दूधदुभतं, शेणगोवऱ्या हाताळणारी सोनल न्यायाधीश होते तेव्हा...

सोनल शर्मा, गाईगुरं, शेणगोवऱ्या, गोठा, पशुपालन

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA

फोटो कॅप्शन, सोनल शर्मा आता न्यायदानाचं काम करणार आहेत.

गाईगुरांचं दूध घरोघरी पोहोचवणं, शेण साफ करणं, चारा घालणं ही कामं करता करता सोनल यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं.

"वडील लोकांची बोलणी खात असल्याचं मी पाहिलं होतं. गल्लीतला कचरा उचलताना मी पाहिलं आहे. आम्हा भावाबहिणींचं शिक्षण व्हावं यासाठी त्यांनी वारंवार अपमानाचा सामना केला. शाळेत असताना आम्हाला लाज वाटायची की आमचे वडील दूध विकतात, मात्र आज मला अभिमान वाटतो की मी त्यांची लेक आहे",

हे केवळ शब्द नाहीत, परिस्थितीने गांजलेल्या स्थितीत मनातली ठसठसती जखमेच्या वेदना ते अभिमानास्पद लेक हे संक्रमण विलक्षण आहे.

चौथ्या इयत्तेपासून गाई-म्हशींचं शेण उचलण्यापासून तिच्या दिवसाची सुरुवात होते. मात्र लवकरच ही सावित्रीची लेक न्यायदानाचं काम सुरू करणार आहे. राजस्थानमधल्या तलावांचं शहर असलेल्या उदयपूरची 26 वर्षीय सोनल शर्मा न्यायाधीश होण्याच्या मार्गावर आहेत.

राजस्थान न्यायिक सेवा अर्थात आरजीएस मध्ये सोनल शर्मा यांची निवड झाली आहे. निकाल गेल्या वर्षीच लागला होता मात्र तेव्हा एका अंकाची चूक झाली आणि सोनल यांचं नाव प्रतीक्षा यादीत गेलं.

आता या प्रतीक्षा यादीत सुधारणा करण्यात आली आहे. 29 डिसेंबरला त्यांच्या कागदपत्रं सत्यांकित करण्यात आली आहेत.

तीन अंकांनी हुकली नियुक्ती, एका अंकाने वेटिंग लिस्टमध्ये

आरजेएस भरती 2017 ही सोनल यांचा परीक्षेचा पहिलाच प्रयत्न होता. नियुक्तीसाठी ठराविक गुण आवश्यक होते. सोनल यांचा क्रमांक तीन अंकांनी हुकला होता. मात्र त्यांनी हार मानली नाही.

सोनल शर्मा, गाईगुरं, शेणगोवऱ्या, गोठा, पशुपालन

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA

फोटो कॅप्शन, भिंतीवर लावण्यात आलेलं वाक्य

2018 मध्ये पुन्हा भरती घेण्यात आली. यावेळेला एका अंकाने त्यांचं नाव वेटिंग लिस्टमध्ये गेलं. याचं त्यांना खूप वाईट वाटलं. अनेक दिवस त्या उदासीन होत्या.

पण असं म्हणतात जिद्द मजबूत असते आणि निर्धार पक्का असतो तेव्हा लक्ष्य पार केलं जातं. सोनल न्यायाधीश होण्याचा प्रवास असाच काहीसा आहे.

गेल्या महिन्यात, वेटिंग लिस्टमधून त्यांची न्यायाधीशपदासाठी निवड करण्यात आली. सोनल यांच्या कागदपत्रांची शहानिशा झाली आहे. आता पोलिसांकडून कागदपत्रांची सत्यासत्यता पडताळण्यात येईल. त्यानंतर वैद्यकीय चाचणी आणि एका वर्षाच्या प्रशिक्षणानंतर न्यायाधीश म्हणून सोनल काम सुरू करतील.

वडिलांना लोकांची बोलणी खाताना पाहिलंय

"त्यावेळी मी चौथीत होते, बाकी मुलामुलींप्रमाणे बाबांबरोबर फिरायला जायला मला आवडायचं. ते घरोघरी दूध पोहोचवण्यासाठी जात असत. तेव्हा मी त्यांच्याबरोबर जात असे.

कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून लोक बाबांना बोलत असत. त्यांचा अपमान करत असत. मात्र तरीही ते न चिडता हसतच उत्तरं देत.

एका दिवशी घरोघरी दूध पोहोचवल्यानंतर आम्ही घरी परतलो. मी आईला विचारलं, मी यापुढे बाबांबरोबर जाणार नाही. कारण मला लाज वाटते",

सोनल शर्मा, गाईगुरं, शेणगोवऱ्या, गोठा, पशुपालन

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA

फोटो कॅप्शन, सोनल काम करताना

"लाज यासाठी वाटत होती काहीही चूक नसताना त्यांना ऐकून घ्यायला लागत असे.

मात्र आज त्यांच्या तपश्चर्येला फळ आलं आहे. बाबांनी परिस्थितीशी टक्कर देताना स्मितहास्य सोडलं नाही", असं सोनल सांगतात.

