एकनाथ खडसे : अजून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याशी कसलीही चर्चा नाही

फोटो स्रोत, facebook
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण ही फक्त चर्चाच आहे.
"अजून राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याशी कसलीही चर्चा झालेली नाही. माझा पण आता तरी पक्षांतराचा विचार नाही," असं एकनाथ खडसे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना स्पष्ट केलं आहे.
खडसे पुढे म्हणाले, "ही चर्चा मी प्रसारमाध्यमांमधून ऐकतोय. याआधी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं होतं एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये आले तर आनंद होईल. त्याचबरोबर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी खडसे यांनी शिवसेनेत यावं असं म्हटलं. ही विधानं विविध पक्षाच्या नेत्यांनी केली. राष्ट्रवादीत पक्षांतर करण्याबाबत असं काही घडलेलं नाही. मी अजूनतरी पक्षांतर करण्याचा माझा विचार पक्का केलेला नाही."
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी" राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांना कोणतीही ऑफर दिलेली नाही आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेण्यासंदर्भातला कुठला प्रस्तावही नसल्याचं स्पष्ट करत," या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
एकनाथ खडसे यांची भाजपमध्ये होत असलेली कोंडी त्यांनी जाहीरपणे सांगितली आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी त्यांचं पुस्तक प्रकाशित केलं. या पुस्तकात त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्याचबरोबर फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार कोसळताच खडसे यांनी भाजपला घरचा आहेर दिला होता.
यावर्षी मे महिन्यात झालेल्या विधानपरिषद निवडणुकीतही भाजपने एकनाथ खडसे यांना तिकीट नाकारलं होतं. त्या आधीपासूनच खडसे भाजपच्या विद्यमान नेत्यांवर नाराज होते.
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत जाण्याचा सल्ला दिला होता. यावर एकनाथ खडसेंनी बीबीसी मराठीशी बोलताना भाजपमधली लोकशाही प्रक्रिया संपलेली आहे अशी टीका केली होती. तसंच चंद्रकांत पाटील यांनीच निवृत्त व्हावं असं खडसे त्यावेळी म्हणाले होते.
2016 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून राजीनामा असेल, विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारलं जाणं असेल, मुलगी रोहिणी खडसेंचा विधानसभा निवडणुकीतला पराभव असेल या सगळ्या गोष्टींसाठी एकनाथ खडसेंनी वारंवार भाजपच्या राज्य नेतृत्वाला जबाबदार धरलंय.
पण अनेकांच्या मनातला मुख्य प्रश्न हा आहे की इतके वेळा पक्षाने आपल्यावर अन्याय केल्याचा आरोप करणारे खडसे पक्षाला सोडचिठ्ठी देणार का?
घरची धुणी
नुकतेच खडसे यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. "फडणवीस हे ड्राय क्लिनर होते. आरोप झाला की क्लिनचिट द्यायचे. पण नाथाभाऊंना दिली नाही. माझ्यावर एवढा राग का आहे," असा प्रश्न खडसेंनी विचारला होता. खडसे यांच्यावर लिहिण्यात आलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी त्यांनी हा प्रश्न विचारला होता.
खडसेंच्या याच प्रश्नावर प्रतिक्रिया विचारली असता देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंना राजीनामा नेमका का द्यावा लागला याचंही स्पष्टीकरण दिलं होतं. शिवाय, "माझ्यामध्ये फार संयम आहे. मी घरची धुणी रस्त्यावर कधीच धुत नाही. खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे मी त्यांच्यावर टीका करणार नाही, " असं फडणवीस म्हणाले होते.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








