पंकजा मुंडे : 'एकदा आपल्याला शिवाजी पार्कही भरवायचं आहे'

फोटो स्रोत, facebook/pankaja munde
"पंकजाताई बाहेर येत नाही, राजकारण करत नाही असा अपप्रचार झाला. पण, कोरोना असल्यामुळे सभा घेऊ नका, अशी विनंती अधिकाऱ्यांनी मला केली होती. पण, मी आता बाहेर आलीये," असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपलं राजकारण संपल नाही, कोरोना काळात आपण नियमांचं पालन करत असल्याचं म्हटलं.
माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला गेला, पण मला आत जायचं माहितीये, तसंच बाहेर येणंही माहितीये, असं म्हणत आपल्याविरोधात राजकारण सुरू आहे, मात्र मी खंबीर आहे, असं पंकजा यांनी कार्यकर्त्यांना म्हटलं.
या मेळाव्याला तु्म्ही गर्दी केली आहे. पुढच्या वर्षी यापेक्षा जास्त गर्दी करू. एकदा आपल्याला शिवाजी पार्क भरवायचं आहे, असं पंकजा मुंडेंनी म्हटलं.
भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या आज दसरा मेळाव्यानिमित्त संत भगवान बाबांच्या अनुयायांशी संवाद साधत आहेत. आज (25 ऑक्टोबर) सकाळीच पंकजा मुंडे यांनी गोपीनाथगडावर जाऊन दर्शन घेतलं.
पंकजा मुंडे सावरगावात पोहोचल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या हस्ते भगवान बाबांची आरती झाली.
सावरगावच्या भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडे ऑनलाईन मेळावा घेत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेल्या 10 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजचं पंकजा मुंडे यांनी स्वागत केलं. मात्र, ही मदत पुरेशी नसल्याचंही त्यांनी म्हटलं.
"10 हजार कोटी रुपयांचं पॅकेज पुरेसं नाही. त्यामुळे त्यात वाढ करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करा, अशी विनंती मी त्यांना करणार आहे," असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.
'...तर फडात बसलेली माणसंही बाहेर काढता येतात'
कोरोनाकाळात माझ्या प्रयत्नांमुळे ऊसतोड कामगारांना घरी सुखरूप पाठवण्यात आलं. त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आणि त्यांनी ते ऐकलं, असं पंकजा यांनी म्हटलं.
पंकजा मुंडे यांनी म्हटलं, "आता ऊसतोड कामगारांसमोर निर्माण झालेले प्रश्न मी सरकारसमोर, शरद पवारांसमोर मांडणार आहे. माझा ऊसतोड कामगार लाचारी पत्करणार नाही. लोकांचे कारखाने सुरू होऊन चालले असून आम्ही आता गप्प बसणार नाही. "
"ऊसतोड कामगारांबद्दल जो निर्णय घ्यायचाय, तो 27 तारखेला होणाऱ्या बैठकीत घ्यावा. नाहीतर फडात बसलेली माणसंही बाहेर काढता येतात," असा इशारा पंकजा यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, FACEBOOK/PANKAJA MUNDE
"ऊसतोड कामगारांचे निर्णय हे मुंबईत बसून होत नाहीत. मग काय धाब्यावर बसून निर्णय घ्यायचे? ऊसतोड कामगारांचा नेता मुंबईत किंवा दिल्लीत बसलं तर काय बिघडतं?"
पंकजा मुंडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड झाली आहे. त्याबद्दल बोलताना पंकजा यांनी म्हटलं की, मला जे पद मिळालं आहे ते माझ्या प्रवासातील मला मिळालेली संधी आहे. ही संधी तुमच्या भल्यासाठी आहे. महाराष्ट्र सोडून निघून चालले असं काही नाहीये. बीड, महाराष्ट्र माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. मी इथंच राहणार आहे.
गेल्या वर्षभरातील राजकीय मुद्दे, एकनाथ खडसे यांच्यासारख्या ज्येष्ठ भाजप नेत्याचे पक्षांतर, ऊसतोड कामगारांचे प्रश्न इत्यादी मुद्द्यांना पंकजा मुंडे आपल्या भाषणातून हात घालण्याची शक्यता आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर हेही बीडमध्ये दसरा मेळावा घेत आहेत. उसतोड कामगार, मुकादम आणि वाहतूकदार यांना प्रकाश आंबेडकर संबोधित करणार आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
भगवानबाबा कोण होते?
या जागेला भगवानगड म्हणून ओळखलं जाण्यापूर्वी त्याला धौम्यगड किंवा धुम्यागड म्हणून ओळखलं जायचं. धौम्य ऋषींच्या नावावरुन हे नाव आलं होतं. भगवानबाबा या गडावर आले आणि त्यांनी गडाच्या बांधकामाला सुरुवात केली आणि त्यातूनच या गडाला भगवानगड नाव मिळालं. या गडाचं उद्घाटन महाराष्ट्राचे तेव्हाचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते 1958 साली झालं होतं.

