हाथरस : 'फक्त मुलींना संस्कारांचे 'डोस' देऊन बलात्कार थांबतील?’

फोटो स्रोत, ENERGYY/GETTY IMAGES
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे, एका मित्राला दुपारी जेवायला घरी बोलावलं होतं. योगायोगाने एक दुसरी मैत्रिणही आली. हे दोघं माझे कितीही घनिष्ठ मित्र असले तरी एकमेकांचे जिगरी दोस्त नव्हते. दुपारची संध्याकाळी झाली, संध्याकाळची रात्र पण आमच्या गप्पा संपेनात. मित्राला म्हटलं राहून जा इथे आज. मैत्रिण राहाणारच होती. त्याने लगेच विचारलं, "अगं मला चालेल, पण तुझ्या मैत्रिणीला अडचण नको व्हायला." यावर माझी मैत्रिण म्हणाली, "तुझ्या जागी कोणीही असता तर मला ऑकवर्ड झालं असतं, तू असताना काहीच अडचण नाही."
माझ्या या मित्रासोबत कोणत्याच मुलीला भीती किंवा दडपण वाटत नाही. हे त्याचे 'संस्कार' आहेत. 'संस्कार' शब्द आल्यामुळे तुम्हालाही लक्षात आलं असेल की कोणत्या संदर्भात बोलतेय. भाजपचे उत्तर प्रदेशमधले आमदार सुरेंद्र सिंह यांनी हाथरस प्रकरणावर बोलताना विधान केलंय की 'मुलींना संस्कार दिले तर बलात्कार होणारच नाहीत'.
"बलात्काराच्या घटना काही शासन किंवा शिक्षा थांबवू शकत नाहीत. सगळ्या आईवडिलांनी आपल्या तरूण वयात आलेल्या मुलींना बोलण्यावागण्याचे, शालीन राहाण्याचे संस्कार दिेले तर अशा घटना थांबू शकतील," असं एक सोपं उत्तर त्यांनी शोधून काढलं.
असं म्हणणारे सुरेंद्र सिंह एकटेच नाहीयेत, किंवा त्यांचा पक्षही एकमेव नाहीये. आजही भारतात हजारो लोकांच्या मनात हाच विचार आहे की बलात्काराला जबाबदार बाईच असते. "लडके हैं, गलती हो जाती हैं," असं मुलायम सिंह यादवही म्हणाले होतेच की.
राजकीय नेत्यांनाच का जबाबदार ठरवायचं? यात सर्वसामान्य माणसं आहेतच. आपला समाज अजूनही तसाच विचार करतो.
गेल्या वर्षी मे महिन्यात दिल्लीतल्या एका बाईंचा व्हीडिओ व्हायरल झाला होता आणि त्याता त्या एका मॉलमध्ये असणाऱ्या काही कमी कपड्यातल्या मुलींशी भांडत होत्या. त्या मुली ऐकत नाहीत म्हणून जोरजोरात ओरडायला लागल्या आणि आसपासच्या पुरूषांना सांगायला लागल्या की 'यांना धरा आणि यांच्यावर बलात्कार करा.'
मग या बाईंचे संस्कार काय होते?
'बलात्कार होऊ द्यायचा नसेल तर व्यवस्थित कपडे घातले पाहिजेत.' हे मी, तुम्ही, बाकी महिलांनी हजार वेळा ऐकलं असेल. काही जणींनी अनेकींना ऐकवलंही असेल. 'बलात्कारासाठी मुळात बाई जबाबदार, पुरुष बिचारे महिलांच्या तोकड्या कपड्यांना बळी पडतात' असं म्हणणारे 100 पैकी 80 लोक आजही सापडतील.

