अर्णब गोस्वामी आणि उद्धव ठाकरे सरकार यांच्यातल्या संघर्षाची 6 प्रकरणं

अर्णब गोस्वामी

फोटो स्रोत, BBC Sport

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी घरात शिरून अटक केली आहे.

अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी रायगड पोलिसांनी त्यांना अटक केल्याचे वरिष्ठ पोलिस सूत्रांनी बीबीसीशी बोलताना स्पष्ट केले.

पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेताना धक्काबुक्की केली असं अर्णब गोस्वामींने एएनआय वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.

यापूर्वी अर्णब गोस्वामी यांच्यावर टिआरपी घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे तर विधिमंडळात त्यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे.

ठाकरे सरकार विरुद्ध अर्णब गोस्वामी यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून टोकाचा संघर्ष पहायला मिळत आहे.

शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की "ठाकरे सरकारने राज्याची धुरा सांभाळल्यापासून सुडाचं राजकारण केलं नाही. अर्णब गोस्वामींची अटक ही कायदेशीर प्रक्रियेनुसारचं झाली आहे."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

नेमकं कोणकोणत्या मुद्यांवरून हा संघर्ष एवढा पेटला? अशा काही उदाहरणांवर नजर टाकूयात.

1. सुशांत सिंह मृत्यू प्रकरण

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचे कव्हरेज करत असताना रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये दावे-प्रतिदावे सुरू होते.

शिवसेनेचे मुखपत्र सामनातून अर्णब गोस्वामी यांच्यावर टीका करण्यात येत होती तर अर्णब गोस्वामी याप्रकरणात सतत ठाकरे सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत होते.

संजय राऊत यांनी 'रोखठोक' मध्ये लिहिले, "महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार आहे. ते कसेही करुन पाडायचे, पडत नाही म्हटल्यावर बदनाम करायचे असे विरोधकांनी ठरवले व भारतीय जनता पक्षाच्या सर्वच प्रकारच्या पाठिंब्यावर उभ्या राहिलेल्या वृत्तवाहिनीतून त्यांनी सुशांत प्रकरणात आघाडी उघडली." असा टोला त्यांनी अर्णब गोस्वामी यांनी लगावला.

"त्या वृत्तवाहिनीच्या प्रमुखाने केले ते 'गॉसिपिंग'! लोकांच्या मनातील संशय वाढवला. अर्णब गोस्वामी हे रिपब्लिक वृत्तवाहिनीचे प्रमुख. ते राजकीय नेत्यांच्या, मुख्यमंत्र्यांचा सरळ एकेरी भाषेत उल्लेख करतात. बदनामीकारक भाषा वापरतात, धमक्या देतात,"असं संजय राऊत यांनी 'रोखठोक' या सदरातल्या 'एक सुशांत, बाकी अशांत! एका आत्महत्येचे राजकारण' या लेखात लिहिलं.

संजय राऊत

'रिपब्लिक भारत' या हिंदी वृत्तवाहिनीवरील 'पूछता भारत' या कार्यक्रमात, जो भाग 'यूट्यूब'वर उपलब्ध आहे, त्यात गोस्वामी यांनी त्यांची बाजू मांडली.

"महाराष्ट्र सरकार आमच्या प्रश्नांना दाबून टाकू इच्छित आहे. काल मला समजलं की 'सामना'मध्ये शिवसेनेनं मोठा खुलासा केला आहे की 'एनसीपी'चे प्रमुख शरद पवार यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि म्हटलं की अर्णब गोस्वामी उद्धव ठाकरेंचं नाव कसं घेऊ शकतो? 'रिपब्लिक भारत'ला रोखा. अर्णबला रोखा. अर्णबच्या टीमला रोखा. उद्धवचं नाव घेण्यापासून थांबवा."

2. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख

8 सप्टेंबरला अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला.

अर्णब गोस्वामी यांनी आपल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रचंड टीका करण्यात आली.

गोस्वामी यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली होती.

संजय राऊत म्हणाले, "हे सर्व पाहिल्यावर श्री.शरद पवार यांनी मला फोन केला. "एका वृत्तवाहिनीवर उद्धव ठाकरे यांचा उल्लेख एकेरी भाषेत होतोय. हे बरोबर नाही. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री ही फक्त एक व्यक्ती नसते तर संस्था असते." 'इन्स्टिट्यूट' असा उल्लेख त्यांनी केला."

शेवटी त्यांनी प्रश्न केला. "मग सरकार काय करते?" पवार यांचे मत एका अनुभव नेत्याचे मत आहे. पत्रकारितेचे हे चित्र चांगले नाही. एक वृत्तवाहिनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत गरळ ओकते व ते सहन केले जाते. या वृत्तवाहिनीस महाराष्ट्रातले राजकीय पक्ष बळ देतात.,'

अर्णब गोस्वामी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अर्णब गोस्वामी

तर यासंदर्भात अर्णब गोस्वामी यांनी त्यांच्या 10 ऑगस्टला प्रसारित झालेल्या कार्यक्रमात स्पष्टीकरण दिले.