फोटो स्रोत, FACEBOOK/Bhagwangad Sansthan
भगवानबाबा यांचं मूळ नाव आबाजी तुबाजी सानप. बीड जिल्ह्यातल्या सावरगाव घाट इथं त्यांचं वास्तव्य होतं. वारकरी संप्रदायातल्या भगवानबाबांनी धौम्यगडावर येऊन कीर्तन, प्रवचन, दिंडी सोहळ्यांचे कार्यक्रम ते करू लागले.
1965 साली त्यांचं निधन झाल्यावर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून भीमसेन महाराज काम पाहू लागले. तर 2003 पासून नामदेव महाराज शास्त्री या गडाचे कार्य करत आहेत. दरवर्षी दसऱ्याला इथं लाखो लोक जमतात.

फोटो स्रोत, bhagwangad.weebly.com
गोपीनाथ मुंडे, भगवानगड आणि दसरा मेळाव्याचा वाद
भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे अनेक वर्षे दसरा मेळाव्यात सहभागी व्हायचे. त्यांना मानणारा बीड जिल्ह्यातला वंजारी समाज मोठ्या संख्येने त्याला उपस्थित असायचा. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या आणि माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी ही परंपरा सुरू ठेवली. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर परळीमध्ये गोपीनाथगड नावाचे स्थळ उभारण्यात आले. त्यानंतर नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये वाद निर्माण झाला.
2016 साली गडाचे उत्तराधिकारी नामदेवशास्त्री यांनी गडावर दसरा मेळावा होणार नाही अशी भूमिका घेतली आणि परवानगी नाकारली. त्यानंतर या दोघांनीही आपल्यामध्ये वाद नाहीत असं आपापल्या बाजूने सांगितलं असलं तरी त्यांची एकमेकांना दिलेली उत्तरं-प्रत्युत्तरं बातम्यांमध्ये चांगलीच गाजली.

फोटो स्रोत, FACEBOOK/Bhagwangad Sansthan
पंकजा मुंडे यांना राजकीय भाषणाला परवानगी का नाकारली हे नामदेवशास्त्री यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. त्यामध्ये ते म्हणाले होते, "भगवानगडाची गादी वारकरी संप्रदायाची आहे. हे धार्मिक स्थान आहे. इथं जातीपातीची, राजकारणाची परंपरा नाही. गोपीनाथराव मुंडे इथं भाषण करत असत म्हणजे ती परंपरा पुढे चालवली जावी असं नाही.

फोटो स्रोत, facebook
गोपीनाथराव गेल्यानंतर गोपीनाथगडाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे राजकारणाचं स्वतंत्र अस्तित्व त्या गडाच्या रूपाने पुढं आलेलं आहे. मग गोपीनाथगडावर कीर्तन आणि इथं राजकारण असं कसं चालेल? भगवानगडाचं क्षेत्र अध्यात्मिक आहे. ही राजकारणाची जागा नाही असं नामदेवशास्त्रींनी जाहीर केलं होतं. गडाला गुरु मानत असाल तर गडाचा आदेश पाळा असं त्यांनी स्पष्ट केलं. गोपीनाथगडाची स्थापना झाली हे आपल्याला खटकलेलं नाही. बापाचं अस्तित्व त्यामुळे त्यांनी निर्माण केलं. ते कसं वाढवायचं हे त्यांनी पाहावं."

फोटो स्रोत, FACEBOOK/Bhagwangad Sansthan
त्यानंतर पंकजा मुंडे यांनी गडाच्या पायथ्याला दसरा मेळावा घेऊन लोकांना संबोधित केलं होतं. या वादानंतर भगवानगड हे नाव सर्वांच्याच लक्षात राहिलं. भगवानगडाच्या पायथ्याला पंकजा मुंडे यांनी मेळावा घेऊन शक्तीप्रदर्शन केलं होतं. निवडणुकीच्या काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बीडमध्ये आलेले असताना प्रचारसभेमध्ये गोपीनाथ मुंडे यांचं भगवानगडासंदर्भातलं शेवटचं भाषणही ऐकवण्यात आलं होतं.
त्यामध्ये गोपीनाथ मुंडे लोकांना उद्देशून, "आपण सर्व बाबांचे भक्त आहोत म्हणजे गुरुबंधू आहोत. या गडाचं महत्त्व राज्याला समजलंय आता केंद्राला समजण्यासाठी प्रयत्न करू. मी भीमसेन महाराज आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भेट घडवून आणली होती. आता न्यायाचार्य (नामदेवशास्त्री) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घडवून पंतप्रधानांना भगवानगडावर आणण्यासाठी प्रयत्न करू" असे सांगितले होते. यावरुन गोपीनाथ मुंडे यांच्या एकूणच राजकीय प्रवासात तसेच सार्वजनिक जीवनात गडाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचं दिसून येतं.
गोपीनाथगड
गोपीनाथ मुंडे यांचं निधन झाल्यानंतर परळी येथे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या 18 एकर जागेवर गोपीनाथगड हे स्मारक साकारण्यात आले. इथं गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळाही उभारण्यात आला आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK/Pankaja Gopinath Munde
या गडाचं म्हणजेच स्मारकाचं लोकार्पण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर हे स्मारकस्थळ एकप्रकारे पंकजा मुंडे तसेच त्यांची बहिण खासदार प्रीतम मुंडे यांच्या राजकारणाचं केंद्र झालं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