फोटो स्रोत, Getty Images
पण महिलांच्या तोकड्या कपड्यांना जबाबदार धरणारे हे सोईस्करपणे विसरतात की बलात्कार 80 वर्षांच्या गावखेड्यातल्या म्हातारीवर होतो, 10 वर्षांच्या चिमुरडीवर होतो आणि 8 महिन्यांच्या बाळाला तर आपण काय कपडे घातले हे कळतही नसतं तरीही होतो. मग इथे महिलांच्या कपड्यांचा संबंध काय?
मागच्या वर्षी व्हॅलेंटाईन डेला एक कपल कुठल्याशा टेकडीवर झाडामागे बसलं होतं तर तथाकथित संस्कृतीरक्षकांनी त्यांच्यावर हल्ला करून त्या मुलीचा विनयभंग केला. त्यानंतर फिरलेल्या अनेक मेसेजसमध्ये एक गोष्ट कॉमन होती मुलीचा विनयभंग झाला हे चुकीचंच, पण मुलीने मुळात अशा ठिकाणी जावंच कशाला, मुलासोबत बसावंच कशाला? ही वाक्यं तुम्हाला ऐकल्यासारखी वाटत असतील.
निर्भयाच्या बलात्काऱ्यांनी तिच्यावर केलेल्या बलात्काराचं समर्थन करताना असंच काहीसं म्हटलं होतं. 'मुळात चांगल्या घरच्या मुली रात्री 9 वाजता बाहेर फिरत नाहीत आणि परक्या पुरुषाबरोबर तर नाहीच,' असं त्यातल्या एकाने बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं. इतकंच कशाला तिने बलात्काराला विरोध केला नसता तर तिला आम्ही कदाचित जिवंत सोडलं असतं असंही एकाने म्हटलं होतं.
कधीही देशात अशी घटना घडली की तीच तीच वाक्य ऐकायला येतात. ती मुलगी काय करत होती, कुठे गेली होती, कशाला गेली होती, जीन्स घातली म्हणून बलात्कार होतात, मोबाईल वापरला म्हणून बलात्कार होतात, शाळेत गेली, कॉलेजात गेली, नोकरी केली एक स्वतंत्र माणूस म्हणून सन्मानाने जगायला जे काही करावं लागतं ते केलं म्हणून बलात्कार होतात. देजा व्हू होत राहातं. सतत एकच दुःस्वप्न पडतं ना, तशी भावना मनात येत राहाते.
मग कोणत्या संस्कारांची गोष्ट करतोय आपण? माणूस म्हणून माणसासारखं जगावं, समतेचा मार्ग पत्कारावा हे आपल्या लेखी संस्कार नाहीतच. संस्कार म्हणजे काय तर ज्या रूढी परंपरांनी शतकानुशतकं बायकांना दुय्यम लेखलं, जनावराहून वाईट वागणूक दिली, त्या संस्कारांची तळी उचलणं.

फोटो स्रोत, Getty Images
मागे एकदा स्त्रीवादी अभ्यासक आणि लेखिका मीनल जगताप यांच्याशी बोलत होते, तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, "पुरुषांवर कायम हेच ठसवलं गेलंय की बाई वस्तू आहे. आपला धर्म, संस्कृती, इतकंच काय सध्याचं राजकारण हेच ठसवत असतं. आणि या वस्तूचा विनीमय कसा करायचा, हे ज्याची मालकी आहे तो ठरवणार."
पण ही 'वस्तू' जेव्हा बोलायला लागते, विरोध करायला लागते, तेव्हा समाजाला काचायला लागते. आणि या काचण्यावरचा इलाज म्हणजे संस्कृती, संस्कार. पण हे सगळे बाईच्याच वाटेला बरका. जिला हे 'संस्कार' मान्य नाहीत तिच्यावर झालेला बलात्कार अगदीच समर्थनीय नसला तरी कुजबुजत का होईना मान्य.
याला सोप्या शब्दात रेप कल्चर म्हणतात. 'रे..प क..ल्च..र'!
स्पष्ट सांगायचं तर रेप कल्चर म्हणजे बलात्काराचं उदात्तीकरण. बाईने ऐकलं नाही, समाजाने घालून दिलेले जाचक नियम पाळले नाहीत तर तिला अद्दल घडवायला तिच्यावर बलात्कार करायला लागणारी संस्कृती म्हणजे रेप कल्चर.
साहजिक आहे की बलात्कार पीडितेलाच ही 'संस्कृती' दोषी मानते. तिनेचं काहीतरी केलं, किंवा काहीतरी केलं नाही म्हणून तिचा बलात्कार झाला असं म्हणते. आणि अशा बलात्कारांचं गांभीर्यही कमी करते.
मुलग्यांवर काय संस्कार करतो हो आपण?
लहान मुलं काय ऐकत मोठी होतात? मुलीसारखा रंग वापरू नकोस, चालू नकोस, बोलू नकोस, विचार करू नकोस. समजून घेणं बाईचं काम, शांत राहणं बाईचं काम, ताकद न लागणारी लहान लहान कामं करणं बाईचं काम या गोष्टी ऐकत ऐकत मुलं मोठी होतात.

