दीपिका पदुकोणचं व्हॉट्सअप चॅटिंग बाहेर कसं काय आलं असेल?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सर्वप्रिया सांगवान
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी आता बॉलिवूडमधल्या ड्रग्ज चौकशीपर्यंत येऊन ठेपली आहे. तसंच या प्रकरणाशी संबंधित लोकांचे व्हॉट्सअप चॅट मीडियात लीक झाले आहेत. अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांची आज नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चौकशी करणार आहे.
नुकतंच अभिनेत्री दीपिका पदुकोणचे व्हॉट्सप चॅट मीडियात दाखवले जात आहे, यात ती कुणाकडेतरी ड्रग्जची मागणी करताना दिसून येत आहे.
असंही म्हटलं जात आहे की, गेल्या काही वर्षं जुना हा संवाद आहे जो डिलिट करण्यात आला होता, पण चौकशी संस्थांना तो मिळण्यात यश आलं आहे.
पण, हे शक्य कसं झालं? व्हॉट्सअपनं स्वत:हून ही माहिती चौकशी संस्थांना पुरवली की दुसऱ्या काही पर्यायांचा वापर करून ही चॅट मीडियापर्यंत पोहोचवण्यात आली? याशिवाय व्हॉट्सअप प्रायव्हसीविषयी जे दावा करतं, त्यावर ते खरोखरच टिकतं का?

फोटो स्रोत, Getty Images
व्हॉट्सअप मेसेज स्टोअर करतं का?
व्हॉट्सअपच्या प्रायव्हसी धोरणानुसार, कंपनी सामान्यपणे यूझर्सचे मेसेज सेव्ह करून ठेवत नाही. एकदा का मेसेज समोरच्याला डिलिव्हर झाला की तो व्हॉट्सअपच्या सर्व्हरमधून डिलिट होतो.
पण, एखादा लोकप्रिय व्हीडिओ अथवा फोटो खूप मोठ्या प्रमाणावर लोक शेयर करत असतील, तर कंपनी त्याला अधिक काळासाठी जनत करून ठेवू शकते.
वापरकर्त्यांचे मेसेज एनक्रिप्टेड असतात. याचा अर्थ एका मोबाईलमधूल दुसऱ्या मोबाईलपर्यंत मेसेज पोहोचत असताना व्हॉट्सअप अथवा इतर कोणतीही थर्ड पार्टी ते वाचू शकत नाही.
वापरकर्त्यांची परफॉर्मन्स संबंधित माहितीसुद्धा व्हॉट्सअप जपून ठेवतं. जसं की वापरकर्ता व्हॉट्सअपचा वापर कसा करतो, कशाप्रकारे दुसऱ्यांशी संवाद साधतो, ही माहिती.
व्हॉट्सअप तुमची माहिती एकत्र करू शकतं, तिचा वापर करू शकतं आणि तिला सेव्हही करू शकतं, तसंत ती शेयरसुद्धा करू शकतं. पण, केव्हा जेव्हा कंपनीला ती खालील प्रकरणांत महत्त्वाची वाटते.

फोटो स्रोत, Getty Images
- एखाद्या कायदेशीर प्रक्रियेसाठी सरकारनं आवाहन केलं तर.
- आपल्या नियमांना लागू करण्यासाठी अथवा इतर नियमांना लागू करण्यासाठी, तसंच एखाद्या बाबीचं उल्लंघन झालं असेल तर
- एखाद्या बेकायदेशीर कामाची माहिती मिळवण्यासाठी, चौकशी, बचाव किंवा सुरक्षेसाठी
- आपले वापरकर्ते, व्हॉट्सअप, फेसबुकच्या कंपनीचे अधिकारी आणि संपत्तीच्या संरक्षणासाठी.
एखाद्या व्यक्तीला व्हॉट्सअपची सेवा पुरवताना त्याने केलेले मेसेज स्टोअर केले जात नाही, पण विशेष परिस्थितीत ते स्टोअर केले जातात आणि शेयरही केला जातात, असं व्हॉट्सअप सांगतं.

