पुण्याचं नाव संभाजीनगर करा - प्रकाश आंबेडकर #5मोठ्याबातम्या

पुणे, औरंगाबाद, संभाजीनगर

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, पुणे

विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.

1. पुण्याचं नाव संभाजीनगर करा-प्रकाश आंबेडकर

पुणे शहर आणि जिल्ह्याचं नाव बदलून संभाजीनगर करा अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. औरंगाबाद शहराच्या नामांतराची चर्चा सुरू असतानाच आंबेडकर यांनी वेगळाच मुद्दा मांडला आहे. 'एबीपी माझा'ने ही बातमी दिली आहे.

"औरंगाबाद पालिका निवडणूक आली की नामांतर वाद होतो. निवडणूक संपली की हा वाद संपतो. याआधी भाजप शिवसेना पाच वर्षं सत्तेत होती तेव्हा नाव का नाही बदललं," असा सवाल आंबेडकर यांनी केला.

"औरंगाबादचं संभाजीनगर करा ही राजकीय मागणी आहे. परंतु औरंगाबाद आणि संभाजी महाराज यांचा संदर्भ सापडत नाही. संभाजी महाराज यांची समाधी पुणे जिल्ह्यात आहे. त्यांचा अंत्यविधी आणि दफन पुण्यात झालं मग पुण्याला त्यांचं नाव दिलं पाहिजं", असं आंबेडकर म्हणाले.

औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर असं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं आणि ते जनतेने मान्य केलं आहे असं सामनाने आपल्या संपादकीयात म्हटलं आहे.

इतिहासात औरंगाबादची विविध नावं होती. सातवाहन काळात राजतडाग असे संदर्भ आढळतात. हे शहर विकसित करणाऱ्या मलिक अंबरने शहराचं नाव खडकी असं ठेवलं होतं. फतेहनगर असंही या शहराचं नाव होतं. खुजिस्ता बुनियाद असंही नाव होतं. औरंगजेबाचं ते आवडतं शहर होतं.

1988ला औरंगाबादेत शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आले. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर विजयी सभा घेतली. याच सभेत त्यांनी या शहराचं नाव औरंगाबादऐवजी संभाजीनगर ठेवत असल्याची घोषणा केली होती.

त्यानंतर शिवसैनिकांतर्फे औरंगाबादचा उल्लेख आजतागायत संभाजीनगर म्हणूनच केला जातो. सामना या मुखपत्रातही संभाजीनगर असंच लिहून येते. तेव्हापासून महापालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत औरंगाबाद की संभाजीनगर हा मुख्य मुद्दा असतो.

जून 1995मध्ये औरंगाबाद महापालिकेच्या सभेत औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा ठराव बहुमतानं मंजूर करण्यात आला. हा ठराव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला.

1995ला युतीचं सरकार होते. औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे हे त्यावेळी औरंगाबादचे तर माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे जालना जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी नामांतराचा प्रस्ताव मांडला. त्याला मंजुरी देण्यात आली.

"युतीचं सरकार आलं तेव्हा 1995मध्ये आम्ही मंत्रिमंडळात संभाजीनगर नाव केलं. एकानं याचिका टाकली. हायकोर्टानं आमच्या बाजूनं निकाल दिला. सुप्रीम कोर्टात नंतर याचिका निकाली निघाली. पण आमचं सरकार तोपर्यंत सत्तेवरून गेलं होतं," माजी खासदार खैरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं होतं.

2. भाजपाकडून लोकशाही संस्थांना पायदळी तुडवण्याचा प्रयत्न- कॅ. अमरिंदर सिंह

सत्तेच्या भुकेपोटी भाजप राज्यपालपदाची प्रतिष्ठा कमी करत आहे. लोकशाही पद्धतीने निवडून आलेलं सरकार अस्थिर करण्याचा खालच्या दर्जाचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केला आहे.

अमरिंदर सिंह

फोटो स्रोत, NARINDER NANU

फोटो कॅप्शन, अमरिंदर सिंह

भाजपाकडून लोकशाही संस्थांना पायदळी तुडवण्याचा प्रयत्न सुरू आहे असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री आणि राज्याचा गृहमंत्री म्हणून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. हे भाजप नेत्यांना माहिती नाही का? केंद्रात सत्तेत असण्याबरोबरच लोकशाही संस्थांचं संरक्षक असणाऱ्या पक्षासाठी ही कार्यप्रणाली योग्य नाही असं अमरिंदर म्हणाले. पंजाब दुसरा बंगाल बनतोय असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.

