26/11 मुंबई अतिरेकी हल्ला: 'माझे कपडे रक्ताने माखले होते आणि हातात फोन होता, एवढंच आठवतंय'

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

"अरे व्हिजुअल्स काय घेताय? दिसत नाही का तुम्हाला. अरे फोटो काय घेताय? आंधळे झालात? त्याला गोळी लागली आहे. मदत करा. माणसाच्या जिवापेक्षा शॉट्स महत्त्वाचे आहेत?

12 वर्षांनंतरही मी हे शब्द विसरू शकलेलो नाही आणि विसरू शकणार नाही. कारण, त्या दिवशी माझ्यासमोर मुंबई पोलीस दलातील एका कर्मचारी निपचित पडला होता. त्याच्या शरीराची हालचाल बंद झाली होती. तो पूर्णत: अचल होता.

तो दिवस होता 26 नोव्हेंबर 2008 चा देशाची आर्थिक राजधानी मुंबई हल्ल्यात रक्तबंबाळ झाली होती देशातील सर्वांत मोठा हल्ला मी माझ्या डोळ्यांनी पाहत होतो.

एका टीव्ही पत्रकाराच्या स्टोरीसाठी व्हिजुअल्स सर्वांत जास्त महत्त्वाची असतात. त्या दिवशीही न्यूज चॅनलचे कॅमेरामन आणि फोटोग्राफर जीव धोक्यात घालून काम करत होते. हल्ल्याची दृश्यं कॅमेरात कैद करण्याचा प्रयत्न करत होते पण, त्याक्षणी मी रिपोर्टिंग करतोय हे मी विसरलो होतो.

26 नोव्हेंबर 2008 ला मुंबईवर अजमल कसाब आणि त्याच्या 9 सहकाऱ्यांनी हल्ला केला. तब्बल 59 तास अतिरेक्यांनी या शहराला वेठीस धरलं. त्या 59 तासांमध्ये काय झालं? तो संपूर्ण घटनाक्रम माझ्या आजही लक्षात आहे.

पण, माझ्या आयुष्यातील त्या 10 मिनिटांत काय झालं? याचं उत्तर मी खूपवेळा शोधण्याचा प्रयत्न केला, आठवण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या आयुष्यातील 'ती' 10 मिनिटं मला बिलकुल आठवत नाहीत. डोळ्यासमोर 26/11 चा हल्ला उभा रहातो. पण, ती 10 मिनिटं मला कधीच आठवता आली नाहीत.

वेळ साधारणत: रात्री 11.50 ची असेल.

मुंबईचं हृदय मानल्या जाणाऱ्या दक्षिण मुंबईत अतिरेकी अंदाधुंद फायरिंग करत होते. मुंबईवर हल्ला सुरू होऊन एव्हाना 2 तास उलटून गेले होते. सीएसटी स्टेशनवर निष्पाप नागरिकांची हत्या केल्यानंतर हल्लेखोर कामा रुग्णालयात पोहोचले होते. तत्कालीन अतिरिक्त आयुक्त सदानंद दाते यांच्या नेतृत्वाखाली मुंबई पोलिसांची एक टीम हल्लेखोरांचा मुकाबला करत होती.

महाराष्ट्र एटीएसचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे त्यांच्या टीमसह टाईम्स ऑफ इंडियाच्या बाजूला, कामा रुग्णालयाकडे जाणाऱ्या गल्लीत शिरले. पत्रकारांशी 2 मिनिटं बोलून पुढे गेले. पत्रकारांना पुढे जाऊ दिलं जात नव्हतं त्यामुळे मी मेट्रो थिएटरच्या जंक्शनला पोहोचलो.

इतर रिपोर्टर्ससोबत रस्त्यावर उभा होतो. रस्त्यावर मोठा पोलीस बंदोबस्त होता. आसपासचे रहिवासी मदतीसाठी आले होते. बघ्यांची गर्दी देखील होती.

हल्लेखोरांच्या AK-47 मधून सुटणाऱ्या प्रत्येक गोळीचा आवाज त्या शांततेत घुमत होता.