फोटो स्रोत, Getty Images
व्हॉट्सअप चॅट कशी समोर येत आहे?
बॉलीवूडच्या ड्रग्ज प्रकरणात चॅट समोर येण्याला तीन पैलू आहेत...
- चॅट लीक कशी होत आहे?
- चॅट लीक होणं कायदेशीररित्या योग्य आहे की अयोग्य?
- तिसरं म्हणजे व्हॉट्सअपची जी सुरक्षा प्रणाली आहे, ती ग्राहकांसाठी योग्य आहे की नाही?
व्हॉट्सअपचं एन्क्रिप्शन फक्त एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत आहे. म्हणजे एका फोनमधून दुसऱ्या फोनवर व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवला जाणारा मेसेज व्हॉट्सअप अथवा तिसरी पार्टी म्हणजे सरकारी अथवा खासगी संस्था वाचू शकत नाही.
पण, त्यानंतर तो मेसेज दोन्ही फोनमध्ये कायम राहतो. तिथून डिलिट झाल्यानंतरही मेसेज पुन्हा मिळवता येतो, पणकसा?
अनेकदा वापरकर्त्यानं व्हॉट्सअपमध्ये अर्काईव्हचा पर्याय निवडलेला असतो, ज्यामुळे त्यांचं चॅट गूगल ड्राईव्ह अथवा फोनमधील इतर ड्राईव्हमध्ये स्टोअर होतं.
अनेकदा वापरकर्त्यानं चॅट बॅकअपचा पर्यायही निवडलेला असतो, ज्यामुळे ती चॅटिंग फोनमध्येही सेव्ह राहते.
सायबर एक्सपर्ट विराग गुप्ता सांगतात, "सध्या या ड्रग्ज प्रकरणात अनेकांना अटक केली जात आहे. अनेकांची चौकशी सुरू आहे. आतापर्यंत तर हेच समोर आलं आहे की, याच लोकांच्या मोबाईलमधील चॅट्सचे स्क्रीनशॉट घेण्यात आले आहेत किंवा फोनच्या ड्राईव्हधून चॅट बाहेर काढण्यात आली आहे."

फोटो स्रोत, Getty Images
तपास यंत्रणांवर ही माहिती फुटल्याबद्दल कारवाई होऊ शकते का?
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अक्ट 2000च्या कलम 72 नुसार ज्या व्यक्तीला कोणाचा तरी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड, पुस्तकं, माहिती किंवा कागदपत्रं ठेवून घेण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे, त्याने मूळ व्यक्तीच्या परवानगीशिवाय या गोष्टी इतर कोणाला दिल्यास त्याला दोन वर्षांपर्यंतची शिक्षा किंवा 1 लाखाचा दंड किंवा दोन्ही होऊ शकतं.
सध्या मीडियामध्ये जे चॅट फिरत आहेत, ते त्या व्यक्तीच्या खासगी हक्कांचं उल्लंघन तर आहेच पण ही इतरांच्या सुरक्षिततेशी निगडीत बाबही असल्याचं विराग सांगतात. कारण एका व्यक्तीच्या मोबाईलमध्ये इतर अनेक लोकांविषयीची माहिती असते.
तपास यंत्रणा या शोध प्रक्रिया वा तपास सुरू असताना महत्त्वाचे पुरावे किंवा तपासातले महत्वाचे टप्पे जाहीर करू शकत नसल्याचं विराग म्हणतात. कारण असं केल्याने ती केस कमकुवत होते. असं करणं इंडियन पीनल कोडनुसार चूक आहे.

