शिवसेना विरुद्ध भाजप : मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी राहणार का?

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, facebook

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

2022 साली होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठीचं वातावरण आतापासूनच तापू लागलं आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मिशन मुंबईचा' नारा देत मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवण्याचा विश्वास व्यक्त केला.

दोन दिवसांपूर्वी मुंबईत भाजप कार्यकारिणीची बैठक झाली. बिहार निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका निवडणुकीकडे मोर्चा वळवला आहे. निवडणुकीला अजून दीड वर्ष वेळ आहे. मात्र, कार्यकारिणीच्या बैठकीत त्यादृष्टीने विचारविनिमय झाला.

या निवडणुकीत स्वबळावर सत्ता आणण्याचं उद्दिष्ट भाजपनं ठेवलं आहे. अतुल भातखळकर यांना प्रभारी पद देण्यात आलं आहे. मुंबईकरांना साद घालण्यासाठी 'भाजप येणार, मुंबई घडविणार' असा नारा भाजपकडून दिला जाणार आहे.

महत्त्वाचं म्हणजे महापालिकेवर 'भाजपचा भगवा' फडकवणार, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेनेला हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून घेरणार असे संकेत मिळू लागले.

शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप

भाजपने शिवसेनेवर पुन्हा एकदा हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून टीका केल्याने शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'तल्या अग्रलेखात भाजपच्या भगव्याची तुलना ईस्ट इंडिया कंपनीच्या युनियन जॅकशी करण्यात आली.

'सामना'मधल्या अग्रलेखात लिहिलं आहे, "शुद्ध भगवा म्हणजे नक्की काय प्रकार आहे. बेशुद्ध अवस्थेत केलेले हे विधान आहे. बिहारच्या विजयाने भाजपचा नक्की कोणता झेंडा पाटण्यावर फडकला आहे? बिहारमध्ये भगवा फडकवू किंवा फडकवला असं विधान भाजप नेत्याने केल्याचं स्मरत नाही. कारण त्यांचा तसा भगव्याशी संबंध नाही. शिवसेनेशी युती झाल्यापासून त्यांचा भगव्याशी संबंध आला."

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे, मुंबई महापालिका

फोटो स्रोत, FRANCIS HAYMAN/NATIONAL PORTRAIT GALLERY, LONDON

फोटो कॅप्शन, ईस्ट इंडिया कंपनी

"भाजपचा शिवसेनेशी संबंध नव्हता तेव्हापासून मुंबईवर भगवा फडकलेलाच आहे. हा भगवा शुद्ध, तेजस्वी आणि प्रभावी आहे. यापेक्षा वेगळा भगवा अस्तित्वात आहे, असे महाराष्ट्राला वाटत नाही. हा भगवा छत्रपती शिवरायांचाच आहे."

"भगवा शुद्धच आहे. भगव्याला हात लावाल तर जळून खाक व्हाल. इतिहासाच्या पानोपानी याचे दाखले आहेत. मुंबई महापालिकेवर ईस्ट इंडिया कंपनीचा 'युनियन जॅक' फडकवण्याची भाषा करणाऱ्यांनी हे विसरू नये."

भाजप नेते आशिष शेलार यांनी 'सामना'च्या अग्रलेखावर टीका करताना म्हटलं, "105 हुतात्म्यांवर ज्यांनी गोळीबार केला, कसाबला ज्यांनी बिर्याणी खायला घातली, याकुबच्या फाशीला ज्यांनी विरोध केला, ज्यांनी कोट्यवधीचा भ्रष्टाचार करून महाराष्ट्र लुटला त्यांच्या सोबत सत्तेत बसलात... तेव्हाच 'भगव्याचा' रंग तुम्ही फिका केलात. भगवा तर तुम्हीच हाताने उतरवलात."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

मात्र, महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्यामुळे शिवसेनेचं हिंदुत्व बाटलं, असं म्हणणाऱ्या भाजपला काश्मीरमध्ये पीडीपीसोबत केलेली युती चालली का, असा सवाल मुंबईच्या महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला.

