उद्धव ठाकरे : घंटा-थाळ्या बडवणारं आमचं हिंदुत्व नाही

सरकार स्थापन झाल्यापासून मी ऐकतोय सरकार पडेल, सरकार पडेल. आजही मी म्हणतो, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला सुरूवात केली.
उद्धव ठाकरेंनी यावेळी हिंदुत्वापासून विरोधकांच्या राजकारणाबद्दल सर्व गोष्टींवर भाष्य केलं आहे. मी मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून आज बोलणार आहे. जर एखादा शब्द इकडे-तिकडे गेला तर मुख्यमंत्र्यांना असं बोलणं शोभतं का, असं विचारलं जाईल. पण तरीही मला संयमाचं महत्त्व माहीत आहे, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे-
- मंदिरं का उघडत नाही म्हणून हिंदुत्वाबद्दल आम्हाला प्रश्न विचारलं जात आहे. कोण विचारतंय? ज्यावेळी बाबरी पाडली गेली, त्यावेळी आता जे हिंदुत्वाबद्दल प्रश्न विचारत आहेत. ते त्यावेळेला शेपट्या घालून कोणत्या बिळात बसले होते काय माहिती? यांना त्याकाळी घराच्या बाहेर कुणीही न ओळखणारे आम्हाला हिंदुत्वाबद्दल विचारत आहेत
- महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदीचा कायदा मग गोव्यात का नाही, असं मी विचारलं होतं. हे असं तुमचं रया गेलेलं हिंदुत्व. इथं गाय म्हणजे माता आणि पलीकड जाऊन खाता
- एकमेकांना नुसत्या टोप्या घालू नका. टोपी खाली डोकं असेल त्यात मेंदू असेल तर सरसंघचालक मोहन भागवत यांना हिंदुत्वाचा अर्थ विचारा. मोहन भागवत जे म्हणाले ते त्यांच्या राजकीय संघटनेनं पाळायला हवं. राजकारण म्हणजे शत्रूमधील युद्ध नव्हे. विवेक पाळा, असं भागवतांनी म्हटलं होतं.
- बिहारला फुकट लस देत आहे आणि महाराष्ट्राचे 38 हजार कोटी रुपये थकवले आहेत. आम्हाला कर्ज काढायला सांगत आहे. पण, का म्हणून आम्ही कर्ज काढायला हवं?
- जीएसटी पद्धत चुकली असेल तर पंतप्रधान मोदींनी प्रामाणिकपणे आपली चूक मान्य करावी. मी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी जीएसटी या करप्रणालीविषयी चर्चा करायला हवी.
- रावसाहेब दानवे म्हणाले लग्न तुम्ही केलं आणि पैसे मात्र बापाकडे मागत आहेत. दानवे जी, ते तुमचे बाप असतील, माझा बाप इथं माझ्यासोबत आहे. तुमचे भाडोत्री बाप तुम्हाला लखलाभ.
- मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटलं गेलं. घरी खायला येत नाही म्हणून मुंबईला यायचं आणि महाराष्ट्राची बदनामी करायची... ही अशी औलाद. 'मुंबई पाकव्याप्त काश्मीर, मुंबई पोलीस निकम्मे, महाराष्ट्रात सगळीकडे गांज्याची शेती आहे,' अशी बदनामी करण्यात आली. पण, मला मुंबईला पोलिसांबद्दल अभिमान आहे. छातीवर गोळ्या झेलून अतिरेक्यांना जिवंत पकडणारे जगातील एकमेव पोलीस दल मुंबईचं आहे.
- जो कुणी मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचा प्रयत्न करेल त्याच्या देहाचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही.
- भाजपनं जो डाव हरियाणाच्या कुलदीप सिंग बिष्णोई यांच्याबरोबर खेळला तोच डाव आता ते बिहारमध्ये खेळत आहे. महाराष्ट्रात हाच डाव आपल्याशी खेळण्याचा प्रयत्न केला होता. बिहारमध्ये आता ते नीतीश कुमारांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करत आहे, माझ्या नितीश कुमार यांना शुभेच्छा आहेत.

