नाशिकमध्ये जन्मलेल्या भारताच्या पहिला महिला वकील ज्यांना विष देण्याचा प्रयत्न झाला होता - कॉर्नेलिया सोराबजी

1931 में कोर्नेलिया सोराबजी
फोटो कॅप्शन, 1931 में कोर्नेलिया सोराबजी

त्या भारतातील पहिल्या महिला वकील होत्या. पडदा प्रथा आणि पुरुषांचा अत्याचार सहन करणाऱ्या अनेक महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी मदत केली. यासाठी त्यांनी कोणतीही सरकारी मदत घेतली नाही. अनेकदा आपला जीव धोक्यात घालून ही लढाई त्यांनी एकटीनेच लढली.

त्यांच्यावर अनेक प्राणघातक हल्ले झाले, पण प्रत्येक वेळी त्या वाचल्या आणि आपल्या ध्येयावर ठाम राहिल्या. महिलांना कायदा क्षेत्रात आणण्याचे आणि वकिली करण्याची परवानगी मिळवण्याचे श्रेय त्यांना जाते.

त्यांचे नाव आहे - कॉर्नेलिया सोराबजी

बीबीसी विटनेस हिस्ट्रीचे प्रतिनिधी क्लेअर बोस यांच्याशी इतिहासकार आणि त्यांचे भाचे सर रिचर्ड सोराबजी यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी कॉर्नेलिया यांच्याबाबत अधिक माहिती सांगितली.

कॉर्नेलिया यांनी स्वतंत्र संघर्ष करत आपले ध्येय गाठले आणि अनेक महिलांचे आयुष्यही वाचवले.

कशी झाली सुरुवात?

कॉर्नेलिया यांचा जन्म नोव्हेंबर 1866 मध्ये नाशिक येथे झाला. त्यावेळी भारतात ब्रिटिश राजवट होती. त्यांचे आईवडील पारशी होते पण नंतर त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. त्यांच्यावर ब्रिटिश राजवटीचा प्रभाव होता आणि आपल्या मुलांच्या यशाचा मार्ग इंग्लंडमधूनच जातो असे त्यांना वाटले.

कॉर्नेलिया अभ्यासात प्रचंड हुशार होत्या. त्याकाळी मुंबई विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या त्या पहिल्या महिला विद्यार्थी ठरल्या. युकेमध्ये पुढील शिक्षण घेण्यासाठी त्यांना शिष्यवृत्तीही मिळाली.

ऑक्सफर्ड विद्यापीठात कायद्याचा अभ्यास करणाऱ्याही त्या पहिल्या महिला ठरल्या, पण अंतिम परीक्षेत त्यांना पुरुषांबरोबर बसण्याची परवानगी देण्यात आली नाही. याविरोधात त्यांनी कोर्टात अपीलही केले.

अखेर कॉर्नेलिया यांच्यासाठी विद्यापीठाला आपल्या नियमात बदल करावे लागले आणि त्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी मिळाली. 1892 साली बॅचलर ऑफ सिव्हिल लॉची परीक्षा देणाऱ्या ब्रिटनमधील त्या पहिल्या महिला होत्या.

त्यांच्या एका पत्रात त्या लिहितात, "मला कायद्याचा अभ्यास करायचा होता आणि जेव्हा मी माझी इच्छा पूर्ण केली तेव्हा माझं स्वप्न पूर्ण झालं असं मला वाटलं."

रिचर्ड सोराबजी सांगतात, "त्या बाहेरून खूप शांत दिसायच्या, पण त्यांच्या मनात अनेक गोष्टींबाबत कुतूहल होते. ते जाणून घेण्यासाठी त्या कायम आग्रही असायच्या."

ब्रिटननंतर भारतात संघर्ष

ऑक्सफर्डमधून कायदेशीर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या भारतात परतल्या. त्यांना उदरनिर्वाहासाठी बॅरिस्टर म्हणून काम करायचं होतं पण त्यावेळी भारत आणि ब्रिटनमध्ये महिलांना वकिली करण्याचा अधिकार नव्हता.

कोर्नेलिया सोराबजी

फोटो स्रोत, Richard Sorabji

भारतात अनेक राजघराणी होती. कॉर्नेलिया अनेक राजघराण्यांमध्ये ओळखल्या जायच्या. या कुटुंबांमधील महिलांना पुरुषांच्या आधिपत्याखाली राहावे लागत हे कॉर्नेलिया यांना कळलं. महिलांना त्यांचे स्वतंत्र अधिकार नव्हते.

भारतात तेव्हा पडदा प्रथा होती. महिलांना आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त इतर पुरुषांशी संवाद साधणं लांबच होतं, त्यांच्याकडे पाहण्याचीही परवानगी नव्हती.

कॉर्नेलिया यांना असे आढळून आले की, अनेक महिला पुरुष प्रधान कौटुंबिक अत्याचाराच्या बळी ठरत आहेत. त्यांना कौटुंबिक मालमत्तेतही कोणतेही अधिकार नव्हते.

या विरोधात काहीही बोलल्यास जीवघेणा हल्ला होण्याचा धोका होता. बाहेरच्या लोकांना घरात प्रवेश करण्यास बंदी असल्याने आणि महिलांना बाहेर जाण्यास मनाई असल्यामुळे अशा अत्याचाराच्या घटना पोलिसांपर्यंत, अधिकाऱ्यांपर्यंत पोहचण्याचा मार्ग नव्हता.