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे, मुंबई महापालिका

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर

बीबीसीशी बोलताना त्यांनी म्हटलं, "अनेक राज्यांमध्ये भाजपने वेगवेगळ्या युती केल्या आहेत. काश्मीरचं उदाहरणं तर आहेच. जे आपल्या देशाविरोधात होते त्यांच्यासोबत भाजपने युती केली. मग तिथे का युती केली? अजित पवारांसोबत पहाटेच्या अंधारात शपथ घेतली तो शुद्ध भाव होता आणि आम्ही एकत्र आलो तर तो अशुद्ध भाव का? भाजपने कायमच शब्दांचा खेळ केला आहे. लोकांच्या भावनेशी ते खेळतात."

त्या पुढे म्हणतात, "छत्रपती शिवरायांचा भगवा, रामदास स्वामींचा भगवा तोच भगवा शिवसेनेने पहिल्या दिवसापासून हाती घेतला आहे. शिवसेनेने कुठल्याही धर्माचा याआधीही अनादर केला नव्हता आणि आजही करत नाही. दुसरं म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला गृहित धरून 'मी परत येईन', 'मी परत येईन', असं जे करत होते त्यांचं स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणून भगवा अशुद्ध झाला का? आमचा भगवा हा हिंदुत्चाचा भगवा आहे आणि तो कायम राहणार."

दरम्यान, आम्ही हिंदुत्व सोडलं नाही, असं शिवसेना म्हणत असली तरी सत्तेच्या मोहापायी त्यांनी हिंदुत्वाला तिलांजली दिलं, असं भाजप नेते अतुल भातखळकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं आहे.

भातखळकर यांनी म्हटलं, "त्यांनी सावरकरांचा अपमान सहन केला. सावरकरांवर अत्यंत अभद्र भाषेत लेख लिहिणाऱ्या काँग्रेसच्या मुखपत्रावर बंदी तर सोडाच पण साधी एफआयआर दाखल करण्याचं धाडस त्यांनी दाखवलं नाही. तीन तलाकसंबंधीच्या कायद्याला विरोध करणाऱ्या शरद पवारांबरोबर ते आहेत.

ज्या काँग्रेसने मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची भूमिका घेतली त्या काँग्रेससोबत ते आज सत्तेत आहेत. ज्या काँग्रेसने पंडित नेहरू महाराष्ट्रापेक्षा मोठे आहेत, असं अधिकृतरित्या म्हटलं होतं, त्या काँग्रेससोबत हे सत्तेत आहेत. त्यामुळे शिवसेना जो एकेकाळी हिंदुत्त्ववादी पक्ष होता तो आता हिंदू विरोधी पक्ष आहे. शिवसेना आज सेक्युलर पक्ष झालेला आहे."

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न?

मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने 'शुद्ध भगव्या'ची चर्चा सुरू झाली असली तरी हा वाद सुरू झाला तो महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेपासून.

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे, मुंबई महापालिका
फोटो कॅप्शन, मुंबई महापालिकेचं मुख्यालय

महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करताना एक किमान समान कार्यक्रम आखण्यात आला होता. त्या कार्यक्रमाचा हवाला देत शिवसेना हिंदुत्वापासून दूर जात असल्याची टीका भाजपने केली होती. महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेत मुस्लिमांना शिक्षणात 5% आरक्षण देण्यासंबंधीचा प्रस्ताव आणला होता. त्यावरूनही देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली होती.

धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याला शिवसेनेचा विरोध होता. मात्र, केवळ सत्तेसाठी त्यांनी या भूमिकेत बदल केला, अशी टीका फडणवीस यांनी त्यावेळी केली होती.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA), NPA आणि NPA या कायद्यांवर शिवसेनेची भूमिका काय, असे प्रश्न विचारून भाजप शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्हं उपस्थित करत होती.

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे, मुंबई महापालिका

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यातील धार्मिक स्थळं खुली करण्याच्या मुद्द्यावरूनही भाजपनं शिवसेनेला लक्ष्य केलं होतं.

