय घेतील."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)