सोनल अभ्यासात अव्वल

सोनल यांचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण उदयपूरमध्येच झालं आहे. मोहनलाल सुखाडिया महाविद्यालयातून त्यांनी वकिलीचं शिक्षण घेतलं. शिक्षण सुरू असताना सायकलवरून घरोघरी दूध पोहोचवलं आणि अभ्यासही केला.

सोनल शर्मा, गाईगुरं, शेणगोवऱ्या, गोठा, पशुपालन

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA

फोटो कॅप्शन, सोनल शर्मा

दहावी आणि बारावीत सोनल यांचा क्रमांक अव्वल होता. बीए एलएलबी अभ्यासक्रम सुवर्णपदकासह पूर्ण केला.

भामाशाह पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. एलएलएम अभ्यासक्रमात महाविद्यालयात अव्वल क्रमांक पटकावल्यानंतर त्यांना चान्लसर पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. हा त्यांच्यासाठी मोठा सन्मान आहे.

'मी जे सोसलं ते मुलांना भोगायला लागू नये'

सगळ्या आईवडिलांना असं वाटतं की त्यांच्या मुलांनी भरारी घ्यावी. सोनल यांचे वडील ख्याली लाल शर्मा यांनाही असं वाटतं.

घर चालवणं, चार मुलांचं शिक्षण यासाठी त्यांच्याकडे गाईगुरं हे एकमेव साधन आहे. याआधारेच त्यांनी मुलांचं शिक्षण पूर्ण केलं.

सोनल शर्मा, गाईगुरं, शेणगोवऱ्या, गोठा, पशुपालन

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA

फोटो कॅप्शन, सोनल यांचे वडील

सोनल यांचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांच्या वडिलांकडे पुरेसा पैसा नव्हता. बाबांनी माझ्या मैत्रिणीच्या वडिलांकडून पैसे घेतले होते.

ख्याली शर्मा सांगतात की, 1980 मध्ये सात पैसे हिशोबाने महाराणा प्रताप कृषी महाविद्यालयात शेण विकण्याचं काम करत असत. महाविद्यालयातल्या सौरऊर्जा केंद्राच्या कामासाठी शेण घेतलं जातं.

सोनल यांची आई शेणापासून गोवऱ्या तयार करून नवऱ्याला मदत करत असत.

ख्याली शर्मा यांना असं वाटतं, आम्ही जे सोसलं आहे ते आमच्या मुलांना भोगायला लागू नये.

सूर्योदयाआधीच सुरू होतं काम

सकाळी उठल्याउठल्या अनेकांना चहा कॉफी लागते. त्याकरता दूध लागतं. हे दूध घरोघरी पोहोचवण्यासाठी सूर्योदयाच्या आधीपासूनच ख्याली शर्मा यांचं काम सुरू होतं. साहजिकच त्यांच्याबरोबरीने घरच्यांचाही दिवस तेव्हाच सुरू होतो.

सोनल सांगतात की, "आजही आम्ही सगळे चार वाजता उठतो. बाबा, गाई आणि म्हशींचं दूध काढतात. आम्ही दूध घरोघरी पोहोचवतो.

सोनल शर्मा, गाईगुरं, शेणगोवऱ्या, गोठा, पशुपालन

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA

फोटो कॅप्शन, सोनल यांच्या घराजवळच्या गोठ्यातलं दृश्य

गाई-म्हशींचं शेण उचलतो, गोठा साफ ठेवणं, गाई-म्हशींना चारा देणं ही कामंही त्या करतात. ही कामं आम्ही आपापसात वाटून घेतली आहेत".

आठ वाजेपर्यंत हे काम आटोपतं आणि सोनल अभ्यासाला सुरुवात करतात.

संध्याकाळी बाबांच्या बरोबरीने पुन्हा गाईम्हशींना चारा देण्याचं काम असतं. दूध काढणं आणि घरोघरी पोहोचवण्याचं काम असतंच.

सोनल यांचा हा दिनक्रम आहे. "आम्ही हे सगळं सोडू शकत नाही कारण हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे", असं सोनल सांगतात.

सोनल शर्मा, गाईगुरं, शेणगोवऱ्या, गोठा, पशुपालन

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA

फोटो कॅप्शन, सोनल कुटुंबीयांसमवेत

आधी शक्य नव्हतं पण आता बाबांच्या मदतीसाठी काही लोकांना घेता येईल असं सोनल सांगतात.

सोनल न्यायाधीश झाल्यानंतर त्यांनी कसं काम करावं याबाबत ख्याली लाल शर्मा म्हणतात, "कोणत्याही दडपणाखाली न येता तिने काम करावं. न्यायदानाचं काम आहे. सगळ्यांना न्याय वागणूक मिळायला हवी. समोर कुणीही असला तरी निष्पक्षपणेच निर्णय द्यायला हवा".

कवीचं म्हणणं सोनल यांची वाटचाल चपखलपणे मांडतो.

"लहरों से डर कर नौका पार नहीं होती,

कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती"

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)