मराठा आरक्षण : उदयनराजे भोसले म्हणतात, 'आरक्षणामुळे माणसं दुरावत आहेत, गुणवत्तेला प्राधान्य द्यायला पाहिजे', #5मोठ्याबातम्या

उदयनराजे भोसले

फोटो स्रोत, Chhatrapati Udayanraje Bhonsle/facebook

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

1. मराठा समाजातल्या संघटनांमध्ये इगो प्रॉब्लेम - उदयनराजे भोसले

मराठा समाजात राजकारण नसतं तर मागेच आरक्षण मिळालं असतं, मराठा समाजातल्या संघटनांमध्ये इगो प्रॉब्लेम आहे असं भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले, यांनी म्हटलंय. साताऱ्यातल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

लोकसत्ताने याविषयीची बातमी प्रसिद्ध केलेली आहे.

"शिवाजी महाराज यांनी कधीही जात-पात मानली नाही, मी स्वतःला कधीही मराठा म्हणून समजून घेतलं नाही. खरं तर गुणवत्तेलाच प्राधान्य दिले पाहिजे. आरक्षणामुळे समाजात दुरावा निर्माण झाला, असे माझे वैयक्तिक मत आहे," असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.

त्यांनी पुढे म्हटलं, "जात-पात लोकांनी स्वतःच्या सोयीसाठी निर्माण केली आहे. इतर जातीचं आरक्षण काढून घेऊ नका. आर्थिक स्तरावर केंद्र शासनाने व अन्य राज्यांनी आरक्षण लागू केले आहे त्याचाही विचार व्हायला काय हरकत आहे. आंदोलन करणाऱ्या मराठा संघटना व कार्यकर्त्यांना मी आपलं उद्दिष्ट काय असं विचारले तर कोणीही बोलत नाही. मला या विविध संघटनांमध्ये इगो प्रॉब्लेम दिसून आला आहे.

2. कोरोनाच्या लढाईत ट्रंप अडखळले, पण मोदींनी देशाला वाचवलं - जे. पी. नड्डा

जेपी नड्डा

फोटो स्रोत, Getty Images

कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये डोनाल्ड ट्रंप अडखळले, पण वेळीच लॉकडाऊनचा निर्णय घेऊन नरेंद्र मोदींनी भारताला वाचवल्याचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी म्हटलंय.

नड्डा बिहारमधल्या दरभंगामध्ये प्रचारसभेत बोलत होते. TV9 मराठीने याविषयीची बातमी दिलेली आहे.

भारतात कोरोना आला तेव्हा देशात टेस्टिंगसाठी फक्त एक लॅब होती, आज देशात दररोज सुमारे 15 लाख टेस्ट होत असून लॉकडाऊनच्या काळात सरकारने संकटाशी लढण्याची तयारी केल्याचं नड्डा प्रचारसभेत बोलताना म्हणाले.

3. फक्त 5 दिवसांच्या दिवाळी सुटीमुळे शिक्षक नाराज

12 ते 16 नोव्हेंबरदरम्यान राज्यातले शिक्षक आणि विद्यार्थ्यांना दिवाळीची सुटी देण्याचं शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलं.पण राज्यातला शिक्षक वर्ग यावर नाराज आहे.

ABP माझाने ही बातमी दिली आहे.

दरवर्षी राज्यातल्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना दिवाळीची सुटी 18 ते 20 दिवस असते. पण ती कमी करून फक्त 5 दिवसांवर आणण्यात आल्याने शिक्षक आणि शिक्षक संघटना नाराज आहेत.

4. महिलांसाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्षाची स्थापना

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, ShivSena/facebook

फोटो कॅप्शन, उद्धव ठाकरे

महिलांचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी आणि महिलाविषयक योजनांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयामध्ये विशेष कक्षाची सुरुवात करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे.

महाराष्ट्र टाईम्सने ही बातमी दिली आहे.

सध्याच्या योजनांमधल्या अडचणी दूर करणं, नवीन योजना आखणं, महिलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आखणं अशी कामं या विशेष कक्षाद्वारे करण्यात येतील.

5. आणखी 3 रफाल विमानं फ्रान्समधून भारतात दाखल

फ्रान्सकडून भारताने घेतलेल्या रफाल लढाऊ विमानांपैकी आणखी 3 रफाल विमानं काल (5 सप्टेंबर) भारतात दाखल झाली.

सकाळने याविषयीची बातमी छापली आहे.

भारताने फ्रान्सकडून 36 विमानं घेण्यासाठी करार केलाय. यापैकीच्या 5 विमानांचा पहिला ताफा काही दिवसांपूर्वीच भारतात दाखल झाला होता.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

फ्रान्समधून झेपावलेली ही रफाल विमान कुठेही न थांबता काल भारतात दाखल झाल्याचं हवाई दलाने ट्वीट केलंय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)