फोटो स्रोत, Getty Images
तू स्वयंपाकघरात जाऊ नकोस, 'अरे पुरुषासारखा पुरुष तू आणि पोरीच्या हातचा मार खातोस' हे वाक्य माझ्या शेजारणीने तिच्या मुलासाठी उच्चारलेलं मी माझ्या कानाने ऐकलंय. मुलाचं वय होतं चार आणि ज्युनिअर केजीमध्ये शेजारी बसणाऱ्या मुलीशी त्याचं भांडणं झालं होतं.
"लहानपणी मुलगा रडतो, तेव्हा काय म्हणतो आपण? काय मुलीसारखा मुळूमळू रडतोस? तिथून मनाचं कंडिशनिंग सुरु होतं," दिल्लीतल्या मानसोपचार तज्ज्ञ डॉ शिल्पा गुप्ता सांगतात.
"शून्य ते पाच या वयातच आपण मुलांची पुरुष ही ओळख पक्की करून टाकतो की हाच मुलगा मोठा झाल्यावर बहिणीशी भांडतो, बायकोला मारतो, आईला शिवीगाळ करतो, प्रसंगी बलात्कारही करू शकतो, कारण पुरुष असणं म्हणजे हेच असं त्याच्या मनावर नकळतपणे बिंबवलं गेलेलं असतं," त्या म्हणतात.
मग या मुलांच्या 'संस्कारां'साठी आपण काय करतो? आता अनेक जणी, चांगल्या, सुशिक्षित घरातल्या बायकाच, सोशल मीडियावर सुस्कारे सोडत आहेत की, 'बरं झालं बाबा मला मुलगी नाही,' किंवा ज्यांना मुली आहेत ते धास्तावलेत आणि मुलींना कराटे क्लासेसला टाकायची भाषा करत आहेत.
एक मिनीट थांबता का प्लीज? मुलगी नाही यात आनंद वाटणं म्हणजे आपण त्याच रूढीवादी पितृसत्तेकडे परत जातोय ना? आज मुलगी नसण्याचा आनंद आहे, उद्या मुलगी झाल्याचं दुःख असेल, परवा मुलगी झाली म्हणून विहीरीत फेकलं जाईल. काय चाललंय काय? सरळ प्रश्नांना उलटी उत्तरं का शोधतोय आपण?

फोटो स्रोत, Thinkstock
मुलींना कराटे क्लासला घालणं हे सोल्युशन नाहीये, मुलांना पुरुषी मानसिकतेतून वाचवणं हे सोल्युशन आहे. आपण मुलांना पुरुषी वर्चस्व शिकवायचं, मुलींवर ठसवायचं 'मर्यादे' चं महत्त्व आणि बलात्कार झाला की महिला अत्याचाराच्या पोकळ गप्पा मारायच्या हे समाज म्हणून आपण आजारी असल्याचं लक्षण आहे.
"पूर्ण कपडे घालत जा इथंपासून पिस्तूल वापरायला शिक हे सगळे सल्ले मुलींनाच देतोय आपण. यात काहीतरी मुलभूत गडबड आहे. बलात्कार थांबावेत म्हणून आपण मुलग्यांना काय सल्ले देतोय? बलात्कार का घडत आहेत याच्या मुळाशी कधी जाणार आपण," महिला हक्क संरक्षण समितीच्या गौरी पटवर्धन मला सांगत होत्या.
वर्चस्व गाजवण्याची वृत्ती चुकीची आहे आणि सेक्शुअल डिझायर कशी हाताळायची हे आपण आपल्या मुलग्यांना शिकवत नाहीत तोवर बलात्कार होत राहाणार, त्या पुढे सांगतात. मुलग्यांकडे लक्ष द्या, मुली आपोआप सुरक्षित होतील.
हाथरस प्रकरणावर ही संस्कारांची प्रतिक्रिया पाहून एका मैत्रिणीला मेसेज केला, 'बघ काय म्हणत आहेत लोक.' तिचं उत्तर आलं, "म्हणूनच आपण आता प्रयत्न करायचे की आपण, आपल्या आसपासच्या मुली 'संस्कारी' न राहाण्यासाठी."
साहजिक आहे म्हणा, तिने, मी आणि माझ्यासारख्या असंख्य मुलींनी समाज म्हणतो त्या अर्थाने 'संस्कारी' न राहाण्यासाठी प्रयत्न केलेत, आता उलटं जाऊन कसं चालेल?
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








