नाना पटोले : नरेंद्र मोदींचा चार्ज काढण्यासाठी मी प्रदेशाध्यक्षपदाचा चार्ज घेतला - #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, facebook
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. नरेंद्र मोदींचा चार्ज काढण्यासाठी मी प्रदेशाध्यक्षपदाचा चार्ज घेतला - नाना पटोले
"आतापर्यंत मॅच फिक्सिंगचा काळ खूप चालला. पण, आता मात्र सर्वसामान्यांना न्याय मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चार्ज काढण्यासाठी मी प्रदेशाध्यक्षपदाचा चार्ज घेतला आहे," असा टोला महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला लगावला. ते नागपुरात एका सभेत बोलत होते.
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून नाना पटोले चांगलेच आक्रमक झाले आहेत. ते केंद्र सरकार तसंच भाजपवर वेळोवेळी सडकून टीका करताना दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी बॉलिवूड कलाकारांवरसुद्धा निशाणा साधला होता.
दरम्यान, नाना पटोले यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही जोरदार टीका केली. "नितीन गडकरी यांनी एक बंदर स्वस्तात विकलं. सध्या देशात फास्टटॅग सुरू करण्यात आलं आहे. या प्रक्रियेतही मोठा भ्रष्टाचार आहे. या विषयावरही आपण दोन-तीन दिवसांत बोलू," असंही नाना पटोले म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.
2. औरंगाबादमध्ये लस घेतलेले 2 डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह
लस घेऊनसुद्धा कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा प्रकार औरंगाबादमध्ये समोर आला आहे. कोरोनाची लागण झालेल्या दोन्ही व्यक्ती डॉक्टर असून त्यांनी कोरोना लशीचा पहिला डोस घेतला होता.

फोटो स्रोत, Getty Images
या दोन्ही डॉक्टरांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहे. लसीचे दोन डोस घेतल्यानंतर चौदा दिवसांनी शरिरात अँटीबॉडी तयार होतात, त्यामुळे त्यांना ही लागण झाल्याचं महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितलं.
पहिल्या डोसने लसीपासून संपूर्ण संरक्षण मिळत नाही. दुसऱ्या डोसनंतर 14 दिवसांनीच आपण सुरक्षित मानले जातो. त्यामुळे लस घेऊनही कोरोना झाला किंवा लस लागू पडली नाही, असं म्हणणं चुकीचं होईल, असं डॉ. पाडळकर म्हणाल्या. ही बातमी ई-सकाळने दिली आहे.
3. सनी देओलच्या मतदारसंघात भाजप उमेदवाराला फक्त 9 मतं
तीन कृषि कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या कित्येक दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. याचा मोठा फटका भारतीय जनता पक्षाला बसल्याचं पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसून आलं.

फोटो स्रोत, Getty Images
याठिकाणी भाजप खासदार सनी देओल याच्या मतदारसंघातील एका उमेदवारावला फक्त 9 मतं मिळाली.
गुरुदासपूर नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 12 मध्ये भाजपच्या उमेदवार किरण कौर यांना फक्त 9 मतं मिळाली. पण यानंतर किरण कौर संतप्त झाल्या असून त्यांनी आपलं मतदानयंत्र बदलल्याचा आरोप केला आहे.
आपल्या घरातच 15-20 मतदार असून मला इतकी कमी मतं कशी मिळाली, असा प्रश्न कौर यांनी विचारला आहे. ही बातमी आजतकने दिली आहे.
4. वीजबिलात 100 युनिट माफी देणार, असं कधी म्हटलंच नव्हतं - नितीन राऊत
वीजबिलात 100 युनिट माफी देणार, असं आपण कधी सांगितलंच नव्हतं. राज्य सरकारने 100 युनिट वीज बिल माफीबाबत एक समिती बनवल्याचं आपण सांगितलं, पण त्या समितीची बैठक झालीच नाही. त्यामुळे त्याचं पुढे काहीच झालं नाही, असं वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे. नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना ऊर्जामंत्री राऊत यांनी वरील वक्तव्य केलं.

फोटो स्रोत, Getty Images
शिवाय, चालू वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांना 15 दिवसांची नोटीस देऊन वीज खंडित केली जाणार असल्याची माहिती ऊर्जामंत्र्यांनी दिली आहे.
भाजपचं वीज बिल आंदोलन फसवं आहे. इंधन दरवाढ, धान्य दरवाढ होत आहे. अशावेळी 10 महिने वीज बिल भरलं नाही, तर महावितरण जगणार कशी? असा सवाल राऊत यांनी विचारला.
वीजनिर्मितीसाठी पैसे लागतात. त्यामुळे जनतेनं वीज बिल भरावं. तुमचं वीज बिल भरणं म्हणजे महावितरणसाठी जगण्या-मरण्याचा प्रश्न असल्याचंही राऊत म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.
5. चंद्रशेखर आझाद यांचा टाईम मासिकाच्या उदयोन्मुख नेत्यांमध्ये समावेश
भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांचा टाईम मासिकाच्या जगभरातील 100 उदयोन्मुख नेत्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. या यादीत आझाद हे एकमेव भारतीय नेते आहेत. त्याशिवाय पाच भारतीय वंशाच्या नागरिकांनाही यामध्ये स्थान देण्यात आलं आहे.
ट्विटरच्या वकील विजया गड्डे, इंग्लंडचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांचाही यामध्ये समावेश आहे, हे विशेष.
या यादीतील प्रत्येक व्यक्ती इतिहास बनवण्यासाठी सज्ज आहे. तर काहींनी आधीच इतिहास बनवला आहे, अशी प्रतिक्रिया टाईम 100 चे संपादकीय संचालक डॅन मॅकसाई यांनी यावेळी दिली. ही बातमी लोकमतने दिली आहे.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