फोटो स्रोत, Getty Images
व्हॉट्सअप चॅट कोर्टात पुरावा म्हणून सादर केला जाऊ शकतो का?
एव्हिडन्स ऍक्ट (Evidence Act) च्या 65(ब) कलमान्वये, चॅटमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नसल्याच्या हमीपत्रासोबत व्हॉट्सअप चॅट पुरावा म्हणून कोर्टात सादर केला जाऊ शकतो.
पण या चॅटच्या आधारे कोणताही गुन्हा सिद्ध करता येऊ शकत नसल्याचं विराग गुप्ता सांगतात. एखाद्या व्यक्तीला दोषी सिद्ध करण्यासाठी इतर पुरावेही द्यावे लागतात.
सोबतच हे चॅट्स तपास यंत्रणांना कसे मिळाले म्हणजे याचा स्रोत अधिकृत आहे की अनधिकृत हे देखील सांगावं लागतं. हे चॅट मिळवताना योग्य प्रक्रियांचं पालन करण्यात आलं की नाही, हे देखील लक्षात घेतलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या वर्षी मुंबई हायकोर्टाने फोन टॅपिंगबाबतच्या एका प्रकरणात हे सांगितलं होतं.
लाचखोरी प्रकरणी एका उद्योगपतीच्या विरोधात खटला सुरू होता. या प्रकरणाच्या सीबीआय तपासात केंद्र सरकारने त्यांना फोन टॅप करण्याची परवानगी दिली होती. पण 'हे बेकायदेशीर असून फोन टॅपिंगचा वापर एखादी सार्वजनिक आणीबाणी वा सार्वजनिक सुरक्षितेतसाठीच केला जाऊ शकतो. या प्रकरणासंदर्भात फोन टॅपिंग हे खासगी हक्कांचं उल्लंघन आहे,' असं म्हणज कोर्टाने हा पुरावा फेटाळून लावला होता.
'व्हॉट्सअप लॉ' या पुस्तकाचे लेखक आणि सायबर कायद्यांचे जाणकार पवन दुग्गल म्हणतात, "व्हॉट्सअपची प्रायव्हसी पॉलिसी काळजीपूर्वक वाचल्यास लक्षात येईल की तुम्ही जी माहिती तिथे देताय ती सार्वजनिक माहिती आहे आणि त्यावर कोणताही खासगीत्वचा हक्क लागू होत नाही."
व्हॉट्सअप हॅक करणंही कठीण नसल्याचं ते सांगतात.
सायबर प्रकरणांचे जाणकार असणारे मुंबईचे प्रशांत माळी सांगतात, "जर एखादी सरकारी यंत्रणा युजरवर पाळत ठेवत असेल, तर व्हॉट्सअप त्या युजरला कोणाताही अॅलर्ट किंवा खबरदारीचा इशारा देत नाही. जर पाळत ठेवणाऱ्या एखाद्या कंपनीने युजरच्या व्हॉट्सअपमध्ये स्पायवेअर घातलं तर युजरला कळणारही नाही."
इस्रायली कंपनीने पेगासुस नावाचं स्पायवेअर अनेक व्हॉट्सअप अकाऊंट्समध्ये इन्स्टॉल केल्याच्या बातम्या गेल्या वर्षी आल्या होत्या आणि जगभर याविषयी चर्चा झाली होती.

फोटो स्रोत, Getty Images
प्रशांत म्हणतात, "व्हॉट्सअपमधली प्रायव्हसीबद्दलची एकमेव विशेष बाब म्हणजे की हे मेसेज एनक्रिप्टेड असतात. पण अनेक कंपन्या हल्ली हे करत आहेत. ATM कार्ड्सही अशीच असतात."
शिवाय तुम्ही व्हॉट्सऍपवर काय करता, कोणाला काय पाठवता, तुम्हाला काय आवडतं, तुम्ही कोणत्या ग्रुपचे सदस्य आहाता ही सगळी माहिती म्हणजेच तुमचा मेटाडेटा व्हॉट्सअप अनेक दिवस ठेवतं आणि फेसबुक, इन्स्टाग्रामसोबत शेअरही करतं. म्हणजे एक प्रकारचं युजर प्रोफायलिंग केलं जातं.
जेव्हा तपास यंत्रणा एखादी माहिती मागतात आणि ती व्हॉट्सअपकडे उपलब्ध असेल, तर अनेकदा ती पुरवलीही जाते. जर एखाद्या युजरला आपल्या खासगी हक्कांचं उल्लंघन झाल्याबद्दल कायदेशीर कारवाई करायची असेलच, तर व्हॉट्सऍप भारतीय न्यायव्यवस्थेच्या अधिकारांच्या कक्षेत येत नाही. ही कंपनी कॅलिफोर्नियाच्या न्यायालयाच्या अधिपत्याखाली येते. शिवाय व्हॉट्सअपचे सगळे नियम आणि अटी इतक्या विस्तृत आहेत की कायदेशीर प्रक्रियेच्या मार्गात अनेक अडचणी निर्माण होतात.
पवन म्हणतात, "जर तुम्हाला एखादी गोपनीय माहिती शेअर करायची असेल तर व्हॉट्सअप त्यासाठी योग्य माध्यम नाही. कारण तुमची खासगी माहितीही ते सार्वजनिक असल्याचं मानतात."
विराग गुप्ता महत्त्वाचा मुद्दा मांडतात. ते म्हणतात, "व्हॉट्सअप पैसे न घेता ग्राहकांना सेवा देतं. म्हणूनच व्हॉट्सअपचं जे अब्जावधी डॉलर्सचं मूल्यांकन आहे ते संपूर्णपणे डेटावर अवलंबून आहे आणि तिथूनच त्यांना फायदा होतो. म्हणूनच ज्या कंपन्या थर्ड पार्टीसोबतही डेटा शेअर करतात, त्यांना तुम्ही पूर्णपणे सुरक्षित म्हणू शकत नाही. व्हॉट्सअपचे फेसबुकसारख्या अॅपशी संबंध आहेत. त्यामुळे लोकांची माहिती फुटण्याची शक्यता आहे."