पोलिसांच्या गर्दीत एक कर्मचारी मागे व्हा, पुढे येऊ नका. अशी सूचना करत होता. त्याच्या डोक्यावर हेल्मेट आणि हातात पिस्तुल होतं. आम्हा पत्रकारांना सुरक्षित अंतरावर रहाण्याच्या सूचना देणारा हा कर्मचारी नंतर माझ्यासमोर निपचित पडणार आहे याची पुसटशी कल्पनाही त्यावेळी कोणी केली नव्हती.

पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू

कामा रुग्णालयाच्या परिसरात गोळ्यांचा बहुदा वर्षाव होत असावा. कारण, प्रत्येक गोळीचा आवाज मेट्रोपर्यंत स्पष्ट ऐकू येत होता. काही वेळाने अचानक आवाज बंद झाला आणि पोलिसांची एक गाडी बाहेर येताना दिसली.

आत काय झालं असेल? याची उत्कंठा पत्रकार म्हणून आम्हा सर्वांना होती. पोलिसांना विचारण्यासाठी आम्ही पुढे सरसावलो खरं पण झाडांवर पाण्याची फवारणी केल्याप्रमाणे पोलिसांच्या गाडीतून AK-47 मधून सुटलेल्या बुलेट्स आमच्या दिशेने येऊ लागल्या. प्रत्येक गोळी मृत्यूची चाहूल देत होती.

फायरिंग अचानक झालं होतं. ज्याला लपण्याची जागा मिळाली तो लपला. पण, एका व्यक्तीला असं करता आलं नाही. AK-47 मधून सुटलेल्या एका गोळीने त्याच्या शरीराचा वेध घेतला.

काही वेळापूर्वी ज्या व्यक्तीशी मी चर्चा केली होती तोच पोलीस कर्मचारी माझ्या बाजूलाच रस्त्यावर निपचित पडला होता.

रस्त्यावर पडलेल्या त्या कर्मचाऱ्याला दोन्ही हातांनी धरून खेचत मी जवळच उभ्या असलेल्या गाडीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. तो कर्मचारी पूर्णत: निश्चल झाला होता. लोकांच्या मदतीने त्या कर्मचाऱ्याला उचलून मी गाडीत ठेवलं. पण, तोपर्यंत बहुदा उशीर झाला होता.

नंतर, माझ्यासमोर निपचित पडलेले पोलीस कर्मचारी हे एन्काउंटर स्पेशलिस्ट विजय साळसकर यांचे ड्रायव्हर अरूण चित्ते होते. हे मला कळलं.

'ती' 10 मिनिटं

भरधाव वेगाने गाडी येणं, अचानक फायरिंग होणं, जवळच उभ्या असलेल्या पोलीस कर्मचारी अरुण चित्तेंचं कोसळणं,यामुळे मृत्यू किती जवळून गेलाय याची जाणीव मला झाली. मृत्यू जवळून पाहिलाय असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.

त्यांच्या जागी आमच्यापैकी कोणी असतं तर? मी असतो तर? हा विचार मनात येणं साहजिक होतं.

अचानक एखादी भयंकर घटना घडली की मानसिक धक्का बसतो. मलाही तसंच झालं डोळे उघडे असतीलही बहुदा. आठवत नाही. कारण अचानक घडलेल्या घटनांनी मी पुरता गोंधळून गेलो होतो.

मित्रांनी हलवून जागं केलं तेव्हा शुद्ध आल्यासारखं वाटलं. अरे काय झालं? असं त्यांनी विचारलं. तेव्हाचं अंधुक आठवतंय. मी रस्त्यावर बसलो होतो. पॅन्ट रक्ताने माखली होती. मोज्यांना रक्त लागलं होतं. शर्टावर रक्त सांडलं होतं आणि हातात फोन होता. बस्स... या मधल्या 10 मिनिटांत काय घडलं याचा खूप विचार करूनही काहीच आठवत नाही.

मेट्रोजवळ अनिल निर्मळ नावाच्या एका सहकारी कॅमेरामनच्या बोटाला गोळी लागली होती. मेट्रोजवळच्या फायरिंगमध्ये दोघं जखमी झाले होते.