ते म्हणाले, " शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणताहेत की मी रागात बोललं नाही पहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव मला मोठ्या सन्मानानं घेतलं पाहिजे. उद्धव ठाकरेजी, शरद पवारजी, या देशाचं संविधान मला प्रश्न विचारण्याचा अधिकार देतं. तुम्ही देत नाही. जसा या देशाचा प्रत्येक नागरिक समान आहे तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पण सर्वांसमान आहेत."

"कारण भारतात लोकशाही आहे. इथं एकाधिकारशाही नाही आहे. जर महाराष्ट्र पोलीस पुराव्यांना लपवणार असेल तर,संजय राऊतजी, मी प्रश्न विचारणार. मी पत्रकार आहे. प्रश्न विचारणं हे माझं कर्तव्य आहे. मी सगळ्यांना प्रश्न विचारणार."

3. कथित टीआरपी घोटाळा प्रकरण

अर्णब गोस्वामी विरुद्ध ठाकरे सरकार हा वाद सुरू असतानाच मुंबई पोलिसांकडून अर्णब गोस्वामी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबईतील ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंबई पुलिस कमिश्नर

फोटो स्रोत, Hindustan Times

Republic TVनं एका कंपनीच्या मदतीनं TRP रेटिंगमध्ये गडबड केल्याचं समोर आला आहे, असं मुंबई पोलिसांनी म्हटलं. तर रिपब्लिक टीव्ही मात्र हे आरोप फेटाळून लावले.

"Republic TVनं एका कंपनीच्या मदतीनं TRP रेटिंग बनावट पद्धतीने वाढवल्याचं केल्याचं समोर आलं आहे. अशिक्षित लोकांच्या घरात इंग्रजी चॅनल्स चालू ठेवण्यासाठी पैसे दिले होते. त्यांच्या मालक आणि संचालकांविरोधात कारवाई करणार करू," असं मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितलं आहे.

तर आपली बाजू मांडताना रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी म्हणतात,

'मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी रिपब्लिक टीव्हीवर चुकीचे आरोप लावले आहेत. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आम्ही त्यांच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळेच ते असं करत आहेत."

4. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण

अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात विधिमंडळात हक्कभंगाचा प्रस्ताव आणल्यानंतर अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्र पोलीस पत्रकार अर्णब गोस्वामी यांची चौकशी करणार असल्याचेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं होतं. याच प्रकरणात त्यांना आज अटक करण्यात आली आहे.

मे 2018 मध्ये इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत 'अर्णब गोस्वामीने रिपब्लिक स्टुडियोच्या इंटेरिअरचे पैसे थकवल्याचं' लिहिलं होतं, अशी माहिती नाईक यांची पत्नी अक्षता नाईक यांनी गृहमंत्र्यांना दिली होती. त्याची दखल घेत या चौकशीला गती आली.

या प्रकरणी आमदार सुनिल प्रभू यांनी विधानसभेत अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात तक्रार करत या प्रकरणाची पोलीस चौकशी करण्याची मागणी केली होती.

5. 'कंगना राणावतची बाजू लावून धरणे'

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात अभिनेत्री कंगना राणावतने मुंबई पोलीस आणि राज्य सरकारवर सत्य लपवत असल्याचे अनेक आरोप केले. कंगना राणावतने सुशांत सिंह प्रकरणाबाबत रिपब्लिक टीव्हीवर अनेक इंटरव्यू दिले.

कंगना राणावत

फोटो स्रोत, Getty Images

कंगना आणि शिवसेनेमध्ये देखील अनेक वाद झाले आहेत. रिपब्लिक टीव्हीने कंगनाला आपली बाजू मांडण्यासाठी नेहमीच व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर शिवसेना आणि तिच्यातला वाद आणखी चिघळला. त्यानंतर बीएमसीने तिचं पाली हिल येथील ऑफिस अनाधिकृत म्हणून पाडले. त्यानंतर रिपब्लिकने तिची मुलाखत घेतली होती. त्यावेळी तिने शिवसेनेवर टीकेची झोड उठवली होती.

6. ठाकरे कुटुंबीयांच्या फार्म हाऊसजवळ गेलेल्या पत्रकारांना अटक

उद्धव ठाकरे यांच्या या फार्म हाऊसची टेहळणी करण्याच्या आरोपावरून रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या दोघा पत्रकारांसह तिघांना अटक झाल्याचं काल (बुधवारी) समोर आलं होतं. रिपब्लिक वृत्तवाहिनीनं मात्र आपले पत्रकार निर्दोष असल्याची भूमिका घेतली होती.

कर्जत

खालापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 10 सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास तीनजण गाडीतून आले आणि त्यांनी फार्म हाऊसच्या सुरक्षारक्षकांकडे ठाकरे यांचे फार्महाऊस कुठे आहे, अशी विचारणा केली. मात्र सुरक्षारक्षकाला संशय आला आणि त्यानं आपल्याला माहिती नसल्याचं सांगितलं. काही वेळानं ते तिघे या फार्म हाऊसमध्ये दाखल झाले आणि त्यांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा सुरक्षारक्षकाचा आरोप ठेवला गेला.

रिपब्लिक वृत्तवाहिनीनं मात्र हे आरोप फेटाळून लावले होते. तसंच आपले पत्रकार कुठल्या बातमीसाठी तिथे गेले होते, हे सांगण्यासही नकार दिला होता.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)