छट पूजेच्या निमित्तानेही भाजपने शिवसेना हिंदुविरोधी झाल्याची टीका केली होती. समुद्र किनाऱ्यावर छट पूजा करू द्यावी, अशी परवानगी भाजपने मागितली होती. मात्र, छटपुजेला अवघे दोन दिवस उरले असताना छट पूजा समुद्रावर नाही तर कृत्रिम तलावात करा, अशी सूचना मुंबई महापालिकेने केली होती.

यावरून राज्य सरकारवर टीका करत अतुल भातखळकरांनी म्हटलं होतं, "शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने छटपूजेसाठी परवानगी नाकारली आणि शहाजोगपणचा सल्ला देत कृत्रिम तलावात पूजा करू शकता, असं अवघ्या दोन दिवस आधी सांगतात. यावरूनच यांना छट पूजा करू द्यायची नव्हती, हे यावरून सिद्ध होतं. मंदिरं सर्वात शेवटी उघडली. यावरूनच राज्य सरकार आणि शिवसेनेची सत्ता असलेली मुंबई महापालिका हिंदू समाजाच्या विरोधात काम करत आहे का, अशी शंका येण्यास वाव आहे."

मुंबई महापालिका निवडणुकीत हिंदू कार्ड चालेल?

शिवसेनेला हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून कोंडीत पकडण्याची भाजपची राजकीय खेळी आहे. मात्र, मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने त्याचा कितपत फायदा होईल?

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे, मुंबई महापालिका

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हिंदुत्वाच्या मुद्यावरून ही निवडणूक होईल?

बीबसीशी बोलताना पत्रकार संदीप आचार्य यांनी म्हटलं, "भाजप मराठी आणि हिंदुत्त्व हे दोन्ही कार्ड खेळण्याचा प्रयत्न करणार आणि म्हणूनच शिवसेनेच्या भगव्याचा रंग कसा फिका झाला आहे, हे सांगायला त्यांनी सुरुवात केली आहे. मंदिरं खुली करा, छट पूजा, घंटा वाजवणे हे सगळं त्यातूनच आलेलं आहे. मात्र, आता सगळी गणितं बदलली आहेत. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आले तर उत्तर भारतीय मतं यांच्या बाजूने येऊ शकतात.

गेल्या निवडणुकीत मुस्लीम मतं समजावादी पक्ष आणि एमआयएमला गेली होती. मात्र, आगामी निवडणुकीत ही मतं हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून भाजपला धडा शिकवण्यासाठी कदाचित शिवसेनेला मिळू शकतात. म्हणजे ते काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान करतील. मात्र, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की निवडणुकीला अजून दीड वर्ष आहे. त्यामुळे तेव्हा काय होईल, हे आताच सांगता येणार नाही."

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, @SHIVSENA

फोटो कॅप्शन, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे.

मुंबईतली गुजराती आणि मारवाडी ही भाजपची पारंपरिक मतं आहेत. ती शिवसेनेला मिळणं जवळजवळ अशक्य आहेत. मात्र, मुंबईत 20 लाख उत्तर भारतीय, जवळपास 20-25 लाख मुस्लीम आहेत. उत्तर भारतीयांमधली मतं भााजपकडे जातील की शिवसेनेकडे? हिंदुत्वाच्या मुद्द्याचा या मतांवर परिणाम होईल का?

याबद्दल सांगताना पत्रकार संदीप आचार्य म्हणतात, "हिंदुत्वाच्या मुद्द्याचा उत्तर भारतीय मतांवर फारसा परिणाम होणार नाही. कारण शिवसेनेचंही हिंदुत्व आहे आणि मुंबईत गेल्या 25 वर्षांमध्ये शिवसेनेने परप्रांतियांविरोधात कधी आंदोलन केलेलं नाही. उत्तर भारतीयांच्याा मनात मनसेबद्दल जो राग आहे तसा शिवसेनेबद्दल नाही. दुसरं म्हणजे महापालिका निवडणूक स्थानिक मुद्द्यांवर होईल. त्यामुळे त्यात मोदी फॅक्टर फारसा चालणार नाही."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)