ऑफिसचा फोन

धक्क्यातून मी पूर्णत: सावरलेलो नव्हतो तोच ऑफिसचा फोन आला. मेट्रोजवळ हल्लेखोरांनी पोलिसांची गाडी हायजॅक केलीय का? लवकर माहिती दे. मी चेक करून सांगतो असं उत्तर दिलं. जी गोष्ट माझ्या डोळ्यासमोर घडली होती तीच घटना मी चेक करणार होतो. कारण फायरिंग, पोलीस कर्मचाऱ्याला गोळी लागणं, मृत्यू अगदी जवळून गेल्याची जाणीव यामुळे जबर मानसिक धक्का बसला होता.

हेमंत करकरे यांचा मृत्यू

मध्यरात्रीचे 12.30 वाजून गेले असतील माझ्या ATS मधील सोर्सचा फोन आला. "करकरे साहेब गेले" एवढंच बोलून त्याने फोन ठेवला. मला विश्वासच बसला नाही. काही वेळापूर्वीच माझ्या वरिष्ठांनी अशोक कामटे आणि विजय साळस्कर जखमी झाल्याची बातमी दिली होती.

मी ऑफिसला बातमी कळवली.."पुन्हा चेक कर…अधिकाऱ्यांकडून कन्फर्म कर. ATS प्रमुखांचा मृत्यू, अशी कशी बातमी चालवणार?" साहजिकच वरिष्ठांचाही बातमीवर विश्वास बसणं अशक्य होतं. पण, बातमी खरी होती. माझा सोर्स रुग्णालयातच उपस्थित होता. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बातमीला दुजोरा दिला.

घटना इतक्या झपाट्याने घडल्या की पहाटे 1 वाजेपर्यंत मुंबई पोलिसांचे तीन वरिष्ठ अधिकारी हल्ल्यात मृत्यूमुखी पडल्याचं स्पष्ट झालं होतं.

कामा रुग्णालयाजवळच्या गल्लीत दबून बसलेल्या अतिरेक्यांनी करकरे, कामटे आणि साळसकर असलेल्या गाडीवर गोळीबार केला. त्यात तिन्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. तर, कॉन्टेबल अरूण जाधव फक्त नशिबाने बचावले होते. त्यांच्याच माहितीवर पोलीस कसाबला पकडण्यात यशस्वी झाले.

26 नोव्हेंबरची रात्र आणि 27 चा दिवस

मेट्रोजवळ फायरिंग झाल्यानंतर काही वेळाने मुंबई हल्ल्यातील एक हल्लेखोर जिवंत असल्याची बातमी आली. मुंबई पोलिसांच्या टीमने गिरगाव चौपाटीवर एक हल्लेखोर जिवंत पकडला होता. तो कोण आहे? त्याच्याकडून काय माहिती मिळतेय? यासाठी मग फोना-फोनी सुरू झाली.

मेट्रोजवळ काय झालं याचा विचार करण्याचा वेळ नव्हता. रक्ताळलेले कपडे बदलण्याची सवड नव्हती. दुसरे कपडे नव्हते. त्याच कपड्यांनी कामाला पुन्हा लागलो. पण, रक्ताने पूर्णत: ओले झालेले सॉक्स मात्र फेकून द्यावे लागले.

सकाळपर्यंत स्पष्ट झालं. पोलिसांच्या ताब्यात असलेला हल्लेखोर अजमल आमीर कसाब आहे. त्याला ट्रेन कोणी केलं? मुंबईपर्यंत हल्लेखोर कसे आले? याची माहिती काढण्याचं काम सुरू झालं.

27 च्या संध्याकाळी मला दुसऱ्या न्यूज चॅनलच्या वरिष्ठ सहकाऱ्याने त्यांच्याकडे असलेली हाफ पॅन्ट आणि टी-शर्ट घालायला दिला. जवळपास 17-18 तासांनंतर मी रक्ताने माखलेले माझे कपडे काढून टाकले होते.

सीएसटी स्टेशनचं दृश्य

हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सीएसटी स्टेशनवर रिपोर्टिंग करण्यासाठी गेलो. साफसफाई सुरू होती. नजर जावी तिथे बुलेट्समुळे भिंतीत भोकं पडली होती. स्टेशनवर माहिती देण्यासाठी असलेल्या अनाउंसमेंट कक्षाच्या काचा फुटलेल्या होत्या. सर्व अस्ताव्यस्त झालं होतं.