फोटो स्रोत, Getty Images
व्हॉट्सअपवरचा लोकांचा विश्वास कमी होईल का?
व्हॉट्सअपवरचा लोकांचा विश्वास लगेच ढळणार नसल्याचं पवन म्हणतात. सध्या भारतात एक प्रकारची क्रांती होत आहे.
प्रत्येक भारतीयाला स्वतःविषयीची माहिती शेअर करायची आहे. मग ती खासगी बाब असो वा व्यावसायिक.पण आपण जी माहिती शेअर करतोय त्याचा कायदेशीर परिणाम काय असू शकतो यविषयी त्यांना माहित नाही. म्हणूनच अशी प्रकरणं समोर येऊनही लोकांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही."
दुग्गल म्हणतात, "त्यांना वाटतं की ही मोठी लोकं आहेत, यांचे चॅट्स पकडले जाऊ शकतात. माझे चॅट्स का कोणी पकडेल. या गैरसमजातूनच लोक हे माध्यम वापरत राहतील. व्हॉट्सअप वापरणारी लोकं त्याचे नियम आणि अटी वाचत नाहीत."
भारतातला खासगीत्वाचा (Privacy) अधिकार
पवन दुग्गल म्हणतात, "भारतातला सायबर कायदा प्रायव्हसीविषयी फारशी दखल घेत नाही. पण सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश पुट्टास्वामी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या खटल्यामध्ये हे स्पष्ट करण्यात आलं होतं की खासगीपणाचा अधिकार हा आपला मूलभूत अधिकार आहे."
"पण भारतात प्रायव्हसीबद्दलचा विशिष्ट कायदा नाही. इतकंच काय डेटा सुरक्षिततेविषयीही कायदा नाही. सरकारही खासगीत्वाला महत्त्वं देत नाही. सायबर सुरक्षा आणि खासगीत्वं जपण्याचा कायदा आणण्याची भारताला गरज आहे. सोबतच सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या जबाबदाऱ्याही पुन्हा अधोरेखित करण्याची गरज आहे."
रकुल प्रीत आणि दीपिकाच्या मॅनेजरची आज चौकशी
अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांची आजा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चौकशी करणार आहे.

फोटो स्रोत, INSTAGRAM/RAKULPREET
रकुल प्रीत सिंह हिला खरंतर कालच (24 सप्टेंबर) NCB समोर हजर व्हायचं होतं. मात्र, समन्स मिळालं नसल्याचं कारण पुढे करण्यात आलं. त्यामुळे NCB ने तिच्या संपर्क साधला. त्यानंतर रकुल प्रीत सिंहने समन्स स्वीकारल्याचं सांगितलं.
दुसरीकडे, दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशने तब्येत ठीक नसल्याचे कारण देत एक दिवसाचा अवधी मागितला होता. त्यामुळे तिलाही एक दिवस उशिरा चौकशीसाठी बोलावण्यात आले.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








