जितेंद्र आव्हाड : 'अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है' #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. 'अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है' - जितेंद्र आव्हाडांचं विधान
'अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है, इसलिए कब्रस्तान बना,' असं वक्तव्यं राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. ते मुंब्रा येथे एका कार्यक्रमात बोलत होते. टीव्ही 9 मराठीनं हे वृत्त दिले आहे.
कोरोनाचे संकट अल्लाहला 2011 सालीच दिसले म्हणून 2019 मध्ये कब्रस्तान बनले, असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं. त्यांचा यासंदर्भातील व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
आपल्या या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, "भविष्यात संकट येणार आहे याची देवाला कल्पना होती या अर्थाने मी ते विधान केलं. मुंब्र्याची लोकसंख्या साडेचार लाख एवढी आहे. त्याठिकाणी 50 वर्ष जुनं एकमेव कब्रस्तान होतं.
एक मृतदेह पुरल्यानंतर त्याचे विघटन होण्यासाठी चाळीस दिवस लागतात. कोरोना काळात दिवसाला 30-40 रुग्णांचा मृत्यू होत असताना चार दिवसांपूर्वी दफन केलेला मृतदेह बाहेर काढावा लागत होता. यावेळी मी 2019 साली पूर्ण झालेल्या कब्रस्तानचा उल्लेख केला."
2. महाराष्ट्रात लवकरच पन्नाशीतील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात?
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्यात वाढ होत असताना लसीकरणाचा वेग वाढवण्याची सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारला केली आहे. तसंच पुढील टप्प्यात पन्नाशीपुढील नागरिकांच्या लसीकरणाची मोहीम हाती घेण्याची गरज असल्याचंही केंद्र सरकारने म्हटलं आहे. लोकसत्ताने हे वृत्त दिले आहे.

फोटो स्रोत, Getty Images
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्य सरकारला हे पत्र लिहिलं आहे. त्यानुसार आठवड्यातील लसीकरणाचे दिवस वाढवण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. आठवड्यातले किमान चार दिवस लसीकरण होणं अपेक्षित आहे.
मार्च 2021 पासून सहव्याधी असलेल्या पन्नाशीतील नागरिकांना लस द्यावी लागणार असल्यंही पत्रात म्हटलं आहे. मार्चपासून लसीकरणाची व्यापक व्यवस्था करण्याची गरज असल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे.
3. सोनिया गांधीचे पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींसंदर्भात पत्र लिहिले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींची वाढ 'ऐतिहासिक आणि अव्यवहारिक' असल्याचं सोनिया गांधींनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. लोकमतने हे वृत्त दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे पेट्रोल, डिझेलच्या किमतींमध्ये एवढी वाढ झाली असून किमती कमी करण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
तसंच इंधन दरवाढीमुळे देशातील प्रत्येक नागरिकाला त्रास होत असल्याचंही त्या म्हणाल्या. लोकांच्या त्रासातून फायदा कमवत असल्याचा आरोपही सोनिया गांधी यांनी केला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
इंधन दरवाढीला UPA सरकार जबाबदार असल्याचं वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. यावर भाष्य करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पत्राद्वारे मोदी सरकावर टीका केली होती. गेल्या सहा वर्षांत तुम्ही बदल का केले नाहीत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.
4. सिंधुदुर्गात परवानगीशिवाय वीज पुरवठा खंडित होणार नाही?
एकाही ग्राहकाचा वीजपुरवठा मला सांगितल्याशिवाय खंडित करायचा नाही, अशा सूचना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत. वीज बिलासंदर्भात दिलेल्या प्रस्तावानुसार सर्वांना हफ्ते बांधून द्या असंही उदय सामंत म्हणाले. सकाळने हे वृत्त दिले आहे.

फोटो स्रोत, UDAY SAMANT
एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात आकारण्यात आलेले वीज बिल वादात असल्याने ऑक्टोबरपासून वीज बिल घ्या तसंच लॉकडॉऊन काळातील वीज बिल भरण्यासाठी हफ्ते बांधून द्या, अशी मागणी व्यापारी महासंघाकडून करण्यात आली होती.
दुसऱ्या बाजूला महावितरण व्यवस्थापनाकडून वीज बिल न भरलेल्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे. वीज पुरवठा खंडित न करता थकीत बिल भरण्यासाठी वेळ मिळावा अशीही सूचना महावितरणाकडे करण्यात आली आहे.
5. पुण्यातील टिकटॉक स्टार समीर गायकवाडची आत्महत्या
पुण्यातील टिकटॉक स्टार समीर गायकवाडने (22) आत्महत्या केलीय. पुण्यातील राहत्या घरी त्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. न्यूज 18 लोकमतने हे वृत्त दिले आहे.
टिकटॉकच्या माध्यमातून आपल्या वेगळ्या शैलीत व्हीडिओ बनवत असल्याने समीर अल्पावधीतच लोकप्रीय झाला होता. तरुणांमध्ये त्याची क्रेझ होती. त्याचे अनेक व्हीडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत.
समीर गायकवाड पुण्यातील वाडीया महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)