फोटो स्रोत, ANI
राज्याची सत्ता हस्तगत केल्यानंतर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा आज (25 ऑक्टोबर) स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात पार पडला.
दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी मेळाव्याचं आयोजन करण्याची शिवसेनेची परंपरा असते. पण यंदाच्या वर्षी कोरोना साथीमुळे हा मेळावा होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह होतं. अखेर हा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात घेतला गेला.
संजय राऊत यांनी दसरा मेळाव्यात काय म्हटलं?
सर्वकाही सुरळीत असतं तर अख्ख्या जगानं नोंद घ्यावी इतका विराट झाला असता. हा महाविजयादशमी मेळावा आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या दसरा मेळाव्यात बोलताना म्हटलं.
- यापुढे शिवसेनेच्या आयुष्यात जे होणार ते 'महा' असणार आहे. महाविकास आघाडी, महाराष्ट्र. हाच महाराष्ट्र पुढे दिल्लीच्या दिशेनं गेला तर कुणाला आश्चर्य वाटायला नको.
- पुढच्या वर्षीच्या दसरा मेळाव्यात आणि व्यासपीठावर शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल मी मागच्या वर्षी सांगितलं होतं. ते काही सहज बोललो नव्हतो.
- हिंदुत्वाचे धडे आम्हाला कुणाकडून घ्यायची गरज नाही, असं मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं त्यामागे वीर सावरकर यांची प्रेरणा आहे.
- कोणी कितीही कारस्थानं केली तरी ठाकरे सरकार पुढची पाच वर्षे राहील. पंचवीस वर्षांचा करार करून पुन्हा सत्तेत येऊ.
- सरकार पाडण्यासाठी तारखा दिल्या जातात. तुम्ही कितीही प्रयत्न करा पण या सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही.
- गेले वर्षभर आरोप झाले, चिखलफेक झाली. पण, मुख्यमंत्री ज्यापपद्धतीनं महाराष्ट्राचा गाडा हाकत आहेत, त्याची नोंद जगाच्या इतिहासात झाल्याशिवार राहणार नाही.
- भाजपनं जो डाव हरियाणाच्या कुलदीप सिंग बिष्णोई यांच्याबरोबर खेळला तोच डाव आता ते बिहारमध्ये खेळत आहे. महाराष्ट्रात हाच डाव आपल्याशी खेळण्याचा प्रयत्न केला होता. बिहारमध्ये आता ते नितीश कुमारांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करत आहे, माझ्या नितीश कुमार यांना शुभेच्छा आहेत.
- विरोधक म्हणजे अहंकारी राजा आणि कळसूत्री बाहुल्या आहेत.
- मराठा, ओबीसी, धनगर समाज मी सगळ्यांना सांगतो की हे सरकार तुमचं आहे. मी सगळ्या समाजांना न्याय देणार आहे.
उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून पहिला दसरा मेळावा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याची धुरा हाती घेतल्यानंतर शिवसेनेचा हा पहिलाच दसरा मेळावा असणार आहे. राज्यात नोव्हेंबर 2020 मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा हा शिवसेनेसाठी महत्वाचा आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
शिवसेनेची 53 वर्षांची दसरा मेळाव्याची परंपरा आहे. दरवर्षी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात काय होणार याची उत्सुकता शिवसैनिकांना असते.
'वर्षभरात जे साचलं, त्या सगळ्यांचा समाचार उद्धव ठाकरे घेणार'
दसरा मेळाव्याच्या तयारीसंदर्भात एबीपी माझाशी बोलताना शिवसेना प्रवक्ते संजय राऊत म्हणाले, "आजचं सीमोल्लंघन कसं असेल, ते रात्रीच समजेल. 2019 चा दसरा मेळावा आमच्यासाठी महत्त्वाचा होता. मागच्या मेळाव्यात मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असं आम्ही बोललो होतो. त्यामुळे या मेळाव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे."

फोटो स्रोत, Getty Images
"दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांनी तयारी केली आहे. पण टार्गेट करणारं राजकारण केलं नाही. व्यासपीठावर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून बोलणार नसून शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणून ते मार्गदर्शन करणार आहेत, वर्षभरात जे काही साचलं होतं, त्या सगळ्यांचा आज पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे समाचार घेतील," असंही संजय राऊत म्हणाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