3. हिवरे बाजार, राळेगणसिद्धीत बंडाचा झेंडा, तीस वर्षांत पहिल्यांदाच निवडणूक

बिनविरोध निवडणुकांची परंपरा असलेल्या हिवरेबाजार आणि राळेगणसिद्धी या गावांमध्ये बंडाचा झेंडा उभा राहिला असून, निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण तापलं आहे. हिवरे बाजारमध्ये तब्बल 30 वर्षांनी निवडणूक होत आहे. गावाचे प्रवर्तक पोपटराव पवार यांच्याविरोधात एका शिक्षकांनी निवडणूक लढवण्याचे ठरवलं आहे. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

गावातील तरुण पिढीला निवडणूक हवी असून त्याशिवाय आम्हाला लोकशाही प्रक्रिया कशी समजणार? अशी विनंती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली होती. त्यावर हजारे यांनी निवडणूक होऊ द्या मात्र शांततेत पार पाडा असं म्हटलंय.

हिवरे बाजारमध्ये सर्वच्या सर्व सातही जागांवर निवडणूक होत आहे. पोपटराव पवार यांच्या वॉर्डात खाजगी शाळेतील शिक्षक किशोर संबळे निवडणूक लढवत आहेत. पोपटराव पवार यांच्या विरोधातील पॅनलच्या उमेदवारांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.

4. नव्या कोरोनाचे राज्यात ८ रुग्ण

कोरोनाच्या नव्या प्रकाराचे आठ रुग्ण राज्यात आढळले आहेत. मुंबईत पाच, पुणे-ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एकाला या नव्या स्ट्रेनची बाधा झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा संसर्ग झालेल्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं असून, त्यांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे असं टोपे यांनी म्हटलं आहे. नव्या प्रकाराचे एकूण देशभरात 38 रुग्ण आढळले आहेत. विषाणूचा हा प्रकार सगळ्यांत आधी ब्रिटनमध्ये आढळून आला होता. कोरोनाच्या मूळ प्रारुपापेक्षा नवा विषाणू अधिक संसर्गजन्य आहे.

दरम्यान परदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी नियमावलीचं उल्लंघन केल्याप्रकरणी अभिनेता अरबाज खान, सोहेल खान आणि सोहेलचा मुलगा निर्वाण खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नियमानुसार क्वारंटीन आणि कोरोना चाचणी बंधनकारक आहे. या नियमांचे पालन न करता हे तिघे संबंधित यंत्रणांची दिशाभूल करून आपापल्या घरी गेले. पालिकेने याची गंभीर दखल घेत खार पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 'आजतक'ने ही बातमी दिली आहे.

हे तिघे 25 डिसेंबर रोजी दुबईतून मुंबईत परतले होते. त्यांना विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आलं. मात्र त्यावेळी आम्ही ताज लँड्स हॉटेलमध्ये राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र प्रत्यक्षात ते आपापल्या घरी गेले. या तिघांना भायखळा इथल्या विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येणार आहे.

5. महाराष्ट्र, मुंबई पोलीस आणि मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्याचं षडयंत्र- सचिन सावंत

भाजपला खूश करण्यासाठी महाराष्ट्र, मुंबई पोलीस आणि मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्यात आली. महाराष्ट्र भाजपचं हे षडयंत्र होतं. याचा हा कबुलीजबाब आहे. भाजपने नाक घासून महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली तरी या पापातून मुक्ती मिळणार नाही अशी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

मुंबई, महाराष्ट्र,
फोटो कॅप्शन, उर्मिला मातोंडकर आणि कंगना राणावत

भाजपला पाठिंबा देऊन मला काहीच मिळालं नाही. पण उर्मिलाला काँग्रेसमुळे खूप फायदा झाला असं ट्वीट अभिनेत्री कंगना राणावतत यांनी केलं होतं. त्यासंदर्भात सावंत बोलत होते.

उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ऑफिससाठी नवी जागा विकत घेतली होती. कंगना यांनी याच मुद्यावर उर्मिला यांना लक्ष्य केलं होतं. कंगनाच्या याच ट्वीटला लक्ष्य करत सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)