अशा परिस्थितीत कॉर्नेलिया यांनी या महिलांना मदत करण्याचा निर्णय घेतला. हिंदू आणि मुस्लिम समाजातील महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला सरकारी कायदेशीर सल्लागार बनवावे, असे आवाहन त्यांनी सरकारला केले. पण सरकारने तत्कालीन नियमांचा हवाला देऊन त्यांची मागणी फेटाळली.

तरीही त्यांनी मागे न हटता संघर्ष करायचे ठरवले. तब्बल 20 वर्षे त्यांनी त्यांनी 600 हून अधिक महिलांना न्याय मिळवून दिला आणि पुरुषांच्या अत्याचारांपासून त्यांची सुटका केली.

राजघराण्यांकडून झालेला विरोध

कोणत्या ना कोणत्या बहाण्याने त्या कुटुंबांमध्ये प्रवेश करत आणि महिलांशी मैत्री करून त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची माहिती मिळवत. यानंतर पोलीस आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने त्या महिलांना न्याय मिळवून देत.

त्यांनी लिहिले, "कधीकधी मला असं वाटतं की मला काहीच माहीत नाही, मला माझा प्रवास मध्येच सोडावा लागेल. पण माझे मित्र मला सातत्याने प्रोत्साहन देतात आणि अखेर मी यशस्वी झाले."

कोर्नेलिया सोराबजी

फोटो स्रोत, Richard Sorabji

रिचर्ड सोराबजी सांगतात, "एकदा एका महिलेच्या सासरच्या मंडळींनी भत्ता नाकारला यासाठी त्या महिलेची मदत करत होत्या. मग, कॉर्नेलियाच्या प्रयत्नांमुळे ते लोक भेटण्यासाठी तयार झाले आणि महिलेला पैसे देण्यासाठीही तयार असल्याचे त्यांनी दर्शवले."

"त्यांनी महिलेसाठी कपडे आणले. पण कॉर्नेलिया यांना संशय आला. त्यांनी कपड्याची माहिती घेतल्यानंतर कळाले पूर्ण कपड्याला विष लावले आहे."

कॉर्नेलिया यांनी अनेक महिलांचा जीव वाचवला. कॉर्नेलिया यांच्यावरही अनेकदा जीवघेणे हल्ले झाले. अनेक राजघराणी त्यांना आपला शत्रू समजू लागली. महिलांनी पुरुषांच्या आधीन असले पाहिजे अशी प्रथा होती आणि कोर्नेलिया महिलांच्या हक्कांसाठी लढत असताना आपल्या संस्कृतीला हानी पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे असे त्यांना वाटायचे.

एकदा एका राजघराण्याकडून कोर्नेलिया यांना जेवणासाठी निमंत्रण आले. त्यांच्या खोलीत सकाळचा नाष्टा पाठवण्यात आला पण त्या अन्नाचा विचित्र वास येत होता. त्यांनी तो नाष्टा केला नाही. त्या अन्नात विष असल्याचे उघड झाले.

जेव्हा न्यायाधीश म्हणाले, "तुम्हाला इंग्रजीव्यतिरिक्त काहीही महिती नाही"

अनेक वर्षांनंतर, 1919 साली ब्रिटनने आपल्या कायद्यात बदल केले. यानुसार महिलांना कायदेशीर क्षेत्रात काम करण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यांना वकील आणि न्यायाधीश म्हणून काम करता येणे शक्य झाले.

यामुळे कॉर्नेलिया यांचे अधिकृत वकील बनण्याचे स्वप्नही पूर्ण झाले आणि त्या भारताच्या पहिल्या महिला वकील बनल्या.

त्या लिहितात, "स्त्रिया सर्व काही करू शकतात हे सांगण्यासाठी मला या गोष्टी करायच्या होत्या. जेणेकरून पुरुषांच्या अत्याचाराने ग्रस्त असलेल्या स्त्रियांना आशेचा किरण दिसेल."

पण वकील म्हणून काम करण्यास सुरुवात केल्यानंतरही त्यांचा मार्ग सोपा नव्हता. कारण त्यावेळी न्यायाधीश स्त्रियांविरुद्ध पूर्वग्रहदूषित होते. ते पुरुष वकिलांचे युक्तिवाद अतिशय गांभीर्याने ऐकत असे पण महिला वकिलांकडे लक्ष दिले जात नव्हते.

एका न्यायाधीशांनी त्यांना काय म्हटले याबाबतही कॉर्नेलिया यांनी लिहिले आहे. "तुम्हाला इंग्रजी उत्तम येते पण याव्यतिरिक्त तुम्हाला काहीही येत नाही."

महिलांना वकिलीच्या क्षेत्रात प्रवेश मिळवून देण्याचे बहुतांश श्रेय कॉर्नेलिया यांना जाते. ब्रिटनच्या पहिल्या महिला बॅरिस्टर हेलेना नॉरमेंटन म्हणाल्या होत्या, "कॉर्नेलिया सोराबजी दमदार पद्धतीने महिलांच्या हक्कासाठी लढल्या. महिलांना वकिली करण्याची परवानगी मिळावी यासाठी त्यांनी संघर्ष केला आणि यामुळेच मी आज वकील बनू शकले."

वकिलीतून निवृत्ती घेतल्यानंतर त्या लंडन येथे स्थायिक झाल्या. 1954 साली 88 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)