आईने पेपरमध्ये पाहिलेला फोटो

28 तारखेला सकाळी घरून फोन येणं सुरू झालं. मी फोन घेतले नाहीत. बॅटरी संपण्याची भीती असल्याने आणि प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असल्याने फक्त मोजकेच फोन घेत आणि करत होतो.

एका रिपोर्टरचा फोन आला. अरे तुझ्या घरून कॉल होता. घरचे काळजी करतायत. तुला गोळी लागलीये? मला काहीच कळायला मार्ग नव्हता. मी फोन ठेवला आणि घरी फोन केला.

पेपरमध्ये माझा फोटो आल्यामुळे आई फार घाबरली होती. शर्ट, पॅन्टवर रक्त असलेला फोटो छापण्यात आला होता. त्यामुळे घरच्यांना मला गोळी लागली असं वाटणं साहजिक होतं. पण, मला काही झालं नाही, असं सांगितल्यानंतर त्यांच्या जीवात जीव आला.

पण, त्या दिवसानंतर अजूनही संध्याकाळी 8 ते 8.30 दरम्यान आईचा दररोज फोन येतो. आजही येतो आणि बहुदा पुढेही येत राहील.

59 तास वेठीस होती मुंबई

खरंतर 26 तारखेला घरी जाण्यासाठी निघालो होते पण प्रत्यक्षात घरी पोहोचलो ते ऑपरेशन 'ब्लॅक टॉर्नेडो' संपल्यानंतर. 29 नोव्हेंबरला तब्बल 59 तासांनंतर NSG कमांडोजनी ताज हॉटेलमध्ये 2 हल्लेखोरांना ठार केल्यानंतर ऑपरेशन 'ब्लॅक टॉर्नेडो' संपल्याचं सांगण्यात आलं.

10 हल्लेखोरांनी मुंबईला टार्गेट केलं. 9 मारले गेले आणि 1 जिवंत पकडण्यात आला होता.

न्यूज चॅनलवर करण्यात आलेली टीका

ज्यू धर्मियांचं प्रार्थनास्थळ असलेल्या 'नरिमन हाऊस' ला त्यांनी टार्गेट केलं होतं. कुलाबा परिसरातील ही इमारत अत्यंत दाटीवाटीच्या ठिकाणी आहे. त्यामुळे NSG कमांडोजनी या इमारतीवर हेलिकॉप्टरने उतरण्याची रणनिती आखली.

'नरिमन हाऊस' वर घोंगावणारं हेलिकॉप्टर, त्यातून उतरलले NSG कमांडोज ही दृश्यं सर्व टीव्ही चॅनलवर लाईव्ह गेली. 'ब्लॅक टॉर्नेडो' सुरू असतानाही आणि संपल्यानंतर एक टीव्ही पत्रकारांवर खूप टीका करण्यात आली. न्यूज चॅनल्समुळे हल्लेखोरांना फायदा झाला अशी टीका करण्यात आली.

मुंबई हल्ला देशात झालेला पहिला हल्ला होता. जम्मू-काश्मीरमध्ये अशी ऑपरेशन पहायला मिळतात. मीडिया, सरकारी यंत्रणा, पोलीस यांच्यासाठी सर्वच नवीन होतं. कॅमेरे लाइव्ह असल्याने सर्व लाइव्ह गेलं आणि चार मजल्यांच्या इमारतीवर हेलिकॉप्टर घोंगावत असेल तर हल्लेखोरांना कळणारच होतं.

मात्र यानंतर मीडियाने स्वत:वर बंधन घालून घेतली आहेत. आता लाइव्ह फुटेज दाखवण्यात येत नाही.

चूक कुठे झाली?

मुंबई शहर या हल्ल्यासाठी तयार नव्हतं. असा हल्ला देशात होऊ शकतो याची कल्पनाही कोणी केली नव्हती. त्यामुळे मुंबई पोलीस दल तयार नव्हतं. राम प्रधान समितीने आपल्या रिपोर्टमध्ये सरकारला अनेक सूचना केल्या. मुंबई पोलीस दलाचं आधुनिकीकरण करण्याची प्रक्रिया त्यानंतर खऱ्या अर्थाने सुरू झाली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)