कोरोना वाढतोयः मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना व्हायरस पुन्हा हातपाय पसरतोय, काळजी घ्या

फोटो स्रोत, Getty Images
कोरोना व्हायरसच्या प्रसार गेल्या काही दिवसांपासून मंदावला असतानाच अचानक कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे.
मुंबईत 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांना ठराविक वेळेत लोकल प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. यानंतर पहिल्याच आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याचं दिसून येत आहे.
विदर्भात अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांच्या आकड्यात अचानक वाढ आढळून आली आहे. पण इतर ठिकाणी आकडा स्थिर असल्याचं दिसतं.
मुंबईत चढता आलेख
1 फेब्रुवारी रोजी मुंबईत फक्त 328 नवे रुग्ण आढळून आले होते. पण 2 फेब्रुवारीला 334 तर 3 फेब्रुवारी रोजी 503 नवे रुग्ण सापडले. 10 फेब्रुवारी रोजीही 558 नवे रुग्ण आढळले. अशा प्रकारे गेल्या 10 दिवसांत 4237 रुग्ण सापडले असून त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकलमध्ये पुन्हा पूर्वीसारखी गर्दी दिसू लागली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्ला, चर्चगेट यांसारख्या स्थानकांवर पुन्हा प्रवाशांची गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग पुन्हा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबईत गेल्या 10 दिवसांत मुंबईत 4237 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे रुग्णसंख्या वाढल्यास रेल्वे प्रवाशांवर निर्बंध आणण्याचे संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहेत.
अमरावतीत कोरोना रुग्ण अचानक वाढले
अमरावती जिल्ह्यात कोरोनाच्या संख्येत अचानक वाढ होऊन 11 फेब्रुवारी या एका दिवसात कोरोना रुग्णांची संख्या 315 वर पोहचली.
राज्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात असतांना अमरावती जिल्ह्यात कोरोनाच्या संख्येत वाढ झाली आहे. दोन दिवसापूर्वी कोरोनाचे 359 रुग्ण तर काल 315 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी अमरावती जिल्ह्यातील ठिकाणे कोरोना साठी हॉटस्पॉट ठरत असल्याचा सांगितलं. यात शहरातील राजापेठ, साईनगर बेलपुरा, कॅम्प, रुक्मिणी नगर दस्तूर नगर रहाटगाव, व ग्रामीण भागातील अचलपूर चांदूर बाजार नांदगाव खंडेश्वर हे ठिकाण आता प्रशासनाने रडारवर घेतलेली आहे.
या भागात प्रशासन घरोघरी जाऊन तपासणी करणार आहेत. दरम्यान, गुरुकुंज मोझरी येथील बाजारपेठ 18 तारखेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात आता त्रिसूत्रीचा पालनासाठी महानगरपालिका व जिल्हा प्रशासन रस्त्यावर उतरणार असल्याचेही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितलं.
खबरदारी म्हणून अमरावती जिल्ह्यातील महाविद्यालये उघडण्याची तारीख लांबणीवर टाकण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता जिल्ह्यातील महाविद्यालये 2 आठवडे उशिराने उघडणार असल्याचं जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
15 फेब्रुवारी पासून राज्यातील महाविद्यालय सुरू करण्याचे शासनाचे आदेश होते. मात्र अमरावती जिल्ह्यात दिवसेंदिवस झपाट्याने कोरोणा रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या दहा दिवसांपासून कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत चाललेली आहे. 10 फेब्रुवारीला 359 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने हा आकडा चिंता आणि प्रशासनाची झोप उडवणारा होता.
जनतेच्या मनातून कोरोनाची भीती शिल्लक नसून सार्वजनिक ठिकाणी मास्क आणि सनेटयाजरचे वापर होताना दिसून येत नाही. प्रशासनाने आता कठोर पाऊले उचलायला सुरवात केली आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापणाऱ्यावर दंडाची कारवाई केली जाणार आहे.
वाढ स्वाभाविक, काळजी घेणं अत्यावश्यक
कोणत्याही संसर्गजन्य आजारामध्ये अशी वाढ होणं स्वाभाविक असतं. ही साथ लगेच संपणार नाही, त्यामुळे येणारा काही काळ आपण कोरोना प्रतिबंधक उपाय करत राहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे, असं मत इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
भोंडवे पुढे सांगतात, "मुंबईत लोकल सुरू केल्यानंतर आकडे वाढताना दिसत आहेत. तसंच महाराष्ट्रात ग्रामीण भागातही पुन्हा अॅक्टिव्हिटी रेट वाढताना दिसत आहे. गेल्या दहा-पंधरा दिवसांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुका झाल्या.
त्यादरम्यान सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं नाही. लग्न समारंभ जोराने होत आहेत. काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या आहेत. आपण प्रतिबंधक उपाय पूर्णपणे विसरून गेलो आहोत. कोरोना अस्तित्वात नसल्याप्रमाणे लोक वागत आहेत. लोकांना कोरोनाचं गांभीर्य राहिलेलं नाही. आपण काळजी घेतली नाही तर त्याचा आपल्यालाच फटका बसणार आहे."
संथ लसीकरण
डॉ. भोंडवे यांनी लसीकरण मोहिमेस लोकांचा प्रतिसाद नसल्याबाबत खंत व्यक्त केली. ते सांगतात, "सामान्य लोकांना अजून लस देण्यास सुरुवात झाली नाही. शिवाय, हवामानातील बदलाचाही व्हायरसच्या वाढीवर परिणाम होत असतो. सध्याचं हवामान विषाणूच्या वाढीसाठी पोषक असं आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्दी, खोकल्याचे रुग्णही वाढले आहेत. त्यापैकी काही जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून येतात."
"कोणत्याही साथीचे आकडे कधीच स्थिरावलेले नसतात. ते कमी जास्त होत असतात. त्यामुळे कोरोना व्हायरसचे रुग्ण संपले तरी पुढे काही महिने या परिस्थितीवर नजर ठेवावी लागेल. न्यूझीलंडमध्ये रुग्ण संपले होते. पण त्यांनी काही महिने आपली सीमा खुली केली नाही. पण तरीसुद्धा काही दिवसांनी त्यांच्या देशात रुग्ण वाढताना दिसत आहेत."
"कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील किमान 70 टक्के लोकांचं लसीकरण होणं गरजेचं आहे. लसीकरणाला लोकांचा प्रतिसाद पाहता हे होण्यास किती वेळ वाट बघावी लागेल, हे सांगता येत नाही. लसीकरणाला आरोग्य क्षेत्रातील लोकांकडूनच चांगला प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे सामान्यांमध्ये लसीचा विश्वास निर्माण करणं कठीण आहे," असं डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)









