मंदिरातले पुजारी अर्धनग्न, मग भाविकांच्या कपड्यांवर निर्बंध का?-तृप्ती देसाई #5मोठ्याबातम्या

तृप्ती देसाई

फोटो स्रोत, FACEBOOK/TRUPTI DESAI

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. मंदिरातले पुजारी अर्धनग्न, मग भक्तांच्या कपड्यांवर निर्बंध का?-तृप्ती देसाई

"मंदिरातले पुजारी अर्धनग्न असतात मग भक्तांच्या कपड्यांवर निर्बंध का घातले जात आहेत?" असा प्रश्न आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी साई संस्थानला विचारला आहे.

शिर्डीतील साई मंदिरात दर्शन घेण्यासाठी यायचं असेल तर भारतीय पेहरावात यावं. तोकडे कपडे घालून येऊ नये असं आवाहन साई संस्थानतर्फे करण्यात आलं. या आशयाचे फलकही साई मंदिर परिसरात लावण्यात आले. याबाबत आता तृप्ती देसाई यांनी प्रश्न विचारला आहे. टीव्ही9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

शिर्डीमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शिर्डी साई संस्थानकडून ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. तसा फलकच मंदिराबाहेर लावण्यात आला आहे.

तृप्ती देसाई

फोटो स्रोत, Getty Images

गेल्या काही दिवसांपासून भक्त छोटे कपडे घालून मंदिरात येत असल्याची तक्रार मिळाल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थानकडून सांगण्यात आलं आहे.

साई संस्थानाने केलेल्या या आवाहनावर बोलताना तृप्ती देसाई यांनी म्हटलं की, "मंदिरात प्रवेश करताना कोणत्या प्रकारचे कपडे असले पाहिजेत त्याचं भान भक्तांना आहे. भक्तांची श्रद्धा कपड्यांवरुन ठरवता येत नाही. श्रद्धा महत्त्वाची असते."

2. ...तर आरक्षणावरून महाराष्ट्राचे तुकडे होतील- उदयनराजे भोसले

"मराठा समाजाला वंचित ठेवता कामा नये. महाराष्ट्र एकत्र ठेवायचा असेल तर सर्व जातींना एकत्र केलं पाहिजे. मेहरबानी करून मराठा मुद्द्याला फाटे फोडू नका, नाहीतर महाराष्ट्राचे तुकडे नक्की होतील," असं भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

उदयनराजे भोसले

फोटो स्रोत, Getty Images

उदयनराजे भोसले आणि शशिकांत पवार यांनी पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षणावरून राज्य सरकारला लक्ष्य केलं. न्यूज18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.

"मुद्दा मी उपस्थित केला असता तर माझ्यावर भडिमार केला असता. मी आणि संभाजी राजे बघतील असे बोलून बंदूक आमच्या खांद्यावर दिली. मराठा आरक्षण दिरंगाईला सर्व आमदार आणि खासदार जबाबदार आहेत," असंही उदयनराजे यांनी म्हटलं.

3. तिघे एकत्र या, नाहीतर चौघे या; आम्ही एकटे पुरेसे आहोत : चंद्रकांत पाटील

'तुम्ही तिघे एकत्र या, नाहीतर चौघे या; आम्ही एकटे पुरेसे आहोत,' असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पदवीधर मतदार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लगावला आहे.

"जगात कोणावरही बोललो तरी मंत्री हसन मुश्रीफ माझ्यावर टीका का करतात हे कोडे सध्या माध्यमांनाही पडले आहे," असंही पाटील यांनी म्हटलं.

चंद्रकांत पाटील

फोटो स्रोत, TWITTER

चंद्रकांत पाटील सांगलीमध्ये पुणे पदवीधर निवडणुकीसाठी मतदानाच्या निमित्ताने आले असताना बोलत होते. एबीपी माझानं ही बातमी दिलीये.

सांगलीच्या चांदणी चौक येथील दमाणे हायस्कूल याठिकाणी असणाऱ्या मतदान केंद्राला चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली.

यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले, "राज्यात पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीसाठी रांगेत उभे राहून मतदान करण्यात येत असून मतदारांमध्ये अत्यंत चांगला उत्साह पाहायला मिळाला आहे. म्हणून भाजपाचा दावा आहे की, सर्व जागा भाजप चांगल्या मताधिक्याने जिंकेल."

4. राज्यातले उद्योग कुणी परराज्यात घेऊन जाऊ शकत नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्र राज्यातले उद्योग कुणी परराज्यात घेऊन जाऊ शकत नाही, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव न घेता टोला लगावला आहे. झी24 तासनं ही बातमी दिली आहे.

दरम्यान, उत्तर योगी आदित्यनाथ यांनी 'मिशन बॉलिवूड' हाती घेतल्याची चर्चा आहे, तर काँग्रेसने योगींवर थेट आरोप करत करत भाजपला टार्गेट केले आहे.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, FACEBOOK/UDDHAV THACKERAY

उद्योजकांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्यातले उद्योग कुणी परराज्यात घेऊन जाऊ शकत नाही, असे वक्तव्य केले आहे. योगी आदित्यनाथ सध्या मुंबईत आहेत. उद्योजक, बॉलिवूड कलाकारांसोबत योगी चर्चा करणार आहेत.

'राज्यातील उद्योग राज्यातच राहतील. इथे येऊन कुणी काही घेऊन जाऊ शकत नाही. स्पर्धेला आम्ही घाबरत नाही. पण कुणी ओढून ताणून येथून काही घेऊन जाणार असेल तर शक्य होणार नाही,' असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे.

5. आंदोलन करणारे बहुतेकजण शेतकरी वाटत नाहीतः व्ही. के. सिंह​

जेव्हा आपण आंदोलनाचे फोटो पाहतो तेव्हा त्यात बहुतेक जण शेतकरी दिसून येत नाहीत. अतिशय कमी शेतकरी या आंदोलनात आहेत, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी केलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

जे शेतकऱ्यांच्या हिताचे तेच सरकारने केलं असल्याचं व्ही. के. सिंह यांनी म्हटलं.

या आंदोलनामागे विरोधी पक्षासह कमिशन खाणाऱ्यांचा हात आहे, असा आरोप सिंह यांनी केला.

शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, REUTERS/DANISH SIDDIQUI

फोटो कॅप्शन, शेतकरी आंदोलन

'शेतकऱ्यांना आपलं उत्पादन विकण्याचं स्वातंत्र्य मिळावं. शेतकऱ्यावर कुठलीही बंधनं असू नये,' अशी मागणी वेळोवेळी केली गेली. आपलं उत्पादन बाजारात विकायचं असेल तर ते विका आणि तुम्हाला जर बाहेर विकायचं असेल तर तेही विकू शकतात. हे काम सरकारने केलं आहे,' असं व्ही. के. सिंह यांनी म्हटलं.

'आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी चर्चेला तयार आहोत. त्यातून काय सकारात्मक निघतं ते पाहूया. शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींचं म्हणणं ऐकल्यानंतर सरकार त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढेल', असं केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)