बिहार निवडणूक 2020: तीन टप्प्यात मतदान होणार, 10 नोव्हेंबरला निकाल

बिहार निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यात मतदान होणार असून, 10 नोव्हेंबरला मतमोजणी होईल.

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषद घेऊन बिहार विधानसभा निवडणुकीच्या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती दिली. कोरोनाचा काळ लक्षात घेता निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत.

बिहार विधानसभा 243 सदस्य संख्येची आहे. नोव्हेंबरच्या 29 तारखेला बिहार विधानसभेची मुदत संपत आहे.

तीन टप्पे आणि निकालाची तारीख :

  • पहिला टप्पा : मतदान - 28 ऑक्टोबर
  • दुसरा टप्पा : मतदान - 3 नोव्हेंबर
  • तिसरा टप्पा : मतदान - 7 नोव्हेंबर

कुठल्या टप्प्यात किती मतदारसंघात मतदान?

  • पहिल्या टप्प्यात 71 मतदारसंघात मतदान होईल.
  • दुसऱ्या टप्प्यात 94 मतदारसंघात मतदान होईल.
  • तिसऱ्या टप्प्यात 78 मतदारसंघात मतदान होईल.

बिहारमध्ये एकूण 7 कोटी 18 लाख मतदार आहेत. त्यात 3 कोटी 79 लाख पुरुष मतदार, तर 3 कोटी 39 लाख महिला मतदार आहेत.

कोरोनाच्या अनुषंगाने महत्त्वाचे बदल:

  • एका बूथवर केवळ एक हजार मतदार मतदान करतील
  • सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान (एका तासाने मतदानाचा कालावधी वाढवला)
  • सात लाख सॅनिटायझर्स, 46 लाख मास्कची तयारी
  • निवडणूक प्रचारादरम्यान सोशल डिस्टंन्सिंगचं पालन अनिवार्य
  • अर्ज दाखल करताना दोनपेक्षा जास्त वाहनं आणू नयेत
  • उमेदवार ऑनलाईन अर्ज भरू शकतात
  • क्वारंटाईन असलेले मतदार सर्वात शेवटी मतदान करतील
  • कोरोनाग्रस्त मतदार शेवटच्या एका तासात मतदान करतील

कोरोना काळात पहिलीच मोठी निवडणूक

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून देशातील अनेक निवडणुका स्थगित करण्यात येत होत्या. त्यामुळे बिहार निवडणूक वेळेत होईल की पुढे ढकलण्यात येईल, याबाबत संभ्रमावस्था होती.

पण आता सोशल डिस्टन्सिंगसारखे नियम आणि अटी, शर्थींसह निवडणूक घेण्यास परवानगी देण्यात येत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)